डॉ. बापूजी साळुंखे यांची दैनंदिनी -- एक प्रेरणोस्त्रोत -- व्यक्तीविशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:48 AM2018-12-16T00:48:40+5:302018-12-16T00:48:50+5:30
डॉ. बापूजी साळुंखे यांच्या दैनंदिनीतून ४५ वर्षांचा काळ सहजरीत्या पुढे-मागे सरकत राहतो. पान पालटत जावे तसे दिवस, महिना, वर्ष सरत जाते आणि काळ आपण चिमटीत पकडू शकतो, याचा आनंद द्विगुणित होतो. २०१८-२०१९ हे डॉ. बापूजी साळुंखे यांचे जन्मशताब्दी वर्ष.
- प्रशांत पितालिया
डॉ. बापूजी साळुंखे यांच्या दैनंदिनीतून ४५ वर्षांचा काळ सहजरीत्या पुढे-मागे सरकत राहतो. पान पालटत जावे तसे दिवस, महिना, वर्ष सरत जाते आणि काळ आपण चिमटीत पकडू शकतो, याचा आनंद द्विगुणित होतो. २०१८-२०१९ हे डॉ. बापूजी साळुंखे यांचे जन्मशताब्दी वर्ष. त्या निमित्ताने त्यांची दैनंदिनी हाती आली. वर्षाची सांगता होत असताना दैनंदिनीसाठी चाललेली लगबग हे औचित्य...
खरे तर दैनंदिनी ही एखाद्याचा जीवनपट पाहण्याचा सर्वांत महत्त्वाचा दुवा. दैनंदिनीतील छोट्यातील छोटी किंवा सर्वांत मोठी नोंद ही काहीतरी दर्शवत असते, दिशानिर्देश करत असते. बापूजी म्हणजेच गोविंद ज्ञानोजीराव साळुंखे यांची दैनंदिनी त्यांच्या व्यक्तिगत जीवनापेक्षाही सार्वजनिक जीवनाकडे अंगुलीनिर्देश करते. त्यांचे ध्येयनिष्ठ जीवन त्यांच्या दैनंदिनीतून पुढे येते. तसे ते यावे यासाठी वेगळा प्रयत्न केला गेला आहे, असे म्हणणे त्यांची दैनंदिनी चुकीचे ठरविते. बालपणापासून ते अखेरच्या क्षणापर्यंत त्यांची दैनंदिनी त्यांची सखी होते, हे सहज जाणवते.
दिनांक १९ नोव्हेंबर १९६१ ची एक नोंद सदैव स्मरणात राहील अशी आहे.
डॉ. बापूजी साळुंखे हे संस्थापक-अध्यक्ष. त्यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा पाया रचला. १९५५ ला त्यांनी प्रारंभ केला. त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. नवे-नवे पुढे येत असताना नव्यातले नावीन्य जरूर अंगीकारले पाहिजे. मात्र, ते पवित्र असले पाहिजे हा त्यांचा आग्रह असे. त्यांची ही राहणी, विचार त्यांच्या त्या नोंदीतून पुढे येतो. नोंद अशी आहे, डॉ. पवार आणि श्री. कारखानीस यांना भेटलो. श्री. दामले भेटू शकले नाहीत. ६८ पैशांचा चिवडा व शेंगदाणे खाल्ले. लोणावळा येथे श्री. घोरपडे गुरुजी, श्री. बाबासोा गवळी, ड्रायव्हर सिंदर आणि मी तीन रुपयांमध्ये जेवलो.
‘ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार’ हे संस्थेचे ब्रीद आहे. त्यांच्या दैनंदिनीतून याचा प्रत्यय येतो. आजारी असतानाही संस्थेसाठी केलेल्या प्रवासाची नोंद सातत्याने आढळते. एका ठिकाणी तर डॉक्टरांचे पैसे कोणी दिले याचीही नोंद आहे. खरे पाहता केवळ बापूजींचा व्रतस्थ प्रवासच नव्हे, तर संस्थेच्या जडणघडणीचा प्रवास त्यांच्या दैनंदिनीतून पुढे येतो. शिक्षणप्रसाराचे वेड मनी बाळगलेले बापूजी एका-एका शाखेसाठी खूप भटकले. गावोगावी गेले. डोंगरदऱ्यांतून फिरले. गावकºयांपुढे हात पसरले. न भेटणारे, मदत नाकारणारे, कोर्ट केसेसमध्ये अडकवून टाकणारे त्यांना अनेक भेटले; पण स्वप्नाला पंखांत सामावू पाहणाºया या पथिकाला सतत पुढेच जाणे ठाऊक असल्याने ते सदैव पुढेच जात राहिले. १९ एप्रिल १९५५च्या नोंदीत बापूजींवर कम्युनिस्ट असण्याचा ठपका ठेवल्याची नोंद आहे. राजकारणापासून अलिप्त अशा या नेतृत्वावर मुद्दामच असा आरोप ठेवण्यात आला होता. बापूजी महात्मा गांधींचे सच्चे अनुयायी, मातीत हात मळविल्याशिवाय, घाम गाळल्याशिवाय आणि रक्त आटल्याशिवाय शिक्षण पुरे होत नाही, हेच त्यांचे तत्त्वज्ञान. ते तत्त्वज्ञानही दैनंदिनीतून समोर येते. महान व्यक्तींनी दैनंदिनीचे महत्त्व सांगितले आहेच. त्यांच्या दैनंदिनी हाती येतात ते मोठेच असल्याचेही जाणवते. दैनंदिनीला इथेच महत्त्व प्राप्त होत आहे.
खरे तर साधी वहीदेखील दैनंदिनी म्हणून चालू शकते; पण वर्षाच्या शेवटी येणाºया रंगीबेरंगी, लहान-मोठ्या आकाराच्या, कॅलिग्राफी असणाºया, संस्था आणि व्यक्तीच्या जयघोष करणाºया, बॉलिवूडच्या नायक-नायिकांना पुढे आणणाºया अनेक दैनंदिनी म्हणजेच डायरी बाजारात दिसू लागल्या की समजावे, काहीच दिवसांनी नवे वर्ष येणार आहे. अगदी जुन्या वर्षाच्या डायरीही कमी किमतीत उपलब्ध होतात. खरे तर त्यांचे प्रयोजन लक्षात येत नाही. अनेक घरांतून, कार्यालयांतून अशा अनेक दैनंदिनी न वापरताच पडून राहिलेल्या असतात. लिहायचे लिहायचे असे म्हणत त्या धूळ खात पडून राहतात. इंग्रजी नववर्षाच्या सुरुवातीला अनेकजणांना या दैनंदिनीची भुरळ पडते. ‘श्री’ लिहून सुरुवात करणारे अनेकजण असतात; पण व्रतस्थ राहून कार्य पार पाडणारे कमीच. पण जे हे कार्य व्यवस्थित पार पाडतात, ते आज ना उद्या या विश्वाच्या पटलावर कुठे ना कुठे चमकल्याशिवाय राहत नाहीत हेच खरे. डॉ. बापूजी साळुंखे यांच्या दैनंदिनीचे उदाहरण समोर ठेवण्याचे कारण इतकेच की, ती दैनंदिनी तुम्हालाही प्रेरणास्रोत वाटावी आणि तुमचीही पावले पायवाटेने चालू लागावीत.