पुणेरी कट्टा - वाढदिवस नको रे बाबा ...!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 07:00 AM2018-12-16T07:00:00+5:302018-12-16T07:00:04+5:30
अनेक मोठमोठे नेते स्वत:च्या वाढदिवसाला अज्ञात स्थळी जाणे पसंत करतात किंवा त्या दिवशी आपले मोबाईल बंद ठेवतात. माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याला हा अनुभव आहे. वाढदिवशी अनेकांना आनंदापेक्षा त्रासच फार होतो...
-अंकुश काकडे -
वाढदिवस म्हटला म्हणजे आपल्या आयुष्यातील आनंदाचा दिवस. कुटुंबातील सर्व मंडळी, मित्रपरिवार यांच्या शुभेच्छा. त्यांच्यासमवेत मजेत घालविण्याचा दिवस. पण राजकीय नेते, सेलिब्रेटीज, प्रसिद्ध व्यक्ती यांच्या बाबतीत मात्र तो मर्यादित स्वरूपात राहत नाही. माज्यासारखा तसा म्हटलं तर छोटा कार्यकर्ता; पण मोठा मित्रपरिवार, सार्वजनिक क्षेत्रात गेली अनेक वर्षं काम करणारा. पण काही वर्षांतील वाढदिवसाचा अनुभव पाहता, आनंदाच्या ऐवजी होणारा त्रास पाहता ह्यवाढदिवस नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ येते.
१० डिसेंबर हा माझा वाढदिवस. पण वाढदिवसाची सुरुवातच होते ९ डिसेंबरला रात्री ११.५९ मिनिटांनी. काही महाभाग (जे स्वत:ला फार जवळचे मित्र आहेत असे समजतात) बरोबर रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी फोन करणार. सुरुवातच अशी करतात, की त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत की डोकेदुखी हेच समजत नाही. त्यांची सुरुवातच अशी होते, काय पहिला फोन माझाच ना? हां, मग आठवणीनं मी लक्षात ठेवतो तुझा वाढदिवस. बरं मग काय चाललंय? नवीन वषार्चा काय संकल्प? पार्टी वगैरे काही ठेवली की नाही? उद्या घरी कधी भेटणार?ह्ण असे नको ते प्रश्न विचारून वाढदिवसाची सुरुवात करतात. काही जण इतक्या लांबलचक शुभेच्छा देतात की, त्यातच १-२ मिनिटे जातात. एकच उदाहरण पाहा, आपणांस येणारं वर्ष सुखसमृद्धीचे, भरभराटीचे, कौटुंबिक सुख, शांती, राजकीय भरभराटीचं जावो, या वर्षी तुम्ही विधान परिषदेत जावो ही शुभेच्छा!
तर एसएमएसद्वारे शुभेच्छाही रात्रीपासूनच सुरू होतात. आता तर व्हॉट्सअपमुळे मोठेमोठे केक, फुलांचे गुच्छ, त्याच्याखाली अनावश्यक शुभेच्छा देणाऱ्यांचे पीक कॉँग्रेस गवतापेक्षा झपाट्याने वाढत आहे. झालं, आमची १० डिसेंबरची सकाळ सुरू झाली की फोन तर चालूच असतात; पण घरच्यांसाठी थोडा वेळ द्यावा म्हटलं तर तेही शक्य होत नाही. कुणी ना कुणी तरी शुभेच्छा द्यायला हजरच. काही जण पेढे, भेटवस्तू घेऊन येतात. बरं त्यांनी आणलेले पेढे त्यांच्यासमोरच खायचा आग्रह (जणू मंदिरातील हार, नारळ जसे लगेच बाहेर विक्रीला येतात, तसे आम्ही ते पेढे पुन्हा दुकानदारांना परत देऊ की काय, असा त्यांना संशय असतो). एकदा एका कार्यकर्त्याने मोठा गुच्छ आणला आणि मला देताना म्हणतो कसा, ह्यफुलवाल्याला सांगितलंय अण्णांना आवडला नाही तर बदलून घेईन.ह्ण असं म्हटल्यावर काय बोलणार! बरं आणलेले गुच्छ तेथेच ठेवले जातात. काही मित्र, कार्यकर्ते हळूच तेथे असलेला गुच्छ घेणार आणि तोच आम्हाला देणार. शिवाय गुच्छ देताना फोटो मात्र काढणार. लगेच तो व्हॉट्सअप, फेसबुकवर टाकून मोकळे. राजेंद्र गुप्ता नावाचा कार्यकर्ता आठवणीने वाढदिवसाला येणार. आल्यानंतर ३-४ प्लेट घेतल्याशिवाय त्याचं पोट भरतच नाही. असे अनेक नमुने. वर्षभरात कधी भेटणार नाहीत; पण त्या दिवशी मात्र हजर. बरं शुभेच्छा देण्यासाठी येणारांना काही वेळेचं बंधन अजिबात नसतं. सकाळ, दुपार, रात्री उशिरापर्यंत त्यांच्या सोईने केव्हाही येणार. एका वाढदिवसाचे दुपारी १ च्या सुमारास एक गृहस्थ भेटायला आले. तशी फार ओळख नव्हती. मी नेमकं जेवायला बसलो होतो, त्याच वेळी आले. औपचारिकपणा म्हणून सहज म्हटलं, जेवण करताय का? अगोदर म्हणाले, ह्यनाही, मी घरी खाऊन आलो आहे. पण ताटात श्रीखंडपुरी पाहिल्यावर म्हणाले,अरे श्रीखंड दिसतंय. माझं आवडतं असं म्हणून चक्क बसले ना जेवायला. ते गेल्यावर पत्नीनं विचारलं, कोण होते एवढे जवळचे? पण मला मात्र त्यांचं नाव काही आठवत नव्हतं. एका वेळी रात्री १० वाजता एका कार्यकत्यार्चा फोन आला.घरी आहात का? विचारलं. मी हो म्हटल्यावर १० मिनिटांत येतो म्हणाले. मी त्यांची वाट पाहत होतो. घरचे जेवणासाठी थांबले होते. पण हे महाशय चक्क पाऊण तासाने आले. उशिराचं कारण काय सांगितलं तर केकचं दुकानच सापडत नव्हतं, एक दुकान भेटलं पण मनासारखा केक तेथे नव्हता म्हणून तो घेतला नाही, उद्या सकाळी पाठवून देईन असं म्हणाले. सध्या वाढदिवस शुभेच्छा या फ्लेक्स लावल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, असा बहुतेकांचा समज झाला आहे. मग ज्याचा वाढदिवस आहे त्याचा फोटो. बरे हे फोटोही असे शोधून काढतात, की ज्याचा फोटो आहे, त्यालादेखील स्वत:चा फोटो पाहून खजील झाल्यासारखं वाटतं. आता तर व्हॉट्सअपवर काय काय मेसेज, गुच्छ, केक पाठवतात... बापरे! ते पाहूनच पोट भरतं. एकीकडे समक्ष भेटायला येणारे, दुसरीकडे मोबाईलवर शुभेच्छा देणारे, त्यामुळे अनेक फोन्स घेता येत नाहीत. त्याचा रागदेखील लगेच बोलून दाखवतात. झालं, अशा रीतीने तो दिवस गेला की ज्यांनी मेसेज केला असतो ते जर दुसरी दिवशी भेटल्यावर लगेच सुरुवात, अहो आमचा मेसेज मिळाला की नाही? आपण हो म्हटलं की लगेच मग परत रिप्लाय नाही केला? (आलेले हजार-पाचशे मेसेज बऱ्याच वेळा लगेच पाहायलाही वेळ मिळत नाही) अशी तक्रार करून मोकळे. अशा प्रकारे वाढदिवसाचा आनंद द्विगुणित होतो, हे म्हणणं थोडं धाडसाचंच होईल. आता माज्यासारख्या माजी महापौराची अशी स्थिती होत असेल, तर शरद पवारांसारखे नेते किंवा इतर मोठे नेते यांना काय त्रास होत असेल याची कल्पनाच करवत नाही. पण मी मात्र यातून एक धडा घेतलाय, ज्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील, त्यांना आदले दिवशी आपणांस वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा असा छोटा मेसेज पाठवतो. याबाबतीत गिरीश बापट यांचे देखील अनुकरण करायला हवे. ते कधीही शुभेच्छांचे फोन करत नाहीत, तर दोन दिवस अगोदर त्यांचे शुभेच्छा पोस्टकार्ड येते. गेली अनेक वर्षे मी ते अनुभवतोय. अर्थात अशा शुभेच्छा दिलेल्या अनेकांना आवडत नाहीत.
(लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक कार्यकर्ते आहेत.)