मातीचं ऋण - डॉ. रतन लाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 06:04 AM2020-06-28T06:04:00+5:302020-06-28T06:05:12+5:30

कृषी संशोधक डॉ. रतन लाल आयुष्यभर मातीच्या श्वासासोबत जगले. मातीच्याच माध्यमातून अब्जावधी लोकांचं आयुष्य त्यांनी सुकर केलं. ते म्हणतात, ‘मातीकडून आजवर आपण फक्त ओरबाडलं. मातीचं ऋण फेडण्याची वेळ आता आली आहे. मातीला जगवलं, तरच आपण जगणार आहोत. खरं तर तीच आपल्याला जगवणार आहे. आपल्याला जे, जेवढं, जसं शक्य होईल  ते आपण मातीला परत करू या.’

Dr. Ratan Lal- A renowned agricultural researcher of Indian origin, Dr. Ratan Lal recently received the prestigious 'World Food Prize'... | मातीचं ऋण - डॉ. रतन लाल

मातीचं ऋण - डॉ. रतन लाल

Next
ठळक मुद्देमूळ भारतीय वंशाचे अमेरिकेतील ख्यातनाम कृषी संशोधक  डॉ. रतन लाल यांना नुकताच प्रतिष्ठेचा  ‘वर्ल्ड फूड प्राइज’ पुरस्कार मिळाला.  त्यानिमित्त..

‘माती ही एक जिवंत, सजीव गोष्ट आहे. माती हा आपल्या जीवनाचा मूलाधार आहे. पृथ्वीवरील प्रत्येक सजीव मातीवरच अवलंबून आहे. असं असूनही मातीची किंमत आपल्याला अजून कळलेली नाही. प्रत्येक सजीवाला काही अधिकार असतात. त्यानुसार मातीलाही अधिकार आहेत. जोपर्यंत आपण अन्न, पाणी आणि इतर नैसर्गिक संसाधनं मातीच्या माध्यमातून वापरतो आहोत, तोपर्यंत मातीलाही आपण काही देणं लागतो. त्यामुळे प्रत्येकानं आपल्याला जे, जेवढं, जसं शक्य होईल ते मातीला परत केलं पाहिजे आणि तिच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रय} केला पाहिजे.’, याच सजीव आणि मातीकेंद्री दृष्टिकोनातून डॉ. रतन लाल यांनी कायम मातीकडे पाहिलं, माती ही आपल्या जिवाभावाची केवळ सोबतीच नाही, तर आपल्याला जगवणारी त्राता आहे, हाच दृष्टिकोन त्यांनी आयुष्यभर बाळगला, त्यातूनच त्यांनी मातीवर विविध प्रयोग केले आणि याच मातीतून अब्जावधी लोकांच्या जगण्याला आधारही त्यांनी मिळवून दिला!.
त्यांच्या याच योगदानाबद्दल कृषिक्षेत्राचे नोबेल समजल्या जाणार्‍या अतिशय प्रतिष्ठित अशा ‘विश्व खाद्य पुरस्कारा’नं (वर्ल्ड फूड प्राइज) त्यांना नुकतंच गौरविण्यात आलं. भारतीय हरित क्रांतीचे जनक कृषी वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना 1987मध्ये याच पुरस्कारानं सर्वप्रथम गौरविण्यात आलं होतं.
मूळ भारतीय वंशाच्या आणि भारतातच शिक्षण झालेल्या डॉ. रतन लाल यांनी भारतीयांसाठीही युक्तीच्या काही गोष्टी सांगितल्या आहेत.


डॉ. रतन लाल सांगतात, पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशसारख्या आपल्या अनेक राज्यांत लक्षावधी छोटे शेतकरी आहेत. पण पिकं घेतल्यानंतर पिकांचे उरलेले अवशेष जाळून टाकण्याची प्रथा आपल्याकडे अनेक भागांत आहे, मात्र त्यामुळे माती मरते, क्षीण होते. मातीच्या याच वरच्या थरांत अत्यंत पोषक असे सेंद्रिय घटक असतात. या सेंद्रिय घटकांचं मातीतलं प्रमाण किमान दोन टक्के तरी असलं पाहिजे. पण अयोग्य पारंपरिक कृषी सवयींमुळे आपल्याकडे अनेक ठिकाणी मातीतील सेंद्रिय घटकांचं प्रमाण जवळपास 0.1 टक्क्यापर्यंत घसरलं आहे. अशा मातीत पिकं कशी जोम धरणार? आपण शेती आणि मातीला इतकं ओरबाडून घेतो, की माती, जमिनीसाठी काही शिल्लकच ठेवत नाही. इतकं की शेणखतांचा वापरही आपल्याकडे आता नगण्य झाला आहे. जनावरांचं शेणही आपण मातीला मिळू देत नाही. पिकांचे किमान उरलेले अवशेष जाळून न टाकता ते मातीलाच परत केले तर मातीतील सत्त्व टिकून राहील.
‘जगा आणि जगू द्या’ हा जसा विश्वाचा नियम आहे, तसाच मातीच्या आरोग्य व्यवस्थापनचाही ‘लॉ ऑफ रिटर्न्‍स’ हा एक नियम आहे. जे घेतलं, त्यातलं किमान काही परत करा. माती म्हणजे तुमचं जणू बॅँक अकाउण्ट आहे. त्यात जेवढी रक्कम आहे, त्यापेक्षा जास्त तुम्ही काढू शकत नाही ! आपल्या अकाउण्टमध्ये ठणठणपाळ होणार नाही, याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल..
डॉ. रतन लाल म्हणतात, माणसाचं आरोग्य आणि मातीचं आरोग्य यांत काहीच फरक नाही. आपण आपल्या शरीर-मनाकडून कामं करवून घेतो; पण त्यासाठी त्याच्या भरणपोषणाचीही तितकीच आवश्यकता असते. आपण मातीतून नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि अनेक सेंद्रिय पदार्थ काढून घेतो; पण त्यातले मातीला किती परत करतो?
मातीत जास्त खत घातलं म्हणजे जास्त पीक येईल, या भ्रामक कल्पनेतून आपण शेतात आंधळेपणानं इतकं खत घालतो, की त्यामुळे मातीची अक्षरश: वाट लागते. भात शेतीत तर अनेकदा उभ्या पाण्यात खत घालतात. तापमान जास्त असताना अनेकदा ही खतं हवेत मिसळल्यानं वायू प्रदूषण, ग्लोबल वार्मिंगला हातभार लागतो. ही खतं पाण्यावाटे जमिनीच्या आतही झिरपतात. त्याचा मानवी शरीरावरही दुष्परिणाम होतो.
जमिनीचा वरचा थर निसर्गानं अक्षरश: लाखो वर्षांत तयार केलेला असतो; पण तो जाळून टाकणं, त्यापासून विटा तयार करणं, यासारख्या कृतींनी आपण तो झटक्यात नष्ट करून टाकतो. वाळू उत्खननही निसर्गासाठी, आपल्यासाठी अतिशय हानिकारक आहे. तुम्हाला काही गोष्टींसाठी वाळू, माती हवीच असेल, तर त्यासाठी विशिष्ट जागा तयार करा, निसर्गातील इतर भूभागाला मग हातही लावू नका, असा कळकळीचा सल्ला डॉ. रतन लाल देतात.
आपल्याकडचा आणखी एक प्रकार म्हणजे, एकीकडे शेतीला भरमसाठ खतं, तर दुसरीकडे वारेमाप पाणी ! ज्यांच्याकडे पाणी आहे किंवा ज्यांना आपल्या पिकांना पाणी देणं शक्य आहे, ते पिकांना अक्षरश: न्हाऊ घालतात ! डॉ. रतन लाल विचारतात, तुम्हीच सांगा, पाण्यात आपण श्वास घेऊ शकू का? मग पिकं आणि मातीतले सूक्ष्म जीव तरी कसे श्वास घेऊ शकतील? ते कसे जिवंत राहतील? त्याऐवजी ठिबक सिंचनाचा उपयोग करा ! त्यामुळे पाणीही वाचेल, पिकंही जोमानं वाढतील ! मुख्य म्हणजे वनस्पतींची मुळं पाण्यात बुडून मरणार नाहीत. ‘फ्लड इरिगेशन’ हा प्रकार कायमचा बंद व्हायला हवा.
डॉ. रतन लाल यांनी सांगितलेली कृषिपद्धती सध्या जागतिक पातळीवरील कृषी व्यवस्था सुधारणांच्या प्रय}ांच्या केंद्रस्थानी आहे. त्यांनी आपल्या संशोधनांतून दाखवून दिलं आहे की, तुमची माती जर निरोगी असेल, तर कमी बियाणांत आणि कमी क्षेत्रफळावरही तुम्ही जास्त उत्पादन घेऊ शकता. कृषी रसायनांचा कमी वापर, कमी पाणी, कमी नांगरणी आणि कमी ऊर्जेतही भरपूर पीक घेता येऊ शकतं, मातीचं आरोग्य चांगलं ठेवलं, तर ती पावसाचं पाणी उत्तम टिकवून ठेवते, प्रदूषकांना फिल्टर करते, सर्व प्रकारच्या सजीवांसाठी निवासस्थान पुरवते!.
डॉ. रतन लाल यांचा हाच सजीव आणि मातीकेंद्री दृष्टिकोन आपल्याला विनाशापासून वाचवणार आहे, मात्र धरतीच्या आरोग्यासाठी ठाम प्रयत्नांबरोबरच ठोस मृदा नितीची अत्यंत आवश्यकता आहे. आणि त्याही आधी मातीचं ऋण आपल्याला फेडावं लागणार आहे.

चार खंडांतील 50 कोटी शेतकरी,
दोन अब्ज लोकांना झाली मदत!

डॉ. रतन लाल यांनी मातीच्या गुणवत्तेत सातत्यानं सुधारणा केली. माती अधिक सकस, उपजाऊ करण्याचे प्रय} केले. गेल्या पाच दशकांपासून त्यांनी स्वत:ला याच कामासाठी सर्मपित करून घेतलं आहे. या माध्यमांतून तब्बल चार खंडांतल्या पन्नास कोटीपेक्षाही जास्त छोट्या शेतकर्‍यांच्या आयुष्यात त्यांनी आनंदाचे मळे फुलवले, तर तब्बल दोन अब्जपेक्षाही जास्त लोकांच्या खाद्य आणि पोषण आहारात सुधारणा घडवून त्यांच्या आयुष्याची दोरी अधिक बळकट आणि लांब केली. नैसर्गिक संसाधनांत कोणतीही तोडफोड न करता त्यांनी ही सगळी किमया घडवून आणली, त्यामुळेच त्याचं महत्त्व अधिक आहे.

मातीच्या सुदृढ आरोग्यासाठी
सर्मपण आणि संशोधन!

डॉ. रतन लाल यांनी आपल्या संशोधनाची सुरुवात नायजेरिया येथे केली. मातीचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आशिया, दक्षिण-पूर्व आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका, दक्षिण अमेरिका, कोलंबिया, ब्राझील, थायलंड, व्हिएतनाम आणि इतरही बर्‍यांच देशात त्यांनी मातीवर अनेकविध प्रकारचे संशोधन करताना अनेक प्रकल्पही विकसित केले. 
मातीचे आयुष्य वाढविणारी पिके, मल्चिंग, अँग्रोफॉरेस्ट्री असे अनेक प्रयोग करताना त्यांनी सर्वसामान्य माणसाचं आयुष्य सुखी केलं. वेगवेगळ्या अत्याधुनिक प्रयोगांद्वारे कमी पाण्यांतही मातीची पोषण मूल्यं कायम राखणारे त्यांचे प्रय} विशेषत्वाने गाजले. पूर, दुष्काळ आणि जलवायू परिवर्तन इत्यादी गोष्टींचा पिकावर परिणाम होऊ न देणार्‍या त्यांच्या प्रयोगांनी क्रांती घडवली. 2007मध्ये ‘इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज’ (आयपीसीसी)ला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. डॉ. रतन लाल हे त्यावेळी आयपीसीसीचेही घटक होते.

मातीला मरू देऊ नका
डॉ. रतन लाल म्हणतात, मातीचं आरोग्य आपण टिकवलं तर अनेक प्रकारच्या संकटांतून आपली सुटका होईल. माणसाच्या अन्न आणि आरोग्याचा प्रश्न तर त्यामुळे सुटेलच; पण पूर आणि दुष्काळावरही मात करता येईल. निरोगी माती पावसाळ्यांत पूर आणि उन्हाळ्यांत दुष्काळ येण्यापासून आपलं संरक्षण करेल.
सर्व प्रकारच्या जैवविविधतेत माती हा एक जिवंत घटक आहे. पेनिसिलिनसारखी प्रतिजैविकेही मातीत राहणार्‍या सूक्ष्मजीवांमधूनच येतात. पण शेतीत खतं आणि कीटकनाशकांचा अंदाधुंद वापर केल्यामुळे हे सूक्ष्मजीव तर मरतातच, शिवाय मातीही मरते. माती कधीच मरणार नाही, तिच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही, याची काळजी आपण घेतली, तर तीही आपल्याला कधीच मरू देणार नाही.

Web Title: Dr. Ratan Lal- A renowned agricultural researcher of Indian origin, Dr. Ratan Lal recently received the prestigious 'World Food Prize'...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.