गुफ्तगू हो, आना जाना, चलता रहे.
By admin | Published: January 2, 2016 02:42 PM2016-01-02T14:42:45+5:302016-01-02T14:42:45+5:30
खरंतर दोन शेजा:यांची भेट ही ‘अशी’च असली पाहिजे. गाजावाजा न करता, पूर्वनियोजनाची गरज न भासता सहज घडलेली. भारत-पाकिस्तानातल्या आपण शेजारी नागरिकांनीही एकमेकांकडे सहज ‘चहा’ला जायला, काय हरकत आहे?
Next
>- बीना सरवर
‘ते’ आणि ‘आपण’
भारतीय आणि पाकिस्तानी लोकांमध्ये एकमेकांविषयी संशय असतो, कारण एकमेकांबद्दल पुरेशी आणि खरी माहितीच या शेजा:यांना नाही. महत्प्रयासानं मिळणारा व्हिसा हातात आला तरीदेखील सीमापार जाताना त्यांच्या मनात असते ती धाकधूक! त्यात ऐकावे लागणारे नातेवाइकांचे, मित्रमैत्रिणींचे सावधगिरीचे सल्ले. शक्यतो ‘तिकडे’ जाणं टाळावंच अशी एक विचित्र अवघडलेली भावना असते. जे हिय्या करून सीमा ओलांडतात, ते मात्र परत येताना पाहुणचाराच्या, नव्या मैत्रीच्या आणि सीमेपलीकडच्या खातीरदारीच्या रोमांचक गोष्टीच सोबत आणतात.
भारतीय आणि पाकिस्तानी जेव्हा तिस:या एखाद्या देशात भेटतात, तेव्हा ते चांगले दोस्त बनतात, हादेखील सार्वत्रिक अनुभव आहे. त्यांच्यात भले राजकीय मतभेद असू देत, पण मनभेद नसतो. ही माणसं भारतीय किंवा पाकिस्तानी असण्याचा शिक्का विसरून परस्परांना माणूस म्हणून भेटतात, ..आणि कोणाही दोन परक्या माणसांची व्हावी तशी त्यांची निखळ मैत्री होते.
अफगाणिस्तानातून भारतात परतताना पाकिस्तानात नवाज शरीफ यांना भेटून मग पुढे जाण्याचा विचार आहे’ - अशा अर्थाचा अत्यंत अनौपचारिक ट्विट करून शेजारी ‘मित्र’ला भेटण्याचा मनोदय भारताच्या पंतप्रधानांनी जाहीर केला, आणि त्यामागोमाग काय घडलं; हा आता इतिहास झाला आहे. लांबच्या प्रवासात वाकडी वाट करून एखाद्या स्नेह्याच्या घरी थोडं डोकवावं, चहा-पाणी, गप्पाटप्पा कराव्यात आणि आपल्या वाटेने मार्गस्थ व्हावं; अशी ही भेट. भारत-पाक संबंधाच्या अतीव गुंतागुंतीच्या इतिहासात कधी न घडलेली.
भारतच काय, पाकिस्तानातही नरेंद्र मोदींच्या या पुढाकाराने सर्वाना धक्का (बहुतेकांना सुखद) बसला. सोशल मीडियावरून ही बातमी कानोकानी झाल्यावर मग मुख्य प्रवाहातल्या माध्यमांना काय होतं आहे, याचा अंदाज आला आणि धावपळ सुरू झाली.
नवाज शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त सौजन्य म्हणून मोदी त्यांना फोन करतात काय, शरीफ त्यांना काबूलहून भारतात रवाना होताना पाक भेटीचं आमंत्रण देतात काय आणि जणू त्याची वाटच पाहत असलेले मोदी त्या आमंत्रणाला लगेच आलिंगन घालतात काय, हे सारंच आश्चर्यजनक! या दोघाही नेत्यांच्या गळाभेटीची, प्रसन्न मुद्रेची आणि हातात हात घेतलेल्या मेहमाननवाजीची दृश्यं पुढच्याच क्षणी जगभरात पोचली. अखंड पेचात अडकलेले भारत आणि पाकिस्तान हे दोन शेजारी मनात आणतील तर काय घडू शकतं याचं जणू ते प्रत्यक्ष प्रत्यंतरच होतं. खरंतर दोन शेजा:यांची भेट ही ‘अशी’च असली पाहिजे. गाजावाजा न करता, पूर्वनियोजनाची गरज न भासता सहज घडलेली. भारत आणि कॅनडाचे नागरिक नाही का सहज सीमा ओलांडून एकमेकांना भेटायला जात! युरोपियन महासंघातल्या शेजारी देशांमध्येही हे असंच जाणं-येणं चालतं. फ्रान्स आणि जर्मनीसारखे देश कित्येक शतकांपासून एकमेकांचे हाडवैरी. त्यांच्या नागरिकांमध्येही एकमेकांविषयी शत्रुत्वाचीच भावना आहे. भारत आणि पाकिस्तानातल्या राज्यकत्र्याचं सोडा, पण इथल्या सामान्य नागरिकांमध्ये मात्र हा विखार, ही दुश्मनी दिसत नाही.
भारत आणि पाकिस्तानच्या द्विपक्षीय संबंधातील गुंतागुंत पाहता मोदी यांच्या पाकिस्तान भेटीमुळे फार मूलभूत बदल घडतील अशी अपेक्षा कुणीही विचारी माणूस करणार नाही. उलट या प्रसन्न ‘मेहेमाननवाजी’नंतर पुन्हा एकदा तोंडावर आपटल्याचाच अनुभव येईल, असंही अनेक निरीक्षकांना वाटतं. झालं गेलं विसरून या दोन्ही देशांनी जेव्हा जेव्हा भाईचा:याचा हात पुढे केला, त्या त्या प्रत्येक वेळी काही ना काही अपशकुन झाल्याचाच इतिहास आहे.. लेकीन, इस वक्त कुछ अलग हो! दोन्ही देशांनी परस्पर संवादाची दारं पुन्हा खुली केली आहेत. दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांच्या भेटीची तारीख ठरली आहे. ‘दोन शेजारी राष्ट्रातील कट्टर राष्ट्रवादी नेते जेव्हा जेव्हा विसंवादाची कोंडी फोडून ‘अमन की राहपर’ पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतात, त्या त्या वेळी सलोख्याची शक्यता वाढते’-पाकिस्तानातील प्रख्यात राजकीय विश्लेषक डॉ. इश्तियाक अहमद यांनी मोदीनीतीबद्दल नोंदवलेलं हे निरीक्षण महत्त्वाचं आहे, ते म्हणूनच!
‘दक्षिण आशियाच्या राजकीय क्षितिजावर उदयाला आलेली सर्वात आशादायी शक्यता’ - असं डॉ. अहमद म्हणतात, ती पाकिस्तानातल्या प्रत्येकच विचारी नागरिकाची भावना आहे.
मोदी आणि शरीफ हे दोघेही जहाल मतं असलेल्या पक्षांचे नेते. त्यांना आपापली पक्षीय भूमिका दूर ठेवण्याची मोठी कसरत करावी लागली असणार. त्यांनी ती तयारी दाखवली, हे विशेष. पण म्हणून या दोघांच्याही राजकीय पक्षातील जहाल मतवादाच्या प्राबल्याची वस्तुस्थिती नजरेआड करता येणार नाही.
मोदी आणि शरीफ या दोन्हीही नेत्यांसाठी ‘विकासाचा अजेंडा’ ही राजकीय आणि सामाजिकही अपरिहार्यता आहे. विकासाच्या असमतोलात कायम गरिबांचीच आहुती पडते. परंपरागत विचारांचा पगडा असलेल्या विशाल समाजरचनेत या आर्थिक असमतोलामुळे नवे सामाजिक ताण निर्माण होतात. असे ताण असलेल्या भूमीतूनच फुटीरतावादी, अतिरेक्यांच्या नव्या पिढय़ांची पैदास होते, याची जाण भारत-पाकएवढी अन्य कुणाला असणार?
जहाल मतवाद्यांविरुद्ध एल्गार पुकारण्यासाठी दक्षिण आशियाला पुन्हा आपली जुनी ओळख मिळवून देणं आणि दहशतवादाची पाळंमुळं खणून काढताना एकमेकांच्या सहकार्याचे हात बळकट करणं हा एक उपाय आहे, तर प्रांतिक किंवा राज्यस्तरीय स्वायत्तता प्रधान मानून परस्परांच्या लोकशाहीप्रधान राजकीय प्रक्रियेला बळकटी देणं हा दुसरा. डिसेंबर 2क्13 मध्ये भारत आणि पाकिस्तानातील पंजाब प्रांतानं आपापल्या केंद्र सरकारांना वळसा घालून एका संयुक्त निवेदनावर स्वाक्ष:या केल्या आणि ऐतिहासिक पाऊल उचललं. या समझोत्यानुसार दोन्ही प्रांतातील विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशिक्षणार्थी यांच्या येण्याजाण्यावरील सारी बंधनं उठवली गेली, त्यांना मुक्त प्रवेश देण्यात आला.
दोन्ही देशांच्या व्यापार-उद्योगांतील धुरिणांनीही केवळ एकमेकांच्या सहकार्यानं काम करण्याची इच्छा सातत्याने व्यक्त केली आहे. एकमेकांच्या नागरिकांना रोजगार देण्यापासून परस्परांच्या देशात गुंतवणुकीर्पयतच्या अनेक शक्यता या क्षेत्रला दिसतात. वस्त्रोद्योग, ऊर्जा, माहिती-तंत्रज्ञान, शिक्षण, कौशल्याधारित प्रशिक्षण, आरोग्यसेवा आणि कृषी या क्षेत्रत अशा परस्पर सहयोगाच्या अगणित संधी आहेत.
संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांतील माध्यमांनी एकमेकांवरील बंधनं हटवावीत, सर्वसामान्य लोकांनी एकमेकांना भेटावं यासाठी व्हिसावरील र्निबध शिथिल करावेत आणि दूरध्वनी सेवेची कनेक्टिव्हिटी वाढवावी अशी शांततागटांची पूर्वापारची मागणी आहे. त्यांच्या या मागणीला व्यापारी जगताचाही जाहीर पाठिंबा आहे. भारत आणि पाकिस्तान हे जगातील बहुधा एकमेव शेजारी देश असावेत, जिथे सेलफोन रोमिंगला मान्यता नाही. युद्धपिपासू लोक, शस्त्रस्त्र निर्मिती आणि संरक्षण उद्योगांनी गेल्या कित्येक दशकांपासून भारत-पाकिस्तानातले संबंध तापते राखून अपरंपार नफा कमावला. पण परस्पर सहकार्याच्या मार्गातून मिळणारा नफा त्यापेक्षा कित्येक पट जास्त असेल, दीर्घकाळ टिकणारा आणि जास्तीत जास्त लोकांर्पयत पोहोचणारा असेल, हे नक्की!
भारताबरोबरचे संबंध शांतता आणि सलोख्याचेच असले पाहिजेत याबाबत पाकिस्तानातही सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये एकवाक्यता आहे. पाकिस्तानवर दीर्घकाळ लष्करचाच कब्जा राहिला, पण मधल्या काळात जेव्हा जेव्हा लोकांनी मतपेटीतून निवडून दिलेले राजकीय पक्ष लोकशाही मार्गानं सत्तेवर आले, ते सारेच भारताबरोबर सलोख्याच्या संबंधांच्या बाजूनेच उभे राहिले. पाकिस्तानचे पंतप्रधानपद तिस:यांदा उपभोगणारे नवाज शरीफही त्याला अपवाद नाहीत. यावेळी भारतासोबतच्या संबंधांच्या शरीफ यांच्या प्रस्तावाला लष्कराचाही पाठिंबा असल्याचं दिसतं आहे.
भारताशी अकारण भांडत बसण्यापेक्षा प्राधान्याने करण्यासारखं पाकिस्तानकडे खूप काही आहे, असं आम्ही शांततावादी गट नेहमीच म्हणत आलो आहोत. याची जाणीव आता पाकिस्तानी लष्करालाही होत असावी, अशी चिन्हं दिसू लागली आहेत.
मोदींच्या पाकिस्तान भेटीने लगेच काही जादू घडणार नाही, हे खरं; पण यातून संवादातले अडथळे तरी बाजूला झाले आहेत. हमें ध्यान रखना होगा, शांती की ओर ले जाने वाली ये सिर्फ एक प्रोसेस है, न कि एक इव्हेण्ट!
(लेखिका पाकिस्तानातील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
www.beenasarwar.com