डॉनल्ड ट्रम्प

By admin | Published: March 26, 2016 08:49 PM2016-03-26T20:49:55+5:302016-03-26T20:49:55+5:30

हे महाशय रासवट आहेत. सभ्यतेचे संकेत सहज धुडकावून लावण्यात माहीर आहेत. स्त्रियांबद्दल बोलताना त्यांना भलभलते प्राणी आठवतात आणि देशाच्या सीमेवर उंच भिंत बांधली म्हणजे ड्रग्ज, स्मगलर्स आणि देशाच्या शत्रूंना ‘बाहेर’ ठेवता येईल, अशी त्यांची योजना आहे. तरीही त्यांची विजयी घोडदौड चालूच आहे. का?

Donald Trump | डॉनल्ड ट्रम्प

डॉनल्ड ट्रम्प

Next
>भारतीय निवडणुकांच्या माहोलवर पोसलेल्या ‘देसी’ अमेरिकन नजरेला दिसणारे ‘तिकडले’ चित्र: पूर्वार्ध
 
- संहिता अदिती जोशी ऑस्टीन, टेक्सास
 
भारताच्या राजकीय आणि सामाजिक वास्तवाने वेगाने घेतलेले उजवे, राष्ट्रवादी वळण हा सध्या आपल्याकडे चर्चेचा विषय आहे. पण राष्ट्रवादाचे हे तीव पडसाद तिकडे युरोप आणि अमेरिकेतही घुमू लागले आहेत. त्या दोन्हीकडची ही खबर 
 
गेले काही महिने अमेरिकेत हवा आहे ती डॉनल्ड ट्रम्प या बोलबच्चनची. जगातल्या सर्वात शक्तिमान देशातला सर्वात ताकदवान नागरिक बनण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न सुरू आहे आणि अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी जिंकण्यासाठीच्या प्राथमिक लढाईत त्यांना यशही येताना दिसत आहे. डॉनल्ड ट्रम्प हे गृहस्थ यशस्वी व्यावसायिक म्हणून अमेरिकन राजकारणात आणि सामान्य लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. (ही प्रसिद्धी चांगली का वाईट ते सोडून देऊ.) ट्रम्पबद्दल आणखी लिहिण्याआधी, अमेरिकन राजकीय पद्धत भारतापेक्षा जिथे निराळी आहे त्याचे किमान ओझरते उल्लेख करणो भाग आहे. 
भारतात सांसदीय लोकशाही आहे व संसद ही सगळ्यात ताकदवान संस्था आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षीय लोकशाही आहे. राष्ट्राध्यक्ष या पदाकडे सर्वाधिक अधिकार असतात. अमेरिकन राष्ट्राध्यक्षाची निवडणूक प्रत्यक्ष मतदानातून होते. भारतात लोकांनी मत दिलेले खासदार पंतप्रधान निवडतात. अमेरिकेत द्विपक्षीय पद्धत आहे. रिपब्लिकन- धार्मिक, परंपरावादी आणि उद्योग/उद्योजकधार्जिणा पक्ष आणि डेमोक्रॅट- सुधारणावादी, डावीकडे झुकणारा, कामगार चळवळीबद्दल आपुलकी बाळगणारा पक्ष. रिपब्लिकन पक्षातही बरेच पंथ आहेत. कट्टर धार्मिक, श्रीमंत/उद्योजकधार्जिणो, मध्यममार्गी. तीच गत डेमोक्रॅट पक्षातही. हे दोन पक्ष वगळता अपक्ष म्हणूनही अध्यक्षीय निवडणूक लढवता येते, पण जिंकून येण्याची शक्यता नगण्यच. आपल्या पक्षाचा उमेदवार कोण हे ठरवण्यासाठी दोन्ही पक्षांचे रजिस्टर्ड मतदार आधी प्राथमिक मतदान करतात. शिवाय पक्ष म्हणून जी संस्था असते त्यांच्याकडे मतांचा काही टक्का असतो. सध्या या प्राथमिक निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांमधून निवडून आलेल्या दोन पक्षांच्या उमेदवारांमध्ये शेवटचा दुरंगी सामना होतो. या निवडणुका दर चार वर्षांनी नोव्हेंबरमध्ये होतात. 
भारतापेक्षा आणखी एक निराळी गोष्ट म्हणजे ठरावीक धोरणं, कायदे व्हावेत किंवा होऊ नयेत या उद्दिष्टाने उद्योजक किंवा त्यांचे समूह उमेदवारांना पैसे पुरवू शकतात. आपल्या फायद्यासाठी पैसे देऊन कायदेमंडळात लॉबी करणं हा भारतात गुन्हा आहे; अमेरिकेत हे कायदेशीर आहे. अर्थात निवडणूक प्रचारासाठी किती पैसे खर्च करता येतील यावर मर्यादा असते (सध्यातरी आहे). उद्योजकांचा रस नफ्यात असतो त्यामुळे त्यांची राजकीय बांधिलकी तशी ढिसाळच असते. आता रिपब्लिकन पक्षातर्फेनिवडणूक लढविण्याची इच्छा बाळगणा:या ट्रम्प यांनी डेमोक्र ॅट पक्षालाही मागच्या निवडणुकांसाठी पैसा पुरवला आहे. एवढंच काय, सध्या त्यांचे प्रतिस्पर्धी असणा:या टेड क्रूझ यांनाही पाच हजार डॉलर्स दिलेले आहेत आणि याचा ट्रम्प जाहीर उल्लेखही करतात, ते अर्थातच क्रूझ यांना वादविवादात नामोहरम करण्यासाठी. 
सभ्य लोकांनी आपसात बोलण्याचे काही संकेत असतात. व्यक्ती जेवढय़ा वरच्या पदावर पोहोचते तेवढी आदबशीरपणो बोलायला लागते. निदान सगळ्यांची तशी अपेक्षा असते. स्वत:च्या प्रचार मेळाव्यांमध्ये, रिपब्लिकन पक्षाच्या वादविवादांमध्ये हे संकेत ट्रम्प सहज धुडकावून लावत आहेत. एका वाहिनीवर मुलाखतीमध्ये त्यांना प्रश्न विचारला, तुमचं हे वागणं-बोलणं राष्ट्राध्यक्षाला शोभणारं नाही; त्याबद्दल तुमचं काय म्हणणं?  
यावर ट्रम्प यांचं उत्तर होतं, सध्या माङया विरोधात सगळे, सगळ्या बाजूंनी आक्र मक विधानं करत आहेत. उद्या निवडणुका झाल्या, मी निवडून आलो की मी नाही असं बोलणार!
ट्रम्प यांचं बोलणं ऐकताना-वाचताना माङया अमेरिकन-भारतीय डोक्यात ‘एका हिंदू स्त्रीला सतराशेसाठ मुलं असावीत’ या छापाची, भारतातल्या सत्ताधा:यांनी केलेली बरीच विधानं झरझर स्क्र ोल होतात. 
भारतीय व्यवस्थेशी तुलना करता आणखी एक निराळी गोष्ट म्हणजे, दोन्ही पक्षांतर्फे कोणाला अधिकृत उमेदवारी मिळणार यातली चुरस सुरू होण्याच्या काही महिने आधीपासूनच निरनिराळ्या टीव्ही वाहिन्या उमेदवारांमध्ये वादविवाद घडवून आणतात. वाहिन्यांचे प्रतिनिधी या उमेदवारांना एकेका विषयावर (अतिशय शांत आवाजात - हे महत्त्वाचं) प्रश्न विचारतात. उमेदवारांनी आपापल्या योजना यात जाहीर करायच्या असतात. अमेरिकन कंपन्यांचं परदेशातून मनुष्यबळ आणणं, त्यातून उभे राहणारे स्थानिकांच्या रोजगाराचे प्रश्न, कर आकारणी, आरोग्य विमा, कॉलेज शिक्षणाचा खर्च, आणि फॉरीन पॉलिसी हे त्यातले काही महत्त्वाचे विषय. अशाच एका वादविवाद कार्यक्रमात फॉक्स चॅनलकडून मेगन केली नावाची पत्रकार इतर दोघांसोबत चर्चेची सूत्रं सांभाळत होती. डॉनल्ड ट्रम्प यांनी तोपर्यंत बरीच स्त्रीद्वेष्टी विधानं केली होती. स्त्रियांबद्दल बोलताना त्यांनी जाडय़ा डुकरिणी ते कुत्र, घाणोरडय़ा आणि किळसवाण्या प्राणी अशी भाषा केली होती. जाहीर वादविवादात मेगनने ट्रम्प यांना त्यांच्या या विधानांवरून छेडलं. पण आपल्या चुकांची कबुली देऊन पुढे जाण्याचं शहाणपण ट्रम्प दाखवू शकले नाहीत. हा वाद पुढे ट्विटरवर चिघळला आणि ट्रम्प यांनी केलीबद्दल तिच्या नाकातून आणि कुठून कुठून रक्त वाहत होतं असलं आणखीच भयंकर विधान केलं. या विधानावरून बरीच राळ उडाली. या विधानासंदर्भात पुढे ट्रम्प यांनी र्अध पाऊल मागे घेतलं. अर्थातच या प्रकारांवरून ट्रम्प यांच्यावर माध्यमांमधून चिकार टीका झाली. सुशिक्षित वर्गाचा दबदबा असणा:या माध्यमांमधून ट्रम्पवर टीका होण्याचं ‘रासवटपणा’ हे एकमेव कारण नाही. मोठय़ा प्रमाणात लॅटिन अमेरिकी देशांमधून निर्वासित योग्य कागदपत्रंशिवाय अमेरिकेत आहेत. त्यांची संख्या साधारण एक कोटी इतकी आहे. (अमेरिकेची एकूण लोकसंख्या 33 कोटी.) हे लोक अनेक वर्षं अमेरिकेत राहून मोलमजुरी छापाची, पडेल ती कामं करत आहेत. असेच अमेरिकेत असताना यांना मुलं झाली; ही मुलं अमेरिकन शाळा-कॉलेजांत शिकत आहेत. अमेरिकेत जन्मलेल्या या हिस्पॅनिक (द. अमेरिकन) मुलांनी आपल्या पालकांचा देश कधीच बघितलेला नाही. कायम अमेरिकेतच राहिली, या अर्थाने ही मुलं अमेरिकी आहेत. पण पालकांकडे योग्य कागदपत्रं नसल्यामुळे त्यांच्याकडे अमेरिकी पासपोर्ट नाही. हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. 
- ट्रम्प यांनी या सगळ्या लोकांना एकजात हाकलून लावणार असं विधान केलं. तेवढय़ावरच ते थांबले नाहीत. मेक्सिकोमधून अमेरिकेत ड्रग्ज आणि बलात्कारी येतात असंही सरसकट विधान त्यांनी केलं. आपल्याकडे अस्सल भारतीय असणा:या मुस्लिमांना ‘आम्ही भारतीयच आहोत हो’ असं सांगावं लागतं; हे लोक तर अमेरिकीही नाहीत. 
- अमेरिकेतले सगळे उदारमतवादी, सुशिक्षित लोक ट्रम्प यांच्या या विधानांवर नाखूश आहेत. सध्याच्या सगळ्या रिपब्लिकन उमेदवारांची एक योजना आहे - अमेरिका आणि मेक्सिको या देशांच्या सीमेवर भिंत घालायची, म्हणजे तिथून योग्य कागदपत्रंशिवाय कोणालाही अमेरिकेत येता येणार नाही. ट्रम्प यांनी एक पाऊल पुढे (!) जाऊन हिस्पॅनिकांना सरसकट बलात्कारी, ड्रग्जवाले म्हटल्यामुळे वातावरण अधिकच तापलं होतं. त्यात मेक्सिकन राष्ट्रप्रमुखाने, अशी भिंत बांधायला आम्ही कवडीही देणार नाही, असं विधान (फ-शब्द वापरून, शिवीसकट) केलं. यावर ट्रम्प यांची प्रतिक्रिया होती, मग मी भिंतीची उंची दहा फूट वाढवेन. 
- शाळकरी मुलांची भांडणं आठवावीत अशी विधानं अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनू पाहणारी व्यक्ती करते, ही गोष्ट सुशिक्षित वर्गाला पटण्यासारखी नाही. विचारी अमेरिकन समाजात, विशेषत: स्त्रीवर्गाकडून ट्रम्प यांना अजिबात मतं मिळणार नाहीत असा एक साधारण अंदाज करायला हरकत नाही. 
प्राथमिक पायरीवरच्या निवडणुका होण्याच्या कित्येक महिने आधीपासून टीव्हीवर, जाहीर वादविवाद सुरू आहेत, उमेदवारांचे प्रचारदौरे सुरू आहेत. त्यातून उमेदवारांचे विचार मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. ही धामधूम सुरू  झाल्यापासून अनेक विद्यापीठं, वृत्तपत्रं-वृत्तवाहिन्या, स्वायत्त संस्थांनी कोणता उमेदवार किती लोकप्रिय आहे याची चाचपणी सुरू केलेली आहे. सुरुवातीला यात रिपब्लिकन पक्षाचे जेब बुश आघाडीवर होते, ते कधीच स्पर्धेतून बाहेर फेकले गेले आहेत. आणि ट्रम्प पहिल्या क्रमांकावर आहेत. 
पॅरिसमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला झाला तेव्हा अमेरिकेत (आणि उर्वरित जगातही) पुन्हा एकदा अतिरेक्यांची भीती दाटून आली. ट्रम्प यांनी मौके पे चौका मारत, मी राष्ट्राध्यक्ष झाल्यास अमेरिकेचे नागरिक नसणा:या मुसलमानांना अमेरिकेत प्रवेश नाकारेन, असं म्हणून घेतलं. एवढी आगखाऊ विधानं करून, अर्धी जनता - स्त्रियांबद्दल विकृत बकवास करून, आपल्या प्रतिस्पध्र्याचा अत्यंत खालच्या पातळीवर उतरून अपमान करूनही ट्रम्प यांची प्रायमरीमधली घोडदौड चालूच आहे. त्यांना एवढा पाठिंबा मिळतो कोणत्या वर्गाकडून? आणि का?
- त्याबद्दल पुढच्या रविवारी!
(लेखिका भौतिक शास्त्रज्ञ असून, 
दीर्घकाळ अमेरिकेत वास्तव्यास आहेत.)

Web Title: Donald Trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.