अश्रूंचा महापूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:13 AM2019-11-17T00:13:06+5:302019-11-17T00:14:01+5:30
मै उगाता हूं कपास, सारी दुनिया कपडे पहनती है फिर मेरी ही लाश क्यू एक कफन के लिए तरसती है
- रूपेश उत्तरवार
जगाचा अन्नदाता आज खितपत पडला आहे. त्याचे अश्रू पुसायला अनेकजण पुढे आले. मात्र ते केवळ कोरडे आश्वासन होते. यामुळे अश्रूचा महापूर गाव खेड्यातून वाहतो आहे. मात्र समाज व्यवस्था आणि सत्ताधाऱ्यांना त्याचे दु:ख नाही.
गृत्समद ऋषींनी कळंबनगरीत कापसाचा शोध लावला. वऱ्हाडात पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून जगभरात यवतमाळचा नावलौकीक आहे. इतकेच नव्हे तर ब्रिटीशांनाही इथला कापूस वाहून नेण्यासाठी रेल्वेगाडी सुरू केली.
सततच्या निसर्ग प्रकोपासोबत शेतमालास न मिळणाऱ्या दराने कापूस उत्पादक शेतकरी अल्पावधीत हाती येणारे पीक म्हणून सोयाबीनकडे वळले. परतीच्या पावसाने कापूस आणि सोयाबीन दोन्ही पीक भुईसपाट केले. आता शेत शिवारात केवळ अश्रू ढाळणारे शेतकरी पहायला मिळत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येणारे सरकार मायबाप मात्र बेपत्ता आहे. एकतर शेती व्यवसायातील पीक पद्धती शेतकऱ्यांना बदलावी लागणार आहे. अथवा शेती व्यवस्थेला सरकारचे मोठे पाठबळ असावे लागणार आहे.
राजमान्यता मिळालीच नाही
शेतीला खर्चावर आधारित दर कधी मिळालेच नाही. शेतमालाचे दर ठरविणारा केंद्रीय कृषीमूल्य आयोग याची कधी दखलही घेत नाही. शासन शेतमालाच्या किमती काही रुपयाने वाढविते. खर्च मात्र हजाराने वाढतो आहे. आयात निर्यात धोरण आणि शेतीमधील गुंतवणूकही नावालाच आहे. यामुळे शेतमालाचे उत्पन्न दुप्पट होणार किंवा नाही, याचे उत्तर काळच देणार आहे.
निसर्गाचा समतोल ढळला
निसर्गाचा समतोल ढळत आहे. त्याचा संपूर्ण परिणाम शेती व्यवसायावर होतो आहे. निसर्ग प्रकोपाचा सामना शेतकºयांना करावा लागतो. या संकटातून बाहेर पडण्यासाठी खंबीर पाठबळ शेतकºयांच्या पाठीशी उभे नसल्याचीच गंभीर बाब पहायला मिळते. पीक विमा नावालाच आहे. ह्या कंपन्या शेतकºयांच्या पाठीशी कधीही उभ्या राहताना दिसत नाही. यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे.
कृषी विद्यापीठांचे संशोधन अपुरे
निसर्गाच्या कालप्रवाहात तगधरणारे संशोधित वाण कृषी विद्यापीठांनी निर्माण केले नाही. यामुळे पतरतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. बीटी आणि त्यातील अद्ययावत तंत्रज्ञानावर नवीन संशोधन करण्यात विद्यापीठ मागे आहेत.
शेतकरी आत्महत्या थांबणार कशा?
कधी कोरडा, तर कधी ओला दुष्काळ, कधी किडींचा प्रकोप तर शेतमालास भाव नाही. यामुळे शेतकरी सदैव दु:खात जगतो आहे. आर्थिक विवंचनेला कंटाळून शेतकरी आत्महत्याही घडत आहेत. खर्चावर आधारीत दर, २४ तास वीज, सिंचनाची सुविधा, प्रक्रिया उद्योग आणि आपत्ती काळात मदतीचा हात असेल तरच हे थांबणार आहे.