नष्ट होणा:या प्रजाती
By admin | Published: May 30, 2015 02:58 PM2015-05-30T14:58:37+5:302015-05-30T14:58:37+5:30
जंगल लुटताना आधी सरपण संपते, मग इमारती लाकूड संपते, कुंपणासाठीची काटेरी झुडुपे संपतात, औषधी झाडेही किरकोळ भावावर पोतीच्या पोती विकली जातात, मग बक:यांच्या बेबंद चराईने गवत संपते, बांध गाळाने भरतात, शेतं वांझोटी होत जातात आणि हळूहळू गावही संपून जातं
Next
>- मिलिंद थत्ते
घराच्या बांधकामात बांबू वापरायचा असेल तर तो पौर्णिमेला किंवा अमावस्येला तोडायचा. अशा वेळी तोडला की त्याला सहसा कीड लागत नाही, असं गावातले जुने लोक सांगतात. याचे कारण ते सांगत नाहीत, पण अशी रीत आहे असे म्हणतात. आवळीचा पाला औषधासाठी घेताना झाडावर सावली पडणार नाही अशा वेळी घ्यायचा, तोही एकाच हातात येईल एवढाच घ्यायचा, आणि एकदा खुडला की वळून परत झाडाकडे पहायचे नाही. नाही तर गुण येत नाही. खेकडे पकडताना पोटात पिल्ले असलेली मादी सापडली, तर ती मादी सोडून द्यायची किंवा पिल्ले मोठी असतील तर पोट उघडून ती सगळी पिल्लेच परत नदीत सोडून द्यायची. रीतच आहे तशी! गावातल्या सर्वांनी पेरणीआधी आपापल्या घरातले नाचणीचे बियाणो एकत्र आणायचे. भगत आणि गावचे बुजुर्ग हे बियाणो एकत्र करतात. देवासमोर ठेवून पूजतात आणि मग सर्वांना वाटे करून देतात.
या सर्व रीतींमागे अनुभवसिद्ध शास्त्र आहे. पौर्णिमेला व अमावस्येला चंद्र स्थिर असल्यामुळे पृथ्वीवरचे सर्व द्रव पदार्थ स्थिर असतात, बांबूतला रसही स्थिर असतो, त्यामुळे तेव्हा केलेली तोड लाभदायी ठरते. आवळीचा पाला औषधी म्हणून तो गरजेपेक्षा जास्त घेऊ नये, म्हणून त्यावर वेळ आणि प्रमाणाचे बंधन आहे. खेकडय़ांची संख्या भविष्यातही भरपूर रहावी म्हणून पिल्लांची काळजी घेतली जाते. आणि बियाणी एकत्र मिसळून पुन्हा वाटल्याने ‘जीन पूल’ सशक्त राहतो. सर्वच रीतींमागे शास्त्र असतेच असे नाही. आणि परंपरा म्हटले की तो कचराच असतो असेही नाही. बरेचदा रीतींमागील शास्त्र कालसापेक्ष आणि परिस्थितीसापेक्ष असते. काळ बदलला, परिस्थिती बदलली की रीतींमागे काहीही कारण असले, तरी त्या रीतीला अर्थ राहत नाही. वड-उंबर-पिंपळ या प्रजातींभोवती अनेक जीवजंतूंचे जीवचक्र असते. पक्षी, प्राणी, सर्प, कीडे, आणि माणसांनाही या झाडांचा आधार असतो. जिथे हे जीवचक्र शिल्लक नाही, तिथे वटपौर्णिमेला अर्थ राहत नाही. त्यांऐवजी पतिपौर्णिमा किंवा इतर काहीही नाव दिले तरी हरकत नाही. वडाच्या तोडून आणलेल्या फांद्यांभोवती गुंडाळलेल्या दो:या या कुठल्याही पुडीला गुंडाळलेल्या दोरीइतक्याच मोलाच्या उरतात. वर उल्लेखिलेल्या रीतीही हळूहळू याच मार्गाने जात आहेत. लग्नाआधी वधूने आणि वरानेही वाजत गाजत आपापल्या गावातल्या उंबराचे दर्शन घ्यायची रीत अनेक आदिवासी समूहांमध्ये आहे. त्या उंबराचा प्रसाद म्हणून त्याची एक डहाळी आणायची आणि लग्नमांडवाला बांधायची असेही केले जाते. आता शहरात राहणारे सरकारी नोकरीत शिरलेले आदिवासी अभिजन अशी एक डहाळी आणतात आणि मांडवातच उंबराला जाण्याचा कार्यक्र म करतात. उंबराचे झाड गावात असले पाहिजे हे परंपरेमागचे शास्त्र आहे, पण ते आता मागे पडले आहे.
ज्या रीतींमागचे शास्त्र लयाला जाते, त्या ‘रूढी’ होतात आणि त्यांचे लोढणो अनेक पिढय़ा, अनेक समाज वागवतात. आपली कालगणना निसर्गाला धरून आहे. चैत्रत नवीन पालवी येते. आणि तेव्हाच नवीन वर्ष सुरू होते. एखाद्या दुर्गम आदिवासी गावात बसलात आणि वृध्द लोकांना विचारलेत, की तुम्हाला महिना बदललेला कसा कळतो, तर ते सांगतील, ‘नवा चांद निघतो तेव्हा महिना सुरू होतो’. पौर्णिमेनंतर चंद्र हळूहळू उशिरा उगवायला सुरुवात होते. अमावस्येला तर तो सूर्याबरोबरच उगवतो आणि मावळतो. त्याच्या दुस:या दिवशी तो नव्याने येतो. तोच नवा चांद आणि नवीन महिना. चैत, वैसाख, जेठ, आखाड, शावन, भादवा, अश्विन, काडतीक, पूस, मागशिर, माघ, फागो असे बारा महिने येतात. फागो शेवटचा महिना, त्यातल्या पौर्णिमेला वर्षातला शेवटचा सण. त्या दिवशी हलके लाकूड असणा:या झाडांची मोठी लाकडे आणायची. या झाडांची पेशी घनता फार नसते, ती झाडे लवकर वाढतात, आणि हलकी असल्यामुळे त्यांचा चुलीत किंवा बांधकामाला उपयोग नसतो. उंच बांधलेली होळी भरभर पेटते आणि तास दोन तासात जळून संपते. लोक एकमेकांची गळाभेट घेतात. होळीतल्या बांबूची राख भंडारा म्हणून एकमेकांना लावतात. जुनी माणसे भेटताना म्हणतात, ‘चला हे वर्ष संपले, ही होळी पाहिली. जगलो राहिलो तर पुढची होळीही पाहू’. होळी हे परंपरेतले ‘थर्टीफस्र्ट आहे. होळीत वापरण्याच्या लाकडांमागचे शास्त्र, एकमेकाना भेटण्याची समाजरीत, त्या भेटीतला स्नेहाचा ओलावा हे सगळे संपले की होळीची रूढी होते. मग त्यात वाटेल ती लाकडे जळतात. तीही प्रचंड प्रमाणात. ज्यांनी जंगल राखलेले नाही त्यांना खरे तर होळीचा नैतिक अधिकारच नाही. पण तेही होळी करतात. तीही स्पर्धा म्हणून. मोठय़ात मोठी होळी करून दाखवतात. त्याला कोणी आक्षेप घेतलाच तर आमच्याच धर्मावर तुम्ही नेहमी घसरता, असेही म्हटले जाते. रूढींचे असेच असते. सर्व मूर्खपणा त्यखाली खपून जातो. लाकडे जाळणो बंद करून आपण फक्त रंगांनी खेळावे. रूढी सोडून फक्त उत्सवाचा, मौजेचा भाग ठेवावा हे शहाणपण फार थोडय़ा लोकांकडे असते. याला शहरे अपवाद नाहीत, तशी गावेही अपवाद नाहीत.
गावानेच चोरांची साथ देणो स्वीकारले की पुढची वाट ठरलेली असते. सर्वांनी जमेल तितके जंगल भराभरा लुटायचे. जंगल संपलेल्या शेजारच्या काही गावांचे सरपणासाठी कसे हाल होताहेत हे दिसत असूनही ही गावे जंगल संपवण्याच्या मार्गावर धावत असतात. पैसा आपल्या सर्व गरजा भागवेल या मृगजळाच्या मागे हे धावणो असते. सरपण संपते, मग इमारती लाकूड संपते, मग कुंपणाला लागणारी काटेरी झुडुपे संपतात, औषधी झाडेही किरकोळ भावावर पोतीच्या पोती विकली जातात, मग बक:यांच्या बेबंद चराईने गवत संपते, झाडेझुडुपे गेल्यावर माती ढासळून निघून जातच असते, बांध गाळाने भरतात, नदीच्या पात्रतली रेतीही काढून विकून संपवलेली असते, नदी आपले पात्र विस्तारून आजूबाजूची शेते फोडू लागते, तिथली माती निघून जाऊ लागते, कसदार माती वीटभट्टय़ा आणि इतर धंद्यांना विकून शेत वांझोटं होऊन जातं, उतारावरची माती जाऊन ती शेतेही खडकाळ होतात, जे जे बरं होतं ते संपवून मग गावही संपून जातं. (काही ठिकाणी मात्र याउलट चित्र असते. जंगल वाचवण्यासाठी गाव एकत्र येते.)
या दिशेने प्रवास करणारी गावे, जनसमूह या नष्ट होऊ घातलेल्या प्रजाती आहेत. जसे डायनासॉर नष्ट झाले म्हणून आपण शोक करत नाही, तसे या गावांचाही शोक करण्याचे कारण नाही.
झुंडशाहीपुढे लकवा
जंगल सांभाळावे, आपल्या पिढीसाठी आणि पुढच्या पिढीसाठीही जंगलसंपत्ती टिकवावी असे वाटणारा छोटा गट आम्ही काम करत असलेल्या गावांमध्ये आहे. ते यासाठी प्रयत्न करतात. कु:हाडबंदी असावी, गुरे चारण्यापासूनही काही क्षेत्र मुक्त असावे असा प्रयत्न हे गट करतात. गावातले राजकीय पुढारी, धनको, भ्रष्टाचारात सरकारचे भागीदार असणारे गावातले हुजरे या सर्वांचा या प्रयत्नांना विरोध असतो. जंगलाची अनिर्बंध लूट करण्यात या सर्वांचा धंदा असतो. ते विविध गोष्टींचा आधार घेऊन जंगल वाचवण्याच्या प्रयत्नांना विरोध करतात. त्यात रूढींचा, धर्माचा, जातीच्या अस्मितेचा अशा सगळ्याचा वापर केला जातो. आमच्या जातीलाच जंगलाचा अधिकार आहे, त्यावर बंधन घालायला सांगणारे हे शहाणो कोण? असा प्रश्न केला जातो. ‘चराईबंदी झाली की तुमची गुरे मरणार’, असा प्रचार केला जातो. सरकारच्या ज्या खात्याकडे जंगल सांभाळण्याची जबाबदारी आणि त्यासाठीची तैनाती फौज आहे, ते खाते अशा वेळी शेपूट घालण्यातच धन्यता मानते. भ्रष्टाचारातल्या भागीदारांना दुखवणो त्यांना शक्यच नसते. संयुक्त वनव्यवस्थापनासारखी थोतांडे या रूढीगत झुंडशाहीपुढे लकवा होऊन लुळी पडतात.
(लेखक ‘वयम्’ या समावेशक विकासाच्या चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)