दिवाळीचे झाले, आता राजकीय फटाके...
By किरण अग्रवाल | Published: November 7, 2021 11:14 AM2021-11-07T11:14:47+5:302021-11-07T11:14:56+5:30
Political firecrackers भाजपाच्या पाठबळामुळे गळ्यात हार पडलेल्या प्रहार पक्षाचा आत्मविश्वास त्यामुळे दुणावणे स्वाभाविक असून, महापालिकेच्या निवडणुकीसाठी ते कंबर कसून तयारीला लागले आहेत.
- किरण अग्रवाल
दिवाळीचे फटाके फोडून होत नाहीत तोच राजकीय फटाके फुटू लागतील, कारण अकोला महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. कोरोनाचे भय ओसरल्यात जमा असल्याने विविध राजकीय आंदोलनांचा आता जोर वाढलेला दिसेल, पण दिवाळीत जसा गरजूंच्या मदतीसाठी माणुसकीचा झरा वाहताना दिसला, तसा या आंदोलनांत सामान्य माणसांचे प्रश्न असतील का, हाच खरा प्रश्न आहे.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट शक्यतांच्या चर्चेतच विरल्यामुळे यंदाची दिवाळी जोरात झाली, खूप फटाके फोडले गेलेत. आता अकोला महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय फटाके फोडण्याची व्यूहरचना सुरू झाली आहे. जिल्हा परिषद सभापतिपदाच्या निवडणुकीत प्रहारच्या उमेदवाराला भाजपाने दिलेल्या पाठिंब्यातून त्याची चुणूक दिसून आल्याने येणाऱ्या काळात अशीच काही समीकरणे आकारास आली तर आश्चर्य वाटू नये.
यंदा अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील प्रहारने दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी केली. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या गृहकुलात कुटासा येथून पोटनिवडणूक जिंकलीच, पण जिल्हा परिषदेत प्रथमच एन्ट्री केलेल्या या पक्षाच्या एकमेव सदस्याने सभापतिपदही पटकावले. भाजपाच्या पाठबळामुळे गळ्यात हार पडलेल्या प्रहार पक्षाचा आत्मविश्वास त्यामुळे दुणावणे स्वाभाविक असून, महापालिकेच्या निवडणुकीसाठी ते कंबर कसून तयारीला लागले आहेत. पक्षाचे महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांच्या वाॅर्डात बच्चू कडू यांनी बैठक घेऊन तेथील कॅनॉलसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या घोषणाकडे याच संदर्भाने बघता यावे. बच्चूभाऊंचे अकोल्यातील दौरे अलीकडे वाढले आहेत त्यातूनही हाच संकेत घेता येणारा आहे.
महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचे काम खूप प्रभावी आहे अशातला अजिबात भाग नाही, परंतु तीन सदस्यीय प्रभागांची रचना घोषित झाल्यापासून हा पक्ष काहीसा निर्धास्त झाला आहे हे खरे. केडर बेस व्यवस्था या पक्षाने उभारून ठेवलेली असल्याने आता विरोधकांवर आरोपांचे फटाके उडवून सत्ता पुन्हा सलामत राखण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून होतीलच. या प्रयत्नांना शिवसेनेकडून जोरदार विरोध होण्याची शक्यता असल्याने, या फटाक्यांचे आवाज कानठळ्या बसवण्याची शक्यता नाकारता येऊ नये. महापालिकेच्या अलीकडील महासभांमध्ये उभय पक्षात झालेल्या घमासानमधून याची चाहूल लागून गेली आहे.
काँग्रेसमधील स्थानिक नेतृत्वाचा बदल काही दिवसांपूर्वीच घडून आला आहे. विशेषतः या पक्षातील युवकांची फळी आता सक्रिय दिसून येत असून, त्यांची आंदोलने वाढली आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यादृष्टीने अकोल्यात लक्ष केंद्रित केले असून, त्याचदृष्टीने गेल्या महिन्यातील काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदसाठी ते अकोल्यात थांबलेले दिसून आले. राष्ट्रवादीचीही सक्रियता वाढली असून विविध आंदोलने केली जात आहेत. नुकतेच त्यांनी इंधन दरवाढीबद्दल रस्त्यावर स्वयंपाक करून अकोलेकरांचे लक्ष वेधून घेतले होते
वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यात जिल्हा परिषद आहेच, आता त्यांना महापालिकेसाठीही प्रयत्न करायचे आहेत. त्याची आखणी सुरू झाली आहे. वॉर्डा-वाॅर्डात सक्षम उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या व शहराशी जवळीक असलेल्या काहींना महापालिकेच्या रिंगणात उतरवता येईल का, याचाही विचार या पक्षात सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारख्या पक्षाची येथे संघटनात्मक ताकद तुलनेने कमी असली तरी बार्गेनिंग फाॅर्म्युल्यात पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे मनसुबे आहेत.
सारांशात, दिवाळी आटोपल्यानंतर आता राजकीय पक्षांचा गलबला सुरू होणार आहे. राजकीय वर्चस्ववादासाठी शह-काटशहाचे राजकारण रंगून आरोप-प्रत्यारोपांचे बार भरले जातील. या राजकीय फटाक्यांची आतषबाजी पाहणे करमणुकीचेच ठरण्याची चिन्हे असल्याने, ती औत्सुक्याची ठरली आहे.