दिवाळी अंक हे दीपोत्सवाचे लखलखते वैभवच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 06:02 AM2020-11-15T06:02:00+5:302020-11-15T06:05:06+5:30
‘दीपोत्सव’ या लोकमतच्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने पुणे येथे साहित्य व्यवहारातल्या मान्यवरांची एक अनौपचारिक मैफल रंगली. त्या संवादातले हे काही अंश
कोरोनासारखे संकट अचानक आले की घाबरणे आणि गोंधळणे या स्वाभाविक प्रक्रिया; पण याची दहशत निर्माण केली जात आहे... कोरोनाचा पहिला जोर ओसरत आहे, सुस्थिती येत आहे. येत्या तीन महिन्यांत गोष्टी सर्वसामान्य होतील व पुस्तक व्यवसायावरचा ताण कमी होईल. मागणी जास्त, पुरवठा कमी ही चांगली गोष्ट म्हटली पाहिजे. तंत्रज्ञानाच्या अंगाने मराठी साहित्यात अनेक गोष्टी घडतील. प्रयोगशील लोकमत दीपोत्सवला शुभेच्छा!
- डॉ सदानंद बोरसे, संपादक, राजहंस प्रकाशन
--------------------------------------------------------------
दर्जेदार पुस्तकं खपतातच. वाचकांबद्दल अजिबात नाराजी नाही. दर्जा राखला तर वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. लोकमत दीपोत्सव अंकांनं हे सिद्ध केलं आहे. प्रसिद्धी माध्यमांनी ग्रंथव्यवहारालाही प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
- अरविंद पाटकर, मनोविकास प्रकाशन
----------------------------------------------------------------------
सकारात्मकता दाखवायची म्हणजे दिशाभूल करायची, असे नव्हे! पुस्तकांना मागणी कमी होत आहे. नोटाबंदीनंतर प्रकाशन व्यवसाय अडचणीत आला आहे. पुस्तक घेण्यासाठी रांगा लागल्या आहेत असे चित्र नाही. पुढे काय वाढून ठेवले आहे माहिती नाही. बाहेरगावच्या विक्रेत्यांना कोरोना, कंटेन्मेंट झोन, ट्रान्सपोर्ट अशा अडचणी आहेत. या अडचणींवर मात करीत लोकमत दीपोत्सवसारखे दिवाळी अंक खपाचे विक्रम करत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे.
- प्रदीप चंपानेरकर, रोहन प्रकाशन
---------------------------------------------------------
यंदा कोरोनामुळे दिवाळी अंक कमी निघाले असले, तरी मागणी खूप आहे आणि अंक कमी पडत आहेत. लोकमत दीपोत्सवचा अपवाद वगळल्यास इतर दिवाळी अंकांच्या प्रती कमी संख्येने उपलब्ध आहेत! पुस्तकपेठेत लोकमतच्या दीपोत्सवला मोठी मागणी आहे. दिवाळीनिमित्त पुस्तके भेट देण्याकडे कल वाढतो आहे, हे नक्की!.. बाजारात निश्चित सकारात्मकता आहे ती माध्यमांमध्ये प्रतिबिंबित झाली पाहिजे.
- संजय भास्कर जोशी, लेखक व पुस्तक व्यावसायिक-पुस्तकपेठ
-----------------------------------------
मीडिया नेक्स्ट या आमच्या कंपनीने मेनका प्रकाशन घेतले तेव्हा खूणगाठ बांधली होती, निव्वळ प्रकाशनगृह म्हणून ते पुढे आणायचे नाही. इतर कंटेंटबरोबर नियतकालिके, दिवाळी अंक, पुस्तके प्रकाशित केली. हा समतोल साधता आला तर प्रकाशन व्यवसाय तगेल. पुस्तकांना मरण नाही. दिवाळी अंकांच्या मागणीच्या मानाने पुरवठा यंदा कमी आहे. कोरोनामुळे दसऱ्यापर्यंत अनिश्चितता कायम होती; पण वाचकांचा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे.
- आनंद आगाशे, मेनका प्रकाशन
------------------------------------------------
आम्ही पुणे या एकाच शहरावर गेली दहा वर्षे दिवाळी अंक काढला, त्याला पुण्यातूनच नव्हे तर जगभरात पसरलेल्या पुणेकरांचा प्रतिसाद लाभत आहे. पुण्याचे डाॅक्युमेंटेशन त्यानिमित्ताने झाले. पुढील वर्षी १५०० पानांचा तीन खंडांतला दिवाळी अंक काढून पुण्याची इत्यंभूत माहिती देणार आहोत.
- डॉ. सतीश देसाई, त्रिदल फाउण्डेशन, प्रकाशक- पुण्यभूषण दिवाळी अंक
--------------------------------------------------------------
कोविडकाळात एका दिवसाआड पुस्तक दालने उघडली. ऑनलाइन विक्री आणि वाचक जागर अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवाळीच्या काळात दिवाळी अंकांमुळे वाचन चळवळीला बळच मिळते. लोकमत दीपोत्सवसारखे दर्जेदार अंक वाचकांना आकर्षित करतात.
- दत्तात्रय पाष्टे, डायमंड प्रकाशन
--------------------------------------------------
गावोगावी वाचनाची भूक आहे. कोरोनाकाळात जीवनावश्यक गोष्टींच्या विक्रीला जशी मुभा होती, तशी सर्व नियम पाळून पुस्तक विक्रीला मिळाली असती, तर वाचकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला असता. कारण या काळात वाचकांना वाचनासाठी बराच वेळ मिळाला होता. लोकमत दीपोत्सवसारख्या दर्जेदार दिवाळी अंकांमुळे विक्रेत्यांचाही उत्साह द्विगुणित होतो.
- रसिका राठीवडेकर, अक्षरधारा
---------------------------------------
शासकीय ग्रंथालयात गर्दी आहे, पुणे, नगर वाचन मंदिरमध्येही पुस्तकांना मागणी आहे. सॅनेटाइझ केलेली पुस्तके वाचक घेत आहेत. लोकमत दीपोत्सव अंकाची वाट वाचक पाहत असतात.
- विकास वाळूंजकर, ज्येष्ठ पत्रकार
(सर्व मुलाखती व शब्दांकन - नम्रता फडणीस)