डॉ. द. ह. अग्निहोत्री विस्मरणात गेलेले भाषाशास्त्रज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 12:22 AM2020-04-19T00:22:18+5:302020-04-19T00:27:03+5:30
समाजाच्या हितासाठी कार्य करणाऱ्या माणसांची जन्मभर आणि मृत्यूनंतरही उपेक्षा करण्याची आपली परंपरा फार प्राचीन आहे . विदर्भाने तर विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या अनेक व्यक्तींची कायम उपेक्षा केली आहे. कोशकार , भाषाशास्त्राचे अभ्यासक, समीक्षक डॉ.द. ह. अग्निहोत्री यांचा जन्म ३ जुलै १९०२ रोजी झाला. एम.ए.बी.टी. पीएच.डी. झालेल्या डॉ.अग्निहोत्री यांनी अमरावती, बुलडाणा, नेर (परसोपंत) येथे विविध महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले. वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात १९६१ ते १९६५ या काळात ते प्राचार्य होते. २२ नोव्हेंबर १९९० रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांची ‘मराठी वर्णविचार विकास’ आणि ‘महाराष्ट्र संस्कृतीचे तात्त्विक अधिष्ठान’ हे दोन ग्रंथ व ‘अभिनव मराठी-मराठी शब्दकोश खंड एक ते पाच’ ही साहित्यसंपदा मराठी भाषा आणि साहित्याच्या अभ्यासासाठी उपयुक्त आहे. आज विदर्भासह महाराष्ट्राला त्यांचे विस्मरण झाले आहे, असेच म्हणावे लागेल.
- डॉ. अजय देशपांडे
नवोदित अभ्यासकांना, लेखकांना, समीक्षकांना डॉ.द.ह. अग्निहोत्री यांचे वाङ्मयीन कार्य माहीत असण्याची शक्यता कमीच आहे. ‘मराठी वर्णोच्चार विकास’ या त्यांच्या पीएच.डी.चा प्रबंध १९६३ मध्ये विदर्भसाहित्य संघाने ग्रंथरूप प्रकाशित केला. त्यानंतर १९७७ मध्ये ‘महाराष्ट्र संस्कृतीचे तात्त्विक अधिष्ठान’ हा त्यांचा ग्रंथ नागपूर येथील सुविचार प्रकाशन मंडळाने प्रकाशित केला.
‘डॉ.द.ह. अग्निहोत्री यांचा मराठी वर्णोच्चार विकासावरील प्रबंध ही मराठीतील भाषाशास्त्र विषयक साहित्याला एक उपयुक्त देणगी होय’, असे डॉ. वि. भि. कोलते यांनी या ग्रंथाविषयीच्या अभिप्रायात नमूद केले आहे. मराठी वर्णमालेतील 'अ' पासून ‘ज्ञ’ पर्यंत अनेक वर्णांच्या उच्चाराचा यादवकाळापासून आधुनिक काळापर्यंतचा विकास या ग्रंथात सप्रमाण दाखविलेला आहे. त्यासाठी सुमारे सात हजार शब्दांचे विश्लेषण केले आहे.
या ग्रंथात मराठी भाषेची ध्वनिशिक्षा, मराठीतील आघात व मराठीची ध्वनिव्यवस्था या तीन गहन विषयांवर प्रथमच सविस्तर साधार चर्चा केली असून मराठीतील स्वरांचे व्यंजनांचे उच्चारदृष्ट्या वर्गीकरण विश्लेषण केलेले आहे. मराठी भाषेचा फारसी, इंग्रजी या भाषांसह गुजराती, हिंदी, उडिया, तेलगू, कन्नड या भाषांशी आलेल्या संबंधाविषयीचेही विश्लेषण या ग्रंथात केले आहे. मराठी वर्णोच्चाराचा विकास स्थलपरत्वे आणि कालपरत्वे कसा झाला ते या ग्रंथात सप्रमाण व साधार नमूद केले आहे.
‘महाराष्ट्र संस्कृतीचे तात्त्विक अधिष्ठान’ या ग्रंथात इतिहासपूर्व प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंतच्या महाराष्ट्र संस्कृतीच्या स्वरूपाची, विकासाची, जडणघडणीची मीमांसा केली आहे. या ग्रंथात एकूण आठ प्रकरणे असून इसवीसन पूर्व पाच हजार वर्षांपासून १९४७ पर्यंतच्या काळातील महाराष्ट्र प्रदेश, त्याचा इतिहास, त्याची संस्कृती आदींच्या विकासाची ,जडणघडणीची पाहणी व विश्लेषण केले आहे.मराठी समाजजीवनाच्या सांस्कृतिक जडणघडणीचे तात्त्विक अधिष्ठान शोधणारा हा ग्रंथ होय.
अभिनव मराठी - मराठी शब्दकोशाचे एक ते पाच खंड आहेत. शब्दांचे प्रचलित प्रमाण उच्चार, शब्दांची व्युत्पत्ती, व्याकरण विशेष, अर्थ, अशी मीमांसा केली आहे. एकूण २६ परिशिष्टे असणाऱ्या या शब्दकोशाच्या पहिल्या खंडात ‘आदर्श मराठी शब्दकोश कसा असावा ‘प्रमाणित मराठी शब्दांचे उच्चार,’ ‘मराठीच्या प्रमुख बोली व त्यांची वैशिष्ट्ये’ हे तीन निबंध आहेत. हा अभिनव शब्दकोश भाषा आणि साहित्याच्या अभ्यासासाठी उपयुक्त आहे.
डॉ.द.ह.अग्निहोत्री यांचे ‘मराठी वर्णोच्चार विकास’ व ‘महाराष्ट्र संस्कृतीचे तात्त्विक अधिष्ठान’ हे दोन्ही महत्त्वाचे ग्रंथ आता विस्मरणात गेले आहेत. या ग्रंथातील लेखकाच्या मतांविषयी, विश्लेषणांविषयी, प्रतिपादनाविषयी, विचार प्रगटीकरणाविषयी काही मतभेद असू शकतात. याविषयी चर्चा - चिकित्सा करणे हे विचार जिवंत व प्रगल्भ असण्याचे लक्षण आहे. पण त्यासाठी ग्रंथ उपलब्ध असणे आवश्यक आहे. डॉ.अग्निहोत्री यांचे ग्रंथ आज दुर्मिळ झाले आहेत. हे ग्रंथ काळाच्या उदरात गडप होऊ द्यायचे नसतील तर या ग्रंथांच्या पुनर्मुद्रणाशिवाय पर्याय नाही.
डॉ.अग्निहोत्री यांच्या ग्रंथांसह अनेक अभ्यासकांचे महत्त्वाचे ग्रंथ आज दुर्मिळ झाले आहेत, काही विस्मरणात गेले आहेत तर काही काळाच्या उदरात गडपदेखील झाले आहेत. या अमूल्य ग्रंथधनाचे जतन करावे असे विदर्भाला वाटत नाही का ? भाषा आणि साहित्य क्षेत्रात वर्षानुवर्षांपासून कार्यरत असणाऱ्या काही संस्था विदर्भात आहेत.
दुर्मिळ ग्रंथांच्या पुनर्मुद्रणासाठी या संस्था हात पुढे का करीत नाहीत ? ‘मराठी वर्णोच्चार विकास’ व ‘महाराष्ट्र संस्कृतीचे तात्त्विक अधिष्ठान’ या दोन दुर्मिळ ग्रंथांसह विस्मरणात गेलेल्या कितीतरी ग्रंथांचे पुनर्मुद्रण करणे, साक्षेपी संपादन करणे, त्यांना अद्ययावत करणे, नव्या आणि अद्ययावत माहितीची पुरवणी या ग्रंथात समाविष्ट करणे, या ग्रंथांच्या डिजिटल आवृत्ती तयार करणे हे कार्य एखाद दुसरा अपवाद वगळता विदर्भात केले जात नाही. डॉ. अग्निहोत्री यांच्या दुर्मिळ ग्रंथांसह इतर मोठ्या अभ्यासकांच्या महत्त्वाच्या ग्रंथांच्या जतनसंवर्धनासाठी विदर्भातील तरुण अभ्यासकांनी, प्रकाशकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
भाषा, साहित्य, संस्कृतीच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था ग्रंथजतन, ग्रंथसंवर्धन, ग्रंथपुनर्मुद्रण, डिजिटल आवृत्ती,ई- आवृत्ती वगैरे कार्यासाठी याकाळात अनभिज्ञ असतील किंवा या कार्याकडे सोईस्कर कानाडोळा करीत असतील तर तो दोष ग्रंथांचा अथवा अभ्यासकांचा नाही. हा दोष भाषा व साहित्यविषयक संस्थात्मक कार्य निष्ठेने न होऊ देणाऱ्या नाठाळ प्रवृत्तींचा आहे. असे असले तरी निष्ठेने कार्य करणारी माणसे कामाला लागली की मोठे परिवर्तन घडून येत असते. दुर्मिळ ग्रंथांच्या पुनर्मुद्रण व संवर्धनाच्या बाबतीत देखील हे खरे आहे.