असा करावा अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 01:11 PM2018-11-16T13:11:30+5:302018-11-16T13:12:03+5:30

अभ्यास कसा करावा, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधी सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास का करावा, या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना ...

Do the practice | असा करावा अभ्यास

असा करावा अभ्यास

googlenewsNext

अभ्यास कसा करावा, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधी सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास का करावा, या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना चांगले करिअर करण्यासाठी आणि स्वत:च्या जीवनातील सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर कशाची गरज असेल, तर ती म्हणजे अभ्यासाची. हे एकदा समजले, की अभ्यास कसा करावा, या प्रश्नाचे उत्तर समजायला मदत होते. सर्व शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांनी जीवनात मोठे ध्येय ठेवावे, त्यातून इच्छाशक्ती निर्माण होते. इच्छाशक्तीतून एकाग्रता वाढते. एकाग्रतेतून अभ्यास करण्याची क्षमता वाढते. क्षमतेतून आत्मविश्वास वाढतो. डोळ्यासमोर कायम मोठे ध्येय असेल, तरच विद्यार्थी जीवनात यशस्वी होतात. मूळ उद्देशापासून कधीच विद्यार्थ्यांनी भटकू नये, अभ्यास करून चांगले करिअर करणे हाच विद्यार्थ्यांचा मूळ उद्देश आहे आणि अभ्यासाशिवाय पर्याय नाही, हे सर्व विद्यार्थ्यांनी समजून घ्यावे, विद्यार्थ्यांनी एकूण उपलब्ध असलेला वेळ व एकूण करावयाचा अभ्यास याचे व्यवस्थित नियोजन करावे, परीक्षेची अंदाजे तारीख लक्षात घेऊन आजपासून त्या तारखेपर्यंत प्रत्येक दिवसाचे नियोजन करावे, शाळेच्या दिवशी कमीत कमी ३ ते ४ तास अभ्यास तर पूर्ण सुटीच्या दिवशी कमीत कमी १४ तास अभ्यास सहज करता येतो.
अभ्यासाला बसल्यावर सलग दोन ते तीन तास जागेवरून उठू नये, अभ्यास शांत ठिकाणी करावा, विद्यार्थ्यांनी झोप सात ते आठ तास घ्यावी, सोप्या विषयांना दोन वेळेस तर कठीण विषयांना तीन वेळेस रिव्हिझन होईल, असा अभ्यासाचा टाइमटेबल बनवावा, कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना त्या विषयांच्या कमीत कमी मागील पाच प्रश्नपत्रिका बघाव्यात म्हणजे अभ्यासाला योग्य दिशा मिळते. सर्व विद्यार्थ्यांनी सर्व विषय शाळेतच, कोचिंग क्लासमध्ये शिक्षकांच्या तासिकेतच लक्ष देऊन समजून घ्यावेत म्हणजे घरी करावयाचा अभ्यास सोपा होऊन जातो. शाळेत होणाऱ्या घटक चाचण्याही विद्यार्थ्यांनी नियमित आणि अभ्यास करून देत राहाव्यात, अभ्यासातील अडथळे समजल्या जाणारे मोबाइल, टीव्ही, कॉम्प्युटर, इंटरनेट टाइमपास करणारे मित्र इत्यादी सर्वांपासून विद्यार्थ्यांनी शक्य तितक्या दूर राहावे, हेच सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांचा अतिशय अमूल्य असा वेळ वाया घालत आहेत.
सर्व विद्यार्थ्यांनी स्वत:ला समजेल अशा भाषेमध्ये स्वत:च्या नोट्स काढाव्यात, या नोट्स काढण्यासाठी तीन ते चार पुस्तकांचा प्रथम चांगला अभ्यास करावा व नंतर त्या नोट्समधून शेवटपर्यंत अभ्यास करत राहावा, सर्व महत्त्वाचे सूत्र, आकृत्या, समीकरण इत्यादींचा एक संच बनवून कायम स्वत:जवळ ठेवावा, तो आयुष्यभर कामात येतो. विद्यार्थ्यांनी संतुलित आहार घ्यावा, स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्यावी. स्वत:च्या जीवनातील समस्या, घरातील वाद, आर्थिक समस्या, आजारपण इत्यादींचा आपल्या अभ्यासावर परिणाम होणार नाही, अशी सकारात्मक मन:स्थिती बनवावी, परीक्षेत किंवा जीवनात कुठेही अपयश आले, तर विद्यार्थ्याने खचून जाऊ नये, अपयशाची खरी कारणं शोधावी, पुन्हा नियोजन करावे, स्वत:च्या चुकीतून धडा घेऊन पुन्हा जिद्दीने कामाला लागावे. सरावाने आणि अभ्यासाने अतिशय साधारण विद्यार्थीसुद्धा परीक्षेत चांगले मार्क्स मिळवू शकतो आणि जीवनात प्रगती करू शकतो. अभ्यास जर चांगला झाला असेल, तर परीक्षेची भीती मुळीच वाटत नाही. अभ्यासातून यश मिळाले तर तुमचा आत्मविश्वास खूप वाढतो व त्या आत्मविश्वासातून पुढचे यश प्राप्त होते. ही यशाची मालिका आजच सुरू करा, आजच्या स्पर्धेच्या युगात एक जरी वर्ष वाया गेले तर तुमच्या क्षेत्रातील लाखो विद्यार्थी पुढे निघून जातात. त्यामुळे वेळेचे भान ठेवून सर्व विद्यार्थ्यांनी वेळचे काम वेळेवर करणे अत्यावश्यक आहे. आजच सर्व विद्यार्थ्यांनी स्वत:च्या अभ्यासाची, परीक्षेची, करिअरची आणि एकंदरीत संपूर्ण जीवनाची जबाबदारी घ्या आणि कामाला लागा.

- प्रा. गणेश देशमुख

Web Title: Do the practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.