आपत्ती, तशी संधीही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 06:04 AM2020-03-15T06:04:00+5:302020-03-15T06:05:05+5:30

चीनमध्ये लोकांच्या मनात घबराट आहे, अनेक गोष्टींवर निर्बंध आले आहेत, जनजीवन विस्कळीत झालं आहे, पण अनेक चांगल्या गोष्टीही घडताहेत.

Disaster, but opportunity too! | आपत्ती, तशी संधीही!

आपत्ती, तशी संधीही!

Next
ठळक मुद्देही आपत्ती आहेच, पण ती अनेक चांगल्या गोष्टींसाठी संधीही आहे. सर्व काही पुन्हा लवकरच सुरळीत होईल, याविषयी आम्हाला कोणतीही शंका नाही.

- राकेश दत्तावाडकर, समीर डोरले

चीनमध्ये लोकांच्या मनात घबराट आहे का?
- हो, आहे.
चीनमध्ये रस्ते सुनसान झालेले दिसताहेत का?
- हो, दिसताहेत.
चीनमध्ये जनजीवन जवळपास ठप्प झाल्यासारखी स्थिती झाली होती का?
- हो, झाली होती.
तिथे लोकांना एकमेकांपासून वेगळं ठेवलं जातंय का? त्यांच्या फिरण्यावर निर्बंध आले आहेत का?
- हो, निर्बंध आहेत.
वरील सगळ्या प्रo्नांची उत्तरं ‘होय’ अशी असली तरीही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे, हे सगळे प्रतिबंधात्मक उपाय आहेत; कोरोनाला रोखण्यासाठी आणि मुख्य म्हणजे लोकांनीही ते मनापासून स्वीकारले आहेत. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे बर्‍याच ठिकाणी लोकांनी स्वत:हून हे उपाय अवलंबायला सुरुवात केली आहे. चीनमध्ये ज्या वेगानं कोरोनानं हातपाय पसरायला सुरुवात केली, त्याच वेगानं चीनमध्ये या व्हायरसला अटकावही करण्यात आला, येतोय. त्यामुळे इथली परिस्थिती आता जवळपास पुर्णत: नियंत्रणात आली आहे. 
वरील सर्व प्रo्नांच्या बरोबरीनं आणखी एक प्रo्न चीनमधल्या, चीनमध्ये राहणार्‍या नागरिकांना विचारला जातोय, तो म्हणजे कोरोनाबाधित हजारो लोकांना चीन सरकारनं गोळ्या घालून एका क्षणात खलास केलं का?
- या प्रo्नाचं उत्तर आम्ही दिलंच पाहिजे. कारण ती आमची जबाबदारी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही चीनमध्ये राहतोय, तिथली परिस्थिती आम्ही खूप जवळून पाहतोय. तिथलं लोकजीवन आणि तिथल्या सरकारच्या कामाची पद्धतही इतक्या वर्षांत आम्हाला चांगलीच माहीत झालीय. 
चीन सरकारनं कोरोनाबाधित एकाही व्यक्तीला गोळ्या घालून अथवा इतर कुठल्या मार्गानं ठार केलेलं नाही. इंटरनेट आणि इतर माध्यमांतून फैलावली गेलेली ही खूप मोठी अफवा आहे. त्यात काडीचंही तथ्य नाही. 
चीन सरकारला लोकांना मारुन सगळा प्रo्नच जर एका क्षणात संपवायचा असता, तर केवळ दहा दिवसांत शेकडो बेडचं हॉस्पिटल त्यांनी का बांधलं असतं? लोकांची इतकी काळजी का घेतली असती? संशोधनावर आणि प्रतिबंधित उपायांवर कोट्यवधीचा खर्च का केला असता? इतके सव्यापसव्य का केले असते?. 
एक गोष्ट खरी आहे, लोकांच्या सर्वांगीण फायद्यासाठी किंवा चीनच्या, त्या त्या विभागाच्या विकासासाठी चिनी सरकारनं एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्याला कोणी विरोध करत नाही. ‘अपिल’ही नसतं. एखाद्या ठिकाणी रस्ता उभारायचा आहे, पूल बांधायचा आहे, तर त्याठिकाणी असलेल्या इमारती, घरं सर्व काही हटवलं जातं, लोकांना स्थलांतरित व्हावंच लागतं. पण चीनमध्ये इतक्या वर्षांच्या वास्तव्यानंतर आम्हाला हेही माहीत आहे, की बरेच लोक विकासकामात आपली घरं जावीत याची प्रतीक्षा करीत असतात, कारण त्यांना बाजारभावापेक्षा जास्त मोबदला दिला जातो, शिवाय अशा ठिकाणी त्यांचं पुनर्वसन केलं जातं, जिथे अनेक उत्तम सोयी-सुविधा असतात. त्यांची लाइफस्टाइलही त्यामुळे उंचावते.
आमच्याप्रमाणेच शेकडो भारतीय चीनमध्ये राहतात आणि प्रत्येकाचा हाच अनुभव आहे. कारण तंत्रज्ञानाच्या माध्यमांतून आणि प्रत्यक्षातही आम्ही एकमेकांशी कनेक्टेड असतो, आहोत. 
चीनमध्ये प्रत्यक्षात काय झालं, काय होतंय, ते आपण बघूया.
चीनमध्ये हुबेई प्रांतातील वुहान या पोर्ट सिटी परिसरात जानेवारी महिन्यात कोरोनानं शिरकाव केला. तिथे कोरोनाचे रुग्ण आढळायला लागले. साधारणत: फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना झपाट्यानं पसरायला लागला. त्याबरोबर चीन सरकारनं लोकांना आवाहन केलं. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना घरून काम करायला परवानगी दिली. कोरोना संशयितांच्या तपासण्या सुरू केल्या. शक्यतो कोणीच घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं. लोकांच्या बाहेर फिरण्यावर निर्बंध आणले. बाहेरच्या देशातील लोकांनाही; त्यांना चीनमध्येच राहायचं, की आपल्या मायदेशी परत जायचं याचा निर्णय त्यांच्यावरच सोपवला. भारतासारख्या देशांतील काही जण आपापल्या देशात परत आले, तर अनेकांनी तिथेच राहणं पसंत केलं. आमचे अनेक सुहृद आजही चीनमध्येच आहेत, ते भारतात परतलेले नाहीत आणि तिथे सुखरूप आहेत. 
आमचे अनेक सहकारी, जे भारतात आले होते, ते याआधीच स्वत:हून तिथे परत गेले आहेत आणि आम्हीही पुन्हा चीनला परतण्याच्या मार्गावर आहोत. तिथे परत जाण्यात आम्हाला कोणताही धोका वाटत नाही किंवा त्याबाबत आमच्या मनात कोणताही किंतु-परंतु नाही. 
आजच्या घडीला इतर कोणत्याही देशात, अगदी अमेरिकेतही घेतली जात नसेल, इतकी काळजी तिथे घेतली जातेय. उद्या यदाकदाचित अशीच काही आपत्कालिन परिस्थिती इतर कुठल्या देशावर किंवा जगावर कोसळली, तर चीन त्याचा सर्मथपणे मुकाबला करू शकेल, इतका अनुभव या आपत्तीतून चीननं नक्कीच घेतला आहे. 
कोरोनाची लागण पसरायला लागल्याबरोबर चीननं अनेक उपाय तातडीनं योजले. त्यावेळी कदाचित अनेकांना ते ‘कठोर’ वाटले असतील, पण आज अनेक देशांनी हे उपाय वापरायला सुरुवात केली आहे. परदेशी नागरिकांनी चीनच्या विमानतळावर पाऊल ठेवल्याबरोबर चीन सरकारनं त्यांची ताबडतोब हॉटेल्समध्ये रवानगी केली. चौदा दिवस त्यांच्यावर देखरेख, तपासणी केली गेली. त्यांना कोरोनाची लागण झालेली नाही, हे कळल्यावरच त्यांना आपापल्या ठिकाणी सोडण्यात आलं. पण हे काही फक्त परदेशी नागरिकांसाठीच नव्हतं, आपल्याच देशातल्या, एका शहरातून दुसर्‍या शहरात गेलेल्या नागरिकांसाठीही चीन सरकारनं हे उपाय योजले. चौदा दिवस त्यांना इतरांपासून वेगळं राहण्यास सांगण्यात आलं, ठेवण्यात आलं. त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. चौदा दिवस अशासाठी की, कोरोनाचा व्हायरस चौदा दिवसच जिवंत राहू शकतो. 
चीनमध्ये अनेक मोठमोठय़ा सोसायट्या आहेत. तिथल्या लोकांनीही आपल्या सोसायटीतून बाहेर जाणं आणि इतरांना आपल्या सोसायटीत घेण्यावर निर्बंध आणले. रस्ते मार्गानं, हवाई मार्गानं किंवा जलमार्गानं कुठल्याही मार्गानं कोणीही आलं, तरीही त्याची तपासणी सुरू झाली. संशयितांना ‘कॉरण्टाइन’ (वेगळं काढणं) सुरू झालं. त्यांच्यावर निगराणी ठेऊन त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. ‘एण्ट्री लेवल’लाच सर्वतोपरी काळजी घेण्यात आली, येतेय.
हे सर्व आपल्या भल्यासाठी आहे, हे लोकांनाही माहीत होतं, आहे. त्यामुळे कोणीही त्याला विरोध केला नाही. पण एवढं सारं होऊनही सारे व्यवहार पूर्णत: बंद होते, असं झालं नाही. विविध कंपन्या, सरकारनंही प्रत्येक नागरिकाला आपल्याकडून होईल तितकी मदत केली, करतंय. प्रत्येकाचे पगार निदान आतापर्यंत तरी नियमित सुरू आहेत. जे परदेशात आहेत, त्यांच्या व्हीसाची मुदत वाढवून देण्यात आली. त्यांच्या सुट्या एक्स्टेंड करुन देण्यात आल्या. आमच्यापैकी काही जणांच्या सुट्या कोरोनाच्या आधीच  प्लॅन आणि मंजूर होत्या. पण सुटी संपल्याच्या दुसर्‍या दिवसापासूनच आम्ही आपापल्या ठिकाणांहून आणि देशांतून कामावर ऑनलाइन रुजू झालो. 
अशा काळात तंत्रज्ञानाचा किती उत्तम उपयोग करून घेता येतो, हे आम्ही अनुभवलं. आपल्याकडे जसं ‘आधार कार्ड’ आहे, तसा चीनमध्ये एक युनिक आयडी असतो. त्यावरून सगळं काही ट्रॅक होतं. इतकं की, ती व्यक्ती कुठे गेली होती, कुठे कुठे प्रवास केला, कोरोनाबाधित एखाद्या भागातही ती गेली होती का, हे सारं त्यावरून कळतं. त्यामुळे संशयितांवर लगेच उपचार करणंही शक्य झालं. 
आजच्या घडीला लाखो, करोडो लोक ‘घरून काम’ या सुविधेचा लाभ घेताहेत. कर्मचार्‍यांअभावी काही कंपन्यांमध्ये प्रॉडक्शन अजून पूर्ण वेगानं सुरू झालं नसलं तरी त्यादृष्टीनं प्रय} सुरू आहेत. केवळ टेक्नॉलॉजीमुळेच आमची कंपनीही आम्ही आठ दिवसांच्या आत पुन्हा सुरू करू शकलो. इमेल, व्हीडीओ कॉन्फरिन्सिंग, वन ड्राइव्ह, वी चॅट. इत्यादि माध्यमांतून मिटिंग्ज, डॉक्युमेण्ट्सची देवाणघेवाण सुरू आहे. जगात कुठेही असलो, तरी रोज दिवसांतून अनेकदा आम्ही एकमेकांशी बोलतोय, संपर्कात आहोत. शाळा, कॉलेजेसचे कॅम्पस बंद असले तरी व्हच्यरुअल क्लासरुम्सच्या माध्यमांतून प्रत्येक शाळा सुरू आहे. त्यांचा ‘डेली अटेण्डन्स’ घेतला  जातोय. टेस्टही सुरू आहेत. सर्व विद्यार्थी, शिक्षक एकमेकांना प्रत्यक्ष स्क्रीनवर पाहताहेत, बोलताहेत, भेटताहेत. प्रत्यक्षात शाळा जशी भरते, त्याप्रमाणे सकाळी जवळपास आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंंत मुलं ‘शाळेत’ असतात. आम्हीही सध्या भारतात किंवा गरजेप्रमाणे इतर देशांत असलो, तरी आमची मुलं आजही या माध्यमांतून ‘शाळेत’ जाताहेत. ‘वी चॅट’चेही अनेक ग्रुप्स आम्ही बनवले आहेत. त्याद्वारे आम्ही प्रत्येकजण रोजच एकमेकांना भेटतोय. कोरोनामुळे दृष्य स्थितीवर निश्चितच बदल झालाय, पण त्यामुळे रुटिन फारसं बदललंय असं आम्हाला तरी वाटत नाही. ही आपत्ती आहेच, पण ती अनेक चांगल्या गोष्टींसाठी संधीही आहे. सर्व काही पुन्हा लवकरच सुरळीत होईल, याविषयी आम्हाला कोणतीही शंका नाही. 

‘बैडू’, ‘यूकू’, ‘वीबो आणि ‘वी चॅट’!
कोरोनाच्या बाबतीत चीनमध्ये नेमकी काय स्थिती आहे, याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेत. बाहेरच्या देशांतल्या लोकांना एक मोठी शंका असते, ती म्हणजे चीनमध्ये इंटरनेटवर पूर्णत: बंदी आहे. आपली कोणतीही गोष्ट ते जगापर्यंत पोहोचू देत नाहीत आणि जगातील प्रत्येक  गोष्ट ‘फिल्टर’ होऊनच त्यांच्यापर्यंंत पोहोचते, पण ते अर्धसत्य आहे. ज्या परदेशी कंपन्यांनी चिनी सरकारचे नियम मान्य करण्यास नकार दिला, त्यांच्यावरच बंदी आहे. यूट्यूब, फेसबुक, व्हॉटसअँप यासारख्या सोशल साइट्सवर बंदी असली तरी त्या प्रत्येकाला लोकल पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यांचा वेगही महाप्रचंड आहे. गुगलच्या ऐवजी ‘बैडू’, यूट्यूबच्याऐवजी ‘यूकू’, फेसबुकऐवजी ‘वीबो’, व्हॉट्सअँपऐवजी ‘वी चॅट’ तसंच गुगल इमेल आणि गुगल ड्राइव्हला ‘क्यूक्यू’ असे अनेक लोकल पर्याय इथे उपलब्ध आहेत. लोक त्यांचा मोठय़ा प्रमाणात वापर करतात. याशिवाय बर्‍याच ठिकाणी व्हच्यरुअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) आहे. त्यावर यूट्यूब, गुगल अशा सार्‍या साइटही चालतात. त्याचा गैरवापर होतोय, अशी सरकारला शंका आली, तर मात्र त्यावर निर्बंंध आणले जातात. मात्र याच सोशल नेटवर्किंंग साइट्सचा चीन आणि चिनी सरकारनं कोरोनाला अटकाव करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला.
(लेखक चीनच्या शांघाय येथील रहिवासी आहेत.)

(मुलाखत आणि शब्दांकन : समीर मराठे)

Web Title: Disaster, but opportunity too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.