केवळ ‘हंगामा’ नको, हेतू तडीस न्या!

By किरण अग्रवाल | Published: June 27, 2021 10:50 AM2021-06-27T10:50:49+5:302021-06-27T22:19:42+5:30

Bacchu Kadu : बच्चू भाऊंबरोबर बैठका म्हणजे केवळ आदळआपट, संताप व इशारेबाजी; या समजाला छेद देऊन काही केले गेले तरच ते शक्य आहे.

Don't just 'season', fulfill your purpose | केवळ ‘हंगामा’ नको, हेतू तडीस न्या!

केवळ ‘हंगामा’ नको, हेतू तडीस न्या!

Next

- किरण अग्रवाल

वेशांतर करून प्रजेचे हाल जाणून घेणाऱ्या इतिहासातील राजा-महाराजांच्या कथा आपण ऐकल्या आहेत. अभिनवतेसाठी ख्यातकीर्त असलेल्या बच्चू कडू यांनीही अकोल्यात तेच केले; पण त्यातून घडून आलेल्या चर्चेवर न थांबता अन्य काही विभागांतील समस्याही अधिकारवाणीने त्यांनी मार्गी लावणे अपेक्षित आहे.

 

चाकोरीच्या पलीकडे जाऊन केलेली कृती चर्चित ठरतेच, पण त्यातून उद्दिष्टपूर्ती घडून येतेच असे नाही. ती साधायची असेल तर त्यासाठी सातत्य आणि पाठपुरावाही गरजेचा असतो. विशेषतः जबाबदार किंवा अधिकार असलेल्या व्यक्तीकडून फक्त चर्चेत येऊन जाणे अपेक्षित नसते, कारण चर्चा काही दिवस घडून येतात आणि परिणाम न घडता हवेत विरतातही. तेव्हा कृती आणि त्या कृतीमुळे घडून आलेल्या चर्चेनंतर तिची परिणामकारकता अगर उपयोगिता दृष्टिपथात येणे आवश्यक बनते. अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी वेश बदलून काही ठिकाणी दिलेल्या भेटींप्रकरणीही तेच घडून येण्याची अपेक्षा बाळगली गेली तर ती गैर ठरू नये.

 

आपल्या वेगळ्या कार्यशैलीची खासियत जपत बच्चू कडू यांनी मंत्रिपदाचा लवाजमा बाजूस सारत व आपली ओळख लपवीत, म्हणजे वेशांतर करीत काही ठिकाणी भेटी देऊन एक प्रकारे ‘रिॲलिटी चेक’ केले. अकोला महापालिकेत सामान्य नागरिकाप्रमाणे त्यांनी आयुक्तांना भेटण्याचा, तर तहसील कार्यालयात रेशन कार्ड मिळविण्याचा प्रयत्न केला. रेशन दुकानात शासनाच्या योजनेप्रमाणे मोफत अन्नधान्य मिळते की नाही याची चाचपणी करतानाच पानटपऱ्यांवरून गुटखाही खरेदी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सामान्यांची होणारी टोलवाटोलवी व अवैध विक्रीचे प्रकार यातून समोर आले हे चांगलेच झाले, त्यावर काही कारवाईही झाली; पण एवढ्यावर थांबून चालणारे नाही, तर अशा अनेक विषयांकडे लक्ष देता येणारे आहे.

 

अभिनव आंदोलनांनी लक्ष वेधून घेण्याची बच्चू कडू यांची खासियत आहे. त्यांच्या आक्रमकतेमुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. विशेषतः दिव्यांगांसाठी असलेल्या अनेक सोयीसुविधा केवळ कडू यांच्या आंदोलनामुळे ठिकठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत. रक्तदानासाठी धावून जाण्याचे त्यांचे कार्य तर सर्वविदित आहे. त्यामुळे केवळ चर्चेत येण्यासाठी त्यांनी वेशांतर करून सदर भेटी दिल्या असे म्हणता येऊ नये. ‘सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही...’ अशा विचारधारेचे ते असल्याने या हंगाम्यानंतरची संबंधितांची कार्यतत्परता व प्रामाणिकता वाढीस लागण्याची अपेक्षा आहे; पण तसे होईल याची शाश्वती नसल्यानेच कडू यांनी याबाबत पाठपुरावा करून आपला हेतू तडीस नेऊन दाखविणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांच्या या वेशांतर प्रकरणाकडे नौटंकी म्हणूनच पाहिले जाईल.

 

महत्त्वाचे म्हणजे कागद वा अर्जावर वजन असल्याखेरीज जागचे न हलण्याची ख्याती असलेले अनेक सरकारी विभाग आहेत. दोन-पाचशे रुपयांसाठी परवानग्या अडवून धरणारे महाभागही अनेक आहेत, तेव्हा अशांचे कारनामे उघडे पाडण्यासाठीही बच्चू भाऊंनी काही केले तर सामान्य जनता त्यांना दुवा देईल. अर्थात हे सर्व करताना स्वतः कडू हे सरकारमध्ये आहेत, पालक मंत्री म्हणूनही त्यांच्याकडे अधिकार आहेत, तेव्हा त्याही माध्यमातून यंत्रणांमधील दोष दूर करण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतील. बच्चू भाऊंबरोबर बैठका म्हणजे केवळ आदळआपट, संताप व इशारेबाजी; या समजाला छेद देऊन काही केले गेले तरच ते शक्य आहे.

 

सामान्य जनतेच्या अपेक्षा सामान्यच असतात. त्यांना रस्त्याची मोठी कॉन्ट्रॅक्ट अगर डोळे दिपवणारे प्रकल्प नको असतात. विना झंझट, महापालिकेत चकरा माराव्या न लागता त्यांना जन्म-मृत्यूचे दाखले मिळाले तरी पुरे असते. जिल्हा परिषदेतील टोलवाटोलवी तर अतिशय टोकाला गेल्याच्या तक्रारी आहेत. रेशन कार्डसाठी अनेकांचा पुरवठा विभागात झगडा असतो. व्यापारी बांधवांना दुकान नूतनीकरणाचे परवाने संबंधितांचे उंबरे न झिजविता मिळायला हवेत. सध्या बळीराजाच्या पेरणीसाठीची लगबग सुरू आहे; परंतु बियाणे असो की रासायनिक खते, ती मिळविताना त्यांची अडवणूक होत असल्याचीही ओरड आहे. तेव्हा पालकमंत्री म्हणून बच्चू भाऊंनी याकडेही लक्ष देणे अपेक्षित आहे.

Web Title: Don't just 'season', fulfill your purpose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.