शेतकऱ्यांच्या मदतीला ध्वनियंत्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 06:01 AM2021-10-10T06:01:00+5:302021-10-10T06:05:01+5:30
वन्य प्राण्यांमुळे दरवर्षी शेतकऱ्यांच्या उत्पादनात सुमारे ४० टक्के घट येते. प्राणी, पक्ष्यांना कोणताही त्रास न होता, त्यांनी पिकांपासून दूर राहावे यासाठी डाॅ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एक ध्वनियंत्र विकसित केले आहे.
- राजरत्न सिरसाट
शेती, निसर्ग, पावसावर अवलंबून... पण दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, अवेळी पाऊस, पावसातील मोठा खंड, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, हवामानातील बदल, बाजारभावातील चढ-उतार अशा असंख्य प्रकारचा सामना करीत असताना वन्यप्राण्यांचा वाढलेला वावर आणि पिकांच्या हाेणाऱ्या अपरिमित हानीने शेतकऱ्यांच्या संकटात भर घातली आहे. हिंस्र पशूंनी थेट शेतकऱ्यांवर जीवघेणे हल्ले केल्याच्या घटनाही घडत आहेत. या वन्यप्राण्यांमुळे दरवर्षी ३० ते ४० टक्के पिकांचे नुकसान हाेत असल्याचे संशाेधनातून समाेर आले़ मुख्यत: हरिण आणि रानडुकरांमुळे पिकांचे सर्वाधिक नुकसान हाेत आहे.
राज्यात कापूस, साेयाबीन, ऊस, फळे व पालेभाज्यांचे पीक माेठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यासाठी शेतकरी दिवसभर शेतात राबतात; परंतु रात्री रानडुक्कर, हरिण, रोही, नीलगाय, माकड यासारखे प्राणी पिकांची नासाडी करतात. पिकांची नासाडी होऊ नये यासाठी शेतकरी विविध क्लृप्त्या, प्रयाेग करून वन्यप्राण्यांचा बंदाेबस्त करण्याचा प्रयत्न करतात; परंतु आजवर त्यांना त्यावर ठोस उपाय सापडला नव्हता.
अकाेल्याच्या डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यावर अभ्यास करून वन्यप्राण्यांचा त्रास कमी करण्यासाठी साैर ऊर्जा प्रचलित अल्ट्रा ध्वनिलहरी यंत्र विकसित केले आहे. या यंत्रातून निघणाऱ्या ध्वनीलहरी वन्यप्राणी व पक्ष्यांना त्रासदायक ठरतात. त्यामुळे पक्षी शेतात येत नसल्याचा दावा यंत्र विकसित करणारे शास्त्रज्ञ डाॅ. विवेक खांबलकर यांनी केला आहे. या यंत्रापासून प्राण्यांना काेणतीही इजा न हाेता पिकांचे नुकसान टाळता येते. लवकरच हे यंत्र शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे डाॅ. खांबलकर यांचे म्हणणे आहे. कुलगुरू डाॅ. व्ही. एम. भाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे यंत्र विकसित करण्यात आले आहे.
काय आहे या यंत्रात?
-साैर ऊर्जा यंत्रातील बॅटरीत साठविली जाते. बॅटरीतील ही ऊर्जा मायक्राे कंट्राेलर ८०५१ ला पुरविण्यात येते. या मायक्राेकंट्राेलला पीआयआर सेन्सर, रिले सर्किट व अल्ट्रा ध्वनिलहरी जाेडण्यात आल्या आहेत.
-७ ते ८ मीटरपर्यंत काही हालचाल जाणवल्यास पीआयआर सेन्सर लगेच कार्यान्वित हाेतो व ध्वनिलहरी साेडतो.
-अल्ट्रा ध्वनिलहरीचा आवाज २० मीटरपर्यंत जातो. या यंत्रामुळे प्राणी, पक्ष्यांना कुठल्याही प्रकारची इजा हाेत नाही. अल्ट्राध्वनी लहरींमुळे ते शेातातून पळ काढतात़
हे यंत्र बनिवयासाठी १० वॅट साैर पॅनल १२ व्ही बॅटरी, मायक्राे कंट्राेलर ८०५१ चा वापर करण्यात आला आहे़
- प्राणी व पक्ष्यांमुळे हाेणारे नुकसान या यंत्रामुळे कमी हाेईल़ ही यंत्रे अधिक प्रमाणात बनविण्यासाठी एखाद्या उद्याेगासाेबत सामंजस्य करार विद्यापीठातर्फे केला जाणार आहे़ शेतकऱ्यांना माफक दरात ही यंत्रे उपलब्ध व्हावीत, असा कृषी विद्यापीठाचा उद्देश आहे़
वन्यप्राण्यांचा बंदाेबस्त करयासाठीची पारंपरिक तंत्रे
-विजेच्या तारांचे कुंपण.
- रंगीत साड्या शेताच्या धुऱ्यावर बांधणे.
- शेतात बुजगावणे लावणे.
- गावठी डुकरांची विष्ठा पसरविणे.
- मानवी केसांचा श्वासरोधक म्हणून वापर.
- आवाज निर्मिती.
- श्वानांचा वापर.
-वाळलेल्या शेणाच्या गौऱ्या जाळणे.
-शेतात पिकांचे रक्षण करण्यासाठी मावचा बांधणे व रात्रभर शेतातच थांबणे.
(मुख्य उपसंपादक, लाेकमत, अकाेला)