भिक्षेक-यांचा फॅमिली डॉक्टर..काम-धंदा सोडून फुटपाथवरची फाटकी जिंदगानी हुडकत फिरणारा अवलिया

By सचिन जवळकोटे | Published: September 16, 2017 03:30 PM2017-09-16T15:30:53+5:302017-09-17T05:34:15+5:30

..खरं तर यातला कुणीच जन्मानं भिक्षेकरी नव्हता. परिस्थिती, वृद्धापकाळ त्यांना फुटपाथवर घेऊन आला होता.

Family doctor with a beggar, leaving the work on the sidewalk. | भिक्षेक-यांचा फॅमिली डॉक्टर..काम-धंदा सोडून फुटपाथवरची फाटकी जिंदगानी हुडकत फिरणारा अवलिया

भिक्षेक-यांचा फॅमिली डॉक्टर..काम-धंदा सोडून फुटपाथवरची फाटकी जिंदगानी हुडकत फिरणारा अवलिया

Next

..खरं तर यातला कुणीच जन्मानं भिक्षेकरी नव्हता.
परिस्थिती, वृद्धापकाळ त्यांना फुटपाथवर घेऊन आला होता.
अशावेळी अभिजित सोनवणे हा अवलिया माणूस त्यांचा केवळ
डॉक्टरच बनला नाही तर रस्त्यावरच्या या माणसांना त्यानं
पायावर उभं राहायलाही मदत केली.
हीच माणसं आता इतर भिक्षेक-यांसाठी आपल्या उत्पन्नातला काही वाटा
बाजूला काढून ठेवतात आणि त्यांना मदत करतात.
आयुष्यभर इतरांसमोर आपली रिकामी ओंजळ धरणारी ही माणसं
आता त्यांच्या मुठीत जे काही आहे, त्यातला काही वाटा
आपल्यासारख्याच इतरांसाठी काढून ठेवताहेत..

कॉर्नरवरच्या छोट्या मंदिराजवळ एक मुटकुळं कसंनुसं पडलेलं. फुटपाथवरनं ये-जा करणाºयांकडं मोठ्या आशाळभूत नजरेनं पाहू लागलेलं. फाटक्या कपड्यात काळंकुट्ट अंग कसंबसं लपलेलं. एका तरी पादचाºयाच्या खिशाला आपल्याबद्दल सहानुभूती वाटेल, या आशेनं समोरचं तुटकं जर्मन भांडंही आ वासून पडलेलं.
मात्र, कुणालाच या मुटकुळ्याशी देणं-घेणं नव्हतं. जो तो आपल्याच विश्वात दंग होता. चुकून एखाद्याची नजर गेली तर त्यातही पटकन तुच्छता दिसायची. सरळ चालणारी पावलं लगेच बाजूला सरकायची.
एवढ्यात, समोरून चाललेली स्कूटर गच्ऽऽकन् थांबली. स्कूटरवाला चालत जवळ येऊ लागला, तेव्हा हे मुटकुळं डोळे किलकिले करून बघू लागलं. त्याला वाटलं, बहुधा हा मंदिरात दर्शनाला जातोय. पण नाही.. स्कूटरवाला थेट त्याच्याकडंच आला.
‘काय दादाऽऽ काय म्हणता? झोपून का राहिलात? अंगात ताप-बिप आहे की काय?’ खांद्यावर आपुलकीनं हात ठेवत समोरच्यानं हळुवारपणे विचारताच मुटकुळं पुरतं दचकलं. घाबरून कसंनुसं हलत उठून बसायचं प्रयत्न करू लागलं. मात्र, त्याला उठू न देता स्कूटरवाल्यानं गळ्यातल्या स्टेथोस्कोप कानात चढविला. छाती-पाठीवर हात ठेवून त्याचे ठोके मोजू लागला. ठोके प्रमाणापेक्षा जास्त होते. अंगात प्रचंड ताप होता. तव्यावरची भाकरी भाजल्यासारखं हात पोळून निघत होता. मग स्कूटरवाल्यानं मोबाइलवरून कुणाला तरी कॉल लावला. काही वेळातच एक अ‍ॅम्ब्युलन्स आली. त्यात हे मुटकुळं उचलून ठेवण्यात आलं. गाडी थेट हॉस्पिटलमध्ये शिरली. बेडवर झोपवून त्याला तातडीनं सलाईन लावण्यात आलं. इंजेक्शनमधून औषधंही देण्यात आली. ओळख न पाळख नसलेला हा कोण देवमाणूस आपल्याला वाचवायला आला, अशा गोंधळलेल्या नजरेतून स्कूटरवाल्याकडं पाहत असतानाच त्याला औषधांची ग्लानी आली. नकळत डोळे मिटले गेले.
त्यानंतर स्कूटरवाला थेट डॉक्टरांच्या केबिनमध्ये शिरला. ‘हायऽऽ या पेशंटचं जे काही बिल हाईल, ते मला द्या. मी भरतो.’ असं सांगून पुन्हा बाहेर पडला. स्कूटरला किक मारून नव्या रस्त्याला लागला. जाताना इकडं-तिकडं पाहू लागला. अजून कुणी नवा पेशंट भिकेची याचना करत कुठल्या कोप-यात बसलाय काय, याचा शोध घेऊ लागला.
स्वत:चा काम-धंदा सोडून फुटपाथवरची फाटकी जिंदगानी हुडकत फिरणा-या या अवलियाचं नाव डॉ. अभिजित सोनवणे. बायकोही डॉक्टर. पुण्यात स्वत:चा दवाखाना. आर्थिकदृष्ट्या ‘वेल सेटल’. तरीही मानसिकदृष्ट्या सतत अस्वस्थ. इतर डॉक्टर स्वत:ला अमुक-अमुक रोगाचा स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात; पण या पठ्ठ्याला ‘डॉक्टर फॉर बेगर्स’ म्हणून मिरवायला खूप आवडतं. ‘बेगर्स’ म्हणजे ‘भिक्षेकरी.’
भरल्या घरात ए.सी.मध्ये बायका-मुलांसोबत टीव्ही एन्जॉय करायचं सोडून रोज ऊन-पावसात भिक्षेकºयांना हुडकत निघणाºया अभिजितच्या तोंडून अजब कहाणी ऐकायला मिळत होती, ‘मी मूळचा साताºयाचा. डॉक्टर झाल्यानंतर वीस वर्षांपूर्वी पुण्यात प्रॅक्टिस करायचा निर्णय घेतला. खडकवासला परिसरातल्या एका छोट्याशा गावात जागाही बघितली; परंतु अख्खा दिवस माशा मारण्यातच जायचा.. तेव्हा गावच्या सरपंचानं सांगितलं की, इथं बसून पेशंटची वाट बघण्यापेक्षा बाहेर पडा. घरोघरी फिरा. मग काय... मी तो सल्ला मानला. पाठीवरच्या बॅगमध्ये औषधं-गोळ्या टाकून गावोगावी फिरू लागलो. त्या परिसरातील बारा खेडी अन् बारा वाड्या-वस्त्या पिंजून काढल्या. दिवसभर फिरून पाच-पंचवीस रुपये मिळू लागले. याच काळात गावच्या मंदिरालगत बसलेली भिक्षेकरी मंडळीही ओळखीची झाली.. कारण माझ्या फिरत्या दवाखान्याचा त्यांनाही चांगला फायदा होत होता. बसल्याजागी त्यांना औषधं मिळत होती. कधी कधी माझा दिवस रिकामा जायचा. गाडीत पेट्रोल टाकण्यापुरतीही कमाई व्हायची नाही. तेव्हा माझा हिरमुसलेला चेहरा बघून काही भिक्षेकरी मंडळी मला उसने पैसे द्यायची. त्यातले एक आजोबा अन् आजी तर माझ्या प्रत्येक अडचणीला स्वत:हून हात पुढं करायची. अशावेळी मला प्रचंड लाज वाटायची. जिवंतपणी मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं. ज्यांना आपण मदत करायला हवी, त्यांच्याच हातून भीक घेणारा मी किती मोठा भिक्षेकरी, असा सवालही मनात तडफडायचा.’
...पण एक दिवस डॉक्टर अभिजितला जणू लॉटरी लागली. ‘आयपास’नामक इंटरनॅशनल हेल्थ आॅर्गनायझेशनमध्ये चांगल्या हुद्याची नोकरी मिळाली. वर्षाकाठी त्यावेळी बारा-पंधरा लाखांचं उत्पन्न मिळू लागलं. पाहता पाहता संस्थेत ते महाराष्टÑाचे प्रमुख बनले. नाव अन् पैसे कमविण्यात बरीच वर्षे गेली.
मात्र, गेल्या वर्षी एक घटना घडली. अमेरिकेच्या हेल्थ सेमिनारमध्ये कंपनीतर्फे भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ते गेले. न्यू यॉर्क सिटीजवळच्या एका उत्तुंग इमारतीत टॉप फ्लोअरला असलेल्या आलिशान हॉटेलात त्यांची राहण्याची सोय करण्यात आली. ‘रूमच्या खिडकीतून मी खालची अख्खी सिटी मोठ्या गर्वानं न्याहाळत असताना मी किती मोठा झालोय याची जाणीव झाली होती.. कारण त्याक्षणी मी सर्वच बाबतीत टॉपला होतो. जगातली सारी सुखं माझ्या पायाशी लोळत होती. हा विचार करत असतानाच अकस्मात माझ्या डोळ्यांसमोर ते भिक्षेकरी आजी-आजोबा तरळून गेले. ज्यांनी मला त्याकाळी पाच-दहा रुपये देऊन जगवलं होतं. आज ते कोणत्या अवस्थेत असतील, हे मी विसरूनही गेलो होतो. त्याचक्षणी माझी मला लाज वाटली. स्वत:चंच मन खाऊ लागलं. सेमिनार संपल्यानंतर भारतात परत आलो. काही दिवसांनी खडकवासला जवळच्या त्या गावात गेलो. तिथला सारा माहोल बदलला होता. ओळखीच्या बºयाच खुणाही पुसल्या गेल्या होत्या. ते आजी-आजोबाही कुठं दिसले नाहीत. बºयाच भिक्षेकºयांकडं चौकशी केली; परंतु त्यांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. मी निराश मनानं परत फिरलो.’ अभिजितला तो दिवस आजही लख्ख आठवत होता.
..परंतु तोच दिवस अभिजितसाठी आयुष्यातला ‘टर्निंग पॉइंट’ ठरला. आजी-आजोबांची चौकशी करताना अनेक भिक्षेकºयांशी त्यांचा संवाद झाला होता. आजारपणाला खिळून पडलेल्या या मंडळींचे भयंकर हाल मनात चरका मारून गेले.. आणि आतला खरा डॉक्टर जागा झाला!
बस्स्... घरी आल्यानंतर त्यांनी पत्नी मनीषाला सांगितलं, ‘उद्यापासून आपला दवाखाना तूच बघायचा. मी निघालो माझ्या जुन्या दात्यांच्या सेवेला.’ मनीषाही डॉक्टर होत्या. त्यांना अभिजितचा मनस्वी स्वभाव पूर्णपणे ठाऊक होता. त्यांनी स्वत:हून या निर्णयाला पाठिंबा दिला.
झालं.. त्या दिवसांपासून डॉ. अभिजित रोज सकाळी स्कूटर घेऊन निघतात. शहरातली गल्ली-बोळं पालथी घालतात. फुटपाथवरच्या तरुण भिक्षेकरीकडं बिलकूल लक्ष देत नाहीत. त्यांच्या नजरेला अचूक पडतात ती विकलांग अन् वयोवृद्ध मंडळी. ते स्वत:हून त्यांच्याजवळ जात त्यांना तपासतात. पाठीवरच्या बॅगेतून औषधं काढून मोफत देतात. हे पाहून ही मंडळी त्यांच्या कुशीत शिरून गदगदून रडतात.. कारण ‘माणुसकी’ या शब्दावरून त्यांचा विश्वास कधीचाच उडालेला असतो.
या रुग्णांना गरज पडली तर मित्रांच्या दवाखान्यात भरतीही करतात. त्याचा सारा खर्चही स्वत:च करतात. अवलिया डॉ. अभिजितची मनापासूनची धडपड मित्रांनाही समजल्यानं तेही कमीत-कमी खर्चात जास्तीत जास्त चांगली औषधं स्वत:हून देतात. ‘वार बघून मी ठरावीक मंदिराजवळ बरोबर पोहोचतो. बाहेर बसलेल्या वयोवृद्धांवर उपचार करतो. आजपर्यंत साडेचारशेपेक्षाही जास्त भिक्षेकºयांची तब्येत मी ठणठणीत केलीय. या वयोवृद्ध रुग्णांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे पाठीचा मणका अन् गुडघ्यांचा. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी बसल्यामुळं हाडं पार निकामी झालेली. अंघोळ नसल्यानं स्कीनचा प्रॉब्लेमही खूप मोठा ठरलेला. मात्र, अलीकडे मी त्यांच्यात आरोग्याबद्दलची चांगलीच जागृती करतोय. हळूहळू का होईना यश येऊ लागलंय,’ डॉ. अभिजित यांच्या बोलण्यातला आत्मविश्वास ओसंडून वाहत होता.
डॉ. अभिजित यांनी पुण्यानंतर आजूबाजूच्या परिसरातही लक्ष घातले आहे. साता-यातील भिक्षेकरीही त्यांना आता ओळखू लागलेत. डॉ. अभिजित अधून-मधून स्वत:च्या दवाखान्यातही बसतात. स्वत:च्या उत्पन्नातला पंचवीस-तीस टक्के वाटा या भिक्षेक-यांसाठी बाजूला काढून बाकी रक्कम पत्नीकडं देतात. मात्र, एवढी छोटी आहुती या महाकाय यज्ञात पुरणार नाही, लक्षात आल्यानं त्यांनी आता ‘सोहम ट्रस्ट’ स्थापन केलाय.
भिक्षेक-यांना लागणा-या औषधं-गोळ्या किंवा गरजेच्या वस्तू लोकांनी या ट्रस्टला द्याव्यात, अशी विनंती ते करतात. सोहम हे त्यांच्या तरुण मुलाचं नाव. लोकं आपल्या मुलांसाठी इस्टेट तयार करून ठेवतात;
परंतु हा झपाटलेला माणूस भिक्षेक-यांसाठी मुलाच्या नावानं ट्रस्ट उभा करतोय. सारंच अतर्क्य. अगम्य. हा बाबा माणुसकीच्या झ-यातून पुण्याईचा सागर उभा करू पाहतोय..

स्वत:च्या पायावर उभे राहिलेले भिक्षेकरी आता इतरांना करतात मदत!
‘भिक्षेक-यांची तंदुरुस्ती’ या मोहिमेत भरभरून यश मिळाल्यानंतर अभिजित डॉक्टरांनी आता पुढची अनोखी मोहीम हाती घेतलीय. त्यांना स्वत:च्या पायावर उभं करण्याचा संकल्प त्यांनी सोडलाय. कधीकाळी टॉवेल-टोपी विकून पोट भरणारा सखाराम धंद्यात खोट आल्यावर रस्त्यावर येऊन भीक मागू लागला होता. मात्र, डॉक्टरांनी त्याची मानसिकता बदलविली. सुरुवातीला होलसेल दुकानातून रुमालांचे गठ्ठे भेट देऊन त्याला पुन्हा व्यवसायाला प्रवृत्त केलं गेलं. आज सखाराम चौका-चौकात उभा राहून रुमाल विकतोय. त्याच्या पायाला प्रॉब्लेम असल्यानं त्याला काठीही दिली गेलीय. मंदिरालगत हात पसरून याचना करणाºया रखमाला फुलांचा व्यवसाय थाटून दिला गेलाय. उन्हात फुलं कोमेजली जाऊ नयेत म्हणून तिला एका दात्यानं छत्रीही भेट दिलीय. कुणी चौकाच्या कॉर्नरला वजनकाटा घेऊन बसलंय.. तर कुणी दाढी करण्याचा डबा ठेवून समोरच्याचा चेहरा गुळगुळीत करू लागलाय.
खरं तर, यातलं जन्मानं कुणीच भिक्षेकरी नव्हतं. वृद्धापकाळात नियती त्यांना फुटपाथवर घेऊन आली होती. अशावेळी त्यांच्या जुन्या कलेला पुन्हा एकदा वाव दिला गेला. त्यांच्या हतबल जिंदगानीला उभारी दिली गेली. हात पसरून लाचारीनं भीक मागण्यापेक्षा हातातली वस्तू ताठ मानेनं विकून पोट भरण्यात काय मजा असते, याचा सुखद अनुभव ही मंडळी घेऊ लागली. सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे, ही मंडळीही आपल्या रोजच्या कमाईतला काही वाटा इतर भिक्षेकºयांसाठी बाजूला काढून ठेवू लागली. आयुष्यभर जगासमोर रिकामी ओंजळ धरणारी मंडळी आता स्वत:ची भरली मूठ मोकळी करण्यासाठी हिरिरीनं सरसावलीत.

भिक्षेकरी 4, कर्मचारी 16 !
साता-यातल्या भिक्षेकरीगृहात क्षयरोग्यांची व्यवस्था करण्यात आलीय. अकरा एकर जागेत वसलेल्या या भिक्षेकरीगृहात चार क्षयरोगी राहतात. त्यांच्या दिमतीला मात्र आहेत तब्बल सोळा कर्मचारी! एक अधीक्षक, एक डॉक्टर, एक परिचारिका यांच्यासह हे सारे कर्मचारी रोज वाट बघतात...नवा क्षयरोगी भिक्षेकरी या गृहात येणार कधी?..

Web Title: Family doctor with a beggar, leaving the work on the sidewalk.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.