डॉ. लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 06:03 AM2019-12-22T06:03:00+5:302019-12-22T06:05:05+5:30

‘परमेश्वराला रिटायर करा’, अशी  प्रखर भूमिका घेणारे डॉ. लागू  अत्यंत गांभीर्याने आपले आयुष्य जगले. देव आणि धर्म याविषयीच्या त्यांच्या भूमिका  सनसनाटी निर्माण करण्यासाठी नव्हत्या.  समाजाला सहसा रूचणार नाही, पण  समाजासाठी आवश्यक अशा वैचारिक भूमिकांनी  त्यांना त्नासच होण्याची शक्यता होती.  असे असूनही त्यांनी प्रखर बुद्धिवादी भूमिका घेतली  आणि त्यासोबत येणार्‍या सर्व त्नासासकट ती निभावली.  डॉ. नरेंद्र दाभोलकरांबरोबरच्या ‘विवेक जागराचा वाद-संवाद’ या कार्यक्रमातही त्यांनी सतत बुद्धिप्रामाण्यवादी भूमिका घेतली.

Dr. Lagoo | डॉ. लागू

डॉ. लागू

googlenewsNext
ठळक मुद्देएक न संपणारा वाद-संवाद..

- डॉ. हमीद दाभोलकर 

92 वर्षांचे दीर्घ आणि समृद्ध आयुष्य जगून डॉ. श्रीराम लागू यांना निसर्गनियमाने मृत्यू आला. मातीतून निर्माण झालेले शरीर मातीत मिळाले. 
डॉ. लागू यांना ‘स्वत:चा मृत्यू’ याविषयीचे त्यांचे मत कुणी, कधी विचारले होते की नाही याची मला कल्पना नाही, पण या प्रश्नाला डॉक्टर लागूंनी, ‘मृत्यू म्हणजे त्यात काय एवढे ! जसा जन्म झाला, तसा मृत्यू येईल. निसर्गाचे घटक निसर्गात मिसळून जातील!’ असेच काहीसे रोखठोक आणि बुद्धिवादी उत्तर दिले असते.  डॉ. लागूंचा  आयुष्यभराचा प्रवास ज्यांनी बघितला, त्यातील बहुतांश लोक या मताशी सहमत होतील.
 थेट ‘परमेश्वरालाच रिटायर करा’ अशी प्रखर बुद्धिवादी भूमिका घेणारा आणि त्यावर आयुष्यभर ठाम राहून जे सोसावे लागेल ते शांतपणे सोसणारा माणूस यापेक्षा वेगळे काय म्हणू शकतो?
रेल्वेने प्रवास करीत असताना, कुणा माथेफिरूने  रेल्वेवर फेकलेला दगड त्यांचा तरुण मुलगा तन्वीरच्या डोक्याला लागून त्यात त्याचा अकाली मृत्यू झाला तेव्हादेखील याच बुद्धिवादी भूमिकेतून डॉ. लागूंनी ते दु:ख पचवले होते.
आपल्या समाजात जन्म आणि मृत्यूविषयीच्या गोष्टी अनेक प्रथा-परंपरा आणि कर्मकांडाशी बांधल्या गेल्या आहेत. 
मृत्यूविषयी बोलताना आपल्याकडे त्या व्यक्तीला ‘ईश्वर आज्ञा’ झाली असे म्हटले जाते. मृत्यूनंतर ती व्यक्ती ‘कैलासवासी’ झाली असेदेखील म्हटले जाते. जी व्यक्ती ईश्वरालाच मानत नाही त्याच्या मृत्यूनंतर काय करायचे असा प्रश्न मनात निर्माण होणे साहजिकच आहे. डॉ. र्शीराम लागूंच्या मृत्यूनंतर कोणत्याही कर्मकांडांच्याऐवजी ज्या विचारधारणांना धरून ते जगले त्यांचा जागर करणे त्यांना स्वत:लाही आवडले असते असे मला वाटते. 
डॉ. लागू हे अत्यंत गांभीर्याने आयुष्य जगणारे आणि आपल्या बुद्धीला पटतील त्याच भूमिका घेणारे व्यक्ती होते. देव आणि धर्म याविषयीच्या त्यांच्या भूमिका म्हणजे समाजात सनसनाटी निर्माण करून प्रसिद्धीसाठी केलेला प्रकार नव्हता. प्रसिद्धी तर त्यांना एक अभिनेता म्हणून भरपूर मिळाली होती. समाजाला सहसा रूचणार नाही पण समाजासाठी आवश्यक आहे अशा विधानाने त्नासच होण्याची शक्यता होती. असे असतानादेखील त्यांनी प्रखर बुद्धिवादी भूमिका घेतली आणि त्यासोबत येणार्‍या सर्व त्नासासकट ती निभावली. 
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत ‘विवेक जागराचा वाद-संवाद’ हा कार्यक्र म ते करीत असत. त्यामध्ये त्यांनी आपली बुद्धिप्रामाण्यवादी भूमिका सविस्तर मांडली आहे.
‘परमेश्वराला रिटायर करा’ या नावाने ही भूमिका समाजात चर्चिली गेली, पण त्यामागची मूळ भूमिका आपण समजून घेतली तर आपल्या लक्षात येते कि डॉ. लागू मानवी जीवनाची उत्पत्ती, मृत्यूनंतर काय होते, आपल्या आयुष्यात  वैज्ञानिक दृष्टिकोनाचे काय महत्व आहे, याविषयी बोलत. जिज्ञासू लोकांना ही त्यांची भूमिका ‘रूपवेध’मधील ‘माझे बुद्धिप्रामाण्य’ या लेखात वाचायला मिळेल. ‘जो धारणा करतो तो धर्म’. धर्माच्या या व्याख्येशी माझे कोणतेही भांडण नाही असे ते स्पष्टपणे नमूद करतात. तसेच मानवतावादी धर्माशीदेखील माझे भांडण नाही असे ते म्हणतात. 
‘द गॉड डिल्यूजन’ या पुस्तकाचा लेखक आणि निरिश्वरवादी रिचर्ड डिकन्स याच्या भूमिकेसारखी ही भूमिका आहे. दक्षिणेत पेरियार रामास्वामी किंवा पूर्वी चार्वाकाने मांडलेल्या भूमिकेला जवळ जाणारी. चार्वाकाची भूमिका मला सगळ्यांत जवळची वाटते असे त्यांनी स्वत: म्हणूनदेखील ठेवले आहे. याच  कार्यक्र मात डॉ. नरेंद्र दाभोलकर ‘महाराष्ट्र अंनिस’ची भूमिका मांडत असत. ती थोडी वेगळी आहे. ती भूमिका असे मांडते कि ‘देव आणि धर्म मानणे अथवा न मानणे हा प्रत्येक व्यक्तीचा संविधानिक अधिकार आहे, पण आपल्या देव आणि धर्माच्या संकल्पनेची आपण चिकित्सा केली पाहिजे तसेच जेथे जेथे देव आणि धर्माच्या नावावर शोषण होत असेल, तिथे त्याच्या विरोधात उभे राहिले पाहिजे.’
‘देवाचे अस्तित्व’ या आदिम प्रश्नाला आपण कसे भिडावे याकडे बघण्याचे हे दोन वेगवेगळे बुद्धिवादी मार्ग असले तरी माणसाने आपल्या बुद्धीचा वापर करून आपल्या आयुष्यातील प्रश्न सोडवले पाहिजेत, याविषयी मात्न त्यामध्ये एकमत आहे. केवळ तेवढेच नाही, तर तहानलेल्याला पाणी आणि भुकेलेल्याला अन्न देणार्‍या मानवतावादी धर्माच्या संकल्पनेविषयी डॉ. लागू आणि डॉ. दाभोलकर या दोघांच्याही भूमिकांमध्ये मोठे साम्य आहे. जगभरातील निरीश्वरवाद्यांपेक्षा डॉ. लागूंचा देव मानणार्‍या लोकांविषयीचा दृष्टिकोन खूपच व्यापक आहे. ‘परमेश्वाराला रिटायर करा’ ही डॉ. लागूंची भूमिका समाजात मोठ्या प्रमाणात चर्चिली गेली, पण ‘विवेकवादी व्हा’ आणि ‘विवेकवाद हीच खरी नैतिकता’ हे त्यांनी लिहिलेले दोन विचारप्रवर्तक निबंध मात्न तितकेसे चर्चिले गेले नाहीत. ‘रूपवेध’ पुस्तकात ते समाविष्ट आहेत. केवळ ‘परमेश्वराचे  अस्तित्त्व’ याविषयी हा वाद-संवाद अडकून पडल्यामुळे त्यामधील व्यापक विवेकवादी मांडणीकडे महाराष्ट्रातील जनतेने अक्षम्य दुर्लक्ष्य केले असेच म्हणावे लागेल. 
धार्मिक अस्मिता दिवसेंदिवस अधिक टोकदार होत चाललेल्या आजच्या कालखंडात ज्या स्वरूपाचा विवेक जागराचा वादसंवाद डॉ. श्रीराम लागू आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी महाराष्ट्रात केला, तो आज करता येईल का याविषयी मन साशंक आहे. या वाद्संवादातील अधिक समाजस्नेही म्हणावी अशी  आणि देव-धर्माविषयी थेट भाष्य न करणारी मांडणी करणार्‍या डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा ज्या महाराष्ट्रात खून होतो, त्या परिस्थितीत तर ही शंका आणखीनच गडद होते. 
‘हमीद दलवाईना नैसर्गिक मृत्यू आला हे आश्चर्यच आहे’, असे नरहर कुरुंदकरांचे एक वाक्य आहे. डॉ. लागूंच्या बाबतीतदेखील असे विधान करावे लागेल कि काय, अशा परिस्थितीत आपण पोहचू लागलो आहोत हे खेदाने नमूद करावेसे वाटते. 
टोकाचे निरीश्वरवादी, अधार्मिक, धर्मनिरपेक्ष, धार्मिक, र्शद्धाळू आणि अंधर्शद्धाळू अशा सर्वांना देव आणि धर्म या संकल्पनांविषयी मोकळेपणाने हा वाद-संवाद करता यावा असे वातावरण महाराष्ट्रात आणि देशात निर्माण करणे हे आज मोठेच आव्हान झाले आहे. विवेकजागराचा वाद-संवाद घडवून आणणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि डॉ. श्रीराम लागू दोघेहे आज आपल्यात नाहीत. आता आपल्यालाच हा न संपणारा वाद नेटाने पुढे न्यावा लागेल. तेच डॉ. लागूंचे खर्‍या अर्थाने स्मरण होईल.

hamid.dabholkar@gmail.com
(लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितेचे कार्यकर्ता आहेत.) 

प्रकाशचित्र : सतीश पाकणीकर

Web Title: Dr. Lagoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.