शंकाग्रस्त डॉ. रमाकांत

By admin | Published: November 29, 2014 02:28 PM2014-11-29T14:28:11+5:302014-11-29T14:28:11+5:30

आंधळेपणाने विश्‍वास ठेवण्याऐवजी शंका घेणे चांगले; कारण त्यातून ज्ञानप्राप्ती होते, वैचारिक स्पष्टता येते, विवेकबुद्धी जागृत होते. पण शंका घेण्यालाही मर्यादेचा बांध हवा; अन्यथा शंकाग्रस्त माणूस कायम अशांत, अस्वस्थ राहतो. डॉ. रमाकांत यांची शंका आणि त्याच्या निरसनाची कहाणी ही अशीच.

Doubtful Dr. Ramakant | शंकाग्रस्त डॉ. रमाकांत

शंकाग्रस्त डॉ. रमाकांत

Next

- डॉ. संप्रसाद विनोद 

 
 
खरं तर कुठल्याही गोष्टीचं चांगलं ज्ञान करून घ्यायचं असेल, तर थोडा संशय, थोडी शंका घेणं उपयुक्त असतं. आवश्यकही असतं. शंका आली तर माणूस माहिती घेतो, विचार करतो, शोध घेतो, पडताळून पाहतो आणि मग ती गोष्ट करतो. ही असते डोळस ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया. पण, काही माणसं अति शंका घेणारी असतात. शंका घेणं हा त्यांचा स्वभावच असतो.  त्यांना प्रत्येक गोष्टीचा  संशय येतो. अशी माणसं कुणावर विश्‍वास टाकू शकत नाहीत. त्यामुळे, ती कायम अस्थिर, अशांत आणि ताणग्रस्त राहतात. 
पुण्याजवळच्या एका खेड्यात दवाखाना असलेले डॉ. रमाकांत हे या प्रकारात मोडणारे एक वैद्यकीय व्यावसायिक. ज्या काळात त्यांनी दवाखाना सुरू केला, तेव्हा त्या भागात इतर कुणी डॉक्टर नव्हता. त्यामुळे त्यांचा दवाखाना चांगला चालू लागला. पैसेही चांगले मिळू लागले. इतके की चार-पाच वर्षांत ते गावाजवळ एक जमीन घेऊ शकले. पुढील चार-पाच वर्षांत त्यांनी एक हॉस्पिटल चालवायला घेतलं. नंतर ते विकत घेतलं. दरम्यानच्या काळात त्या भागात चार-पाच डॉक्टर येऊन स्थिरावले. त्याचा थोडा परिणाम रमाकांतरावांना जाणवू लागला. तरीही काही काळ ते तग धरून राहिले. नंतर मात्र व्यवसायावर फारच परिणाम होऊ लागला. नव्यानं आलेल्या डॉक्टरांचा व्यवसाय अधिक चांगला चालू लागला. मागून येऊन ते पुढे जाऊ लागले. आपल्याविषयी कुणी तरी कटकारस्थान करतंय, अशी रमाकांतरावांची भावना झाली. इतरांचं यश रमाकांतरावांना सलू लागलं. त्यांच्याविषयी असूया वाटू लागली. रुग्ण या परिस्थितीचा गैरफायदा घेऊ लागले. रमाकांतरावांकडे येणार्‍या रुग्णांची संख्या कमी झाल्यानं प्रत्येक रुग्णाला धरून ठेवण्यासाठी ते त्यांना फीमध्ये सवलत देऊ लागले. रुग्ण आपल्याला सोडून दुसर्‍या डॉक्टरकडे जातील, या भीतीपोटी ते फीबद्दल फारसे आग्रही राहीनासे झाले. आलेल्या सगळ्या रुग्णांवर उपचार मात्र करीत राहिले. 
रुग्णांकडून यायच्या फीच्या रकमेचा आकडा वाढू लागला. ही फी वसूल करायला गेलं तर रुग्ण दुरावेल, या भीतीपोटी ते रुग्णाकडे थकलेली फी मागायला बिचकू लागले. थकबाकीविषयी विचारलं, तर ‘आम्ही काय पळून जातोय का?’ असं म्हणून रुग्णदेखील पैसे देणं पुढे ढकलू लागले. थकबाकी आणखी वाढली. त्यातले काही रुग्ण तर फी बुडवून दुसर्‍या डॉक्टरांकडे गेले. त्यांच्याविषयीचा रमाकांतरावांचा राग वाढत गेला; पण काही करता येत नव्हतं. दमदाटी करणं, धमकी देणं त्यांच्या स्वभावात बसणारं नव्हतं. शिवाय, तसं करणं त्यांच्या प्रतिष्ठेला शोभणारं नव्हतं. साहजिकच, हा सगळा राग त्यांना आतल्या आत गिळून ठेवावा लागला. परिणामी, रक्तदाब आणि मधुमेह सुरू झाला. रात्रीची झोप उडाली. मनात हिंसेचे विचार येऊ लागले. निराशेनं त्यांना ग्रासून टाकलं. काही करण्यात रस वाटेना. जगणं संपवून टाकावंसं वाटू लागलं. मग, वैद्यकीय क्षेत्राचं शास्त्रीय शिक्षण घेतलेल्या या डॉक्टरांना ज्योतिषाचा आधार घ्यावासा  वाटला. त्यांनी सांगितलेल्या विधींवर हजारो रुपये खर्च केले. वास्तुविशारदांचा सल्ला घेऊन रुग्णालयाचं प्रवेशद्वार बदललं. ‘वास्तू’नुसार पाण्याची टाकी हलवली; तरीही फारसा फरक पडला नाही. आणखी निराशा आली. कुणी तरी करणी केली आहे, कुणी तरी आपल्या वाइटावर आहे, असं वाटू लागलं.
‘शेवटी’ योगाचा काही उपयोग होतो का, हे पाहण्यासाठी ते माझ्याकडे आले. डोळ्यात पाणी आणून, कळवळून मला म्हणाले, ‘सर काहीही करा; पण या भयाण मन:स्थितीतून मला बाहेर काढा. मला आशीर्वाद द्या. मला वाचवा. अगदी कंटाळून गेलोय.’ मी त्यांना समजावून सांगितलं, ‘या सगळ्या त्रासातून बाहेर पडण्याचा ‘अभिजात योगसाधना’ हा रामबाण उपाय आहे हे निश्‍चित; पण ही साधना सुरू करण्यासाठी तुम्हाला काही पूर्वतयारी करावी लागेल. प्रथम आपली नजर आणि विचारसरणी साफ करावी लागेल. म्हणजे, आपल्या परिस्थितीला प्रामुख्यानं आपणच जबाबदार आहोत, हे मनापासून मान्य करावं लागेल. योगसाधना ही काही जादू नाही. नुसता तुमच्या डोक्यावर हात ठेवून तुमचे प्रश्न सुटले असते, तर मी लगेच तुमच्या डोक्यावर हात ठेवला असता; पण माझा अनेक वर्षांचा अभ्यास आणि अनुभव मला असं सांगतो, की अशा प्रकारे फक्त तात्पुरता आणि काही काळ आधार मिळतो. पण, तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या अंतरंगातच शोधावी लागतील. तिथंच तुम्हाला खरा आधार मिळतो. तो तुम्हाला तिथं नक्कीच सापडेल. तुम्ही मनापासून शोध घ्यायला तयार असाल, तर मी तुम्हाला निश्‍चितपणे मदत करू शकेन. मला तरी तुमच्यासाठी हाच पर्याय योग्य वाटतो.’
रमाकांत थोडे नाराज झाले. निराश झाले; पण माझा नाइलाज होता. मला माझी स्वत:ची किंवा त्यांची फसवणूक करायची नव्हती. ‘विचार करतो,’ असं सांगून ते निघून गेले. मध्ये बरेच दिवस गेले. परत एकदा त्यांचा दूरध्वनी आला. क्षेमकुशल बोलणं झालं. वेळ ठरवून ते भेटायला आले. बराच वेळ बोलले. अनेक शंका विचारल्या. माझ्या दृष्टीनं शंका विचारणं चांगलंच होतं. मी त्यांच्या सगळ्या शंकांचं आनंदानं निरसनही केलं. तरीही काही शंका बाकी राहिल्याच. पुन्हा मध्ये काही दिवस गेले. ते परत भेटायला आले. असं दोन-तीनदा झालं. ते येत गेले. मी त्यांच्या शंकांना उत्तरं देत गेलो. ‘डोक्यावर हात ठेवावा,’ असं वाटणं मग आपोआप मागे पडलं.
रूढार्थानं रमाकांत यांची योगसाधना सुरू व्हायला प्रथम थोडा वेळ लागला. पण, शंका निर्माण होणं आणि त्या दूर करणं हादेखील साधनेचा एक महत्त्वपूर्ण भाग असल्यामुळे त्यांची ‘बौद्धिक’ साधना तर सुरू झालीच होती. बौद्धिक साधनेमुळे शंकानिरसन व्हायला मदत होते. शंकानिरसनामुळे  वैचारिक स्पष्टता येते. वैचारिक स्पष्टतेमुळे साधनेची गुणवत्ता सुधारते. रमाकांतना आता अशी स्पष्टता यायला लागली आहे. त्यांची मनोभूमी चांगली तयार होत चालली आहे. आता जोडीला आसन-प्राणायाम-ध्यान यांच्याद्वारे ‘अनुभूती’ची साधनाही सुरू झालेली असल्यामुळे बौद्धिक साधनेला चांगली बळकटी प्राप्त होत चालली आहे. वैचारिक स्पष्टतेमुळे अनुभूतीची साधनाही त्यांना खूप सोपी जाते आहे. साहजिकच, योगसाधनेचे परिणामही लवकर मिळू लागले आहेत. तसं पाहिलं, तर  खूप शंका असणारी अशी रमाकांतसारखी माणसं शेकड्यानं, हजारानं असतात; पण याच शंकांचं ‘बौद्धिक’ आणि ‘अनुभवाच्या’ पातळीवर चांगल्या प्रकारे निरसन झालं, तर त्यातून योगविद्येबद्दल ‘टिकाऊ’ आणि ‘अढळ निष्ठा’ असणारे ‘डोळस’ साधक तयार होऊ शकतात. 
अशा प्रकारच्या साधकांची आज समाजाला नितांत आवश्यकता आहे. त्यांच्याकडूनच, अडलेल्या, नडलेल्या, गांजलेल्या, त्रासलेल्या गोरगरिबांना खरा आधार, दिलासा मिळू शकेल. असे प्रयत्न व्यक्तिगत आणि व्यापक सामाजिक पातळीवर काही प्रमाणात चालू असले, तरी सध्याची समाजाची गरज लक्षात घेतली, तर त्याला व्यापक सामाजिक अधिष्ठान मिळण्याची गरज आहे. त्यासाठी सामाजिक भान असणार्‍या, समाजासाठी सेवाभावी वृत्तीनं रचनात्मक कार्य करू इच्छिणार्‍या, सुशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असणार्‍या, सखोल आणि प्रदीर्घ योगसाधनेसासाठी पुरेसा वेळ देऊ शकणार्‍या व्यक्तींची गरज आहे.
(लेखक महर्षी न्यायरत्न विनोद यांचा विशुद्ध अध्यात्माचा आणि अभिजात योगसाधनेचा वारसा चालविणारे योगगुरू आहेत.) 

Web Title: Doubtful Dr. Ramakant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.