सर्वत्र ‘ययातीं’च!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 01:23 PM2018-11-02T13:23:09+5:302018-11-02T13:26:21+5:30
‘ययाती’ या वि.स. खांडेकर यांच्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. मराठी साहित्याला मिळालेला हा पहिला पुरस्कार. महाभारतातील एका उपाख्यानाच्या कथानकाचा ...
‘ययाती’ या वि.स. खांडेकर यांच्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. मराठी साहित्याला मिळालेला हा पहिला पुरस्कार. महाभारतातील एका उपाख्यानाच्या कथानकाचा आजच्या काळाच्या संदर्भात त्यांनी समर्पक वापर केला आहे. भोग लालसेने वेडा झालेला राजा ययाती शेवटपर्यंत भोगलिप्त राहूनही अतृत्पतच राहतो. ही ययाती राजाची आणि भोगलंपट मानवी प्रवृत्तीची कथा आहे. महर्षी व्यास भोगसक्ततेने निरपराधांचे कसे शोषण होते, हे दाखवितात. वि.स. खांडेकरांनी भोगवादी, चंगळवादी समाजजीवनाचे चित्रण केले आहे. ययाती राजा परमेश्वराला चिरतारुण्याचे वरदान मागतो. तारुण्याच्या प्राप्तीसाठी ययाती आपल्या पुत्राचे ‘पुरुरवा’चे तारुण्य वरदानाने मिळवतो. शेवटी शोकांतिका होते.
ययाती राजा होता आणि दुसऱ्याचे तारुण्य हिसकावण्याचा वर त्याने मिळवला होता. आज सर्वच क्षेत्रात ‘ययाती’ येथे आहेत. आजची युवापिढी ‘पुरुरवांसारखी या शोषकांची शिकार होते आहे. सर्वाधिक तरुण लोकसंख्येच्या या देशातील युवकांचे भवितव्य काय आहे? महर्षी व्यासांनी मानवी प्रवृत्ती स्वत: व इतरांचाही कसा विनाश घडवून आणते, हे दाखविले आहे. भोगवादी, चंगळवादी वृत्ती नैतिकतेचा आव आणून वर्चस्व प्रस्थापित करीत असते. पुरुरवाचे तारुण्य ओरबडून घेणारी ‘ययातीप्रकृती’ आजही सर्वत्र आहे. इथे, तिथे, अत्र, तत्र, सर्वत्र!
समकालीन तरुणपिढी पुरुरवासारखी आपल्या तारुण्याची निलामी अनुभवत आहे. ‘सर्वाधिक तरुण लोकसंख्येचा आणि सर्वाधिक तरुण निकामी हातांचा देश..’ हे अस्वस्थ वर्तमान आहे या देशाचे. कधी ‘शिक्षक’ तयार करण्याचे उद्योग (बी.एड्., डी.एड्. कॉलेजेस) तर कधी यांत्रिकी, तांत्रिकी अभियंत्याच्या शिक्षणाचा शिक्षण क्षेत्रातील या मार्केटिंगने ‘ययातीं’चे उखळ पांढरे झाले; पण या तरुणांचे काय? परदेशात किती जाणार? महानगरे या तरुणांना काम, राहायला जागा द्यायला तयार नाहीत. मॉल्स, मेट्रो, उड्डान पुले, दू्रतगती मार्ग उभे होत आहेत, सृजनशील आणि रोजगाराची क्षमता असलेल्या शेतीचा बळी देऊन! आत्महत्याग्रस्त लाखो शेतकºयांमध्ये तरुणाची संख्या प्रचंड आहे. शिक्षण, उद्योग, व्यावसायिक प्रतिष्ठानात नोकºया कमी करून देश हा कोणता संपन्न झाला?
शाळा, महाविद्यालयात शिक्षक भरती बंद, या संदर्भात एका दूरचित्रवाहिनीने देशभरातील विद्यापीठ, शाळा, महाविद्यालयातील शिक्षणाची लक्तरे टांगली आहेत. स्वराज्याचे सुराज्य हे स्वप्न घेऊन लढणाºया राष्ट्रीय नेत्यांनी ‘बुनियादी शिक्षा’ हा मूलभूत अधिकार प्रस्थापित करण्यासाठी ‘जीवाचे रान’ केले. महात्मा ज्योतिराव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंजाबराव देशमुखांनी खेड्यापर्यंत शिक्षणहक्क आग्रहाने पोहोचविला. शेवटी झाले काय? आम्ही शिकलो, काही प्रमाणात लढायलाही शिकलो. कितीतरी विद्यार्थी अजूनही अभ्यास क्षेत्रापासून कष्टकरी समाजातील दूर आहेत. ‘कॅपीटेशन फी’ तर सोडा शासन निर्धारित वार्षिक फी लाखोंच्या घरात असेल तर गुणवत्ता असूनही सामान्य घरातील मुले वैद्यकीय, संशोधन पदव्युत्तर शिक्षण कशी घेणार? शिक्षण, आरोग्य सोडाच पिण्याचे पाणी व रोजगारापासून वंचित शेतकरी, शेतमजुरांची कधी नव्हे इतकी दुखद अवस्था झाली आहे. या देशातील अस्वस्थ तरुणांनी कुठे आणि कोणत्या समृद्ध मार्गावरून जावे आणि कुठे पोहोचावे?
अभिमत विद्यापीठाच्या उपकुलगुरुंनी गांधी विचार पदवी (पीएच.डी.) चौर्यकर्म करून मिळवल्याचे अनेक वर्षांनी उजेडात आले. विद्यापीठीय राजकारणात पदस्थ सोयीच्या परीक्षक समित्या नेमून कोण पदवी मिळवू शकतात, सन्मानाने मिरवू शकतात. शिक्षणासारख्या ज्ञानाच्या क्षेत्रातही ‘साधनसूचिता’ उरली नाही. शिक्षण क्षेत्रातील भाग साम्राज्यात तरुण अभ्यासक हतबल अािण दुर्लक्षित आहेत. नेट, सेट, एम.फिल, पीएच.डी. या पदव्या घेऊन शेकडो तरूण चाळिशीत टेकले आहेत. चंद्रपूरला वित्तमंत्र्यांनी ‘रोजगार मेळावा’ घेतला. तीन-चार हजार रुपयांच्या मासिक नोकºया देण्याचे सांगितले. तरुण, तरुणी चिडून म्हणत होते. आमच्या क्विंटलभर धान्याचे भाव तीन हजारापेक्षा कमी आले. आमचे महिन्याभराचे श्रम हे असेच बेमोल! संत तुकारामांचा अभंग आठवतो.
‘आता काय खावे, कुणांकडे जावे।
गावात राहावे, कोणाबळे।।
ज्योतिराव ‘शेतकºयाचा आसूड’मध्ये म्हणाले होते. शेतीत राबणाºयांनी अडाणी राहण्यात व ठेवण्यात सत्ताधाºयांचा स्वार्थ आहे. गोरे इंग्रज गेल्यावर तर हे वास्तव अधिकच गडद झाले.
मंदिरात प्रवेश नाही, जो स्पर्शाने वाटतो तो देवच कसला ? असा विवेकी प्रश्न प्रबोधनकारांनी वारंवार मांडला; पण असा शुद्ध तर्क आमच्या महिला संघटना मांडीत नाहीत. उलट महिला नेत्या कुठे, कसे जावे, याची शिकवण देतात. महाराष्ट्रातील महानुभाव पंथाने ‘रजस्वला स्त्री’ला भक्तीचा अधिकार सांगितला व निसर्ग धर्म अपवित्र कसा? असा प्रश्न उपस्थित केला होता. पुरोगामी महाराष्ट्रही हे विसरला. मूर्तिपूजेला, पोथ्यांना विरोध करणारे गाडगेबाबा, त्यांची घणाघाती कीर्तने आम्ही विसरलो. धर्माच्या क्षेत्रात अनेक ‘ययाती’ आहेत. ते आता ‘तरुण पुरुरवां’ना वेठीस धरायला निघाले आहे.
‘मी टू’ या चळवळीने स्त्री, विशेषत: तरुण कुठेही सुरक्षित नाही, हे लक्षात येते. मुलीच्या जन्माला नकार आणि त्यानंतर अल्पवयीन आणि एकूणच स्त्रियांच्या असुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. रामरहीम, आसाराम धार्मिक वलयांकित साधुंनी स्त्रिया, मुलींची विटंबना केली तरी हजारो तथाकथीत भाविक त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर कोर्टापुढे उभे राहतात. तेव्हा भारत नेमका कोणत्या क्षेत्रात ‘महासत्ता’ होणार आहे? असा खिन्न करणारा प्रश्न निर्माण होतो. प्रत्येक सरकारी, निमसरकारी कार्यालयांत, प्रतिष्ठानांमध्ये ‘विशाखा’ समितीची स्थापना करूनही जागोजागी ‘ययाती’ आहेतच. ‘मी टू’ चळवळीला विरोध करणारे म्हणतात, स्त्रिया इतकी जुनी प्रकरणं का उघड करताहेत आणि अवमान नवा-जुना नसतो. आत्मसन्मान जागृत झालेला नाही. परिणामाची तमा न बाळगता मुली बोलू लागल्या आहेत. मा. हे सगळे ‘शोषक ययाती’ या स्त्रियांविरुद्ध अब्रुनुकसानाचे दावे ठोकणार आहेत म्हणे ! भोगवादी ययाती या सर्वच क्षेत्रात आहेत.
असमानतेच्या श्रृंखला तोडून सार्वजनिक जीवनात निर्धाराने पुढे येणारी युवापिढी विशेषत: स्त्रिया यांच्या पाठीमागे जनशक्ती विवेकी समाज उभा झाला पाहिजे. शंभर वकिलांची फौज चंगळवादी, भ्रष्ट ययातींना वाचवू शकणार नाही, असे जनमानस जागृत व्हायला हवे.
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ययातीकरण भोगवादी प्रवृत्तीचे दर्शन घडवते. आता यत्र, तत्र, सर्वत्र असणाºया ‘ययाती’विरुद्ध आपण निर्धाराने लढले पाहिजे.
-डॉ.श्रीकांत तिडके