भीमसेनी मुखशिल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 06:04 AM2019-02-10T06:04:00+5:302019-02-10T06:05:07+5:30
एका स्टॅण्डवर फिरता लोखंडी पाट, त्यावर ओल्या शाडूचा मोठा गोळा. शरदचे कसबी हात त्या शाडूच्या गोळ्याभोवती फिरू लागले आणि बघता बघता भीमसेनजींचे अप्रतिम मुखशिल्प तयार झाले!
- सतीश पाकणीकर
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जयंतीनिमित्त..
४ फेब्रुवारी १९२२ हा दिवस भारतीय अभिजात संगीताच्या इतिहासात अत्यंत मानानं लिहून ठेवावा, असा दिवस. याच दिवशी ख्याल गायकीतले पहिले ‘भारतरत्न’ जन्माला आले. अर्थातच मी बोलतोय पं. भीमसेन जोशी यांच्याविषयी. त्यामुळे आज त्यांच्या चाहत्यांना त्यांची आठवण येऊन डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहाणार नाही. माझीही अवस्था काही वेगळी नाही. त्यांच्या सहवासात घालवलेला एक दिवस मला आज पुन्हा त्याच वातावरणात घेऊन गेला.
स्थळ : राजेंद्रनगर, पुणे येथील पं.भीमसेन जोशी यांचा ‘कलाश्री’ बंगला. दिवस : ११ फेब्रुवारी १९९९. वेळ दुपारी ३ ची.
नुकताच गेल्या आठवड्यात पंडितजींचा ७७वा वाढदिवस साजरा झालेला. त्यांच्या पंचाहत्तरीनंतर त्यांना उद्भवलेल्या त्रासातून व त्यानंतरच्या आॅपरेशनमधून सुखरूप बरे झालेले व आता अत्यंत दिलखुलास व प्रसन्न मूडमध्ये असलेले पंडितजी.
प्रसिद्ध शिल्पकार शरद कापूसकर, श्री. रामभाऊ कोल्हटकर व मी; तिघेही ‘कलाश्री’वर पोहोचलो. बंगल्याच्या सिटआउटपर्यंत आम्ही पोहोचतो तर दस्तूरखुद्द अण्णांनीच आमचं स्वागत केलं. शुभ्र झब्बा आणि काठाची पांढरी लुंगी या पेहरावात असलेले पंडितजी त्यांच्या खास खर्जातल्या आवाजात म्हणाले ‘या !’.
निमित्त होतं त्यांचं ‘मुखशिल्प’ बनवण्याचं. बऱ्याच दिवसांपासून शरदची ती इच्छा होती आणि रामभाऊंनी ती पंडितजींना बोलून दाखवल्यावर ते लगेचच तयार झाल्याने हा योग जुळून आला होता.
ख्याल गायकीच्या या सम्राटाला, त्याच्या लोकविलक्षण कलेला, त्याच्या अत्यंत साध्या राहणीला आणि स्वभावाला ते ‘मुखशिल्प’ बनवणं म्हणजे एक मानाचा कुर्निसात असणार होता. आणि ते घडताना बघणाऱ्या काही भाग्यवंतांपैकी मी एक होतो. माझ्या कॅमऱ्यासह सज्ज ! आजपर्यंत अनेक मैफलींमध्ये मी शेकडो भीमसेनी मुद्रा टिपलेल्या होत्या. पण आजची ही मैफल जरा वेगळीच आणि महत्त्वपूर्ण होती.
एखाद्या व्यक्तीला समोर बसवून त्या व्यक्तीचं चित्रं काढणं ही सोपी गोष्ट नाही. आणि त्याहीपेक्षा अवघड गोष्ट आहे ती त्रिमितीमधील शिल्प घडवणं. एखाद्या पाषाणामधील अनावश्यक भाग हातोडी-छिन्नीने काढून टाकत हळूहळू त्या पाषाणामधून एक सुंदर सुबक मूर्तीचा आविष्कार समर्थ शिल्पकार आपल्यासाठी घडवतो. आज शरद शाडूच्या आधारे हे मुखशिल्प घडवणार होता.
चित्रकाराला चित्र काढताना किंवा शिल्पकाराला शिल्प घडवताना पाहणे ही एक गायक-गायिकेला, अथवा वादकाला त्याची कला सादर करताना पाहाण्याच्या, अनुभवण्याच्या आनंदासारखाच आनंद देणारी घटना असते. माध्यमं वेगळी असतील, आविष्कार वेगळे असतील; पण रसिकाला होणाºया आनंदाचे मोजमाप मात्र सारखेच असते.
शरद आणि त्याची पत्नी सौ. स्वाती दोघेही तयारीला लागले. रामभाऊंनी त्यांच्या खास खुबीनं भीमसेनजींना बोलतं केलं. अत्यंत कमी शब्दात; पण मार्मिक बोलणं ही भीमसेनजींची खासियत. त्यामुळे त्यांनी ही गप्पांची मैफलपण त्यांच्या गाण्याच्या मैफलीप्रमाणे लगेचच काबीज केली.
एका स्टॅण्डवर असलेला फिरता लोखंडी पाट, त्या पाटावर लावलेला ओल्या शाडूचा मोठा गोळा, आणि बादलीमध्ये असलेला ओला शाडू. बस्स ! एवढंच साहित्य. शाडू खाली पडून कार्पेट खराब होऊ नये म्हणून वर्तमानपत्राचे कागद अंथरले गेले. आणि अंदाज घेत घेत शरदचे कसबी हात त्या शाडूच्या गोळ्याभोवती फिरू लागले. ओल्या शाडूच्या छोट्या छोट्या गोळ्या करत त्या स्टॅण्डवरील मोठ्या गोळ्यावर बसवत मुखशिल्पाचे काम सुरू झाले.
भीमसेनजी आमच्याशी बोलत होते. मधूनच ते शरदच्या जादुई हातांकडे आणि आकाराला येणाऱ्या त्या शाडूच्या गोळ्याकडे बघत होते. काहीच मिनिटात त्या शाडूच्या गोलसर गोळ्याच्या ठिकाणी माणसाचा चेहरा दिसू लागला. भीमसेनजींच्या चेहऱ्याशी साम्य सांगणारा तो चेहरा!
हळूहळू त्यातील नाक, डोळे, कान, गळा, केस, कपाळ, गाल यांवर काम होत होतं, तसतशी भीमसेनी मुद्रा त्या शाडूमध्ये आकाराला येत होती. निर्मोही स्वरसाधना आणि समर्पित भावनेने गाण्यास वाहून घेतलेल्या असामान्य साधकाचे, ख्यालियाचेच शिल्प एखाद्या ख्याल गायनाप्रमाणे आकार घेत होते.
मध्येच भीमसेनजींनी त्यांच्या खास शैलीत दोन जुन्या पण मोठ्या गवयांमध्ये घडलेला एक किस्सा सांगितला आणि आमची हसून हसून पुरेवाट झाली. त्या शिल्प घडण्याच्या प्रोसेसचा आनंद भीमसेनजी त्यांच्या गाण्याप्रमाणेच घेत होते. आणि या अद्वितीय क्षणांचा अनुभव आम्ही घेत होतो. मधून मधून वेगवेगळ्या कोनातून मी भीमसेनजींसह त्या शिल्पाची प्रकाशचित्रं घेत होतो. शिल्प साकारत होतं. त्याचबरोबर माझ्या कॅमेºयात या ऐतिहासिक क्षणांच्या आठवणी बंदिस्त होत होत्या.
काही वेळाने भीमसेनजींचा पुत्र श्रीनिवास या प्रोसेसचा आनंद घेण्यास आला. तर थोड्या वेळाने आमचा आणखी एक चित्रकार मित्र कुंदन रूईकरही आला. भीमसेनजींची शुश्रूषा करणारी शर्ली मधूनच डोकावून जात होती. आणि मग भीमसेनजींची कन्या सौ. शुभदा तिचा लहानगा मुलगा आणि अण्णांचा लाडका नातू चि. अक्षय हेपण आले. आम्ही सर्वजण त्या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होत होतो.
सुमारे तासाभरात त्या लोखंडी स्टॅण्डवर भीमसेनजींचे ते मुखशिल्प अप्रतिमरीत्या तयार झाले आणि अण्णांबरोबरच त्यांच्या पत्नी सौ. वत्सलाबाई यांनी त्याला उत्स्फूर्त दाद दिली.
तासाभराची ती शाडूकामाची मैफल संपली. ‘अवर्णनीय’ या शब्दाच्या पलीकडला शब्द सुचत नव्हता. मी भीमसेनजींना त्या शिल्पासोबत प्रकाशचित्र घेऊया असे सुचवले. सिटआउटपर्यंत ते शिल्प आम्ही उचलून नेले. आणि भीमसेनजी त्याच्या शेजारी येऊन उभे राहिले. आणखी एक अनोखे प्रकाशचित्र कॅमेराबद्ध झाले. मग निवांत गप्पा मारत चहापानाचा कार्यक्र म झाला आणि आम्ही सर्व सामान पॅकअप केले.
पुढे लंडन येथील ‘सोसायटी आॅफ पोर्ट्रेट स्कल्प्चर’ या संस्थेने आयोजित केलेल्या ४०व्या प्रदर्शनात भीमसेनजींचे हे मुखशिल्प निवडले गेले. सर्व जगभरातून एकूण चाळीस शिल्पांची निवड झाली होती त्यात पहिल्यांदाच आणि संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदा एका भारतीय शिल्पकाराचे शिल्प निवडले गेले होते. शरद कापूसकरचे भीमसेनजींचे मुखशिल्प; आणि तेही कोणतेही हत्यार न वापरता फक्त बोटांच्या साहाय्याने केलेले शिल्प. मादाम तुसांच्या प्रसिद्ध संग्रहालयाची मुख्य स्कल्प्चर जेनी फ्लेयर हिनेही या शिल्पाची मुक्तकंठाने स्तुती केली. पण शरदच्या कामाचे खरे चीज झाले ते पुण्यात परत आल्यावर पं. भीमसेनजींनी केलेल्या सत्कारानेच !
अशी या मुखशिल्पाची आनंददायी निर्मिती. आम्हा काहीजणांना ही कलाकृती बनताना बघण्याचे व मला त्याचवेळी प्रकाशचित्रण करण्याचे भाग्य लाभले याचा आनंद कसा वर्णन करता येईल?
म्हणूनच तुकोबांची माफी मागून त्यांच्या अभंगाच्या पहिल्याच ओळीत थोडा बदल करीत असे म्हणावेसे वाटते..
राजस सुकुमार ‘स्वर’ मदनाचा पुतळा !..
sapaknikar@gmail.com
(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)