गुणकारी शिवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 06:01 PM2018-09-17T18:01:01+5:302018-09-17T18:01:49+5:30
शिवणच्या झाळाची मुळे ही दशमुळातील एक अंग आहे. शिवण झाडाच्या मुळ्या, साल, पाने, फळे औषधात वापरतात
पश्चिम घाटात मोठ्या प्रमाणात शिवणचा वृक्ष आढळतो. पाने पिंपळासारखी लांब असतात. फुले पिवळसर, फळे बोराएवढी व चवीला गोड असतात. शिवणच्या झाळाची मुळे ही दशमुळातील एक अंग आहे. शिवण झाडाच्या मुळ्या, साल, पाने, फळे औषधात वापरतात. शीतपित्तात शिवणची ताजी किंवा वाळलेली फळे आणि उंबराची ओली किंवा वाळलेली फळे एकत्र करून काढा बनवावा. सर्व शरीरात दुर्बलता आली असेल, थकवा जाणवत असेल तेव्हा शिवणच्या वाळलेल्या फळांचे चूर्ण दिवसातून दोनवेळा गायीच्या दुधासोबत साखर टाकून घेतल्यास घेतल्याने दुर्बलता कमी होते. गर्भावस्थेत बाळाच्या सुरक्षेसाठी शिवणचे फळ आणि ज्येष्ठमधाचे चूर्ण एकत्र करून दोन ग्रॅम चूर्ण साखर घालून मधाबरोबर रोज चाटण घेतल्याने गर्भातील बाळाची अवस्था सुरक्षित राहते. वनौषधीचा वापर करण्यापूर्वी ज्येष्ठ वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यावा. सुडौल स्तनांसाठी व स्तनाची वाढ होण्याकरिता बाजारात मिळणारे शिवणच्या तेलचा वापर महिलांनी करावा.
बाळंतिण महिलेला दशमूळ दिले जाते ते याच वृक्षाचा एक भाग आहे. बाळंतिणीला शिवणाच्या सालीचा काढा देतात. यामुळे गर्भाशयावर येणारी सूज कमी होते. शिवाय बाळंतपणात येणारा तापदेखील नियंत्रणात राहतो. तसेच मातेच्या दुधातही वृद्धी होते. नेहमी नेहमी होणाऱ्या गर्भपातावर शिवण गुणकारी औषध आहे. गर्भधारणेसाठी शिवणमूळ, मंजिष्ठा, शतावरी या तिघांचे समभाग चूर्ण ४ ते ५ ग्रॅम दुधाबरोबर रोज घेतल्यास गर्भधारणा होण्यास मदत होते. शरीरात दाह होत असेल तेव्हा शिवणीचा पानांचा रस शरीराला चोळावा. नागीण नावाच्या रोगात अंगाचा खूपच दाह होतो. अशावेळी पानांचा लगदा आणि अंबेहळद एकत्र पेस्ट करून या रोगावर लेप करावा. उन्हामुळे उद्भवणा-या डोकेदुखीवर शिवणची कोवळी पाने शेळीच्या दुधात किंवा गायीच्या दुधात वाटून कपाळावर लेप करावा. थंडीच्या दिवसात शरीरात कफ वाढतो. यावेळी शिवणीची ४ ते ५ पाने आणि ४ ते ५ अडुळाच्या पाने घ्यावी त्यांना वाटून रस काढावा. दिवसातून १ चमचा रस २ ते ३ वेळा घेतल्यास कफ कमी होऊन घशामधील खवखव थांबते. सर्प, विंचू दंशावर शिवणीच्या सालीचा लेप करतात. शिवाय काढा बनवून पोटातून देतात. त्यामुळे विषबाधा कमी होते. अशा हा वेगाने वाढणा-या गुणकारी वृक्षाची लागवड केली पाहिजे.