जंग तो जितनी है..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 06:04 AM2020-06-14T06:04:00+5:302020-06-14T06:05:12+5:30
कोरोनामुळे मालेगावातील यंत्रमागांची खडखड अचानक बंद झाली, शहर थंड पडलं, पण पुन्हा सारे जोमाने उभे राहिले आणि सार्या शंका-कुशंका त्यांनी फोल ठरवल्या.
- शफिक शेख
मालेगाव म्हटले की पहिल्यांदा आठवतात, त्या तिथल्या दंगली. आणि लगेच सर्वांच्या भुवया उंचावल्या जातात.
यावेळीही मालेगाव प्रचंड चर्चेत होते, पण ते दंगलींमुळे नाही, तर कोरोनामुळे! मालेगावांत कोरोनाचे रुग्ण सापडायला लागले आणि आता मालेगावचे काही खरे नाही म्हणून सगळेच हादरले. अगदी मालेगावला वाळीत टाकण्याचीही भाषा सुरू झाली.
.पण कोरोनाच्या संदर्भात जे मालेगाव खरोखरच हॉटस्पॉट ठरू पाहात होते, त्याच मालेगावात कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही सुरू झाली, लोकांनीही साथ दिली आणि रुग्ण झपाट्याने बरे होऊन घरी परतू लागले! ज्या ज्या शहरांत कोरोनाची भीती होती आणि आहे, तेही आता म्हणू लागले, ‘मालेगाव जर कोरोनाला अटकाव करू शकते तर आपण का नाही?.’
कोरोनाला रोखण्यासाठी मालेगावने खरोखरच अथक संघर्ष केला अन् कोरोनावर मात करणार्यांची संख्या आश्चर्यकारकरीत्या कमी होऊ लागली.
खरे तर मालेगावकरांचा स्वभाव सहनशील. हिंदू - मुस्लीम वादाने चर्चेत असणारे गाव संकटाच्या वेळी जातधर्म, सर्व भेद विसरून एकत्र येतात. तसा भाईचारा जगात शोधूनही मिळणार नाही. हीच का ती माणसं असा सहज प्रश्न कोणालाही पडावा!
मालेगावकरांचा स्वभाव जितका ‘आक्रमक’, तितकाच सहनशील.! पण जेव्हा कोरोनाने शहरात बेमालूमपणे प्रवेश केला तेव्हा सर्वांचेच धाबे दणाणले. एकापाठोपाठ एक लॉकडाऊन लागत गेले अन् मालेगाव शहर विजनवासात जावे तसे शांत झाले.
चोवीस तास यंत्रमागांची खडखड सुरू असणार्या या शहराची धडधड बंद झाली अन् माणसाचं हृदय बंद पडावं तस शहर थंड पडलं. पोटाची खळगी भरण्यासाठी राबराब राबणारे हात कुणी कलम करून टाकावेत तसे काम बंद पडल्याने दहा बाय दहाच्या खोलीत अनेकांनी स्वत:ला बंद करून घेतलं.
दहा ते पंधरा लोकं ज्या एकाच घरात कोंबल्यासारखे राहतात ते कसे करतील सोशल डिस्टन्सिंग आणि त्यांना काय माहीत त्याबाबतीत! मालेगावची रचनाच तशी ‘नदी के इस पार’वाली. मोसम नदीने दोन्ही बाजूंना हिंदू - मुस्लीम दोन्ही समाजांना वाटून टाकलेलं. नेहमी या ना त्या कारणाने भांडणारी ही माणसं संकटाच्या वेळी मात्र हातात हात घालून एकत्र येतात, कारण मालेगावचा तानाबानाच मुळी एक दुसर्याला सोडून विणता येत नाही. तरीही नेहमी संशयाचे वातावरण.
दाट लोकवस्तीमुळे कोरोनाचा स्फोट होतो की काय अशी भयावह परिस्थिती असताना शहरातील सर्वच नागरिकांची मानसिकता ‘जंग तो जितनी है’ अशीच होती. शासकीय यंत्रणेच्या प्रय}ांना मालेगावकरांनी मोठय़ा हिमतीने साथ दिली आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईत ते सहभागी झाले.
इथला यंत्रमाग मजूर म्हणजे गरिबी, दारिद्रय़. या गोष्टी कायमच इथल्या लोकांच्या वाट्याला आल्या. रात्र रात्र यंत्रमागावर जागून काढल्यावर मालक हप्त्याला किती मजुरी देतो, तर म्हणे पाचशे ते आठशे रुपये!
15 जणांच्या घरातील दोन-तीन जण जरी यंत्रमागावर काम करीत असले तरी आठवड्याला घरात येणार फक्त दोन ते अडीच हजार रुपये! कसा काढायचा त्यात आठवडा? शिवाय अनेक कामगारांना चहा, विडी, सिनेमा यांचा प्रचंड शौक! भले एक वेळ उपाशी राहतील, पण शुक्रवारी थिएटरात जाऊन सिनेमा पाहतील! उरलेल्या पैशांत घर चालवायचं कसं तरी..
कोरोना आला अन् लॉकडाऊन झाल्याने सर्व घरी बसले. हातातील रोजीरोटी गेल्याने उपासमार सुरू झाली. यंत्रमाग मालकाने पहिल्या महिन्यात अर्धा पगार दिला अन् नंतर हात वर केले. रोजीरोटीचा प्रश्न स्वस्थ बसू देईना अन् घराबाहेर निघाले तर पोलिसांचे दंडुके सोसले जाईना. इकडे आड, तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाल्याने उत्तर प्रदेश, बिहारमधील अनेक कुटुंबांनी मालेगाव सोडण्याचा निर्णय घेतला.
अनवाणी पावलांनी अनेक कुटुंबे रातोरात संसार खांद्यावर घेऊन आपापल्या राज्यात निघून गेली.
8 मेपर्यंत 572 कोरोनाबाधित रुग्ण एकट्या मालेगावात झाले, तसे प्रशासनाचे धाबे दणाणले. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे अन् जिल्हाधिकारी सूरज मांढरे मालेगावी ठाण मांडून बसले. पालक मंत्री छगन भुजबळ, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही मालेगावात भेटी देऊन विशेष लक्ष घातले. या सार्याचे परिणाम दिसू लागले.
प्रशासकीय यंत्रणा आणखी जोमाने कामाला लागली अन् नागरिक एकापाठोपाठ कोरोना मुक्त होऊ लागले. त्यातच यंत्रमागांचा खडखडाटही पुन्हा सुरू झाला अन् शहरात ‘जान मे जान’ आ गई!.
विशेष म्हणजे मालेगावातील अनेक अधिकार्यांना बदलीवर जावे लागले तर आयुक्त बोर्डे यांना सेवानिवृत्तीच्या महिनाभर आधीच मालेगाव सोडावे लागले.
त्यानंतर नवीन अधिकारी आले, अपर जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकारी बदलले अन् नवीन आयुक्त दीपक कासार आले. सर्वांनी कामात झोकून दिले. या प्रय}ांत आयुक्त स्वत: कोरोनाबाधित झाले, अनेक डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली; परंतु कोणीही जिद्द सोडली नाही. कोरोनावर विजय मिळवत त्यांनी लोकांची हिंमत आणखी उंचावली. कोरोनाविरुद्धच्या लढाईत मालेगावकरांचा विजय दृष्टिपथात आणून ठेवला!.
ईदची नमाजही घरातच अदा!
मालेगावी रमजान म्हटले की, महिनाभर चहल-पहल असते. रात्रीचा दिवस होतो. महिलावर्ग बिनदिक्कतपणे रात्री बाजारपेठांमध्ये नवे कपडे, चपला, बांगड्या आणि ईदचे साहित्य खरेदी करतात. मात्र दरवेळी ओसंडून वाहणारा उत्साह यावर्षी कोरोनामुळे दिसला नाही. लॉकडाऊनमुळे लोक घरात अडकून पडले. रमजान ईदसाठी लोक घराबाहेर पडतीलच असे सर्वांना वाटले. त्यामुळे निमलष्करी दल तैनात करण्यात आले, मात्र मुस्लीम बांधवानी संयम राखत घरीच नमाजपठण केले.
ज्या इदगाह मैदानावर लाखो लोक नमाजपठणासाठी जमत, ते मैदान यावर्षी प्रथमच ओस पडल्याचे दिसून आले. पवित्र रमजान महिन्यातली शुक्रवारची नमाजदेखील लोकांनी घरातच बसून पढली. मुस्लीम बांधवांसह सार्यांनीच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळल्याने कोरोनाचे रुग्ण घटले अन् मालेगावकर कोरोनवर मात करू शकले!
shafique.sheikh@lokmat.com
(लेखक लोकमतच्या नाशिक आवृत्तीत
वरिष्ठ उपसंपादक आहेत.)