प्रयोगशील ‘अभि’रंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 10:29 AM2021-05-23T10:29:58+5:302021-05-23T10:30:43+5:30

गोरेगाव पश्चिमेला असणाऱ्या अंबाबाईच्या देवळाच्या पायऱ्यावर तीन मुली आणि चार मुलांना घेऊन गोविंद पांडुरंग पातकर गुरुजींनी सुरू केलेल्या या, ’अभि’ शाळेने आता भव्य स्वरूप तर प्राप्त केले आहेच, पण तिने इतक्या वर्षांत शाळा म्हणजे पुस्तकी शिक्षण देणारी चारभिंतींआडची संस्था नव्हे हे सिद्ध केले आहे.

Experimental ‘Abhi’Rang | प्रयोगशील ‘अभि’रंग

प्रयोगशील ‘अभि’रंग

Next

मुंबईच्या गोरेगाव या उपनगरात १९४२ साली अ. भि. गोरेगावकर इंग्लिश शाळा सुरू झाली. २०२१ साली ती शाळा ७९व्या वर्षांत आहे. गोरेगाव पश्चिमेला असणाऱ्या अंबाबाईच्या देवळाच्या पायऱ्यावर तीन मुली आणि चार मुलांना घेऊन गोविंद पांडुरंग पातकर गुरुजींनी सुरू केलेल्या या, ’अभि’ शाळेने आता भव्य स्वरूप तर प्राप्त केले आहेच, पण तिने इतक्या वर्षांत शाळा म्हणजे पुस्तकी शिक्षण देणारी चारभिंतींआडची संस्था नव्हे हे सिद्ध केले आहे. मी ५२ वर्षांपूर्वी पुण्याच्या प्रख्यात नूतन मराठी प्रशालेत शिकलो आणि असा अभिमान बाळगला की नूमवि ही एकमेव उत्तम शाळा आहे. त्यावेळचे शिक्षण निरीक्षक व प्रसिद्ध साहित्यिक वि. द. घाटे यांनी असे म्हटले होते की, आम्ही नूमवित नवीन काय झाले ते पाहायला आणि शिकायला येतो व तसे इतर शाळांनी करावे असे त्यांना सांगतो. पण आज अभिची प्रगती वाचताना असे जाणवले की तिने नूमविला नक्कीच मागे टाकले आहे. या शाळेची ७५ वर्षांपर्यंतची कामगिरी २५०-३०० पानांच्या दोन खंडात ही शाळा चालविणाऱ्या ‘दि शिक्षण मंडळ, गोरेगाव’ या संस्थेने ग्रथित केली आहे. यातल्या वेगवेगळ्या पैलूंची माहिती ते ते विभाग चालविणाऱ्या लोकांनी शब्दबद्ध केले आहेत.

शाळेतली बालवर्गापासून दहावीपर्यंतची १२ वर्षे ही संपूर्ण जीवनाची पायाभरणी करणारी वर्षे असल्याने ती आयुष्याची बेगमी ठरण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी शिकवणारी शाळा हवी, नव्हे तर ती तशी असायला हवी. मग त्यात वर्गात धडे शिकवले जायला हवेत, ती स्थानिक भाषेच्या माध्यमातून दहावीपर्यंत शिकवणारी शाळा असायला हवी, त्याचबरोबर त्यांचे इंग्रजीही बोलणे, लिहिणे याबाबतीत पूर्ण तयारी करून घेणारी असायला हवी, त्यामुळे पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे जाण्याचा ओघ खुंटेल. खेळांचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळायला हवे.

समाजात ज्या ज्या स्पर्धात्मक परीक्षा होतात त्यांची तयारी करून घ्यायला हवी. सातवी- आठवीत मुले-मुली वयात येतात, तेव्हा त्याबद्दलचे शिक्षण, समुपदेशन, जशी हुशार मुलांची वेगळी तयारी करून घेतात, तशी ढ मुलांची वेगळी तयारी करून घेण्याची सोय, जर दिव्यांग मुले असतील, तर त्यांच्यासाठी वेगळी सोय हवी. सांघिक गीतगायन, समारंभाच्या वेळी ओळख करून द्यायला, आभार मानायला, ध्वनिवर्धक लावायला नववी-दहावीतल्या मुलांची मदत घेतली पाहिजे. शिक्षण खात्याच्या सूचनांची अंमलबजावणी वेळच्या वेळी करावी लागते, अंदाजपत्रक बनवणे, खर्चावर देखरेख ठेवणे, शाळा आधुनिक ठेवणे अशा एक ना अनेक गोष्टी करत राहाव्या लागतात आणि त्या सर्व गोष्टीत ‘अभि’ पुरी पडलेली दिसते. काही ठिकाणी असलेले त्यांचे अपयशही त्यांनी न लपवता या पुस्तकांतून वाचकांपुढे व्यवस्थितपणे मांडले आहे. कारण कुठल्याही संस्थेत कायम यश मिळत नसते. किंबहुना चुका झाल्या तरच शिकण्याची संधी असते आणि यासाठी शिक्षण संस्था चालवणाऱ्या मंडळाला निस्वार्थी भावनेने काम करणारी माणसे सतत मिळवत राहावी लागतात, त्यातही ही शाळा यशस्वी ठरलेली दिसते.
- अ. पां. देशपांडे 
 
पुस्तकाचे नाव
शिकणारी शाळा ‘अभि’रंग
प्रकाशन
ग्रंथाली प्रकाशन
पृष्ठे : ३०४
मूल्य : रु. ३५०/-

Web Title: Experimental ‘Abhi’Rang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.