ड्रॅगनचा तैवानवर फुत्कार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 06:00 AM2021-10-10T06:00:00+5:302021-10-10T06:00:02+5:30
दोन महायुद्धांनी अवघ्या जगाचे मोठे नुकसान केले आहे आणि आता तिसऱ्या महायुद्धाच्या धमक्या दिल्या जात आहेत. निमित्त आहे चीन आणि तैवान यांच्यात निर्माण झालेला प्रचंड तणाव.
- पवन देशपांडे
दोन महायुद्धांनी अवघ्या जगाचे मोठे नुकसान केले आहे आणि आता तिसऱ्या महायुद्धाच्या धमक्या दिल्या जात आहेत. निमित्त आहे चीन आणि तैवान यांच्यात निर्माण झालेला प्रचंड तणाव. चीनच्या एकूण क्षेत्राफळाच्या तुलनेत एक टक्काही क्षेत्रफळ नसलेल्या छोट्याशा तैवानने चीनच्या मुजोरीला बधणार नसल्याचे जाहीर केल्याने हे भांडण विकोपाला गेल्याचे गेले आहे. जाणून घेऊया चीन का गिळू पाहतोय तैवान?
भांडण का आणि केव्हापासून?
१९४० च्या दशकात चीनपासून तैवान वेगळा झाला. पण, तैवान आपलाच भाग असल्याचे चीन अजूनही ठासून सांगतो आहे. हा भाग परत मिळवण्यासाठी आपण बळाचाही वापर करू, अशी धमकीही चीनने दिली आहे. केरळ राज्यापेक्षाही छोट्या आकाराचा असलेला तैवान देश लोकशाहीप्रधान देश आहे. त्यांची स्वतंत्र राज्यघटना आहे. ३ लाख सैनिकही तैवानकडे आहेत. पण ते चीनविरोधात कधीच पुरेसे ठरणार नाहीत.
आता वाद का पेटला?
गेल्या आठवड्यात सलग चार दिवस चीनची १५० हून अधिक लढाऊ विमाने तैवानच्या हद्दीतून टेहळणी करून आली आहेत.
येत्या काळात तैवानविरोधात युद्ध करायचे असल्यास त्या देशाची तयारी काय आहे, हे पाहण्याची चीनची रणनिती आहे. तैवानला ही बाब खटकत आहे.
आपल्या संरक्षण क्षेत्रातील ही घसखोरी आपण खपवून घेणार नाही, असा पवित्रा तैवानने घेतला आहे. त्यामुळे तैवानने येत्या चार वर्षांत संरक्षण क्षेत्रावरील खर्च अनेक पटींनी वाढवण्याचा विचार केला आहे.
अमेरिका तैवानला साथ देईल?
तैवानच्या सुरक्षेसाठी आपण कटिबद्ध असल्याचे काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेने म्हटले होते. त्यामुळे गरज पडल्यास तैवानला युद्धसामुग्री पुरवण्यासही अमेरिका मागेपुढे पाहणार नाही.
चीनला एकटे पाडण्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी अमेरिका करू शकते. याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि जपानही तैवानच्या बाजूने उभे राहू शकतात.
(सहायक संपादक, लोकमत)
pavan.deshpande@lokmat.com