वेगळ्या टाइपची माणसं...
By अोंकार करंबेळकर | Published: August 20, 2017 01:00 AM2017-08-20T01:00:00+5:302017-08-20T01:00:00+5:30
कटरर्र.. टिंग.. खट्ट.. खडखट्ट... हा नुसता आवाज नाही, या लोकांचा श्वास आहे. या श्वासाचं संगीत ऐकतच ते मोठे झाले. बेजॉन मादन, चंद्रकांत भिडे, अभ्यंकर.. सारीच टाइपरायटरवेडी माणसं. मनापासून आणि झटून काम करणारी. आपल्या कामावर एवढं प्रेम असलेली पिढी आता टाइपरायटरसारखीच दुर्मीळ होत चालली आहेत.
टाइपरायटरनं आजवर हजारो, लाखो माणसांना जगवलं; पण या टाइपरायटर्सना ज्यांनी जगवलं, वाढवलं, त्यांच्या हृदयातील धडधड अखंड सुरू ठेवली, त्या टाइपरायटर्सच्या पोशिंद्यांचं काय?
काय करताहेत ही माणसं?
टाइपरायटरवर टायपिंगची शेवटची परीक्षा गेल्या आठवड्यात झाली आणि ठिकठिकाणचे टाइपरायटर शांत झाले..
म्हटलं, भेटूया या लोकांना. बोलूया त्यांच्याशी.. टाइपरायटर्स आणि त्यांच्यातल्या नात्याची वीण आपणही जरा समजावून घेऊया...
बेजॉन मादन अंकल
पहिल्यांदा फोन केला तो ‘टाइपरायटरचे डॉक्टर’ बेजॉन मादन यांना. गेली कित्येक वर्षे टाइपरायटर दुरुस्तीचं काम ते करताहेत. ‘करत होते’ असं आता म्हणावं लागेल.
‘मादन अंकल, आपसे मिलना है मुझे.’
- कायकू?
‘वो टाइपरायटर वगैरा देखना था, गपशप करना था, चायभी पिना था आपके साथ’..
- ऐसा है तो घरपेही चाय पिजा..
‘नही मै तो बिलकूल आऊंगा और मिलुंगा आपसे’...
- तू साला चाय पिकेही छोडेगा...
या पारसीबावाबरोबर बम्बय्या हिंदीमध्ये असा लडिवाळ संवाद झाल्यावर त्यांच्याशी भेटही अशीच भन्नाट होणार हे दिसतच होतं.
त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पिकेट रोडवर त्यांच्या इमारतीमध्ये गेलो. ‘टाइपरायटरचं हॉस्पिटल’ बघायला मी आलो होतो. शोधाशोध केल्यावर चौथ्या मजल्यावर त्यांचं 'जनरल आॅफिस टाइपरायटर्स' दिसलं. आधी वाटलं होतं, टाइपरायटर म्हणजे तिथं नुस्ता खडखडाट असणार; पण त्यांच्या आॅफिसात तर सगळा शुकशुकाट. बेजॉन मादन बाहेरच्या खोलीत आणि त्यांचे फ्रान्सिस नावाचे एक मेकॅनिक आत स्टुलावर बसले होते. गेल्या गेल्या कबूल केल्याप्रमाणे बेजॉन यांनी चहा मागवला आणि बोलू लागले.
१९७०च्या आसपास त्यांच्या सासऱ्यांनी हा टाइपरायटर दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. पण त्या काळात बेजॉन मादन मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचं काम करत एक औषधांचं दुकानही सांभाळायचे. १९७६ साली त्यांनी या कामाला सुरुवात केली. मादन म्हणाले, अरे तो काय काळ होता.. एकेकावेळेस आमच्याकडे दहा-बारा मेकॅनिक खटाखट काम करायचे. या वाकड्यातिकड्या जिन्यावरून ते जुने जडजड टायपिंग मशीन आणायला आम्ही कूलीच ठेवलेले. ते सतत चार मजले वरखाली करून मशीनची ने-आण करायचे. इकडे सगळ्या फोर्टसकट सगळ्या आॅफिसात आमची सर्व्हिस असायची. सेंट्रल बँक विचारू नको, युनियन बँक विचारू नको... सगळ्या बँकांमध्ये आमचे मेकॅनिक जायचे आणि दुरुस्ती करायचे. काही काही बँकांच्या चार पाच मजल्यांच्या आॅफिसात प्रत्येक मजल्यावर २०-३० मशीन्स असायची. प्रत्येक टेबलावर एक मशीन असंच गृहीत धर म्हणजे किती मशीन्स असतील याचा विचार कर.. सगळ्यांची सर्व्हिस आम्ही करायचो. तुमच्या कॉम्प्युटरच्या लॅब असायच्या ना वेगळ्या तशा टाइपरायटरच्या असायच्या त्याला 'टायपिंग पूल' म्हणायचे. तेथेही भरपूर मशीन्स असत. अरे गोदरेज, रेमिंग्टनच्या पलीकडे फारशी नावं लोकांना माहिती नसतात. पण भरपूर देशी-विदेशी कंपन्यांची मशीन्स आम्ही दुरुस्त केलीत.
बोलता बोलता त्यांनी त्यांच्या मागे ठेवलेला कार्डांचा लाकडी खोका दाखवला. त्यात त्यांनी सगळी वार्षिक कॉन्ट्रॅक्ट्स नीट लावून ठेवलेली. हे तुमच्या हॉस्पिटलातले केस पेपर्स म्हणायचे का? हॉस्पिटल म्हटल्यावर मादन हसले ''हां.. ये हॉस्पिटल है लेकिन मॅटर्निटी नही.. यहां हम मशीन को जनम नही देते.. सिर्फ रिपेअर होता है.. मग त्यांनी ती कार्ड दाखवली. बघ असं आम्ही प्रत्येक ग्राहकाच्या मशीनचं कार्ड केलंय. प्रत्येक महिन्याला त्या मशीनचं सर्व्हिसिंग झालं की यात खूण करायची. अशी वीस वर्षांपूर्वी भरपूर कार्ड असायची आता त्यांची संख्या फारच कमी झालीय. खिन्नपणे म्हणाले, टाइपरायटरच गेले तर सर्व्हिसिंग कशाला?..
आमचं बोलणं सुरू असताना मादन म्हणाले, आता या मशीनवर बस आणि टाइप करून दाखव. त्यांनी हाताला धरूनच एका स्टुलावर बसवलं. मी हळूच बटणं दाबली तर काहीच अक्षरं उमटेनात.. ते म्हणाले, ‘ये तेरा आॅफिसका कॉम्प्युटर नही है, जोरसे दबा..’ त्यांच्या आवाजातल्या जोरामुळे आपसूकच माझ्याकडून जोरानं बटणं दाबली गेली आणि अक्षरं उमटली. तो होता कर्सिव्ह टाइपरायटर. एकामागोमाग एक अक्षरं इटॅलिक टायपात उमटत होती..
त्यांचं वर्कशॉप बघून झाल्यावर मादननी मला त्यांची जुनी बुकं दाखवली. तीन चार दशकांचा सगळा हिशेब, सर्व्हिसिंग, रिपेअरिंगची माहिती त्यात संगतवार नोंदवलेली होती. टाइपरायटरवर छापून आलेल्या जुन्या बातम्या आणि जाहिरातीही दाखवल्या. १९८७ सालच्या एका जाहिरातीत मशीनची किंमत ९ हजार पाहून म्हटलं इतकं महाग? ते म्हणाले, तेवढ्या किमती होत्याच, तेव्हा गरजेची वस्तू होती. आता नवा टाइपरायटर मिळत नाही.. पण जुना तिनेक हजारात मिळेल. परवा तर सिनेमासाठी एक माणूस आमच्याकडचा टाइपरायटर भाड्याने घेऊन गेला. आता असंच होणारेय.. लोकांना टीव्ही, सिनेमा किंवा पुस्तकातच टाइपरायटर पाहायला मिळणार. त्यांच्याशी बोलताना टाइपरायटरवर चित्रं काढण़ाऱ्या चंद्रकांत भिडेंचा विषय निघाला. मादन म्हणाले 'वो तो मेरा फ्रेंड है युनियन बँक मे था.. रुक' असं म्हणून त्यांनी भिड्यांना फोन लावला आणि माझ्याशी बोलायला लावलं. त्यांना सांगितलं आता तुम्हालापण भेटायला येतो. मादन यांना भेटून पुन्हा त्या लाकडी पायऱ्या उतरलो. प्रत्येक मजल्यावरून खाली येताना एकेक दशकाचा काळ मागे जात असल्यासारखा वाटलं. खाली स्मॉल कॉज कोर्टाजवळ पिकेट रोडवर टाइपरायटर्सची जागा कॉम्प्युटरनी घेतल्याचं दिसत होतं. नाही म्हणायला पालिकेसमोर काही टायपिस्ट मांडीवर लॅपटॉपसारखे छोटे मशीन घेऊन टायपिंग करणारे दिसतात. कोर्टासमोर, नोटरी करून देणाऱ्यांजवळ टायपिस्ट दिसतात. पण आता ती शेवटचीच पिढी असेल.
अभ्यंकर टायपिंग क्लासेस
तिथून सरळ गिरगावातल्या अभ्यंकरांचे टायपिंग क्लासेस गाठले. १९३४ पासून त्यांचे हे वर्ग सुरू आहेत. आजवर असंख्य स्टेनोना अभ्यंकरांनी टायपिंग आणि शॉर्टहॅण्ड शिकवलंय.
आता कोण टायपिंग शिकत असेल असा विचार केला तर त्यांच्याकडे जोरात खटखट आवाजात पोरं-पोरी टायपिंग करत होती. कागद रोल केल्याचा कटरर्र..., बटणांची खटखट, वाक्य संपल्यावर होणारा टिंगऽऽ आवाज. आवाजांची अशी सरमिसळ होऊन एक बँडच क्लासमध्ये तयार झालेला. तिथल्या शिकवणाऱ्या जाधव बाई म्हणाल्या.. शासनाच्या निर्णयामुळे राज्यातल्या ३५०० संस्थांवर परिणाम होणार आहे.
पण आम्ही हा बदल स्वीकारला आहे. टाइपरायटरनंतर आम्ही मुलांना संगणकावर टायपिंग शिकवतो, त्याचा सराव करून घेतो. दर सहा महिन्याला परीक्षा असते, शंभरेक मुलं रोज त्याचं शिक्षण घेतात. मराठी, हिंदी, इंग्रजी टायपिंग आणि शॉर्टहँडला आजही मुलं प्रवेश घेतात.
जाधवबार्इंचं म्हणणं खरंच होतं. त्या बोलत असताना मुलं चौकशीला, परीक्षेचे अर्ज भरायला येत होती. त्या म्हणाल्या, एकीकडे दु:ख होतं; पण बदल स्वीकारावा लागेलच.
टाइपरायटरवर चित्रं काढणारे चंद्रकांत भिडे
हजारो पोरांना नोकरी लावणाऱ्या या मशीनची जागा आता अडगळीत आहे; पण चंद्रकांत भिडे यांची बोटं गेली पन्नास वर्षे टायपिंग करत आहेत. टायपिंग करता करता त्यांनी टंकलेखन यंत्रावरच चित्र काढायला सुरुवात केली. असं चित्र काढायची कल्पना आलेले ते पहिलेच व्यक्ती असावेत. युनियन बँकेतून निवृत्त झालेल्या भिड्यांना भेटायला त्यांच्या दादरच्या घरात जाऊन भेटायचं ठरवलं. भिडे घरी होतेच. टायपिंगवर बोलायचं म्हटल्यावर ते जाम खूश दिसत होते.
आत गेल्या गेल्या त्यांनी ते ज्या मशीनवर चित्र काढतात ते दाखवलं. 'पन्नास वर्षे हे मशीन मी वापरतोय, अजून सुंदर चित्र काढतं, भराभर टाइप करून देतं'
६७ सालापासून भिडे नोकरी करत होते. खरं तर त्यांना जे.जे.मध्ये शिकायचं होतं. पण परिस्थितीमुळे नोकरी करावी लागली आणि त्यांच्या हातात टाइपरायटर आला. पण आतला कलाकार गप्प बसलेला नव्हताच. नोकरीच्या ठिकाणीच त्यांनी टायपिंगमध्ये काही नवे प्रयोग केले. एकेदिवशी इंटरकॉमच्या फोन नंबरची यादी त्यांनी टेलिफोनच्या आकारातच टाइप केली. मग त्यांना सुचलं की फोन काढता येतो तर चित्र का नाही काढता येणार? त्यांनी धडाधड एक्स बटण वापरून गणपती काढायला सुरुवात केली. सगळ्या रूपातले गणपती, अष्टविनायक झाल्यावर त्यांनी शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, सावरकर यांची चित्र काढायला सुरुवात केली. मग एक्ससारखी दुसऱ्या बटणांचा वापर करूनसुद्धा ते चित्र काढायला लागले. झालं. त्यांच्यातल्या कलाकाराला रोजच्या कामातूनच नवी वाट मिळाली.. भिडेंचे टाइपरायटरवर रोज नवे प्रयोग सुरू झाले. रोज नवे चित्र त्यांच्या मशीनमधून तयार होऊ लागले. एके दिवशी त्यांनी आर. के. लक्ष्मण यांचा कॉमनमॅनच मशीनवर काढला, कॉमनमॅनसारखा मारिओ मिरांडा यांचा मिस्टर गोडबोलेसुद्धा त्यांनी कागदावर उमटवला. एक वेगळ्या वाटेवरचा कलाकार म्हणून त्यांची ओळख व्हायला लागली. आर.के. लक्ष्मण, मिरांडा यांनी त्यांच्या पाठीवर शाबासकी आणि कौतुकाची थाप दिल्यावर भिडे यांच्या चित्रांची प्रदर्शनही भरू लागली. चंद्रकात भिडे यांना या आगळ्यावेगळ्या कलेमुळे मोठमोठ्या साहित्यिक, कलावंत, लेखकांना भेटता आलं,
सुवर्णयुगाची साक्ष..
कागदावर अक्षरं उमटवायची माणसाची धडपड गेली सहा शतकं सुरू आहे. १५७५ साली इटालियन संशोधक फ्रान्सेस्को रॅम्पझेटोने स्क्रिटुरा टॅटाइल नावानं एक यंत्र तयार केलं. त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी नव नवे शोध लागत गेले. इटली, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, इंग्लंडमधील संशोधक सतत प्रयोग करत राहिले आणि टायपिंगसाठी जास्तीत जास्त सोपं, चांगलं, सुटसुटीत यंत्र तयार करायचा प्रयत्न करू लागले. १८७४ साली पहिला कमर्शिअल टाइपरायटर तयार करण्यात आला, त्यानंतर त्याचा वापरही वाढला. विविध रंगांमधले टायपिंग, वेगवेगळ्या भाषांचे कीबोर्ड तयार होऊ लागले. रेंमिग्टन, आयबीएम, इम्पेरियल टाइपरायटर्स, आॅलिवेटी, स्मिथ कोरोना अशा कंपन्यांचे टाइपरायटर्स सगळीकडे वापरले जाऊ लागले. १९५५ साली भारतामध्ये गोदरेज कंपनीने गोदरेज प्रायमा नावाचा स्वदेशी बनावटीचा टाइपरायटर तयार केला. टाइपरायटर तयार करणारी आशियातली ती पहिलीच कंपनी ठरली. १९५५ पासून सुरू असणारे गोदरेज टाइपरायटरचे उत्पादन २०११ साली थांबवण्यात आले. घटलेली मागणी आणि संगणकाचा वाढता वापर यामुळे बहुतांश कंपन्यांनी हेच केलं. जेरेमी मेयर नावाचा अमेरिकन कलाकार टाइपरायटरचे सुटे भाग वापरून सुंदर इन्स्टॉलेशन्स करतो. गोदरेजसाठीही त्याने सुंदर इन्स्टॉलेशन करून दिले आहे.