चेहरे...मन:पटलावर ठळकपणे उमटून राहिलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 09:15 AM2018-11-18T09:15:00+5:302018-11-18T09:15:06+5:30

ललित : माणसं माणसं माणसं... जीवन एक जत्रा व त्यात भेटलेली असंख्य माणसं... आणि त्यांचे असंख्य चेहरे; पण या असंख्य चेहऱ्यांपैकी एखादाच चेहरा मन:पटलावर ठळकपणे उमटून राहतो.  तो आपण कितीही विसरला तरी विसरू शकत नाही किंवा नंतर कुठे अचानक दिसल्यास आपण चटकन म्हणतो ही आपणास कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते.

Faces ... marked on mind | चेहरे...मन:पटलावर ठळकपणे उमटून राहिलेले

चेहरे...मन:पटलावर ठळकपणे उमटून राहिलेले

googlenewsNext

- सुषमा सांगळे - वनवे

तो चेहरा सुंदरच असतो असेही नाही. कित्येकदा कुरूप असतो, सामान्य अगदी दहा जणांसारखाही असतो, तर कधी क्रूर अथवा भयानकदेखील असतो. तो विशिष्टच चेहरा मनात जाऊन का बसतो, याचे काही कारण सांगता येईल, असे मला तरी वाटत नाही; पण असे कित्येकांच्या बाबतीत घडते.
काही चेहऱ्यांवर सहज भाव उमटून जातात. असे चेहरे अगदी स्वच्छ आरशासारखे वाटतात. काही इतके बोलके असतात की, त्यांना आपण कधी बोलून गेलो हे आपल्याही लक्षात येत नाही. काही स्थितप्रज्ञ दगडासारखेही असतात. काहींच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांच्या मनाचा तळ प्रतिकूल, अनुकूल असे भाव सहज दिसतात. काही पारदर्शी मनात काही लपून न राहणारे असे असतात, तर काहींचे चेहरे एवढे भीतिदायक असतात की, बऱ्याच वेळा लहान मुले तर त्यांच्याकडे पाहून रडूही लागतात.

चेहऱ्यातील कपाळ, गाल, नाक, ओठ हे सारे अवयव आपापल्या परीने चेहऱ्याचे वैशिष्ट्ये व्यक्त करतात; पण चेहऱ्याची सारगर्भिता कशात असेल, तर ती साठवलेली असते माणसांच्या डोळ्यात. डोळ्यात सारे ब्रह्मांड असते. ज्या गोष्टी ओठांनी सांगता येत नाहीत ते डोळे न बोलता सहज सांगून जातात. मानवी मनाच्या खिडक्या कोणत्या असतील तर त्या म्हणजे डोळे. माणसाचे शील, त्याचा स्वभाव, त्याची तल्लख बुद्धिमत्ता त्याच्या डोळ्यातच चमकताना दिसते. मनातील उदासी, भीती, प्रेम, असूया, क्रोध, तिरस्कार, आनंद माणसाच्या मन:पृष्ठावर उठणाऱ्या विविध भावतरंगाचे प्रतिबिंब जर कुठे दिसून येत असेल तर ते डोळ्यात..! प्रतिभावंत डोळे, भावातुर आर्जवी डोळे, अर्भकाचे निष्पाप डोळे एकंदर मानवी जीवनाच्या सप्तरंगाचा इंद्रधनू डोळ्यात साठवलेला असतो.

चेहऱ्यामधील डोळे झाकून ठेवले तर तो चेहरा रंगहीन, भेसूर दिसू लागतो. फक्त एका नजरेचा कटाक्ष उत्कट प्रेमभावनेचा प्रारंभ होण्यास पुरेसा असतो. हाच चेहरा माणसांच्या वयाची साक्ष देत राहतो. कपाळावर पडणाऱ्या आठ्या, सुरकुत्या, सैल पडत जाणारी त्वचा हे सारे वार्धक्याची सूचना देत राहतात आणि माणूस नेमक्या याच गोष्टीला घाबरत असतो. आपला चेहरा कसा का असेना बरा, वाईट, सुरूप, कुरूप ज्याचा त्याला तो आवडतो; पण वार्धक्याचे शिलालेख चेहऱ्यावर उमटू लागले की, तो हादरतो आणि वय लपविण्यासाठी त्याची केविलवाणी धडपड सुरू होते.

हे जरी खरे असले, तरी माणसाच्या जीवनाचा अख्खा चित्रपट दर्शविणारे चेहरे म्हणजे वृद्धांचे चेहरे. त्यांच्या चेहऱ्यावरील प्रत्येक सुरकुती त्यांचा जीवनपट उलगडत असते. जीवनपटातील प्रत्येक घटनेची, आनंदाची, वेदनेची सुख-दु:खाची ती साक्षीदार असते. तारुण्यातील गोड, टवटवीत देखण्या; पण व्यक्तित्वशून्य चेहऱ्यापेक्षा असे वैशिष्ट्यपूर्ण चेहरे अधिक देखणे दिसतात. कवी, शिल्पकार, थोरविचारवंत, देशभक्त, यांचे वृद्ध चेहरे खरंच त्यांच्या व्यक्तित्वाचे समग्र दर्शन घडवून देतात. त्यामुळे ते अधिक देखणे दिसतात.

इंदिरा गांधी, सिंधूताई सकपाळ, आइन्स्टाईन, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर असे कितीतरी देखणे चेहरे डोळ्यासमोर सहज आठवतात. अर्थात सर्व वृद्धांचे चेहरे असे सुंदर नसतात. काही निर्बुद्ध, अर्थहीन, कोरे करकरीत, जसेच्या तसे राहतात; पण काही अधिक बोलके, जीवनग्रंथांचे खोल दर्शन घडविणारे असतात. खरंच वार्धक्य हे माणसांच्या चेहऱ्याला सुंदर अशी देणगी देत असते. माणसाचे व्यक्तिवैशिष्ट्य त्यात सामावलेले असते. मात्र, ते बघण्याची, जाणण्याची नेमकी नजर मात्र आपल्याकडे असावी लागते.

Web Title: Faces ... marked on mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.