तुमच्या मुलांकडे तुमचं लक्ष आहे ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 08:59 AM2022-02-20T08:59:06+5:302022-02-20T08:59:30+5:30

आपल्या मुलांकडे लक्ष कसं ठेवायचं? हा पालकांना नेहमी पडणारा प्रश्न आहे.

Do your children have your attention? | तुमच्या मुलांकडे तुमचं लक्ष आहे ना?

तुमच्या मुलांकडे तुमचं लक्ष आहे ना?

Next

संजीव लाटकर, पालक समुपदेशक

आपल्या मुलांकडे लक्ष कसं ठेवायचं? हा पालकांना नेहमी पडणारा प्रश्न आहे. हाच प्रश्न पालक मलाही नेहमी विचारतात. मुलांकडे लक्ष ठेवणं ही संकल्पना मुलांच्या वयानुसार बदलत असते. मूल जेव्हा अगदी लहान असते तेव्हा ते खूप unpredictable अर्थात बेभरवशाचे असते. त्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज असते. कारण आपण जी कृती करतो, त्याचे परिणाम नेमके काय होणार आहेत हे लहान मूल जाणत नाही. उदाहरणार्थ पडणे, धडपडणे, भाजणे अशा घटना या त्यांच्या आकलनाच्या पलीकडे असतात. त्याने त्याचा पुरेसा अनुभव घेतलेला नसतो. अशा अतिशय अजाण, लहान मुलांकडे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज असते. पुढे मुलं मोठी झाली की ते हळूहळू कमी होतं. आपला मुलांवरचा विश्वास वाढला की डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची गरज राहत नाही. सहाजिकच लक्ष ठेवणे कमी होते.

मुलांचा हा जो प्रवास सुरु होतो, तो अशा एका टप्प्यावर पोहचतो, की पालकांनी आपल्यावर लक्ष ठेवलेलं (आता वयात आलेल्या, समज आलेल्या आणि मोठ्या झालेल्या) किशोरवयीन मुलांना आवडत नाही. ते पालकांकडे नाराजी व्यक्त करतात किंवा पालकांना चक्क खडसावतात. मग आजकालची मुलं सहजपणे म्हणून जातात, की "आम्हाला आमची स्पेस हवीय. त्यात तुम्ही ढवळाढवळ करू नका". मुलांच्या आणि त्याहीपेक्षा पालकांच्या जीवनात एक टप्पा असाही येतो की या वयातल्या मुलांवर लक्ष ठेवायचं कसं? असा प्रश्न पालकांपुढे असतो!

हे वय जितकं आत्मविश्वासाचं असतं, तितकंच अनुभवांच्या अभावाचंही असतं. या वयात मुलं निसरड्या वाटेवर जाण्याची किंवा फसण्याची शक्यता असते. मुलांना योग्य किंवा अयोग्य हे चटकन समजेल, असं नसतं. त्यांना थोडी झगमगाटी किंवा धाडसी जीवन शैली आकर्षित करू शकते. अशा वेळी पालकांच्या मार्गदर्शनाची आणि पालकांबरोबर संवादाची खूप महत्त्वाची गरज तयार होते. या संवादाच्या वेळी संवादापेक्षा पालकांचा भर माहिती काढून घेण्यावर असेल, तर तिथे फार मोठी गल्लत होण्याची शक्यता आहे. मुलांनी त्यांची सर्व माहिती आपल्याला द्यावी, अशी पालकांची इच्छा असते आणि ते त्याच दिशेने विचार करत असतात. पण पालकांनी सतत पोलिसांसारखी चौकशी करणं, सतत माहिती काढून घेणं, सतत प्रश्न विचारून भंडावून सोडणे, सतत त्यांच्यावर लक्ष ठेवणं मुलांना आवडत नाही.  

मुलं शाळेत जातात. क्लासला जातात. खेळत असतात. मुलं जस जशी मोठी होतात तसं त्यांचं स्वतःचं एक विश्व तयार होतं. या विश्‍वात ते सहसा पालकांना डोकावूं  देत नाहीत. या विश्वाबद्दल त्यांनी  जेव्हा जेव्हा पालकांशी माहिती शेअर करतात, तेव्हा तेव्हा त्यांनी पालकांचा ओरडाही खाल्लेला असतो. त्यामुळे ते माहिती शेअर करणं थांबवतातच. या नव्या विश्वाकडे, नव्या मित्रांकडे, नव्या वातावरणाकडे मुलं जेव्हा आकृष्ट होतात, तेव्हा त्यांना तसं होऊ द्यावं.
 
मुलं मोठी होत असताना ती संवेदनशील असतात. म्हणूनच अनेक पालकांचा प्रश्न असा असतो, की उद्या मुलं बिघडली तर आम्ही काय करायचं? म्हणून आम्ही मुलांवर बारकाईने लक्ष ठेवतो. मुलांवर लक्ष ठेवणं म्हणजे वॉच ठेवणं नव्हे. मुलांकडे लक्ष द्यायचं असतं, लक्ष ठेवायचं नसतं! लक्ष देणे म्हणजे मुलांना प्राधान्य देणे, मुलांचे निरीक्षण करणे, मुलांचं म्हणणं नीट ऐकणे, मुलांशी सुसंवाद प्रस्थापित करणे. मुलांना विश्वास देणे, मुलांबद्दल तुम्ही क्षमाशील आहात याची खात्री पटवून देणे आणि या माध्यमातून मुलांना समजून घेणे. यातून मुलं तुमच्याशी मोकळेपणाने संवाद साधू शकतात. किमान काहीही झालं तरी तुम्ही त्यांच्या मागे भक्कमपणे उभे आहात, हा खूप आश्वासक असा धीर त्यांना वाटतो. 

'घार हिंडते आकाशी, तिचे चित्त पिलापाशी' या प्रमाणे पालक आयुष्यभर मुलांकडे लक्ष देतच असतात. मुलं मोठी होऊन पंखात पुरेसे बळ घेऊन कुठेही उडून गेली, तरी पालकांचं लक्ष देणं मात्र थांबत नाही. हे लक्ष देणं म्हणजेच पालकत्वाचा गाभा आहे...

Web Title: Do your children have your attention?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.