‘भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका’ या कॅलेंडरची तुम्हाला माहिती आहे का? अशी आहेत वैशिष्ट्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 09:30 AM2022-04-10T09:30:05+5:302022-04-10T09:31:04+5:30
Indian National Calendar: भारताचं नववर्ष 1 जानेवारी किंवा गुढीपाडवा नाही. खूप कमी लोकांना या दिनदर्शिकेविषयी माहिती आहे. भारतीय खगोलशास्त्रावर आधारलेली ही दिनदर्शिका खरोखर भन्नाट प्रकरण आहे. त्याचाच हा वेध...
- विनय जोशी
(खगोल अभ्यासक, नाशिक)
गळ्या भारतीयांनाभारतीय नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! या शुभेच्छांनी खरंतर आश्चर्य वाटू शकेल. १ जानेवारी नाही, गुढीपाडवा नाही मग हे कोणते नववर्ष? हे आहे २२ मार्चला सुरू झालेले आपल्या भारताचे अधिकृत वर्ष. ‘भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका’ हे भारताचे अधिकृत राष्ट्रीय कॅलेंडर असून शासकीय कामकाज, बातम्या, राजपत्र यात याचा वापर केला जातो. तसेच जावा व बाली येथील हिंदू याचा वापर करतात. नेपाळमधील नेपाळ संवत या दिनदर्शिकेची निर्मिती यापासूनच झाली. राष्ट्रीय सौर दिनांक चेकवर लिहिणे
ग्राह्य आहे.
भारतात जशी भाषा, वेशभूषा यात विविधता आहे तसेच कालगणनेत सुद्धा प्रचंड वैविध्य आहे. बहुतांश भारतात गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होते, तर गुजरातमध्ये दिवाळी पाडव्यापासून. तमिळनाडू-पुथंडू, बंगाल-पहेला वैशाख, पंजाब- बैसाखी, केरळ- विषू या दिवसापासून तर व्यवहारात १ जानेवारीला नवीन वर्ष सुरू होते. हा सगळा गोंधळ पाहून सर्वांना समान वाटेल आणि शास्त्रशुद्ध अशी देशाची एखादी कालगणना असावी, असा विचार स्वातंत्र्यानंतर सुरू झाला. १९५२ मध्ये भारत सरकारने शास्त्रज्ञ मेघनाद साहा यांच्या अध्यक्षतेखाली एक कॅलेंडर सुधारणा समिती स्थापन केली. या समितीने सर्व बाबींचा सखोल विचार करून सुचवलेली दिनदर्शिका सरकारने राष्ट्रीय दिनदर्शिका म्हणून २२ मार्च १९५७ या दिवसापासून अधिकृतपणे स्वीकारली.
भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका ही संपूर्णपणे खगोलशास्त्रावर आधारित कालगणना आहे. १२ महिने सौर म्हणजे सूर्यावर आधारित असून त्यांची नावे चांद्र म्हणजे चैत्र, वैशाख हीच आहेत; पण यात तिथींसारखे प्रतिपदा, द्वितीया असे नसून १ ते ३१ अंकांनी दिवस मोजले जातात. नवीन वर्षाची सुरुवात भारतीय सौर १ चैत्र वसंत संपात दिनी म्हणजे २२ मार्चला होते. या दिवशी दिवस आणि रात्र समान असतात. यानंतर तीन महिन्यांनी सौर १ आषाढ- २२ जूनला सूर्य कर्कवृत्तावर दिसत असताना दक्षिणायन सुरू होते. पुढे २३ सप्टेंबरला शरद संपात दिनी सहा महिने पूर्ण होऊन सौर १ आश्विन येतो. यावेळी पुन्हा दिवस-रात्र समान असतात. तर २२ डिसेंबरला सूर्य मकर वृत्तावर असताना नऊ महिने पूर्ण होऊन सौर १ पौष येतो. अशा प्रकारे दर तिमाहीची सुरुवात निसर्गातील या चार महत्त्वपूर्ण खगोलीय घटनांशी सांगड घालणारी आहे.
या दिनदर्शिकेत महिन्याचे दिवस ३०/३१ घ्यायला देखील शास्त्रीय आधार आहे. सूर्य विषुववृत्ताच्या उत्तरेकडे दिसत असताना सूर्याची पृथ्वीसापेक्ष गती मंदावते म्हणून त्या काळातले वैशाख ते भाद्रपद हे महिने ३१ दिवसांचे आहेत. सूर्य विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे दिसत असताना सूर्याची पृथ्वीसापेक्ष गती जास्त असते म्हणून त्या काळातले आश्विन ते फाल्गुन हे महिने ३० दिवसांचे. अशा तऱ्हेने ३६५ दिवसांचे वर्ष पूर्ण होते. इंग्रजी लीप वर्षी सुरू होणारे राष्ट्रीय वर्षही ‘लीप वर्ष’ घेतात. त्या वर्षी नवीन वर्षाची सुरुवात २१ मार्चला करतात. भारताच्या बहुतेक भागांत शालिवाहन शक वापरला जात असल्याने आपल्या राष्ट्रीय दिनदर्शिकेत देखील तोच आहे. नवीन दिवसाची सुरुवात मध्यरात्री १२ वाजता होते.
खरेतर ही जगातली सगळ्यात शास्त्रीय आणि निसर्गचक्राशी पूरक दिनदर्शिका आहे. तसेच तिरंगा, राष्ट्रगीत यांच्यासारखीच आपले राष्ट्रीय प्रतीक आहे; पण भारतीय असून आपल्याला याबद्दल फारशी माहिती नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. दैनंदिन व्यवहारात या दिनदर्शिकेचा प्रचार व्हावा यासाठी प्रयत्न अपेक्षित आहेत. ही दिनदर्शिका घरात लावणे, जिथे जिथे इंग्रजी तारीख लिहितो तिथे सौर दिनांकसुद्धा लिहिणे, चेक, निमंत्रण, लग्नपत्रिका वगैरे सगळ्या दैनंदिन व्यवहारात वापर करणे, अशा सोप्या उपायातून हे कार्य घडू शकेल. अशा प्रयत्नांतून भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका जनमानसात रुजावी याच नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!
वैशिष्ट्य काय?
‘भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका’ हे भारताचे अधिकृत राष्ट्रीय कॅलेंडर असून शासकीय कामकाज, बातम्या, राजपत्र यात याचा वापर केला जातो. जावा व बाली येथील हिंदू याचा वापर करतात. नेपाळ संवत दिनदर्शिकेची निर्मिती यापासूनच झाली.
खरे तर
ही जगातली सगळ्यात शास्त्रीय आणि निसर्गचक्राशी पूरक दिनदर्शिका आहे. तसेच तिरंगा, राष्ट्रगीत यांच्यासारखीच आपले राष्ट्रीय प्रतीक आहे; पण भारतीय असून आपल्याला याबद्दल फारशी माहिती नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल.