ल्वच्छता हा 'इव्हेंट' नव्हे

By admin | Published: November 8, 2014 06:36 PM2014-11-08T18:36:40+5:302014-11-08T18:36:40+5:30

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेले ‘स्वच्छ भारत अभियान’ निश्‍चितच स्वागतार्ह आहे; परंतु भीती आहे ती वेगळीच. आपल्याला सवय झाली आहे, सगळ्याचाच ‘इव्हेंट’ करायची. या अभियानाचेही तसे होऊ द्यायचे नसेल तर महात्मा गांधींना अभिप्रेत असणारी स्वच्छतेची संकल्पना आधी समजून घ्यावी लागेल. नक्की काय अभिप्रेत होते त्यांना?

Desperation is not an 'event' | ल्वच्छता हा 'इव्हेंट' नव्हे

ल्वच्छता हा 'इव्हेंट' नव्हे

Next

 चंद्रशेखर धर्माधिकारी 

 
सफाईचा कार्यक्रम हा फॅशनेबल इव्हेंट नाही. तो प्रायश्‍चिताचा कार्यक्रम आहे. ‘झाडू’ हे महात्मा गांधींच्या सामाजिक विषमता व जातीपातीवर आधारित उच्चनीच भावना समाप्त करणार्‍या समाजक्रांतीचे प्रतीक होते. क्रांतीचे अंकगणित नसते, क्रांतीची प्रतीके असतात. झाडू अगर सफाई हे सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी गांधींनी उभारलेल्या क्रांतीचे प्रतीक होते. म्हणूनच स्वच्छतेला ‘ईश्‍वरी देणगी’ म्हणण्यात येते.
गांधीजींनी ‘हरिजनसेवा’ कार्यक्रम आखला होता. एकाचा उद्धार दुसरा करू शकत नाही. स्वत: खाल्ल्याखेरीज पोट भरत नाही, स्वत: मेल्याखेरीज स्वर्ग दिसत नाही, हे गांधीजी ओळखून होते. त्यांचा हरिजन सेवेचा कार्यक्रम सवर्णांच्या उद्धारासाठी होता. ते स्वत: व त्यांचे आश्रमांतील सहकारी रोज संडास सफाई करीत. पिढय़ान्पिढय़ा समाजातील एका वर्गाला अस्पृश्य मानणार्‍या सवर्णांनी प्रायश्‍चित्ताच्या भूमिकेवरून हरिजनसेवा करावी, असे ते मानीत. हरिजन हे खरोखरीच हरिजन-देवाची लेकरे आहेत. इतरांना सुखशांती मिळून स्वच्छ जीवन जगता यावे, म्हणून अस्पृश्य आपले हात व शरीर मलिन करीत असतात. अस्पृश्य जर सफाईचे काम करणार नाहीत, तर सवर्ण स्वच्छ जीवन कसे जगू शकतील? उच्चवर्णीयांचे स्वच्छ व पवित्र जीवन ही अस्पृश्यांचीच देणगी आहे. सफाई कामगारांच्या हाती भगवद्गीता व ब्राह्मणांच्या हाती झाडू आला, तरच अस्पृश्यता संपून सामाजिक समता निर्माण होईल, असे गांधीजी मानीत.
जर हरिजन देवाची लेकरे आहेत, तर बाकीची काय ‘दुर्जन’ अगर सैतानाची अवलाद आहे, असा प्रश्न उपस्थित केला गेला. ‘आजकालच्या अस्पृश्यतेपासून सवर्ण हिंदू जेव्हा अंतरीच्या निश्‍चयाने व स्वच्छेने मुक्त होतील, तेव्हा आपण सारे स्पृश्य लोक हरिजन म्हणून ओळखले जाऊ. कारण मगच आपल्यावर ईश्‍वराची कृपा होईल’, असे गांधींचे मत होते. हरिजन हा खरोखरीज ‘हरीचा जन’ आहे. तरी त्यांना दडपून टाकण्यात आपण आनंद मानत आलो आहोत. अजून आपल्याला हरिजन होण्यास मोकळीक आहे. आज त्यासाठी आपण त्यांच्याप्रती केलेल्या पापाबद्दल अंत:करणापासून पश्‍चाताप केला पाहिजे. सवर्ण हिंदूंनी अस्पृश्यतेच्या भावनेतून मुक्त झाल्यावर व हरिजन बनल्याबद्दल शुद्धी समारंभ साजरा करावा, तसे जीवन जगावे’, असा सल्ला त्यांनी दिला होता. अस्पृश्यता संपवून एकजीव व एकजिनसी समाज निर्माण करणे हे गांधींच्या जीवनाचे ध्येय होते. गांधी स्वत:ला भंगी, सूत कातणारा विणकर व मजूर म्हणवून घेत. न्यायालयातील खटल्याच्या वेळी त्यांनी आपला हाच व्यवसाय आहे, असे सांगितले होते. ते स्वेच्छेने भंगी झाले होते. अस्पृश्यता निवारणाचा प्रयत्न हा त्यांच्या जीवनाचा अभिन्न भाग होता. अस्पृश्यता निवारणाच्या कामासाठी जीवही देण्याची त्यांची तयारी होती. त्यांना पुनर्जन्म नको होता. पण तो यावयाचा असेल, तर अस्पृश्याचाच असावा, अशी त्यांची मागणी होती. १९१६ साली अहमदाबाद येथील सभेत मस्तक पुढे करून व मानेवर हात ठेवून मोठय़ा गांभीर्याने त्यांनी घोषणा केली होती, की ‘हे शिर अस्पृश्यता निवारणार्थ वाहिलेले आहे.’
‘झाडू’ हे गांधींना अभिप्रेत असलेल्या क्रांतीचे प्रतीक होते. गांधीजी मानीत होते, की समता व एकरसता नसलेल्या समाजाकडून क्रांती घडवून आणता येत नाही. तो समाज कुठल्याही गुलामगिरी विरुद्ध लढू शकत नाही. दलितांतील सर्वात पददलित, वाल्मिकी हाच आहे. गांधीजी मानीत मुलाच्या जीवनात आईचे जे स्थान आहे. तेच समाजाच्या जीवनात सफाई कामगारांचे आहे. गांधीजी म्हणत, ‘मी भंग्याला माझ्या बरोबरीचा मानतो आणि सकाळी त्याचे स्मरण करतो. अस्पृश्यता-निवारण करणे अखिल जगतावर प्रेम करणे व त्याची सेवा करणे. म्हणून ते अहिंसेचेच एक अंग आहे. अस्पृश्यता घालविणे म्हणजे मानवामानवातील भेदभावाची तटबंदी कोसळणे, एवढेच नव्हे तर जीवमात्रातील उच्चनीचता लयास नेणे. अस्पृश्यता हा हिंदुधर्मांवरील कलंक आहे. अस्पृश्यचा मानणे हे स्पृश्य लोकांचे महान पातक आहे. अस्पृश्यतेची चाललेला माझा लढा हा अखिल मानवजातीतील अशुद्धतेशी चाललेला लढा आहे. एखादा भंगी राष्ट्रसभेचा कारभार चालवीत आहे, असे ज्या दिवशी मला दिसेल, तेव्हा मला खरा आनंद होईल.’ ‘अंत्योदयातून सवरेदय’ ही गांधींच्या चळवळीची दिशा होती. यात दया भावने ऐवजी कर्तव्य भावनाच अधिक होती. म्हणून तर गांधींच्या विधायक कार्यक्रमात ‘हरिजन सेवेला’ महत्त्वाचे स्थान होते. नेल्सन मंडेला व लूथर किंग यांना गांधी दलित, पददलित व शोषितांचा ‘मसीहा’ वाटले. लूथर किंग म्हणत, की ‘गोर्‍या लोकांचे मन गोरे झाल्याखेरीज काळ्या लोकांचा प्रश्न सुटणार नाही.’ सवर्णाचे मन गोरे होऊन त्याचे हृदय परिवर्तन होण्यासाठी गांधीजी ‘हरिजन सेवा’ हे  सवर्णाचे कर्तव्य आहे असे मानले.
‘हरिजन’ हा शब्द महात्मा गांधीपूर्वीही संत नरसी मेहताने वापरला होता. नरसी मेहता स्वत: नागर ब्राह्मण होते; परंतु त्यांची हरिजनांशी जवळीक होती. झारखंड मुक्ती आंदोलनाचे पुढारी व संसद सदस्य श्री. शैलेंद्र महंतो यांच्या मते हरिजन शब्दाचा सर्वात प्रथम उपयोग महर्षी वाल्मिकी यांनी केला. ते स्वत: अस्पृश्य होते.
गांधींना उच्च-नीच भावनेवर आधारित परंपरागत धर्म मान्य नव्हता. त्यांनी हरिजन सेवेचे व्रत घेतले. सवर्णांनी प्रायश्‍चित्ताच्या भूमिकेतून सेवा करावी असे ते म्हणत. अस्पृश्यांतही सर्वात अधिक अस्पृश्य भंगी आहे. गांधी म्हणत, की ‘मैल्याची टोपली डोक्यावर घेऊन चाललेल्या भंग्याला पाहिले, की मला ओकारी येते. मी त्यास माझ्या बरोबरीचा माणूस मानतो. रोज सकाळी मी त्याचे स्मरण करतो. अस्पृश्यतेविरुद्ध चाललेला माझा लढा हा अखिल मानवजातीतील अशुद्धतेच्या विरोधात चाललेला लढा आहे. ब्राह्मणास विशेष पवित्र मानल्याशिवाय भंग्याचे अस्तित्व कल्पिणे शक्य नाही. भंग्याने असे घाणीचे काम करण्याचा रिवाज म्हणजे मानवाविरुद्ध आणि ईश्‍वराविरुद्ध केलेला गुन्हा आहे. तो एक दिवसही चालू राहणे ही भारतीय नागरिकांसाठी लज्जेची गोष्ट आहे. एखादा भंगी राष्ट्राचा कारभार चालवीत आहे, असे ज्या दिवशी मला दिसेल, तेव्हा मला आनंद होईल.’ त्यांनी ‘झाडू’ हे क्रांतीचे प्रतीक मानले. उच्चनीच भावना व जातीयतेवर आधारित विषमतेचे पालन करणार्‍या, कर्मकांडावर आधारित परंपरागत धर्माचा त्याग करुन ‘झाडू’ या सामाजिक क्रांतीच्या प्रतिकाचा गांधींनी अवलंब केला. अधर्माचा त्याग केला. अध्यात्माचा स्वीकार केला. ‘मेहतर’ म्हणजे ‘महत्तर’, आज दुर्दैवाने सफाई करणार्‍यापेक्षा घाण करणार्‍यांची प्रतिष्ठा अधिक आहे. त्यांचे नावही अप्रतिष्ठित मानले गेले. म्हणून ते आज स्वत:ला ‘वाल्मिकी’ म्हणवून घेतात. सफाई ही अद्भूत सामाजिक क्रांति आहे. मन ‘स्वच्छ’ असल्याखेरीज ‘स्वच्छ भारत’ संकल्पना प्राणभूत होणार नाही, हेच या कार्यक्रमामागेच अंतिम सत्य आहे. कारण ती एक ‘जीवनसाधना’ आहे आणि ‘जीवनप्रणाली’ आहे.
(लेखक मुंबई उच्च न्यायालयाचे 
माजी मुख्य न्यायाधीश आणि गांधी तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, विचारवंत आहेत.)

Web Title: Desperation is not an 'event'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.