हर रंग - अब भी - कुछ कहता है!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 06:00 AM2021-06-06T06:00:00+5:302021-06-06T06:00:07+5:30

दिवस किती का वाईट असेनात, आपलं इंद्रधनुष्य आपल्याच मनाच्या सांदीकोपऱ्यात असतं, प्रयत्न केले की आपलं आपल्याला सापडतं ते!!

Every color - even now - says something! | हर रंग - अब भी - कुछ कहता है!

हर रंग - अब भी - कुछ कहता है!

Next
ठळक मुद्देमनातलं इंद्रधनुष्य शोधताना इच्छेचे किरण होकारात्मक विचारांच्या आरपार गेले, की दिसतात सप्तरंग. त्यासाठी इच्छा हवी आणि होकारात्मकता!

डॉ. राजेंद्रबर्वे

‘ऐकना रे माझी नवीन कविता, कोरोनावर लिहिलीय!’- फोनवरचा हा मैत्रिणीचा भावुक आवाज मला परिचित आहे. ही माझी शाळेपासूनची मैत्रीण. हौशी शीघ्र कवयित्री. मी आपला निमूट ऐकू लागलो...

कोरोनाच्या कुटिल काव्याची

कशी ही कभिन्न काळोखी,

कासावीस जीव होई,

आले प्राण कंठाशी!

भीतीने थरकापे माझी तनू,

द्या ना मला आणूनी एक इंद्रधनू...

... हिच्या कवितांचा शेवट बहुधा असाच ‘मला इंद्रधनू आणून द्या’, ‘कल्पवृक्ष द्या, कामधेनू शोधून ठेवा’- असा असतो.

- त्यादिवशी मात्र तिला म्हटलं, हे बघ, सध्या शॉपिंग मॉल बंद आहेत आणि नेटवरून फक्त औषधंविवषधं ऑर्डर करता येतात. त्यामुळं आजची ऑर्डर मी घेऊ शकत नाही; पण एक मार्ग सुचवतो. मी कायम माझ्याच मनात इंद्रधनू आणि कामधेनू शोधतो. मनाचा धांडोळा घेतला की, अबोध मनाच्या कडेकपारीत असतं आपापलं इंद्रधनुष्य. एकदा ते सात रंग सापडले ना की सगळीकडं दिसतात. निसर्गात सदैव फुललेले असतात!’

तिने चिकाटीने प्रश्न विचारला, ‘पण नेमकं काय करायचं, आपापल्या मनातलं इंद्रधनुष्य शोधायला?’

‘आठवतंय ना, सामान्य विज्ञानाच्या धड्यात शिकवलं होतं. पावसाच्या थेंबाच्या आरपार सूर्यकिरण गेले की, त्या किरणांचं पृथक्करण होतं आणि इंद्रधनुषाच्या कमानीत ते सात रंग उमटतात. प्रयोगशाळेत एखाद्या पारदर्शक स्फटिकावर प्रकाशझोत टाकला, की त्यातून ते रंग दिसायचे! मनातलं इंद्रधनुष्य शोधताना इच्छेचे किरण होकारात्मक विचारांच्या आरपार गेले, की दिसतात सप्तरंग. त्यासाठी इच्छा हवी आणि होकारात्मकता!’- मी म्हणालो.

‘पण या कोरोनाच्या काळ्या काळात कसं सापडेल मनातलं इंद्रधनुष्य? मन तर कातावलेलं असतं!’- तिने भावुकतेने विचारले.

‘अगं, याच काळात तर मुद्दाम शोधायचे ते सात रंग. डोळे उघडून पाहा. काळ्या विचारांची काजळी भेदून तुलाही सापडेल ते रंगीबेरंगी इंद्रधनुष्य! इतकंच काय, ते सात रंग आपल्याशी हितगुजही करतात. काहीतरी सुचवतात! कारण हररंग कुछ कहता है! जगणं सोपं असतं गं, काळ्या कवितांचा नाद तू आता सोड. नको अडकूस त्या शब्दांच्या गुंत्यात!’ - मी म्हणालो.

ती फोनवर थांबली आणि आम्ही एकदम हसलो.

तानापिहिनिपाजाचीकिमया

तांबडा : सावधान राहण्याचे नियम पाळले नाहीत तर धोके आहेत, हे सुचवणारा हा लाल रंग!

नारिंगी : नागपुरी रसरशीत संत्र्याचा ताजेतवाने करणारा हा रंग! या संत्री रंगात असते ते जीवनसत्त्व ‘सी’ खूप महत्त्वाचे. जिथे कुठे नारिंगी रंग दिसतो, तो आठवण करून देतो या विशेष जीवनसत्त्वाची.

पिवळा : हा हळदीचा रंग सशक्तपणाचा, रक्तशुद्धीचा! कोविडच्या काळात चौरस आहाराचे महत्त्व हाच रंग सुचवतो.

हिरवा : अहाहा, सुखद रंग मऊशार हिरवळीचा, निसर्गाच्या रसरशीतपणाचा हिरवा रंग म्हणतो, आता थांबू नका. पुढे व्हा. काळ्याकुट्ट निराशेतून बाहेर पडा!

निळा : हा स्वच्छ आकाशाचा रंग, तळ्यावरच्या खंड्या पक्ष्याच्या पंखावर दिसतो ना जर्द निळा तो रंग शिकवतो मुक्त राहा आकाशासारखे, विस्तारा तुमची दृष्टी. लॉकडाऊनच्या पलीकडचे जग पाहा. संकुचित राहू नका.

पारवा : हा थोडासा निस्तेज वाटतो खरा; पण या रंगात दडलेली शुभ्रतेची चाहुल. तो रंग अचानक समोर आला की वाटते जरा थांबावे, विसावा घ्यावा. मनातल्या त्या नकारात्मक विचारांना म्हणायचे थांबा, आता मी नाही तुमच्यामागे येणार. तुम्ही आल्या पावली जा, नाही तर मी तुमच्याकडे अजिबात लक्ष देणार नाही. मी शुभ्र विचारांकडेच वाटचाल करणार!

जांभळा : गाभुळलेल्या गावरान मेव्याची जांभळांची आठवण करून देतो हा रंग. किती साधे फळ, कसला तोरा नाही की बडेजाव; पण त्याच्या दळदाट रसात मला जाणवते पावित्र्य. निसर्गात रमणारी, साधीसुधी वृत्ती. हीच वृत्ती अवघड काळात आपल्याला साथ देते.

 

(ख्यातनाम मनोविकारतज्ञ)

drrajendrabarve@gmail.co

Web Title: Every color - even now - says something!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.