देह आणि देही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 09:55 AM2018-03-11T09:55:21+5:302018-03-11T09:55:21+5:30
बंगळुरूत आर्ट आॅफ लिव्हिंगच्या वतीने अलीकडेच आंतरराष्ट्रीय महिला परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेतली ही एक खास भेट..
श्री श्री रविशंकर
अनेकजण मला विचारतात, अध्यात्म म्हणजे नक्की काय? स्पिरिच्युअॅलिटी कशाला म्हणायचे? या सा-याकडे मी एकाच दृष्टीने बघतो..
आपण ज्या क्षणी जन्म घेतो त्याच क्षणापासून आपले अंतर्मन काम करायला सुरुवात करते. ज्याप्रमाणे आपले शरीर स्वत:मध्ये आवश्यक त्या दुरु स्त्या सातत्याने करत हा देह चेतन ठेवत असतो, त्याचप्रमाणे मनाच्या मशागतीची आणि मनाच्या सफाईचीही गरज असते. अनेक आठवणी, अनुभव यांची गाठोडी आपण मनावर साठवलेली असतात. त्यातले जे आवश्यक आहे ते ठेवून उरलेले काढून टाकणे गरजेचे असते. पण ही क्रि या आपण करतच नाही. आपण फक्त साठवत राहतो..
विचार करा, आपल्या घरात आपण नुसताच कचरा गोळा करत राहिलो आणि त्याची विल्हेवाट लावली नाही तर काय होईल? तेच आपल्या मनाचंही होत असतं.
त्यामुळे ‘माइंड मॅटर्स’ !
हे जितक्या लवकर आपल्या लक्षात येईल तितके बरे!
आपला मेंदू हे एक अजब रसायन आहे. तो अनेक गोष्टी लक्षात ठेवतो. स्मरण हे आपल्याला मिळालेले वरदान आहे. कालपर्यंत मानवाला फक्त मेंदूतच स्मरणशक्ती असते असे वाटत होते. पण आता आपल्याला हेही माहीत आहे की लक्षात ठेवण्याचं काम शरीरही करतं. त्वचाही करते. आपला डीएनए आपल्या कॉन्शसशी, आपल्या देहभानाशी जोडलेला आहे. त्यामुळे आपण सतत असंख्य गोष्टी स्मरत असतो आणि साचवत असतो. पण ते करत असताना, अनावश्यक गोष्टी काढून टाकण्याची प्रक्रिया मात्र आपण करत नाही आणि जगण्यातला आनंद हरवून बसतो. ध्यानधारणा आणि स्वसंवाद आपल्याला जे आवश्यक आहे तेवढंच बाळगण्याची प्रेरणा देतं. नकोशा गोष्टी, नकोसे अनुभव, नकोसे विचार कायमचे मनातून, मेंदूतून काढून टाकायला ध्यानाचा उपयोग होतो. आयुष्य आनंदाने जगायचे असेल तर मनाचा विचार अपरिहार्य आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचार करण्याची सवय, भावनांचं नेमकं व्यवस्थापन आणि आध्यात्म यांची सांगड घालता आली तरच मनाचा समतोल साधता येतो. आणि एकदा मनाचा समतोल साधला गेला की आयुष्य आनंदी आणि समाधानी होते. मला अनेकजण विचारतात, अध्यात्म म्हणजे नक्की काय? स्पिरिच्युअॅलिटी कशाला म्हणायचं? अनेक लोक याचे निरनिराळे अर्थ सांगतात. पण मी एकाच दृष्टीने याकडे बघतो. आपण मॅटर आणि स्पिरिटने बनलेले आहोत. म्हणजेच देह आणि देहीने बनलेलो आहोत.
एक शरीर आहे, जे दिसतं.. जे प्रोटिन्स, कार्ब्स आणि अजून असंख्य गोष्टींनी बनलेले आहे, तर एक देही आहे, म्हणजेच आपला आत्मा. जो प्रेम, करुणा आणि शांतीने बनलेला आहे. या दोन्हीचा समतोल आणि योग्य वापरच माणसाला माणूस बनवतो. तो करायला आपण शिकलं पाहिजे.
स्त्रीतत्त्व ही सगळ्यात मोठी शक्ती आहे. कुटुंबातील स्त्री आनंदी, समाधानी आणि शांत असेल तर ते कुटुंब समाधानी आणि आनंदी असते, जर कुटुंबातील स्त्री अस्वस्थ असेल तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. पुराणकाळापासून बघा, सगळी महत्त्वाची कामे स्त्रीतत्त्वांकडेच तर आहेत. वित्त, ज्ञान आणि संरक्षण या सगळ्याची जबाबदारी देवी लक्ष्मी, देवी सरस्वती आणि देवी दुर्गेवर आहे. म्हणजेच स्त्री तत्त्वावर आहे, ही गोष्ट स्त्रियांनी कधीही विसरू नये. स्त्रियांना सबलीकरणाची खरं तर आवश्यकताच नाहीये. त्याच आदिशक्ती आहेत. फक्त स्वत:तल्या या प्रेरणा, ही शक्ती ओळखण्याची गरज आहे. जगण्याकडे हलक्या फुलक्या नजरेने बघायलाही शिकलं पाहिजे. आयुष्य अतिगंभीरपणे घेण्याचेही दुष्परिणाम असतात. हसायला, मन मोकळं करायला वेळच मिळू नये यासारखे दुर्दैवी काहीही नाही. आपल्या देशात हजारो पद्धतीचे पदार्थ बनतात, भौगोलिक परिस्थितीनुसार चवी बदलतात. तीच गोष्ट संगीत आणि नृत्याची आहे. संगीत आणि नृत्याचे किती प्रकार आपल्याकडे आहेत, किती भाषा, बोलीभाषा आहेत, माणसांच्या जगण्याच्या हजारो तºहा एकाच देशात बघायला मिळणं आणि त्याचा भाग होता येणं हे आपल्याला मिळालेलं वरदान आहे.
आपण भाग्यशाली आहोत म्हणून भारतात जन्माला आलो. असे असताना जगण्याचा उत्सव सदोदित आपल्या चोहोबाजूंनी चालू असताना त्याकडे पाठ वळवणं आणि नको त्या गोष्टींना जवळ करून आयुष्य दु:खी करून घेणे योग्य आहे का, तुम्हीच विचार करा! जगणं हा एक उत्सव आहे, तो रोज साजरा करण्याची संधी आपल्याकडे आहे. ती आपण घेतली पाहिजे. आपल्या प्रेरणा आपण शोधल्या पाहिजेत. आपल्या प्रत्येकांत कल्पनेचे अंकुर फुटत असतात. फुलत असतात. त्यांचा हात धरून वाटचाल केली पाहिजे. म्हणजे मग जात, धर्म, पंथ लिंग यापलीकडे जाऊन माणूस म्हणून आपल्याला एकमेकांशी कनेक्ट होता येईल. आपण जगण्याचा उत्सव साजरा करायला शिकलो की आपोआप आनंद आणि समाधान आपल्या शेजारी येऊन बसतं. हृदयात वास करतं.
आपण आनंदी असू तर आपले कुटुंब आनंदी असेल, कुटुंब आनंदी असेल तर आपला भवताल आनंदी असेल, भवताल आनंदी असेल तर समाज आणि देशही आनंदी होतो. आपल्याला आपल्या देशाची प्रगती साधायची असेल, निराश माणसांच्या देशांच्या यादीतून बाहेर पडून आनंदी माणसांच्या, देशांच्या यादीत यायचं असेल तर स्वत:पासून सुरुवात करावी लागेल. आपला आनंद, आपले समाधान आपल्यापाशीच असते ते शोधावे लागेल. त्यासाठी मनाशी संवाद करावा लागेल. आपले मानसिक बळ आणि मानसिक स्थैर्य हीच आपली ताकद असते. ध्यानधारणा, योग, समाजकाम, कला आपल्याला मन:शांती मिळवून देतात. आपल्या मनाची ताकद वाढवतात. त्यामुळे माइण्ड मॅटर्स, हे नेहमी लक्षात असू द्या!
शब्दांकन : मुक्ता चैतन्य
(बंगळुरू येथे आंतरराष्ट्रीय महिला परिषदेतील
श्री श्री रविशंकर यांच्या भाषणाचा संपादित भाग.)