माणसांना माणसात आणताना... 'मॅगसेसे'चे मानकरी डॉ. वाटवानींच्या जिद्दीला सलाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 06:11 PM2018-08-04T18:11:48+5:302018-08-06T15:11:09+5:30
स्वत:ची ओळख, भोवतालाचं भान हरवून बसलेले, गलिच्छ आणि लाजिरवाणं जीणं जगणारे रस्त्यावरचे मनोरुग्ण. त्यांना पुन्हा ‘माणसात’ आणण्याचा एक जाणता प्रयत्न..प्रतिष्ठेचा रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झालेले डॉ. भरत वाटवानी यांनी निवडलेल्या अनोख्या वाटेवरून चालताना....
- आनंद अवधानी
आपण कोणत्याही मोठय़ा शहरात रस्त्याच्या कडेला बसलेली माणसं पाहतो. वाढलेले केस, वाढलेली दाढी, मळून काळे झालेले कपडे, शून्यात हरवलेली नजर आणि अस्ताव्यस्त व्यक्तिमत्त्व. आपल्यासाठी रस्त्यावर पडलेले अनाहूत दगड नि अन्य सटर-फटर वस्तू आणि ही माणसं सारं काही सारखंच असतं. कधी आपल्याला ते भिकारी वाटतात तर कधी दारूडे वाटतात; पण यातली बरीच माणसं प्रत्यक्षात दोन्हीही नसतात. ते असतात मनोरुग्ण.
‘श्रद्धा ’ ही संस्था गेली अनेक वर्षं अशा व्यक्तींसाठी काम करते. रस्त्याच्या कडेला ‘पडलेली’ ही माणसं उचलून आपल्या केंद्रात आणायची, त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक उपचार करायचे, त्यांना बोलतं करून त्यांच्या घरचे, गावचे पत्ते मिळवायचे आणि पुन्हा त्यांना त्यांच्या कुटुंबात नेऊन सोडायचं, असं ‘श्रद्धा ’च्या कामाचं स्वरूप आहे. रस्त्यावरच्या मनोरुग्णांच्या प्रश्नाची तीव्रता आणि भयावहता पाहता या कामाचं सामाजिक मोल खूप मोठं आहे. डॉ. भरत आणि डॉ. स्मिता वाटवानी या मनोविकारतज्ज्ञ असलेल्या डॉक्टर जोडप्याने सुरू केलेलं आणि चालवलेलं हे काम आहे. हे दोघे सायकॅट्रिस्ट या कामाकडे कसे वळले याची कहाणी मोठी विदारक आहे.
1988च्या सुमाराची गोष्ट. वाटवानी पती-पत्नी बोरिवलीच्या एका रेस्टॉरण्टमध्ये जेवायला गेले होते. तिथे बसलेले असताना रस्त्याच्या दुस-या बाजूच्या फुटपाथवर एक व्यक्ती बसलेली त्यांना दिसली. त्या व्यक्तीचे हावभाव पाहिल्यावर डॉक्टर वाटवानींच्या लगेच लक्षात आलं, की ही व्यक्ती मनोरुग्ण आहे. रेस्टॉरण्टमधल्या आनंदी मूडमध्येही त्यांच्यातला डॉक्टर त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यानंतर जे घडलं ते डोळ्यांवर विश्वास बसू नये असं होतं.
अचानकपणे त्या माणसाने जवळची नारळाची करवंटी उचलून गटारात बुडवली आणि ते घाण पाणी तो चक्क पिऊ लागला. मग मात्न आपण काय करतो आहोत हे कळण्याच्या आत तो रुग्ण बसला होता तिथे डॉक्टर पोहचले. त्याला उचलून त्यांनी त्यांच्या खासगी नर्सिंग होममध्ये दाखल केलं. लगेचच उपचार चालू केले. तो स्क्रि झोफ्रेनिक होता. काही दिवसांत त्याच्यात सुधारणा दिसू लागली. तो जरा जरा बोलू लागला. त्याने सांगितलं की, तो बी.एस्सी.पर्यंत शिकलेला आहे, तेव्हा डॉक्टरांना खरा धक्का बसला. उच्च शिक्षण घेतलेला माणूससुद्धा केवळ मानसिक आजारामुळे रस्त्यावर येऊ शकतो? इतकं गलिच्छ आणि लाजिरवाणं आयुष्य त्याच्या वाट्याला येतं? हा रुग्ण आंध्र प्रदेशमधल्या सधन कुटुंबातला होता. त्याचे वडील तिथल्या जिल्हा परिषदेत अधिकार पदावर होते.
तोपर्यंत मनोरुग्णांच्या अनेक केसेस हाताळलेले डॉक्टर सुन्नपणाच्या पुढची अवस्था अनुभवत होते. त्या आजाराचं हे असं हिडीस रूप त्यांना पहिल्यांदाच दिसत होतं. या मनोरुग्णाकडून घरचा पत्ता मिळवून त्यांनी त्याच्या वडिलांशी संपर्क साधला. ते अक्षरश: पळत आले. वडील आणि मुलाचं ते मीलन पाहिल्यानंतर डॉक्टरांना या प्रकारच्या कामाची एक अंधुक वाट दिसू लागली. आपल्या नर्सिंग होममधली एक कॉट त्यांनी अशा अभागी रु ग्णांसाठी ठेवली. त्यानंतर रस्त्याच्या कडेचे मनोरुग्ण जाणीवपूर्वक उचलले जाऊ लागले, त्यांना अँडमिट केलं जाऊ लागलं आणि ते बरे झाल्यावर त्यांना पुन्हा त्यांच्या कुटुंबाशी जोडलं जाऊ लागलं. डॉक्टर या भेटींना ‘री-युनियन’ म्हणतात. ‘र्शद्धा’च्या कामाची सुरुवात झाली ती अशी. आपली खासगी प्रॅक्टिस सांभाळत एकामागोमाग एक मनोरु ग्ण रस्त्यावरून उचलून त्यांना बरं करणं हा डॉक्टरांच्या रुटीनचा भाग झाला. त्यासाठी शक्य तेवढा वेळ ते देऊ लागले. स्वत:च्या उत्पन्नातून पैसे खर्च करू लागले.
‘श्रद्धा ’च्या कामामध्ये सर्वात मौल्यवान असलेली बाब म्हणजे हे ‘री-युनियन’. मानसिक आजारामुळे बिघडलेली रुग्णांच्या आयुष्याची गाडी पुन्हा रुळावर आणणं औषधोपचारांमुळे शक्य आहे; पण त्या व्यक्तींना पुन्हा त्यांच्या मूळ कुटुंबात, त्यांच्या ‘आपल्या’ माणसांत नेऊन सोडणं हे अधिक महत्त्वाचं आहे. ‘श्रद्धा ’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत दीड हजार ( ताज्या आकडेवारीनुसार सात हजाराहून अधिक) लोकांना पुन्हा त्यांच्या कुटुंबांशी जोडलं आहे.
हळूहळू डॉक्टरांनी कामाची व्याप्ती वाढवली. या रुग्णांसाठी दहिसरला एक स्वतंत्र जागा घेतली. त्यामुळे एकाहून अधिक रुग्णांवर एका वेळी उपचार करणं शक्य झालं. कार्यकर्त्यांची आणि कर्मचा-याची टीम त्यासाठी तयार केली. यथाशक्ती आपण या क्षेत्नात काम करत राहायचं, हा निर्णय जाणीवपूर्वक घेतला. पुढे कामाचा पसारा वाढत गेल्यावर कर्जत स्टेशनपासून जवळ ‘र्शद्धा रिहॅबिलिटेशन सेंटर’ ही वास्तू आकाराला आली. या केंद्राचं उद्घाटन 2006 साली डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते झालं.
‘श्रद्धा ’मध्ये मनोरुग्ण आणल्यानंतर त्यांच्यावर करण्याच्या काही उपचारांच्या पद्धती आहेत. पहिली गोष्ट त्यांची स्वच्छता. त्यांच्या डोक्याचे, दाढीचे सर्व केस काढून त्यांना स्वच्छ अंघोळ घालावी लागते. अनेक महिनेच काय, वर्षंसुद्धा नीट जेवण नसल्यामुळे आणि रस्त्यावरचं काहीही उचलून खाल्लेलं असल्यामुळे त्यांना एकदम नेहमीचं अन्न देऊन चालत नाही. त्याची रिअँक्शन येऊ शकते. त्यांच्या मेंदूमधल्या रसायनांचा गेलेला तोल सावरण्यासाठी काही औषधं दिली जातात, तर शारीरिक स्थिती सुधारण्यासाठी वेगळी औषधं असतात. त्यापूर्वी एचआयव्ही सकट सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. दुसरीकडे त्यांच्या भाषेचा अंदाज घेऊन त्या भाषेतले कार्यकर्ते त्यांना बोलतं करायचा प्रयत्न करतात. यासाठी कधी कधी महिनाभरही थांबावं लागतं. ते बोलू लागले की मग ते त्यांची घरची पार्श्वभूमी, शिक्षण, नातेवाईक वगैरे माहिती हळूहळू सांगू लागतात. त्याच्या आधारे ते कोणत्या राज्यातले, कोणत्या गावातले आहेत हे शोधलं जातं. त्यानंतर त्यांच्या आजारातून ते किती बरे झाले आहेत याचा अंदाज डॉक्टर घेतात. एकदा डॉक्टरांनी परवानगी दिली की त्या रुग्णाच्या री-युनियनची तयारी होते. ‘री-युनियन’ करण्याची स्वत:ची अशी पद्धत ‘श्रद्धा ’ने तयार केली आहे. एक तर मनोरुग्ण जेव्हा रस्त्यावर सापडतो तेव्हा रेकॉर्डसाठी त्याचे फोटो काढले जातात. नंतर त्याच्या तब्येतीमधल्या बदलांची नोंद ठेवली जाते. त्याला कोणत्या औषधांची भविष्यात गरज लागणार आहे याची यादी केली जाते. या सगळ्याची फाइल री-युनियन झाल्यावर त्याच्या नातेवाइकांना दिली जाते. सोबत एका महिन्याची औषधं दिली जातात. त्यानंतर दर महिन्याला ‘श्रद्धा ’च्या केंद्रांमधून त्या व्यक्तीच्या नातेवाइकांना फोन केला जातो. गरजेप्रमाणे औषधं बदलून पाठवली जातात. प्रश्न जसे या मनोरुग्णांच्या जगण्याचे आहेत तसेच आपण त्यांना विसरण्याचेही आहेत. आपल्या लक्षातच येत नाही, की यांचा आपण विचारच करत नाही. त्यांना न मोजताच आपली जनगणना पूर्ण होते. 2020च्या महासत्तेकडे वाटचाल करण्याच्या नादात आपण यांना बरोबर घेण्याचं विसरूनच जातो. आपल्या देशात पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त, इतकंच काय पण भिका-यासाठीसुद्धा योजना आहेत; पण त्यात या रुग्णांचा उल्लेखदेखील नाही. केंद्र सरकारची नेहरू योजना म्हणते, की गरिबातल्या गरिबांसाठी अंदाजपत्रक बनवलं पाहिजे. पण जी माणसं अस्तित्वात असल्याची नोंदच नाही त्यांचं काय?
डॉक्टर वाटवानींच्या मते रस्त्यावर फिरणा-या मनोरुग्णांची भारतातली संख्या किती तरी लाखांत आहे; पण आपला समाज त्यांचा विचारही करायला तयार नाही. ‘श्रद्धा ’सारख्या अनेक संस्था निर्माण होतील तेव्हा मुंबईच्या रस्त्यांवरच्या रुग्णांचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल. याचा अर्थ पूर्ण देशभरातला प्रश्न सोडवण्यासाठी किती संस्थांना किती काम करावं लागेल !
रस्त्याकडेचं बेवारस आयुष्य
1. रस्त्याकडेच्या मनोरूग्णांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे स्क्रि झोफ्रेनिक रूग्णांचं असतं. मेंदूतील ज्या रसायनांमुळे आपण नॉर्मल विचार करू शकतो, त्यांचाच तोल बिघडतो. मग माणूस तंद्रीत राहतो, हवेत हातवारे करतो, स्वत:शीच हसतो. अशिक्षित मंडळी याला ‘देवीचा कोप’ मानतात किंवा कुणाची करणी मानतात. मग अंगारे-धुपारे, देवदेवस्की..
2. आरोप-प्रत्यारोप करणं, रागावणं, बोलणं टाकणं, पाणउतारा करणं, प्रसंगी मारहाण करणं, बांधून ठेवणं असे प्रकार सुरू होतात. त्यातून ती व्यक्ती इतरांपासून तुटते आणि तिचा आजार बळावत जातो.
3. अशातच स्वत:च्या तंद्रीत अशी व्यक्ती घरातून बाहेर पडते. रेल्वेत चढली तर कुठे तरी कोप-यात बसून राहते. अशा व्यक्तींना भान नसतं. मग रेल्वेच्या शेवटच्या स्थानकांवर अशा व्यक्ती पोचतात.
4. यार्डात गाडी पोचल्यावर सफाई कर्मचारी त्यांना गाडीतून हाकलतात आणि हे मनोरूग्ण महानगरांच्या रस्त्यांच्या कडेचा आधार घेतात.
(‘अनुभव दिवाळी 2011’ मधून संपादित साभार)
vatwanibharat@gmail.com
anandawadhani@gmail.com