अहंकार वृत्ती निरोध

By Admin | Published: May 6, 2014 03:42 PM2014-05-06T15:42:07+5:302014-05-06T15:42:07+5:30

अर्जुन म्हणतो, ‘‘मोहजालात अडकलेला मी बाहेर आलो आहे. शुद्ध स्मृती परतलेली आहे. संदेह, शंका नष्ट झाल्या आहेत.

Ego attitude detention | अहंकार वृत्ती निरोध

अहंकार वृत्ती निरोध

googlenewsNext

 - बी. के. एस. अय्यंगार कु. गीता अय्यंगार 


अर्जुन म्हणतो, ‘‘मोहजालात अडकलेला मी बाहेर आलो आहे. शुद्ध स्मृती परतलेली आहे. संदेह, शंका नष्ट झाल्या आहेत. आता तुझी आज्ञा शिरसावंद्य.’’ ही ती शरणागती. हेच ते समाधान-चित्त आणि हाच तो अहंकार वृत्ती निरोध होय.

अष्टांग योगामधील सात अंगांचा विचार केल्यावर ओघाने येणारे आठवे अंग म्हणजे समाधी. समाधी हे सप्तांगांचे फळ आहे. वृक्षाचे फळ शेवटी येते. बी पेरण्यापूर्वी भूमीची मशागत करावी लागते आणि पेरल्यानंतरही सर्व सोपस्कार करावे लागतात, तेव्हा कुठे रोपटे उगवल्याची लक्षणे दिसतात. अंकुर जोपासणे हेच मुळी महान कार्य असते. अंकुराने जोम धरला, की पुढील सर्व कार्य नैसर्गिकरीत्या होऊ लागते. खोड, फांद्या, पाने, फुले आणि फळे हे सर्व नंतर. समाधीबाबतही हेच सत्य आहे. आधी कष्ट, मग फळ. प्रयत्न आधी, फळ नंतर. फळासाठी प्रयत्न नसतात. प्रयत्नाचे उत्तर म्हणजे फळ. समाधी हे फळ असल्यामुळे समाधीसाठी प्रयत्न नाहीत. समाधी ही निष्पत्ती आहे, त्यामध्ये चित्ताचे परिवर्तन पूर्णत्वाला जाऊन, चित्ताचा नाश होऊन केवळ आत्माच राहतो. चित्ताच्या स्वभावात व स्वरूपात पूर्ण बदल होऊन त्रिगुणात्मक असलेले चित्त नष्ट होते. चित्त आमूलाग्र बदलते किंवा तसे ते बदलण्यासाठी चित्त परिणाम पावते. या पूर्ण बदलामुळे ते पुन्हा उलटे फिरत नाही. त्याचे मूळ शुद्ध असे स्वरूप म्हणजे ‘कूटस्थ चित्त’ होय. विषयवस्तूंनी, सुख-दु:खांनी, विचारांनी यावर कितीही घणाघाती हल्ला केला, तरी ते चित्त अपरिणामी असेच राहते. आत्मा किंवा द्रष्टा जसा अपरिणामी, न बदलणारा राहतो; चित्तही तसेच राहते. किंबहुना, ते तसेच राहावे म्हणून हा खटाटोप असतो. चित्त म्हणजे आत्म्याभोवती कडे करून असलेली निकटची प्रकृती. प्रकृतिजन्य देह हे बाहेरील कवच अथवा तट आहे. सूक्ष्म प्रकृती आत्म्याभोवती वतरुळाकार कडे करून रिंगण घालते, अशी कल्पना केली, की लक्षात येईल, या सान्निध्यामुळे या चित्ताला आपणच आत्मा आहोत, असे वाटू लागते. या चित्ताच्या अज्ञानाला ‘सज्ञानी’ बनविले जाते समाधीने.
शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार, चित्त आणि विवेक या घटकांनी आत्मा वेढलेला आहे, त्यामुळे या सर्वव्यापी आत्म्याची जाणीव माणसाला चित्ताकडून विसर पाडायला लावते. शरीर, मन आणि विषय यांतच गुंतलेला माणूस त्यापलीकडे बघूच शकत नाही. बाहेरील जग, तसेच शरीर, इंद्रिये आणि मन यांच्या साह्याने जगातले भोग-विषय आनंदाने, सुखाने, दु:खाने किंवा कष्टाने भोगणारा माणूस यापलीकडे काहीच समजत नाही, हीच वृत्ती. हा सर्वसामान्यांचा एक वर्ग. बुद्धी थोडी समंजस व उन्नत झाली असेल, तर जगातील प्रत्येक वस्तू, पदार्थ, माणूस, पशु-पक्षी-वनस्पती या सर्वांमध्ये काही वैशिष्ट्ये आहेत, असे समजून घेणारे विद्वान अथवा त्यांच्यावर शोधक दृष्टीने बघत संशोधन करणारे शास्त्रज्ञ हा एक बुद्धियुक्त वर्ग. हा बुद्धिवंत वर्ग आपले शरीर, मन, बुद्धी व अंत:करण यांना पणाला लावून जगाचे ज्ञान प्राप्त करून घेतो; परंतु दोन्ही वर्गांचा संबंध बाह्यजगाशी वेगवेगळ्या कारणांसाठी आहे. बाहेरील जग जाणून घेण्यासाठी असेल तर योग्य; परंतु ते केवळ उपभोगण्यासाठी असेल तर अयोग्य.
तिसरा वर्ग असा, की तो शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार, चित्त आणि विवेक या घटकांना आत्म्याकडे उलटा प्रवास करायला भाग पडतो. हा प्रवासमार्ग झाला. ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, योगमार्ग आणि भक्तिमार्ग यातून प्राप्त होते, ती आध्यात्मिक विद्या. योगमार्गामध्ये यासाठी पराकोटीचा प्रयत्न केला जातो व त्याचे फळ म्हणून मिळते ती समाधी. समाधीत हा अंत:प्रवास पूर्ण होऊन त्या प्रवासाची पोच असते परमात्म्यापर्यंत. मात्र, हा प्रवास अष्टांगयोगाभ्यासाने अथवा ईश्‍वरप्रणिधानाने होऊ शकतो, यासाठी वैराग्याची पराकाष्ठा म्हणजे परवैराग्य असणे आवश्यक असते. तसे परवैराग्य नसेल, तर या अंत:प्रवासामुळे चित्त हे आत्म्याइतकेच शुद्ध होते; परंतु अहंकाराचा सूक्ष्म घटक, म्हणजे आत्म्याभोवती रिंगण घालणारी अस्मिता ही राहतेच. त्यामुळेच साधक अनेक सिद्धी प्राप्त करून घेतो, ते या समाधी सिद्धीमुळे, ज्यात अजून ही अस्मिता शिल्लक आहे. पतंजली योगशास्त्र सूत्ररूपाने मांडताना मोठय़ा खुबीने एक गोष्ट, आंतरिक सूत्र न सोडता मांडतात. ते म्हणतात, क्रिया ही कृतिरूपाने का करायची, तर समाधी-भावनेसाठी आणि समाधी प्राप्त कशी होते, तर ईश्‍वरप्रणिधानाने. एखाद्या कलाकाराला ‘वाहवा!’ म्हणून दाद द्यावी तशी दाद येथे द्यावी लागेल. कृती व भक्ती, आस्था व शरणागती यांची ही अद्भुत सांगड आहे. समाधी कशी लावायची, हे सांगा किंवा डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवून समाधी लागेल, अशी जादू करा, अशी जेव्हा विनयपूर्वक विनंती केली जाते, तेव्हा या दोन्ही प्रकारच्या मानसिकतेला येथे काट दिली आहे.
स्व-प्रयत्न हेच येथे सत्य होय.
ज्ञान प्राप्त करून घेताना ‘भावन’ हा एक मार्ग आहे. वाचून, अभ्यासून, परिश्रम करून ज्ञान प्राप्त होते हे निश्‍चित. लक्ष केंद्रित करून, एकाग्रतेने, सतत प्रयत्नाने, दीर्घ काळ, प्रयास पडले असतादेखील ज्ञान प्राप्त करून घेता येते. ध्येयावर लक्ष ठेवून त्यानुसार कृती करीत पुढील वाटचाल करता येते; परंतु ‘भावन’ याचा अर्थ वेगळाच आहे. त्यामध्ये एक नैसर्गिक ‘अंतर्ओढ’ आहे; ती एक ‘अंतर्कळ’ आहे. ईश्‍वरापासून अलग झालेले आपण कुठे तरी अंतर्नाळेने जोडलो होतो, याची जाणीव करून देणारे ‘अंतसरूत्र’ आहे. तो ईश्‍वर आपला आहे, याची जाण आहे. आपण त्याचेच आहोत, हा भाव आहे. आपली अहंता, अस्मिता, अहंकार, गर्व वगैरे सोडून कुठलीही लाज न बाळगता त्याला बिलगायचे आहे. याला म्हणतात ईश्‍वरप्रणिधान. या ईश्‍वरप्रणिधानाने होते समाधी सिद्ध! हाच तो समाधी-भावन याचा अर्थ होय.
आता पतंजली हेच शास्त्रीय पद्धतीने मांडतात. त्याचे कारण म्हणजे या योगाच्या प्रयोगशाळेत चित्ताचे आमूलाग्र परिवर्तन घडवायचे आहे. धारणेत बुद्धी शुद्धी होत असेल, तर ध्यानात चित्ताची शुद्धी होते. येथे समाधीत मात्र चित्तात परिवर्तन घडवायचे आहे. परिवर्तन हे टप्प्याटप्प्याने घडत असते. एका रात्रीत होणारे परिवर्तन टिकाऊ नसते; किंबहुना ते परिवर्तनच नसते.
या परिवर्तनाची सुरुवात योगाभ्यासास आसनांनी सुरुवात करतानाच होऊ लागते. शरीराचे एक स्वत:चे वर्तन असते. देहबोली हा यातीलच एक भाग आहे. तेव्हा शरीराचे वर्तन व वागणूक बदलावी लागते. ते आसनाभ्यासाने घडत जाते. पंचप्राण हे वेगळ्या स्तरावर काम करतात ते प्राणायामाने. इंद्रिये केवळ अंतर्मुखच नाहीत, तर त्यांना नेमकी अंतर्कृती मनासहित जाणवू लागते, ती प्रत्याहाराने. बुद्धी जी बाह्य ज्ञानासाठी सतत बहिर्प्ेरित होते, ती अंतर्प्ेरित होते धारणेने. चित्त एकवृत्तीय होते, ते चित्ताला एकतानता उमजल्यामुळे. असे ते चित्त ‘एकतत्त्वाभ्यासाकडे’ वळते ते ध्यानाने. आत्मा केवळ अमर नाही, तर केवळ आत्माच आहे, दुसरे काही नाही हे जाणवू लागते ते समाधीमुळे. तेव्हा शंकासमाधानासाठी समाधी समजून घेऊ. शंकासमाधान झाले, की शांतीच शांती; म्हणून सरतेशवेटी शंकाच शंका आणि प्रश्नच प्रश्न विचारणारा अर्जुन म्हणतो, ‘मोहजालात अडकलेला मी बाहेर आलो आहे. शुद्ध स्मृती परतलेली आहे. संदेह, शंका नष्ट झाल्या आहेत. मी तुझ्याकडे शरणागती पत्करली, तू मला पावलास, तुझा कृपारूपी प्रसाद मिळाला. आता मी स्थिर झालो आहे. शरीराने, मनाने, बुद्धीने, प्रज्ञेने सर्व बाजूंनी मी स्थिर व शांत झालो आहे. आता तुझी आज्ञा शिरसावंद्य.’’ ही ती शरणागती. हेच ते समाधान-चित्त आणि हाच तो अहंकार वृत्ती निरोध होय.
(लेखक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगाचार्य, लेखिका योगसाधनेचे तत्त्वज्ञान मांडणार्‍या विचारवंत आहेत.)

Web Title: Ego attitude detention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.