मुद्द्याची गोष्ट : मुलं आजुबाजुला असताना तुमचा मोबाइल खिशात असतो की हातात?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 10:15 AM2022-06-19T10:15:42+5:302022-06-19T10:17:46+5:30
मुक एक मालिकेतील दृश्ये पाहून मुले हिंसक झाली, मोबाइलवरचा गेम खेळताना मुलाने आत्महत्या केली, इंटरनेटच्या अतिवापराने मुले बिघडली’ अशा बातम्या वाचून अनेक जण पान उलटतात, पण काही दिवसातच या बातम्या तुमच्या घराचे दरवाजे ठोठावू शकतात.
- राजीव तांबे, समुपदेशक, पुणे
मुक एक मालिकेतील दृश्ये पाहून मुले हिंसक झाली, मोबाइलवरचा गेम खेळताना मुलाने आत्महत्या केली, इंटरनेटच्या अतिवापराने मुले बिघडली’ अशा बातम्या वाचून अनेक जण पान उलटतात, पण काही दिवसातच या बातम्या तुमच्या घराचे दरवाजे ठोठावू शकतात. कारण आज घराघरातला सुसंवाद संपत चालल्याचं दिसतं आहे.
घरातल्या मुलांची जेवायची वेळ झाली की घरातली मोठी माणसं, टीव्हीवरचा कार्टूनचा नळ सोडतात आणि मुले जेवू लागतात. त्यावेळी पालक आपल्या हातातील मोबाइल बघत जेवण चिवडू लागतात. सतत दृश्य प्रतिमा पाहिल्याने आपली विचारशक्तीच बंद होते, वेगळा विचार करण्याची क्षमताच कमी होते आणि आपल्या मनातील विचार आपल्या भाषेत मांडण्याची शक्तीच विरुन जाते हे पालकांच्या लक्षातच येत नाही. इथूनच टिव्ही, मोबाइल आणि टॅबच्या ‘ठिबक सिंचनाची’ सुरुवात होते.
‘अहो हा टीव्ही पाहिल्याशिवाय जेवतच नाही’ असं सांगणारे पालक आपल्या हातातील मोबाइल बाजूला ठेवून मुलाशी बोलतात का? त्याला जवळ घेतात का? हा महत्वाचा प्रश्न आहे. मुलांच्या तक्रारी करून प्रश्न सुटणार नाही. आपल्याला मुलांच्या समस्येच्या मुळाशी जायला हवं. आणि त्याचवेळी मुलांना अत्यंत सह्रदयतेने समजून घ्यायला हवं.
‘कुठलीही गोष्ट करू नये’ असं म्हंटलं की त्या गोष्टी बद्दल अधिक आकर्षण निर्माण होतं. अशावेळी ‘करू नये’ असं न सांगता ती गोष्ट ‘कशी करावी’ हे सांगितलं तर प्रश्न सुटतो हे लक्षात ठेवा. मुलांनी टीव्ही पाहूच नये, ही झाली टोकाची भूमिका. पण आपल्याला सुवर्णमध्य काढायचा आहे. म्हणून टीव्ही किती पाहावा, कोणते कार्यक्रम पाहावेत आणि कधी पाहावेत याचं वेळापत्रक घरातल्या सगळ्यांसाठी करणं गरजेचं आणि बंधनकारक असेल तर काही मार्ग काढता येईल.
मुले हिंसक होतात, लहान वयातच जीवावर बेतणारी साहसं करायला तयार होतात, चटकन निराश होऊन आत्महत्या करण्याचा विचार करतात हे खुपदा घरातील वातावरण आणि मुलांचे पालकांशी असणारे सहसंबंध यावर अवलंबून असतं. हे टाळण्यासाठी एक गोष्ट सुचवीन.
मुलांना कुठलाही प्रश्न विचारण्याआधी तो प्रश्न पालकांनी आधी स्वत:ला विचारावा. त्याचे समाधानकारक उत्तर आपण आपल्यालाच देऊ शकलो तर तो प्रश्न मुलाला विचारावा.
अनेक पालक मुलांना रोज विचारतात ‘आज काय शिकवलं? काय शिकलास? एव्हढंच? अभ्यास केला की टाइमपास केला?’ या प्रश्नानंतर मुले एकलकोंडी होतात. फारसं बोलत नाहीत. कारण या प्रश्नामागे अविश्वास आहे. पण जर पालकच आधी म्हणाले की, ‘आज मला या गोष्टी नवीन कळल्या. मला पण अभ्यास करावाच लागतो’. लक्षात घ्या फक्त प्रश्न विचारून मुले शिकत नाहीत. जेव्हा मुलांसोबत शिकण्याचं शेअरिंग होतं तेव्हा मुलांचा वाढलेला आत्मविश्वास मुलांची शिकण्याची गती वाढवतो. मुले अधिक सकारात्मक होतात.
एकमेकांशी बोलणं, गप्पा मारणं, एकमेकांना समजून घेणं, आपण नवीन काय पाहिलं, वाचलं इतकंच काय पण आज आपण काय चुकलो आणि त्यातून काय शिकलो हे मोकळेपणाने एकमेकांना सांगणं जर घराघरात होऊ लागलं तर मुलांसोबत पालकही मोठे होऊ लागतील.
प्रिय पालकांनो, आरशासमोर उभं
राहून पुढच्या तीन सोप्या प्रश्नांची
उत्तरं खरी खरी सांगा.
तुम्ही अधिक वेळ तुमच्या मुलांना देता की मोबाइलला?
मुलाचे मित्र, त्याचा अभ्यास, त्याच्या आवडी निवडी याची तुम्ही आस्थेने चौकशी करता का?
मुलाच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याशी गप्पा मारत फिरायला जाता का?
‘ज्या पालकांचे मोबाइल नेहमी खिशातच असतात ते त्यांच्या मुलांचे मित्रच असतात’ ही चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल म्हणा.