अजिंठ्याची भित्ति-चित्रे आणि त्यामागची कहाणी शोधण्यासाठी आयुष्य वाहणारे डॉ. वॉल्टर स्पिंक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 06:00 AM2021-02-28T06:00:00+5:302021-02-28T06:00:02+5:30

डॉ. वॉल्टर स्पिंक हे अमेरिकन इंडॉलॉजिस्ट! भारतीय कला-इतिहासातला सोन्याहून तेजस्वी तुकडा असलेल्या अजिंठा लेण्यांच्या निर्मितीची कहाणी शोधण्यासाठी अख्खे आयुष्य वाहिलेल्या या संशोधकाचा १६ फेब्रुवारी रोजी जन्म-स्मृतिदिन होता.. त्यानिमित्ताने..

Dr. Walter Spink Professor who spent his life to find story behind ajintha vaves | अजिंठ्याची भित्ति-चित्रे आणि त्यामागची कहाणी शोधण्यासाठी आयुष्य वाहणारे डॉ. वॉल्टर स्पिंक

अजिंठ्याची भित्ति-चित्रे आणि त्यामागची कहाणी शोधण्यासाठी आयुष्य वाहणारे डॉ. वॉल्टर स्पिंक

Next
ठळक मुद्देप्राचीन भारतीय इतिहासातल्या एक वैभवशाली कालखंड अजिंठ्याच्या  भित्तिचित्रांमधे जिवंत गोठवला गेला आहे.वाकाटक सम्राट हरिषेणाची अल्पकालीन वैभवशाली कारकीर्द डॉ. स्पिंक यांच्या सिद्धांतामुळे समोर आली.अजिंठा शैलगृहसमूहातल्या अंदाजे तीस प्रमुख लेण्यांपैकी केवळ फक्त पाचच लेणी अशी आहेत ज्यांना ख-या अर्थाने पूर्ण रंगचित्रांकित म्हणता येईल.

- शर्मिला फडके   

प्राचीन भारतीय कला-कौशल्याचा मुकुटमणी मानली गेलेली, दीड हजारांहून जास्त वर्ष टिकून असलेली अजिंठ्याची लेणी, त्यातल्या भित्तिचित्रांमधला आजही न उणावलेला रंगांचा झळाळ, कोमल रेषांचा डौल, अत्युत्तम लयीतली रंग-चित्रांकित कथनात्मकता  याची मोहिनी जगभरातल्या कलारसिकांच्या मनावर आहे. 

अजिंठ्याच्या भित्तिचित्रांचा मध्यवर्ती विषय आहे बोधिसत्त्व, म्हणजे बुद्धाचे विविध जन्मांमधील अवतार, त्याची शिकवण सांगणा-या जातककथांमधल्या निवडक प्रसंगांचे कथन. त्यात सलगता आहे, ठळक व्यक्तिरेखा आहेत, विविध समूह चित्रं आहेत. भित्तिचित्रांमधून  आपल्या समोर दीड हजार वर्षांपूर्वीचे आपल्याच भूभागावर अस्तित्त्वात असलेले, म्हटले तर परिचित तरीही अनोखे जग उलगडते. त्यात ऐश्वर्यसंपन्न अभिजन आहेत तसेच सामान्य जन आहेत, अप्सरा, यक्ष, राक्षस आहेत, पशू-पक्षी आहेत, सुशोभित घरे, राजमहाल, रस्ते आहेत, बोधिसत्वाचा रत्नखचित मुकुट, तलम वस्त्रांची श्रीमंती, परदेशी प्रवाशांचे चित्रण, उत्तम मदिरा असलेले बुधले, समुद्रात विहरणा-या नौका, फ़ळा-फ़ुलांचे बगिचे, धान्य या सगळ्यातून एका समृद्ध व्यापार, संपन्न, स्थिर नागरी जीवनाचे अस्तित्त्व जाणवते. नागरिकांचे दैनंदिन जीवन, खाणे-पिणे, समजुती, श्रद्धा, त्यांची देहबोली, चेहेऱ्यावरचे शांत, आश्वस्त भाव, वैविध्यपूर्ण व सुबक अलंकार, शस्त्रे, वाद्ये, खेळणी, करमणुकीची साधने... अजिंठ्याच्या भित्तिचित्रांमधे हे सर्व आहे. एका सुसंस्कृत, समाधानी, निश्चिंत, प्रगत, बुद्धीमान, धार्मिक समाजाचे बारीकसारिक तपशिलांसह केले गेलेले हे दृश्य दस्तावेजीकरण आहे. यातून आपल्याला अनेक गोष्टींचे आकलन होते:  सुसंस्कृत संपन्न राहणीमान असलेला समाज, शिल्प-चित्र, संगीत, नृत्यादी कलागुणांची कदर करणारी राजसत्ता, व्यापार उदिमाने मजबूत झालेली आर्थिक क्षमता आणि प्रजाजनांच्या सुखरूपतेविषयी व सुरक्षिततेबाबत जागरूक असणारी स्थिर व खंबीर शासनव्यवस्था. 

प्राचीन भारतीय इतिहासातल्या एक वैभवशाली कालखंड अजिंठ्याच्या  भित्तिचित्रांमधे जिवंत गोठवला गेला आहे. हा अद्वितीय पाषाण आविष्कार जन्माला आला तेव्हा महाराष्ट्रात वाकाटकांचे वैभवशाली, बलाढ्य साम्राज्य होते. संपूर्ण भारतभरात कला-कौशल्याचे पुढील काळात जागतिक स्तरावर मास्टपीस ठरलेले अत्युत्तम नमुने उभारले जात होते, राजवाडे, भव्य वास्तु, मंदिरे बांधली जात होती. कालिदासाच्या मेघदूताची निर्मिती होत होती. प्रतिभावंत कलाकार घराणी, कला-शाळा घडत होत्या. त्यातीलच कसबी, कुशल कला-कारागिरांच्या हातून अजिंठ्याच्या भित्तिचित्रांची निर्मिती घडली. शिल्पकाराची छिन्नी आणि चित्रकाराचा कुंचला, दोन्हींचे कसब त्यात पणाला लागले. हजारो गुणवंत, प्रशिक्षित, अनुभवी, सुबक हात कामाला लागले. केवळ याच अद्वितीय निर्मितीकरता जणू ते प्रशिक्षित झाले होते, त्यांचा आजवरचा सगळा अनुभव पणाला लागला. या कलाकाराचं ताजं, उत्साही, परिपक्व, अनुभवी मन रंग-रेषांमधे प्रतिबिंबित झालं. 

अजिंठ्याच्या या संपूर्ण पाषाण-लेणीसमुहाकरता एकुण किती कलाकार त्याकरता काम करत होते, किती धन लागले, किती कालावधी लागला, कोण राज्यकर्ते होते, त्यावेळी सामाजिक परिस्थिती नेमकी कशी होती असे असंख्य मूलभूत प्रश्न अजिंठा लेण्यांचा दोनशे वर्षांपूर्वी पुनर्शोध लागला तेव्हापासून प्रत्येक संशोधकाच्या, कलारसिकाच्या मनात ठाण मांडून होते. त्याकरता अनेक अंदाज बांधले गेले, गृहितके मांडली गेली. परंतु त्याचं निश्चित, पुराव्यासहित तपशिलवार उत्तर दिलं डॉ. वॉल्टर स्पिंक  यांनी. भारतीय कला-इतिहासातला एक सोन्याहून तेजस्वी तुकडा, ज्याला अनेक वर्षं एकाकी, निखळलेला मानलं गेलं, त्याच्या मागचे, पुढचे दुवे सांधता येतात, एका कडीमधे गुंफ़ता येतं, ही लेणी कोणा अनामिक भारतीयांनी नाही, तर एका सुसंगत इतिहासाचा भाग असलेल्या, वंशावळीचा दुवा माहित असलेल्या धनाढ्य, बलाढ्य राजवटीने उभारलेली आहेत हे अजिंठ्याच्या चित्र-शिल्पांवर निरातिशय प्रेम करणा-या या इंडॉलॉजिस्टने अतिशय प्रभावीपणे, पुराव्यानिशी दाखवून दिलं. आजवर अजिंठ्यातील भित्तिचित्रांचा विचार केवळ सौंदर्यलक्षी दृष्टीकोनातून आणि त्यातून प्रतित होणारे बुद्धाचे तत्वज्ञान, विचार, शिकवण या संदर्भातूनच अधिक केला गेला होता. या पार्श्वभूमीवर डॉ.स्पिंक यांनी नेमक्या शास्त्रीय दृष्टीकोनातून मांडलेली गृहितके महत्वाची, आजवरच्या समजुतींना छेद देणारी ठरतात.  

अजिंठ्याच्या या रंगचित्रांकित लेण्यांबद्दल जगभरातल्या तज्ञ, संशोधक, अभ्यासकांच्या अनेक पिढ्या मनात सार्थ कुतूहल, कौतुक, अभ्यासवृत्ती बाळगून आहेत. डॉ वॉल्टर स्पिंक हे त्यातील अग्रगण्य अभ्यासक. अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठात ते कला-इतिहासाचे मानद प्राध्यापक होते. २०१९ साली, वयाच्या 91 च्या वर्षी त्यांचे निधन झाले, तोपर्यंत ते सातत्याने कार्यरत होते. १६ फ़ेब्रुवारी हा त्यांचा जन्म-स्मृतीदिन. त्या निमित्ताने अजिंठा लेणी आणि त्यातील भित्तिचित्रे यांच्या संदर्भातल्या त्यांच्या संशोधनाचा वेध घ्यायचा हा प्रयत्न. 

अजिंठा लेण्याची सर्वप्रथम सुरुवात झाली महाराष्ट्रात सातवाहन साम्राज्याच्या आधिपत्याखाली. ही लेणी त्या काळात निर्माण होत असलेल्या इतर लेण्यांप्रमाणेच होती, उदा. कार्ले-भाजे, कान्हेरी. त्यानंतर हे काम बंद पडले व दुसऱ्या टप्प्यात सुमारे तीन शतकांच्या नंतर वाकाटक राजवटीत पुन्हा सुरू झाले. वाकाटक सम्राट हरिषेणाच्या अवघ्या सतरा वर्षांच्या कारकीर्दीत ही सर्व लेणी निर्माण झाली, याचे सुस्पष्ट, निस्संदिग्ध पुरावे डॉ स्पिंक यांनी त्यांच्या सात खंडांच्या ग्रंथमालेत मांडले आहेत.

डॉ. स्पिंक यांनी अजिंठा लेण्यांच्या निर्मितीचा निश्चित कालानुक्रम नोंदवताना लेण्यांचा पुराततत्वीय दृष्टीकोनातून एक उत्खनित वास्तु म्हणून अभ्यास केला, त्याद्वारे तत्कालीन घटनांचा एक अनुक्रम मांडून त्यातून अजिंठ्याच्या रचना निर्मितीचे टप्पे निश्चित केले. लेण्याच्या बांधकामाचे टप्पे, पद्धत, तत्कालीन राजकीय परिस्थितीचा त्यावर झालेला परिणाम इत्यादी संदर्भात पायाभूत निरीक्षणे नोंदवली. लेण्यांची रचना, खांब, कोरीवकाम यासोबतच भित्तिचित्रांच्या अभ्यासातून मिळालेल्या पुराव्यांचा सखोल विचार केला. स्पिंक केवळ उत्खनित पुराव्यांवर अवलंबून राहिले नाहीत, या पुराव्यांना आधार देणारे प्राचीन साहित्यामधले,  म्हणजे दंडीचे दशकुमारचरितातले उल्लेख त्यांनी अभ्यासले, लेण्यांच्या लाकडी दरवाजांच्या सांध्यांच्या जोडणीच्या दगडी भिंतींवर राहिलेल्या खुणा, लेण्यांची सूर्यभ्रमणानुसार केलेली रचना अभ्यासली, शिलालेख वाचले, शिल्प, भित्तिचित्रांची शैली, प्रत्येक रेषा, अगदी रंगांचे हलगर्जीपणाने उमटलेले ओघळही त्यांच्या नजरेतून सुटले नाहीत, त्यांनी प्रत्येक बारीक-सारीक तपशिलांची नोंद केली. या सगळ्यातून पहिल्यांदाच समोर आला बलाढ्य अशा प्राचीन वाकाटक साम्राज्याचा इतिहास, त्याची अखेर नेमकी कशी झाली याचा वृत्तांत. 

ही गोष्ट सोपी तर नव्हतीच, त्याकरता प्रचंड चिकाटी, संशोधन, शारीरिक-मानसिक परिश्रम, आणि वेळ खर्ची पडला, जो त्यांनी अतीव आनंदाने दिला. अजिंठ्यावर जीवापाड प्रेम करणारा हा संशोधक होता.  स्पिंकच्या संशोधनानुसार लेणीनिर्मितीचा मुख्य काळ एकुण १७ वर्षं आहे, आणि हा काळ निश्चित करण्याकरता त्यांनी लेण्यांचा जो सातत्याने अभ्यास केला, तो तब्बल ६६ वर्षं. म्हणजे लेणीनिर्मितीच्या कालावधीपेक्षा तिप्पट काळ. अजिंठ्याला स्पिंक यांनी पहिली भेट दिली १९५२ साली, सप्टेंबर २०१८ ची त्यांची अजिंठ्याची भेट अखेरची ठरली. या ६६ वर्षांच्या कालावधीत स्पिंक यांनी अत्यंत बारकाईने, लेण्यांमधील दालनांचा इंच न इंच तपासून, अभ्यासून आपली निरिक्षणे तपशीलवार सात ग्रंथांमधे नोंदवली, जी पुढील काळातल्या अजिंठा अभ्यासकांच्या दृष्टीने अनमोल आहेत. अजिंठ्याच्या लेणीसमूहात जी अर्धवट सोडून दिलेली, अपूर्ण लेणी आहेत तीही त्यांनी तपशीलवार अभ्यासली. लेणीनिर्मितीच्या कामाचे टप्पे, प्रगती, आलेल्या अडचणी, राजकीय अस्थिरता आणि हस्तक्षेप या सगळ्याचा वेध घेतला, आणि अजिंठा लेणीनिर्माण संदर्भातला आपला सुधारित लघु कालक्रमाचा (शॉर्ट क्रोनोलॉजीचा) सिद्धांत मांडला. 

वाकाटक सम्राट हरिषेणाची अल्पकालीन वैभवशाली कारकीर्द एरवी गुप्त साम्राज्याच्या सुवर्णकाळाच्या झगमगाटात इतिहासाच्या पानांमधून बहिष्कृत राहिली होती, डॉ. स्पिंक यांच्या या सिद्धांतामुळे प्रथमच ज्ञात होऊ शकली. 

इ.स. तिसरे ते पाचवे शतक वाकाटक साम्राज्याचा काळ. उत्तरेत वैभवशाली गुप्त साम्राज्याचे आधिपत्य होते.  वत्सगुल्म (आजचे वाशिम) ही वाकाटकांची तत्कालीन राजधानी. समृद्ध, भरभराटीचा, स्थिर असा हा कालखंड होता. व्यापारी मार्गांवर वाहतुकीचा गजबजाट होता, परदेशी धनिक व्यापा-यांची राज्यात सातत्याने जा-ये होती. अजिंठ्याच्या भित्तिचित्रांमधे या परदेशी व्यापा-यांचे व्यक्तिचित्रण अनेक ठिकाणी पहायला मिळते. इ.स. सुमारे ४६० ला वाकाटक सम्राट देवसेन  याचा मुलगा हरिषेण सम्राटपदी स्थानापन्न झाला. वाकाटक सम्राट हिंदू (शैव) असले तरी त्यांचे अनेक मंत्रीगण, व्यापारी, नागरिक बौद्धधर्माचे अनुयायी होते. हरिषेण  याने बौद्ध धर्मीय लेण्यांच्या बांधकामाकरता उदार धनाश्रय दिला. अजिंठ्याच्या लेण्यांना विशेषत्वाने हा खास राजाश्रय मिळाला, धनाची, कसबी कला-कारागिरांची कमी नव्हती, त्यामुळे लेण्यांची पुढची निर्मिती अतिशय कमी कालावधीत शक्य झाली. इ.स. ४६२ मधे अजिंठ्याला मोठ्या प्रमाणावर लेण्यांचे बांधकाम सुरु झाले. गुहा क्र. १ मधे स्वत: हरिषेण  याने, तर गुहा क्र. १६ त्याचा मुख्य प्रधान वराहदेव याने आपल्या खाजगी धनाच्या देणगीतून कोरीवकाम सुरु केले. अजिंठ्याच्या लेणीसमूहातली ही सर्वात मोठी, वैभवशाली, उत्कृष्ट भित्तिचित्र, शिल्पाकृतींनी सजलेली अशी ही दोन प्रमुख दालने पूर्ण झाली. याच गुहा क्र. १ मधे बोधिसत्वाची विविध रुपे, ज्यात अतीव मनोहारी असा वज्रपाणी, मंजुश्री आणि अवलोकितेश्वराचे चित्रण आहे. छतावर लयबद्ध, देखण्या वेलबुट्ट्या, भौमितिक आकृत्यांची सजावट आहे. पुढे सम्राट हरिषेण  याच्या राजवटीत उलथापालथी सुरु झाल्या. त्याचा फ़ायदा घेत धुमश्चक्रीला कारणीभूत असलेले अश्मकराज्य,, आणि खानदेशातला ऋषिक राजा उपेन्द्रगुप्ताने अजिंठ्यात स्वत:च्या लेण्यांचेही बांधकाम सुरु केले. मात्र अस्थिरता फ़ारच वाढली आणि वर्षभर युद्धस्वरुप परिस्थितीतअजिंठ्या लेण्यांचे बांधकाम ठप्प झाले. तिथले कलाकार कारागिर या कालावधीत धारजवळ बाघ येथे गेले, तिथल्या लेण्यांचे बांधकाम याच काळात झाले. इ.स. ४७३ मधे अजिंठा लेण्यांचे काम पुन्हा सुरु झाले, आणि दोनच वर्षांनी सम्राट हरिषेण याचे अकस्मात निधन झाले. कदाचित त्याला अश्मकांनी कट कारस्थाने करून मारले असावे.  डॉ. स्पिंक यांच्या मते बहुधा म्हणूनच सम्राटाच्या क्र. 1 या लेण्याचे औपचारिक, समारंभपूर्वक उद्घाटन झाले नाही.  हरिषेण  याच्या मृत्यूनंतर त्याच्या अकार्यक्षम मुलालाही अश्मकांनी मारले आणि वाकाटक साम्राज्याचा शेवट झाला. अजिंठा लेण्यांचे पुढचे बांधकाम अश्मकांच्या आधिपत्याखाली झाले. या संपूर्ण घडामोडींचा अजिंठा लेण्यांवर झालेला नेमका परिणाम डॉ. स्पिंक यांनी आपल्या सूक्ष्म निरिक्षणाने, अभ्यासाने टिपला, ग्रंथांमधे नोंदवला.  

लेणी खोदणे, शिल्प घडवणे, कोरीव काम, लाकूडकाम, भित्तिचित्रांकरता लेण्यांचा अंतर्भाग ’तयार’ करणे, दगडी पृष्ठभागावर रंगकाम करता यावं यासाठी अजिंठा लेण्यांमधे जो ’मड-प्लास्टरिंगचा’ प्रयोग दीड हजार वर्षांपूर्वी केला गेला तो जगभरात आजवरच्या उपलब्ध संशोधनात त्या कालखंडातील अद्वितीय, एकमेव असा आहे. अजिंठ्याच्या या रंगचित्राकृतींना भित्तिचित्र किंवा म्यूरल्स संबोधतात, कारण दगडांच्या मुद्दाम खडबडीत केलेल्या भिंतीवर माती, शेण, गोमुत्र, भाताच्या जाळलेल्या ओंब्यांच्या भुकटीच्या मिश्रणाचा, त्यावर अजून एक चुन्याचा थर देऊन, सुकवून तयार केलेल्या पृष्ठभागावर या चित्राकृतींचे रेखांकन आणि रंगलेपन केले गेले.  फ़िक्या लाल, तपकिरी किंवा काळ्या रंगाची बाह्यरेषांनी चितारलेल्या आकृत्यांमधे खारीच्या शेपटीतील केसांनी तयार केलेल्या कुंचल्याने रंग भरले. परिसरातील दगड, गोट्यांच्या चु-यापासून तयार केलेले नैसर्गिक, खनिज रंग वनस्पतीच्या गोंदात मिसळून हे रंगकाम केले. गडद लाल-तपकिरी, पिवळा, काजळीचा काळा, चुन्याचा पांढरा आणि मध्य आशिया, पर्शियातून आलेल्या लापिस लाझुलीचा राजवर्ती निळा रंग चित्रलेपनात प्रामुख्याने वापरला गेला. चित्रांचे सुसंगत समुह आहेत, असंख्य आकार आणि विषय, मात्र एकाचीही पुनरावृत्ती नाही, रंगांच्या विरोधी छटांचाही सुयोग्य, प्रसन्न समतोल, वैशिष्ट्यपूर्ण भारतीय काव्यमय चित्रशैली. साधारण दीड हजार वर्षांहून जास्त काळ लोटूनही रंगांचा ताजेपणा, उजळपणा, भावमुद्रांची मोहकता टिकवून धरलेली ही चित्रे आहेत. युरोपियन रेनेसान्स कालखंडातली चित्रे  त्यानंतर दहा शतकांचा काळ उलटल्यावर चितारली गेली आहेत हे लक्षात घेतलं तर अजिंठ्याच्या अनामिक चित्रकारांची चित्रांमधली खोली, सघनता, रचना, तंत्र, वास्तवता, डौल आणि पर्स्पेक्टीवची सखोल जाण, विषयांची निवड, चेह-यावरील भाव, देहबोली, हालचाली, रंगछटांचे सुबक लेपन थक्क करुन टाकते. रेनेसान्स काळात मायकेलेन्जेलोने रंगवलेले सिस्टीन चॅपेलच्या प्रचंड छताच्या तुलनेत पहायचं तर अजिंठ्याच्या या  भित्तिचित्रांकरता वापरला गेलेला पृष्ठभाग त्याहूनही दहा पटींनी जास्त आहे. 

अजिंठ्याच्या लेण्यांमधली भित्तिचित्रे ख-या अर्थाने ’आधुनिक’ ठरतात. तत्कालिन ऐतिहासिक, भौगोलिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, दरबारी, व्यापारी व्यवहारांची जाण ही चित्रे देतात. अजिंठ्याच्या चित्रांकनात परदेशी प्रभावही आहेत, केशभूषेवर ग्रीक, तर कपड्यांवरील चुण्या, घड्यांमधून गांधार कला दृगोच्चर होते, मात्र या विभिन्न शैलींना सामावून घेत अजिंठ्याची चित्रे परस्परांशी एक अद्वितीय, सुसंगत मेळ साधतात आणि आपल्यासमोर एक सलग रंगचित्रांचा पट उलगडत जातो. केशरी, पिवळीवस्त्रे, हिरवाईत डुलणारी निळीकमळे, गुलाबी पुष्पवेली, शुभ्र हत्ती.. विनय पिटकातील महावग्गात सांगितल्यानुसार थेरवादी महंत वेळोवेळी ज्या ठिकाणी लेण्यांचे खोदकाम सुरु असे, तिथे भेट देऊन तिथल्या प्रमुखाला लेण्यांमधे कोणत्या जातक कथा चित्रित करायच्या याच्या सूचना देत, त्याकरता लागणारे धन पुरवत. या कथांमधले कोणते प्रसंग रंगवायचे याचा निर्णय लेणी प्रमुखावर सोपवला जाई. त्यानंतर तो प्रसंग कसे, कोणत्या शैलीत, रंगांनी रंगवायचे याचे पूर्ण स्वातंत्र चित्रकाराला दिले जाई. कदाचित त्यामुळेच अजिंठ्याची भित्तिचित्रे इतकी सहज, नैसर्गिक, जिवंत आणि आकर्षक, आनंदी दिसतात.              

एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट डॉ. वॉल्टर स्पिंक यांच्या निरिक्षणातून समोर आली, ती अशी की जगभरात अजिंठा लेणी याच भित्तिचित्रांकरता आज ’पेंटेड पॅरेडाईज’ म्हणून सर्वात जास्त प्रसिद्ध असली तरी प्रत्यक्षात अजिंठा शैलगृहसमूहातल्या अंदाजे तीस प्रमुख लेण्यांपैकी केवळ फक्त पाचच लेणी अशी आहेत ज्यांना ख-या अर्थाने पूर्ण रंगचित्रांकित म्हणता येईल. तीन लेण्यांमधील रंगचित्रे अर्धवट राहिलेली आहेत. इ.स ४७८ मधे, म्हणजे अजिंठा लेण्यांच्या निर्मितीच्या अंतिम कालखंडात काही चैत्यगृहांमधे घाईघाईने उरकलेले रंगचित्रकाम दिसते. तेरा लेण्यांमध्ये रंगचित्रांची जेमतेम सुरुवात झाली, बाकी पाच लेण्यांमध्ये रंगाचा एक ठिपकाही उमटला नाही. तरीही अजिंठ्याला भेट दिल्यावर तोंडून ’अहाहा’ उमटतो, मनावर पुढचा प्रदीर्घ काळ ठसा उमटून रहातो तो अद्वितीय भित्तिचित्रांचाच. डॉ. स्पिंक यांच्या मते लेण्यांमधले शिल्प- रंगचित्रकाम करणारे कलाकार देशाच्या वेगवेगळ्या भागांमधून, गटागटांनी येऊन काम करणारे होते, कारण लेण्यांमधील कलाकृतींमधे शैली आणि दर्जाचे वैविध्य आढळून येते. हे चित्रण करणारे कलाकार कसबी आणि अनुभवी होते, राजमहाल, मंदिरांवर अशा त-हेची रंगचित्रं सातत्याने रंगवणारे हे कुशल हात होते. त्यामुळेच भित्तिचित्रांमधले राजवाडे, इमारती, रस्ते यांचं चित्रण त्यांना अचूकतेनं, सहजतेनं, बारीकसारिक तपशिलांसहित देखणेपणानं करता येणं शक्य झालं. 

अगदी सुरुवातीच्या काळातल्या गुहा आणि बाहेरच्या सज्जांमधल्या चित्रांतूनही त्यांच्या प्रतिभेचा प्रत्यय येतो. लेण्यांच्या छतावर शोभिवंत कलाकुसर आहे, त्यात भौमितिक आकार, फ़ुलांच्या वेलबुट्टी चितारल्या आहेत, आणि दगडी भिंतींवर जातक कथांमधले निवडक प्रसंग चितारले आहेत. लेण्यांच्या निर्मितीमधे छताचे रंगचित्रकाम आधी केले जाते आणि मग भिंतींवर. पण अजिंठ्यामधे काही वेळा उलट झाले आहे. एका लेण्याचे निरिक्षण करताना छतावरुन भिंतीवर ओघळलेला रंगाचा एक ठिपका पाहून त्यांनी हे अनुमान काढले. तसेच काही लेण्यात प्रवेशद्वारावर सुंदर चित्रांची सजावट आहे, अगदी तशाच प्रकारची सजावट इतर लेण्यातही आहे, पण ती रंगचित्रांची नसून कोरीवकामाची आहे. स्पिंक यांचे अनुमान असे की रंगचित्रे ही कोरीवकामाचा पूर्वनमुना म्हणून काढली गेली. अजिंठ्यातली सपाट, एकसमान केलेल्या पृष्ठभागावर रंगवलेली भित्तिचित्रे अतिशय सुबक, चित्रमय दिसतात, पण तेच चित्रविषय खडबडीत, असमान पृष्ठभागावर कोरीवकामातून दाखवायचा जिथे प्रयत्न झाला, तेव्हा ते सुबक न वाटता गिचमिड स्वरुपाचे दिसते. लेण्यांमधे खांबांवर आधी आडव्या रेषा चितारल्या गेल्या होत्या, पण नंतर कदाचित त्या योग्य न वाटल्याने पुसून तिथे एकसंध रंगलेपन केले गेले.  निर्णय किती योग्य होता हे त्यावर उठून दिसणा-या सुरेख वेलबुट्टीना पाहून लक्षात येते. 

इ.स. ४६८ मधे म्हणजे अगदी सुरुवातीच्या कालखंडातल्या लेण्यांमधे छतावर तुलनेने साध्या सोप्या कमळ, पक्षी अशा चित्राकृतीची सजावट आहे, नंतरच्या कालावधीत असाधारण विषय, उदा. नाचणारे बुटके विदुषक किंवा रौद्र सामुद्रिक प्राण्यांच्या आकृत्यांची सजावट दिसते. सोपेपणाकडून गुंतागुंतीकडे जाणारा चित्रशैलीतला हा बदल महत्वाचा आहे, कालखंडातल्या बदलत्या सांस्कृतिक, सामाजिक अभिरुचीवर ठळक भाष्य करणारा आहे. अजिंठ्यातल्या भित्तिचित्रांतून प्रतित होणारे सौंदर्य, कथनात्मकता, तत्वज्ञान, बोध लक्षात घेता आज या चित्रांचे स्थान, दर्जा आणि महत्व तिथल्या शिल्पाकृतींच्या तुलनेत सर्वोच्च प्रतीचे मानले जाते. परंतु लेणी निर्मिकांना कदाचित हे अपेक्षित नसावे. कारण शिल्पांच्या निर्मितीकरता तुलनेत अधिक वेळ, कसब, कौशल्य, हत्यारे आणि साहजिकच जास्त धनाची गरज होती. शिल्पकौशल्याला जास्त मान आणि महत्वही म्हणूनच होते. शिल्पनिर्मितीकरता जास्तीत जास्त धन द्यायला आश्रयदात्यांची चढाओढ लागे. चित्रांकरता नैसर्गिक, खनिज रंग, कुंचले इतकंच लागे, राजवाडे, मंदिरांवर रंगचित्र चितारणारे कलाकारही मोठ्या प्रमाणावर, सहज उपलब्ध होते. आज निर्माणानंतर हजारो वर्षं टिकून राहिलेला रंगांचा आणि लयदार रेषाकृतींचा प्रभाव आणि अचंबा शिल्पांच्या तुलनेत केव्हाही जास्त महत्वाचा वाटणे साहजिक आहे.  त्यामुळे सुरुवातीच्या कालखंडात निर्मिलेल्या खिडक्या, प्रवेशद्वार आणि खांबांवर रंगाकृती आहेत, पण नंतरच्या कालखंडातल्या लेण्यात या जागी कोरीवकाम आहे, जे अधिकाधिक क्लिष्ट, गुंतागुंतीच्या नक्षीचे होत गेले. लेणीनिर्मितीच्या अंतिम टप्प्यात अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे या कोरीवकामाचा दर्जाही खालावत गेला. स्पिंक यांनी आपल्या अभ्यासपूर्ण, बारीक निरिक्षणाद्वारे काढलेली ही अनुमाने निश्चित महत्वाची आहेत.  

उजळ, प्रसन्न रंगछटा, मृदू, लयदार रेषांमधून साकारलेल्या या रंगचित्रांमधे एक विलक्षण डौल, मेळ आणि अभिजातता आहे, त्यात शृंगारिक, आवेगी भावमुद्रा आहेत आणि वैचारिक, ज्ञानी, शांतपणाचेही दर्शन आहे. भित्तिचित्रांच्या समूहामधे सुसंगती आहे, लेण्यांची सजावट इतका मर्यादित हेतू त्यांचा नाही. जातक कथांमधून सांगितले गेलेले बुद्धजीवनातले प्रसंग, शिकवण, अनुभव कथन, उपदेश सामान्यांपर्यंत पोचवण्याचे काम त्यांनी केले. ही भित्तिचित्रं आपण पहात नाही, तर ’वाचतो’, अनुभवतो. गुहांमधल्या मंद प्रकाशात, साध्या खनिज रंगांनी, प्राथमिक कुंचल्यांनी तत्कालीन कलाकारांनी हे अद्वितीय रंगकाम कसे केले असेल याची केवळ क्षीण कल्पना आपल्याला आज करता येऊ शकते. ही रंगचित्र आपण पहातो, वाचतो, त्यातून बुद्धाच्या शिकवणुकीचा जमेल तसा बोध घेतो,भारावून जातो परंतु डॉ. वॉल्टर स्पिंकसारखे झपाटलेले संशोधक अजिंठ्याच्या या अद्वितीय कलाकौशल्यामुळे केवळ भारावून जात नाहीत, त्याही पुढे जाऊन ते या कलाकृतींच्या निरीक्षणाचा, अभ्यासाचा, संशोधनाचा ध्यास घेतात, वर्षानुवर्षं सातत्याने याच संशोधन भावाने, वारक-याच्या निष्ठेने येत रहातात, लेण्यांचा कानाकोपरा, प्रत्येक इंच सूक्ष्मतेनं न्याहाळतात, त्यातून ठोस निष्कर्ष काढतात, पुन्हा पुन्हा तपासून पहातात आणि मग आजवर केवळ कल्पनेतून साकारलेली लेण्यांच्या निर्मितीची कहाणी आपल्या समोर उलगडते. अद्वितीय, पारलौकिक सौंदर्याने परिपूर्ण अशी ही अजिंठा लेणी मानवी कल्पकतेची, सृजनात्मक ऊर्जेची, परिपूर्णतेचा ध्यास घेणाऱ्या झपाटलेपणाची, परिश्रमाची, कलाकौशल्याची ठोस, निर्विवाद अशी पावती आहे. आणि या अनामिक कलाकारांचा त्यांना साजेसा सन्मान  बहाल केला आहे  डॉ. वॉल्टर स्पिंक यांनी. 

sharmilaphadke@gmail.com
(लेखिका कला आस्वादक आहेत.)
(छायाचित्रे सौजन्य : प्रसाद पवार, नाशिक)
 

Web Title: Dr. Walter Spink Professor who spent his life to find story behind ajintha vaves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.