चित्रकाराच्या रेखांकित मैफिली!
By admin | Published: July 8, 2016 02:08 PM2016-07-08T14:08:14+5:302016-07-08T14:08:14+5:30
पंढरपूरचे ज्येष्ठ चित्रकार श्रीपाद सावळे यांनी चित्रकलेच्या माध्यमातून हिंदुस्थानी अभिजात संगीतातील सुमारे १३० दिग्गज गायक आणि वादकांना रेखाचित्रांच्या माध्यमातून एकत्र आणण्याची किमया केली आहे
Next
>- रवींद्र देशमुख
सोलापूर, दि. 08 - कोणतीही कला किंवा कलावंत माणसं जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम करत असतात. पंढरपूरचे ज्येष्ठ चित्रकार श्रीपाद सावळे यांनी तर आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून हिंदुस्थानी अभिजात संगीतातील सुमारे १३० दिग्गज गायक आणि वादकांना रेखाचित्रांच्या माध्यमातून एकत्र आणण्याची किमया केली आहे. सावळे यांचं नुकतंच प्रसिद्ध झालेलं ‘रेखांकित मैफिली’ हे पुस्तक त्यांच्या अजोड आणि गतिशील कुंचल्याचा नितांत सुंदर आविष्कार आहे.
एका रेल्वे प्रवासात ७९ वर्षीय चित्रकार सावळे भेटले. पूर्वीचा परिचय होताच. ते चित्रकार असल्याचेही ठाऊक होते. प्रवासात थोड्या गप्पा झाल्यानंतर सावळे यांनी आपल्या पिशवीतून चित्रकलेची डायरी अन् पेन्सील काढली अन् ते एका विशिष्ट पेहरावातील सहप्रवाशाचे चित्र काढण्यात मग्न झाले. आता तास - सव्वा तासानंतर कधीतर सावळेंचे चित्र पूर्ण होईल अन् ते पाहायला मिळेल, असे शेजारी बसलेल्या प्रवाशांना वाटले आणि प्रत्येक जण स्वत:मध्ये रंगून गेला... पण दहा मिनिटांतच श्रीपाद सावळे यांचं चित्र पूर्ण झालं. सर्व प्रवाशांना ते पाहून आश्चर्याचा धक्का बसला. इतक्या कमी वेळात हुबेहूब माणूस साकारला कसा? हा सर्वांना पडलेला प्रश्न होता.
सावळेंची ही चित्रकला पाहून त्यांच्याशी संवाद साधला असता, त्यांच्या ‘रेखांकित मैफिली’ची माहिती मिळाली. पंढरपूरच्या लोकमान्य विद्यालयातून चित्रकलेचे शिक्षक म्हणून निवृत्त झालेल्या श्रीपाद शंकर सावळे यांना लहानपणापासून संगीताची मोठी आवड. त्यांचा स्वत:चा आवाजही छान आहे. पंढरपूर, सोलापूर आणि पुण्यात गेल्या तीस - चाळीस वर्षात झालेल्या दिग्गज कलावंतांच्या मैफिलींना ते आवर्जून जात. मैफील सुरू झाली की, पुढची जागा पकडून ते त्या कलाकाराचे चित्र काढण्यात रंगून जात. चित्र पूर्ण झाल्यानंतर मध्यांतरात त्या कलावंताला ते दाखवून त्याची दाद आणि स्वाक्षरीही घेत. आजवर चित्रकार सावळे यांनी पं. भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, उ. अब्दुल हलीम जाफर खाँ, पं. मल्लिकार्जुन मन्सूर, हरिप्रसाद चौरसिया, पं. जितेंद्र अभिषेकी, जयमाला शिलेदार, उ. झाकीर हुसेन, पं. छोटा गंधर्व, पं. जसराज आदी १३० कलावंतांची ते सादरीकरण करत असताना रेखाचित्रे साकारली आहेत. कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने ‘रेखांकित मैफिली’ या नावाने या चित्रांचं पुस्तक केलं आहे.