प्रत्येक क्षण सतर्कतेचा

By admin | Published: November 22, 2014 05:34 PM2014-11-22T17:34:47+5:302014-11-22T17:34:47+5:30

मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हे एक प्रकारचे अघोषित युद्धच होते. फक्त १0 दहशतवाद्यांनी सागरी मार्गाने मुंबईवरच नाही; तर भारतीय अस्मितेवरच हल्ला केला होता. त्याचा प्रतिकार करताना भारतीय कमांडोंना तब्बल ६0 तासांची झुंज द्यावी लागली. त्या घटनेनंतर आपण काय धडा घेतला हे यानिमित्ताने तपासून पाहणे महत्त्वाचे आहे. दहशतवादाविरोधात सदैव सतर्कता, हाच एक पर्याय आहे.

Every moment alert | प्रत्येक क्षण सतर्कतेचा

प्रत्येक क्षण सतर्कतेचा

Next

- सारंग थत्ते

त्या दु:खद घटनेला आता सहा वर्षे उलटून गेली आहेत; परंतु ते ६0 तास अजूनही कुणीही विसरलेले नाही. भारताच्या आर्थिक राजधानीवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी विचारपूर्वक आखणी करून दहशतवादी हल्ला केला होता. ते एक युद्धच होते! दहा दहशतवादी सागरी रस्त्याने पूर्ण तयारीनिशी हल्ला करायला आले होते आणि अशा प्रकारच्या हल्ल्याला सामोरे जाण्यास आपण अजिबातच तयार नव्हतो. त्यात १६४ जणांचा मृत्यू आणि ३८0पेक्षा जास्त जखमी झाले. पण त्याहीपेक्षा जास्त ठेचाळली गेली भारताची अस्मिता. कारण आमच्या घरात घुसून मूठभर दहशतवाद्यांनी आम्हाला वेठीस धरले आणि आपल्याला झुंज द्यावी लागली. त्या घटनेनंतर आपण काय धडा घेतला? केवळ एक दहशतवादी जिवंत पकडला गेला आणि त्याला फाशी दिली गेली. परंतु प्रमुख आरोपींवर सुरू असलेल्या खटल्यामध्ये पाकिस्तानने अद्याप कोणताच निर्णय दिलेला नाही. 

दक्षिण मुंबईमधील दोन पंचतारांकित हॉटेल्स आणि छत्रपती शिवाजी रेल्वेस्थानक या ठिकाणी झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानने सागरी मार्गाचा अवलंब केला होता. आता कदाचित पुन्हा याच मार्गाने असा हल्ला होण्याची शक्यता नाही. कारण त्यांना माहीत झाले आहे, की आता भारत तिथे बारीक लक्ष ठेवून उभा आहे. परंतु, जेव्हा दहशतवाद्यांचे मनसुबे पक्के असतात आणि पूर्ण तयारीनिशी ते सज्ज असतात, तेव्हा हल्लेखोरांनी कसा, कुठे आणि केव्हा हल्ला करायचा याचे आदेश कराची, इस्लामाबाद आणि लाहोर येथून त्यांच्या वरिष्ठ सूत्रांकडून या भाडोत्री दहशतवाद्यांना मिळतात. तेव्हा ते आपल्याकरता कोणताही रस्ता निवडू शकतात. २00८नंतर या प्रकारची घटना पुन्हा झालेली नाही; पण त्या प्रकारचा धोका कायम आहे. पाकिस्तानची स्थिती हलाखीची झाली आहे. दिवाळीपूर्वी त्यांनी भारताच्या पश्‍चिम सीमेवर जबरदस्त गोळीबार केला, ज्याचे चोख उत्तर त्यांना आपल्याकडून मिळाले. आता पाकिस्तानच्या नेतृत्वाला आयएसआयएसच्या धोक्याचा अंदाज येऊ लागला आहे. त्याचा मुकाबला करण्याकरिता पुन्हा एकदा अमेरिकेचा दरवाजा ठोठावला आहे. भारताच्या वाघा सीमारेषेवर २ नोव्हेंबर रोजी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात पाकिस्तानात राहत असलेला एक दहशतवादी आपल्याबरोबर ६0 पेक्षा अधिक लोकांना बॉम्बने उडवण्यात यशस्वी झाला. भारताच्या पश्‍चिमी सीमेसाठी ही धोक्याची घंटाच आहे. गुप्तहेर खात्याच्या माहितीनुसार पाकिस्तानातून खूप सारे दहशतवादी भारतात घुसण्याच्या प्रयत्नात आहेत. भारतीय सीमेच्या अगदी जवळच झालेल्या या दहशतवादी हल्ल्याकडे भारतीय दृष्टिक्षेपातून पाहिले तर आमच्या सुरक्षा संघटनांनी त्वरित सक्रिय होणे आवश्यकच होते आणि सुदैवाने तसे झालेही. कारण हा धोका जितका सीमेपलीकडच्यांना आहे, तेवढा आपल्यालासुद्धा आहेच. असाच हल्ला भारतात होऊ शकतो; कारण हजारो दहशतवादी हिमवर्षाव सुरू होण्याआधी भारतीय सीमेच्या आत घुसण्याच्या प्रयत्नात आहेत.
आपल्या सरकारने २६/११ स्मृतिदिनाच्या आधीच सर्व महानगरे, विमानतळ, बंदरे आणि इतर संवेदनशील भागात सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय विमान तळावरील २७ नंबरचा रनवेसुद्धा बंद करून टाकला आहे; कारण या रनवेच्या मार्गावर राजधानीतील काही महत्त्वाच्या इमारती आहेत. तिथे ९/११ सारखा हल्ला करण्याचे कारस्थान असू शकते. भारतीय पोलीस दल आणि इतर सुरक्षा दलांना सतर्क राहण्याची गरज आहे. आज असे दिसते, की मॉल्स, हॉटेल्स, बाजारात आणि दुकानात उपस्थित सुरक्षा कर्मचार्‍यांकडे शस्त्रास्त्रे नसतात. हत्यारबंद सुरक्षारक्षक फक्त बँका आणि विमानतळांवर उपस्थित असतात. दहशतवादविरोधी कारवाई करण्यासाठी पहिले प्रत्युत्तर देणार्‍या सशस्त्र दलांची गरज आहे. दहशतवादाशी लढण्याची पोलिसांची तयारी वेळोवेळी तपासली गेली पाहिजे; कारण ९0 टक्के पोलिसांनी दहशतवादाचा चेहराच पाहिलेला नाही. मुंबईच्या ‘फोर्स वन’चे कमांडो आणि हैदराबादच्या   ‘ऑक्टोपस’चे ट्रेनिंग आता अधिक चांगले झाले आहे त्यांना एनएसजीच्या धर्तीवर सैन्यातील अधिकार्‍यांनी प्रशिक्षण दिले आहे. तरीही अजूनसुद्धा अशा घटनास्थळी पोहोचण्यास लागणारा वेळ कमीत कमी लागला पाहिजे. 
दहशतवादी कायम लपूनछपून आपल्या पुढील हल्ल्याच्या जागा शोधत राहतात आणि नवीन साथीदारांना आपल्या गटात सामील करून घेण्याच्या मागे असतात. ते आपल्या आणि आपल्या सुरक्षा दलांतील कमतरता अभ्यासत राहतात तेव्हा आपणही प्रत्येक क्षणी सतर्क राहू असा निश्‍चय आपल्याला करावा लागेल. 
 
२६ नोव्हेंबर २00८ च्या या दु:खद घटनेमधून आम्ही काय धडा घेतला? 
 तटवर्ती सुरक्षा दलांना एकत्र करण्याची आवश्यकता आहे.
 महानगरांच्या संवेदनशील भागांत सीसीटीव्ही कॅमेरे जरुरी आहेत.
 पोलीस विभागाकडे स्वयंचलित हत्यारे आवश्यक.
 एकमेकांमधील ताळमेळ आणि विदेशी नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी महत्त्वाची आहे 
 पोलिसांना बुलेटप्रूफ वाहन आणि जॅकेट द्यावी लागतील. 
 मीडियाला अशा घटनास्थळापासून लांब ठेवावे लागेल; कारण दहशतवाद्यांना बाहेर काय चाललंय याची माहिती प्रसारमाध्यमांमुळेच मिळाली. 
 त्वरित कार्यवाही करण्याच्या उद्देशाने वेगळा रिझर्व्ह फोर्स असणे महत्त्वाचे आहे.
 सामान्य नागरिकांना धोक्याची जाणीव करून देण्यासाठी लाउड स्पीकर, रेडियो आणि टीव्हीचा उपयोग आवश्यक आहे. 
 गुप्तहेर संघटनांनी एकमेकांशी मिळालेल्या माहितीबाबत समन्वय साधल्याशिवाय सुरक्षा दले यशस्वी होऊ शकणार नाहीत. 
 टेलिफोन आणि मोबाइल जॅमर महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचणे आवश्यक आहे; ज्यामुळे आतंकवाद्यांना बाहेरील जगाशी संपर्क साधणे कठीण होईल. 
 समुद्रामध्ये जाणार्‍या सर्व बोटींना वेगळे ओळखण्यासाठी नंबर आणि रंग दिले जावेत. सर्व बोटींवर जीपीएस यंत्रणा असावी. 
 हॉटेलमध्ये येणार्‍या पर्यटक आणि त्यांचे सामान यांची एक्स रेमधून चाचणी जरुरी आहे. सखोल चौकशी करूनच कर्मचारी वर्गाची नियुक्ती केली जावी. 
 सर्व दलांना सत्य परिस्थितीशी झुंज देण्यासाठी सदैव तत्पर, जागरूक राहणे आवश्यक आहे आणि वेळोवेळी दहशतवादावर नियंत्रण करण्याची रंगीत तालीम करणे जरुरी आहे. 
 दहशतवादविरोधी माहितीकरिता नॅट्ग्रिड आणि नॅशनल काउंटर टेररिझम सेंटर पूर्णपणे अमलात आणले गेले पाहिजे. 
 
 
आंतरराष्ट्रीय कायदेशीर डावपेच
१. फक्त एक दहशतवादी जिवंत पकडला गेला आणि त्याला फाशी दिले गेले; पण या मुंबईच्या हल्ल्यातील प्रमुख आरोपीवर कोर्टात चालू असलेल्या खटल्यात पाकिस्तानने कोणताही निकाल दिलेला नाही किंवा खरं तर त्या खटल्याची सुनावणीच अजून पूर्ण झालेली नाही! 
२. अमेरिका आणि इस्रायलच्या मारल्या गेलेल्या नऊ लोकांच्या नातेवाइकांनी अमेरिकन कोर्टात ६८.८ करोड डॉलरची नुकसानभरपाई मागितली आहे (जवळजवळ ४२ अब्ज रुपये) आणि त्यात जमात उद डावा, लष्कर-ए-तोयबा आणि अन्य कारस्थानी संघटनांच्यावर खटले चालवण्याची मागणी केली आहे. 
३. पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयला यात सामील करण्याची मागणी अमेरिकन कोर्टाने २0१0 मध्ये फेटाळून लावली होती; कारण सरकारी असल्यामुळे त्यांना कायदेशीर संरक्षण मिळाले आहे.
 
 
राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे प्रादेशिक केंद्र
मुंबईच्या घटनेनंतर सरकारने राष्ट्रीय सुरक्षा गार्डची एनएसजीची चार प्रादेशिक केंद्रे मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद येथे स्थापित केली होती. त्या वेळी या केंद्रांमध्ये (ज्यांना ‘हब’ असे म्हटले जाते) कमांडोंची संख्या २४१ ठेवली गेली होती. परंतु, आता ताज्या माहितीनुसार, या सर्व केंद्रांमध्ये आता ४६0 कमांडो आहेत. त्यांच्याजवळ अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, दळणवळणाची साधने आणि दूरसंचार उपकरणे आहेत. या केंद्रांकरिता आणखी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रियासुद्धा सुरू आहे. याशिवाय गुजरातमध्ये अहमदाबाद येथे आणखी एक प्रादेशिक केंद्र स्थापन करण्याचा सरकारचा विचार झाला आहे. 
 
 
समन्वय आणि ताळमेळ
आपले सैन्य, एनएसजी, अर्धसैनिक दल आणि पोलीस यांची आणीबाणीच्या परिस्थितीत करण्याच्या कार्यवाहीची अंतिम सूत्रे सैन्यदलाकडे असतात; परंतु त्याबरोबर राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन, रुग्णालये, रुग्णवाहिका, परिवहन विभाग, सामाजिक संस्था, अग्निशमन दल, मेट्रो परिचालन, राज्य परिवहन, विमानतळ, दूरसंचार विभाग, एनसीसी इत्यादी दहशतवादाच्या लढाईमधील अप्रत्यक्षपणे लढणारे विभाग यांच्यासाठी एकत्रितपणे दिशा देणारी मार्गदर्शक तत्त्वे अजून तयार झाली नाहीत. या सर्वांचा सहभाग संपूर्ण कारवाईमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. मुंबईसारख्या हल्ल्याच्या प्रसंगी एनएसजी, राष्ट्रीय सुरक्षा गार्डला गुडगाव येथून दिल्ली विमानतळावर पोहोचण्यासाठी चार तास लागले आणि खरेतर त्यांच्यासाठी विमान केव्हाच तयार होते. यासाठी राज्य परिवहन आणि पोलीस दल यांच्या तातडीच्या मदतीची आवश्यकता असते. आणि म्हणूनच वर उल्लेखलेल्या सर्व घटकांची कार्यक्षेत्रे ठरवून त्यांच्यात ताळमेळ आणि समन्वय आवश्यक आहे. शिवाय त्यांनी एकत्रितपणे रंगीत तालीम करणे जरुरीचे आहे. या सर्व गोष्टींकरिता जितका जास्त घाम गाळला जाईल, तितके कमी रक्त युद्धात सांडले जाईल. 
 
(लेखक निवृत्त कर्नल आहेत.) 
 

Web Title: Every moment alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.