कडुनिंब! हिरव्या निसर्गासाठी बिनखर्चिक, टिकाऊ पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2018 12:41 PM2018-06-03T12:41:11+5:302018-06-03T12:41:11+5:30
पावसाळा आला की दरवर्षी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला जातो. मात्र त्यातली किती झाडे जगतात? ती जगवण्यासाठी आणि या उपक्रमांमागे किती खर्च येतो? कडुनिंबाची लागवड हा या प्रश्नावर एक उत्तम पर्याय आहे.
- जी. एम. बोथरा
दरवर्षी पावसाळा आला की अनेकजण झाडे लावतात. बऱ्याचदा झाडे लावण्याचा हा उपक्रम ‘इव्हेण्ट’ही ठरतो. रोपे वाढत तर नाहीतच, केलेला खर्चही वाया जातो. झाडे लावण्याचा प्रकल्प हाती घेण्याआधी रोपांना पुरेसे संरक्षण देणे आणि त्यांना योग्यवेळी पाणी देणे गरजेचे असते. या गोष्टी केल्या गेल्या नाहीत तर सगळी मेहनत वाया जाते.
पर्यावरणाच्या दृष्टीने पाहिले तर कडुनिंबाची लागवड हा अतिशय उत्तम, स्तुत्य आणि व्यवहार्य उपक्रम आहे. कडुनिंबाच्या लागवडीतून अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात. अत्यंत कमी खर्चात, कमी श्रमात, कमी पाण्यात कडुनिंबाची लागवड होऊ शकते.
थोडे सजगतेने आजूबाजूला पाहिले तर कडुनिंबाचे महत्त्व आणि पर्यावरणवाढीतले त्याचे स्थान आपल्या लक्षात येऊ शकते.
मे, जून, जुलैमध्ये कडुनिंबाच्या झाडाखाली मोठ्या प्रमाणात निंबोळीचे बी पडलेले दिसते. हेच बी पावसाळ्यात रुजते आणि आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबरमध्ये कडुनिंबाच्या झाडाखाली, आजूबाजूला बरीच छोटी छोटी कडुनिंबाची रोपे उगवलेली दिसतात. नोव्हेंबर व त्यापुढील काळात ही सर्व छोटी मोठी कडुनिंबाची रोपे वरून छाटलेली व फक्त बुडखा असलेली दिसतात. उन्हाळ्यामध्ये मात्र ही बुडखा असलेली रोपे अदृश्य झालेली दिसतात.
या गोष्टींचा बारकाईने विचार केल्यावर अनेक गोष्टी स्पष्ट होतात. निंबोळी उन्हाळ्यामध्ये तयार होते, पिकते व पावसाळ्याच्या आधी गळून पडते. वाºयामुळे निंबोळ्याआजूबाजूस पसरतात.
जमिनीवर पडलेली निंबोळी पाऊस पडल्यानंतर मातीचा आधार घेऊन फुटते व त्याचे रोप तयार होते.
या नैसर्गिकरीत्या उगवलेल्या कडुनिंबाच्या रोपाची नासाडी आजूबाजूच्या जनावरांकडून केली जाते. यामध्ये शेळ्या व मेंढ्यांचा मोठा वाटा आहे. याशिवाय कडुनिंबाच्या रोपाचा बुडखा पाणी तसेच पुरेसे संरक्षण न मिळाल्यामुळे आणि उन्हाळ्यातील उष्णतेमुळे नामशेष होतो.
कुठल्याही प्रकारचा खर्च व मेहनत न करता नैसर्गिकरीत्या उगवलेली कडुनिंबाची रोपे जनावरांना सहजरीत्या खायला उपलब्ध होतात कारण या छोट्या रोपांना कुठल्याही प्रकारचे संरक्षण पुरविलेले नसते. जनावरे वरचा कोवळा भाग खाऊन टाकतात व रोपे खुरटी होतात. खुरट्या रोपांना कायमस्वरूपी संरक्षण व पाण्याचा पुरवठा नसल्यामुळे ती कालांतराने नष्ट होतात.
थोड्याशा निष्काळजीपणामुळे एवढी मोठी वृक्षसंपत्ती नष्ट होते. कुठल्याही प्रकारच्या खर्चाविना व मेहनतीशिवाय उगवलेल्या कडुनिंबाच्या रोपांना योग्य संरक्षण जर आपण पुरवले तर अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात.
काय कराल?
कडुनिंबाचे बी कुठल्या ठिकाणी लावायचे, हा या प्रयोगातील पहिला सर्वात महत्त्वाचा घटक आहे.
पावसाळ्यात पहिले एक-दोन चांगले पाऊ स झाले की निंबोळीच्या तीन-चार बिया एका चांगल्या वाढलेल्या काटेरी बाभळीच्या झुडपांजवळ लावायच्या. सहा ते आठ महिन्यांतच त्या ठिकाणी एक चांगले हिरवेगार कडुनिंबाचे कोवळे रोपटे काटेरी बाभळीच्या झाडामधून जोमाने बाहेर आलेले दिसेल. काटेरी बाभळाच्या झाडाजवळ हे बी लावण्याचे कारण म्हणजे बाभळीच्या काट्यांमुळे नैसर्गिकरीत्याच या रोपट्याचे संरक्षण होते आणि शेळ्या, मेंढ्या त्यापासून दूर राहतात. बाभळीच्या झाडाचे पाणीही अनायासे रोपांना मिळते आणि ते खुरटण्यापासून वाचते.
कडुनिंबाचे वैशिष्ट्य
कडुनिंबाच्या झाडाची वाढ फार कमी पाण्यामध्ये कुठेही होते. कडुनिंब डोंगराळ भागातसुद्धा चांगले येते.
थोडी माती असेल तर कडुनिंब तग धरते व आजूबाजूच्या पाण्याच्या श्रोतातून रोपटे फुटते. त्याची वाढ होते. पावसाळी हवामानामुळे रोपटे कोरडे पडत नाही व सुकत नाही. कडुनिंबाचे झाड लावण्यासाठी आपल्याला जमीन तयार करावी लागत नाही. खड्डे घ्यावे लागत नाहीत. कडुनिंबाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जेथे निंबोळी पडते तेथे जमिनीतील पाण्याच्या आधारे त्याचे रोप वाढते. काटेरी बाभळीची झाडे लहान कडुनिंबाच्या रोपट्यावर संरक्षण व आधार देण्याचे मोलाचे काम करते. येथे बाभळीचे झुडूप ट्री गार्डचे काम करते.
पावसाळ्यानंतर बाभळीचे रोपटे जमिनीमधून आपल्यासाठी पाणी खेचते. या पाण्यातून काही पाणी कडुनिंबाचे रोपटे आपल्याकडे खेचते व आपली तहान भागवते. येथे बाभळीचे रोपटे कडुनिंबाच्या रोपट्याला पाणी देण्याचे कार्य नैसर्गिक रूपात करते.
काही महिन्यात कडुनिंबाचे रोपटे जमिनीत खोल मुळे पसरवते व आपली पाण्याची व्यवस्था स्वत: करते. ठरावीक काळानंतर बाभळीच्या झुडपामधून एक चांगले कडुनिंबाचे झाड तयार होते व कालांतराने बाभळीचे झुडूप पूर्णपणे संपते.
अशा रीतीने थोडीशी काळजी घेतली तरी कडुनिंबाची झाडे जोमाने वाढू शकतात. पर्यावरण संवर्धनासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात हातभार लागू शकतो.
एका ट्री गार्डची किमान किंमत हजार रुपये. तसेच वेळेवर, नियमित व हवे तसे पाणी देण्यासाठी एका झाडामागे दरमहा कमीत कमी शंभर रुपये खर्च येतो.
खर्चाचे हे आकडे व त्याचे अंदाजपत्रक प्रत्येक व्यक्तीला, संस्थेला झाडे लावण्याचा प्रकल्प घेताना पुनर्विचार करण्यास भाग पाडते. हा खर्च झाडे लावण्याच्या प्रक्रियेतील सर्वात मोठा अडसर आहे.
प्रत्येक व्यक्ती किंवा संस्थेला झाडे लावण्याचा प्रकल्प राबवताना या सर्व बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष पुरवावे लागते. नाहीतर केलेला सर्व खर्च व मेहनत पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता असते.
या साºया गोष्टी विचारात घेतल्या तर हरित क्रांतीसाठी कडुनिंबाची लागवड हा सर्वोत्कृष्ट पर्याय ठरतो.
(लेखक महावीर इंटरनॅशनलच्या ‘ग्रीन इंडिया’ या प्रकल्पात
उपसंचालक आहेत.)