मायावी काळाचे तुकडे
By admin | Published: January 2, 2016 01:55 PM2016-01-02T13:55:44+5:302016-01-02T13:55:44+5:30
मी 1976 साली पुण्यात जन्मलो. ते शहर आज काळाने गिळले आहे आणि त्याची त्वचा खिडकीबाहेर वाळत टाकली आहे. मी वाचलेली पुस्तके, मी फार महत्त्वाचे मानलेले महान लोक यापैकी काहीही मला आज जगायला पुरे पडत नाहीये. याचे कारण मी वाढलो तो नव्वदोत्तरीचा काळ! 1992 पासून आजर्पयतचा. वेगवान, क्रूर, हसरा आणि मायावी!
Next
>सचिन कुंडलकर
महाराष्ट्रात राहणा:या मराठी माणसाची स्मृती एकवेळ सोपी, नटवी आणि चावट असते. पण महाराष्ट्र सोडून परदेशात स्थायिक झालेल्या वयस्कर माणसाची स्मृती विनोदी वेडय़ा म्हातारीसारखी भेसूर असते. त्यांना जो महाराष्ट्र आज आहे असे वाटत असते, तो महाराष्ट्र स्मृतिपूर्व काळातला असतो.
एकोणीसशे साठ सत्तर वगैरे सालातला. महाराष्ट्राचा सुवर्णकाळ वगैरे जो काही होता असे म्हणतात त्यातला. अशा माणसांची पोटची मुलेच त्यांना ताळ्यावर आणायला सक्षम असतात हे एक बरे.
त्या मुलांना काहीच माहिती नसते. कारण ती त्यांचा स्वत:चा काळ विणत योग्य दिशेने वर्तमानात जगत असतात. विस्मृती आणि अज्ञान हा जुन्या सत्तेच्या
आणि जुनाट काळाच्या विरोधातला
एक रामबाण उपायच नसतो का?
आयुष्यामध्ये निघून गेलेल्या वेळाइतके रोमांचकारी आणि पोकळ काहीही नाही. आठवणींचे चाळे करणो हा शुद्ध बौद्धिक दिवाळखोरपणा आहे या विचारात माझी अनेक वर्षे गेली. मी भूतकाळाकडे साशंकतेने पाहणारा माणूस आहे. कारण भूतकाळात वेळ साचून राहिलेला, अप्रवाही आणि दुर्गंधी येणा:या चिकट पदार्थासारखा असतो. मानवी मनाला भूतकाळाकडे बघण्याची चिकित्सक वृत्ती जोपासायची सवय नसते. भूतकाळ ही त्याच्यासाठी एकप्रकारे सुटका असते. पटकन बाहेर जाऊन गुपचूप ओढून आलेली एक सिगरेट. स्मृती (ेीे18) आणि स्मरणरंजन (ल्ल23ं’ॅ्रं) यातला फरक ना आपल्याला घरी शिकवला जात ना दारी. त्यामुळे आपण आठवणी काढतो आणि भूतकाळात रमतो. त्यातून नवे मिळवत काहीच नाही, तर स्मरणरंजनाच्या चिखलात काही काळ लोळत पडून बाहेर येतो. महाराष्ट्रात आपल्याला नुकते आवडलेले चार सिनेमे, दोन नाटके, तीन पुस्तके यांचे विषय पाहा. ते आपल्याला असेच काही काळ त्या चिखलात लोळून यायला मदत करतात. आणि म्हणूनच आपल्या साज:या, गब्दुल मराठी मनाला ते आवडतात. कारण आपण स्वत: फार काही करायला नको. भूतकाळ आपला भरजरी होता हे एकदा स्वत:ला समजावून आपला वेळ रविवारच्या पुरवण्या वाचत संपवला की आपण सोमवारी पाटय़ा टाकायला मोकळे.
भारतीय लेखिका दुर्गा भागवत आणि इरावती कर्वे, लेखक महेश एलकुंचवार आणि अमिताव घोष, तुर्की लेखक ओरहान पामुक तसेच फ्रेंच लेखक मिशेल हुलबेक यांच्या साहित्यामुळे मी फार सतर्कतेने भूतकाळाकडे बघायला आयुष्यात सावकाशपणो शिकलो. उशिराच शिकलो, कारण मी काही कुठे आकाशातून पडलो नव्हतो. पुण्यातल्या सदाशिव पेठेत, महाराष्ट्राच्या आठवणींच्या कारखान्यातला जन्म माझा. उशीर लागणारच. पण उशिरा का होईना, आठवणींचा गुलाम होण्याऐवजी त्या आठवणींमधून काळाची तार्किक सुसंगती लावायचा प्रयत्न करायला लागलो. कारण मी फार साधा आणि चुका करत शिकणारा माणूस आहे. मला माझा वर्तमान फार आकर्षक वाटतो, कारण काळाच्या ज्या तुकडय़ात मी माणूस म्हणून वाढलो, शिकलो, मोठा झालो तो काळाचा तुकडा अतिशय नाटय़मय, प्रवाही आणि गजबजलेला आहे. मी 1976 साली पुण्यात जन्मलो. ते शहर आज काळाने गिळून टाकले आहे आणि त्याची त्वचा सुकवण्यासाठी खिडकीबाहेर वाळत टाकली आहे. मी ऐकलेली गाणी, मी वाचलेली पुस्तके, मी फार महत्त्वाचे मानलेले महान लोक यापैकी काही म्हणून मला आज जगायला पुरे पडत नाहीये. याचे कारण मी ज्या काळात मोठा झालो तो नव्वदोत्तरीचा काळ हे आहे. 1992 पासून आजपर्यंतचा. वेगवान, क्रूर, हसरा आणि मायावी काळ. आपल्या सर्व भारतीय समाजाची स्मृती ढवळून काढणा:या आणि आपल्याला झटके देऊन जागे करणा:या या काळाचे कधीतरी पुनरावलोकन करायला हवे.
आपल्याला कळायला लागते, भान येते ते नक्की कधी? माङया समजुतीप्रमाणो आठवण यायचे वय तयार झाले की आपल्याला जगाचे भान यायला सुरुवात होते. त्याचा संबंध शारीरिक परिपक्वतेशी असतो. आपण वयात येत जातो तसे पहिल्यांदा आपले जगाशी काहीतरी देणोघेणो सुरू होते. आपले स्वत:चे कुटुंब, पालक यांच्या पलीकडचे. भारतीय समाजात या वयात मुले माध्यमिक शिक्षण पूर्ण करायच्या बेतात आलेली असतात. माङोही तसेच होते. मी शारीरिकतेने सतर्क आणि उत्सुक झालो तेव्हा नुकताच ‘कयामत से कयामत तक’ हा तरु ण जाणिवेचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या आठवणीने पिढीची वर्गवारी करणो भारतात सोपे जाते म्हणून हा उल्लेख.
माझी पुण्यातली मराठी माध्यमाची फक्त मुलांची शाळा भावे स्कूल. हे माङो सुरक्षित, आनंदी अभयारण्य होते. शाळा संपली 1992 साली आणि मी जगामध्ये असुरक्षिततेत लोटला गेलो असे म्हणता येईल. याचे कारण माङया आईवडिलांना तोपर्यंतच माङयासाठी निर्णय घेता येत होते. त्यापुढच्या वाटचालीचे निर्णय माङो मलाच घेणो भाग होते, कारण ते दोघे महाविद्यालयात शिकलेच नव्हते. मी जे म्हणीन त्याला पाठिंबा द्यायचा असे त्यांनी ठरवले होते, पण निर्णयाची जबाबदारी माझी होती.
शाळा संपली. नेमकी त्याच वर्षी बाबरी मशीद पडली आणि पहिली अनामिक सामाजिक भीती माङया पोटात उगम पावली. विध्वंस आणि दंगलीमधून तयार झालेली भीती. तोपर्यंत आम्हा मुलांना कुणालाच आडनावावरून जात ओळखता येत नव्हती. बाबरी मशिदीनंतर आणि मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर आम्ही आडनावांकडे लक्ष द्यायला शिकलो. या सगळ्याच्या आगेमागेच बर्लिनची भिंत पडली, सोविएत साम्राज्य संपले, राजीव गांधींची हत्त्या झाली. आम्ही शाळेतल्या शिक्षकांच्या आग्रहाने रोजचे पेपर वाचत होतो. त्यातले अंधुकसे काही कळायला लागले आणि हे जाणवायला लागले की आपला या सगळ्याशी फार थेट संबंध येणार आहे. तोपर्यंत आमच्या आयुष्यात आणि पुणो शहरात काही म्हणजे काहीही वाकडे घडलेच नव्हते. पानशेतचा पूर आणि जोशी-अभ्यंकर खून खटला ही आमच्या शहराच्या वेदनांची जुनी ग्रामदैवते होती. पण त्यानंतर सगळे फार झपाटय़ाने बदलू लागले. शाळा संपताच आजूबाजूचे सर्वजण कॉम्प्युटरच्या क्लासला जाऊ लागले आणि चादरीच्या आकाराच्या फ्लॉपीज घेऊन फिरू लागले.
या काळापासून आजपर्यंत स्वत:चे निर्णय घेत पुढे जात राहणो आणि काम करत राहणो हा माङयासाठी आयुष्याचा मोठा भाग राहिलेला आहे. ज्या काळात हे घडले त्या काळापासून पुढची पंचवीस वर्षे अर्थकारण, विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजकारण याची घडी विस्कळीत होऊन मोठी उलथापालथ होणार आहे याची आम्हाला त्या काळात कल्पना नव्हती. माणसाचे जगणो आणि माणसाच्या आठवणी ह्यावर पुढील काळात होणा:या आर्थिक आणि तांत्रिक घडामोडींचा सखोल परिणाम होणार होता आणि पाच-पाच वर्षांच्या काळात नवनव्या गोष्टी निर्माण होऊन नाहीशा होणार होत्या. आज चांगले वाटेल ते उद्याच अनावश्यक वाटू लागणार होते आणि आमचे पुढचे सगळे महिने आणि वर्षे आपल्या जुन्या मूल्यांकडे जमेल तसे लक्ष देत, नवी मूल्ये वेगाने आत्मसात करण्यात जाणार होती. वेगवान आणि भन्नाट. या सगळ्यात जर कशावर अंतस्थ परिणाम होणार होता तर तो आमच्या मेंदूतल्या आठवणी तयार करण्याच्या कारखान्यावर.
मी या लेखमालेत यापुढे या विचित्र, वेगवान, झगमगीत आणि वाह्यात आठवणींविषयी लिहिणार आहे. या सदरामध्ये, इथे सुरुवातीला मी काय लिहिले होते ते मी पूर्ण विसरून जाईस्तोवर.
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)
kundalkar@gmail.com