साने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 08:09 AM2018-12-16T08:09:00+5:302018-12-16T08:10:02+5:30

आत्मप्रेरणेचे झरे : साने गुरुजी कथामाला हा मुलांना संस्कारक्षम गोष्टी सांगणारा उपक्रम आहे. पतीच्या अपघाती मृत्यूनंतर हा उपक्रम  समर्थपणे पुढे नेणाऱ्या जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील राणी वाहेगाव येथील शिक्षिका कल्पना हेलसकर यांची या महिन्यातील साने गुरुजी जन्मदिनानिमित्त मुलाखत.

Dedication to the Sane Guruji Kathamala Movement | साने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण

साने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण

googlenewsNext

- हेरंब कुलकर्णी 

प्रश्न - तुमचे दिवंगत पती दत्तात्रय हेलसकर यांनी मराठवाड्यात साने गुरुजी कथामालेचे झपाटल्यासारखे काम केले. त्या कामाविषयी थोडे सांगा?
  -    यदुनाथ थत्तेच्या प्रेरणेने त्यांनी साने गुरुजी कथामालेचे काम १९९३ पासून सुरूकेले. अतिशय गरीब परिस्थितीतून पुढे ते आले. मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात हे काम पोहोचवले. २००१ साली आमचे लग्न झाले; पण आमच्या  दोघांपैकी एकाचा पगार या कामासाठी त्यांनी खर्च केला. प्रत्येक तालुक्यात स्पर्धा परीक्षा घेणे, शिक्षकांना साने गुरुजी पुरस्कार देणे, कथामालेची शाखा सुरू करणे असे उपक्रम ते सतत करीत. साने गुरुजी कथामालेच्या वतीने श्यामची आई पुस्तकावर परीक्षा घेतली जाते. आतापर्यंत १२००० पुस्तके वितरित करण्यात आली आहेत. मुलांसाठी बाल चित्रपट महोत्सव त्यांनी आयोजित केला. २०१५ साली या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला जातानाच त्यांचे अपघाती निधन झाले. 

 प्रश्न - पतीच्या दुर्दैवी निधनानंतर तुम्ही हे काम कसे पुढे नेले ?
  -    त्यांच्या मृत्यूने मी कोलमडून गेले होते; पण माझे वडील मला म्हणाले की, आता रडू नको त्यांचे काम तू पुढे नेले पाहिजे. मग मी मनाची उभारी धरली व साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष सुहास सदाव्रते व इतर कार्यकर्त्यांसोबत काम सुरूकेले. मी ७ ते ८ साने गुरुजी कथामालेच्या शाखा सुरु केल्या. साने गुरुजी पुरस्कार संपूर्ण मराठवाड्यात दिला जातो. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांनी ज्या ज्या शाळेत नोकरी केली तिथे ५०० वह्या वाटप केल्या. शिक्षकांनी मुलांना गोष्टी सांगाव्यात यासाठी शिक्षकात कथाकथन कौशल्य येणे गरजेचे आहे म्हणून शिक्षकांच्या कथाकथन स्पर्धा कथामालेने मराठवाडा विभागात सुरूकेल्या. त्यात शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यातून प्रत्यक्ष शाळेत शिक्षकांचे मुलांना गोष्टी सांगण्याचे प्रमाण वाढते आहे. दत्तात्रय हेलसकर त्यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी साने गुरुजी जन्मदिवशी जालना जिल्ह्यात बालमहोत्सव सुरु केला. त्यात मुलांसाठी विविध उपक्रम असतात. मुलांसाठी संस्कार शिबिरे आयोजित केली जातात. अशाप्रकारे दत्तात्रय हेलसकर यांचे कार्य आम्ही पुढे नेतो आहोत. 

प्रश्न - तुम्ही एक उपक्रमशील शिक्षिका आहात. तुमच्या शाळेवर तुम्ही कोणते उपक्रम राबविता?
  -    माझ्या शाळेचे गाव हे गरीब कष्टकरी वर्गाचे गाव आहे. साने गुरुजींची वंचित मुलांविषयीची तळमळ लक्षात घेऊन मी ३८ शाळाबाह्य मुलींना शाळेत आणले आहे. या मुलींच्या घरच्या समस्या लक्षात आल्या. त्यात मी शिक्षिका म्हणून लक्ष घातले. मीना राजू मंच या उपक्रमात मी विद्यार्थ्यांना या शाळाबाह्य मुलांच्या घरी घेऊन गेले. त्यातून या मुली शाळेत येऊ लागल्या. या उपक्रमासोबत मी शाळेत बाल वाचनालय सुरूकेले आहे. मधल्या सुटीत मुले खिचडी खाल्ली की ही पुस्तके वाचतात व पुस्तकात नेमके काय आवडले? याविषयी मुलांना बोलायला सांगते. मुले शेवटच्या तासिकेला किंवा परिपाठात वाचलेल्या पुस्तकाविषयी माहिती सांगतात. शाळेतील मुले शिव्या देत. हे प्रमाण खूपच होते. त्यासाठी ‘शिवीबंद अभियान’ सुरूकेले. मुलांना शिव्या देण्यामागची विकृती समजून सांगितली. तरीही कुणी शिवी दिली तर त्याला फुल देऊन आम्ही गांधीगिरी करतो. त्यातून शिव्या बंद झाल्या. वाचन प्रेरणा दिनाच्या दिवशी शाळेत पुस्तक जत्रा भरवली. मुलांना २०० पुस्तके आणून दिली व मुलांनी ती पुस्तके खरेदी केली. त्यातून पुस्तक खरेदीचा संस्कार मुलांवर झाला. पालक संपर्क महत्त्वाचा मानून शनिवारी एका गटाच्या पालकांना एकत्र आणतो आणि त्यांच्या मुलांच्या विकासासाठी चर्चा केली जाते.     
( herambkulkarni1971@gmail.com ) 

Web Title: Dedication to the Sane Guruji Kathamala Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.