मांजरा नदीचा मराठवाड्यातील प्रवाह क्षतिग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 09:19 AM2018-12-30T09:19:00+5:302018-12-30T09:20:02+5:30

आपल्या नद्या, आपले पाणी : गोदावरीच्या अनेक उपनद्या आहेत. त्यापैकी मांजरा ही एक प्रमुख उपनदी. सुमारे ६०० किलोमीटर लांबीची ही नदी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात उगम पावते. तिकडच्या बालाघाट डोंगरराशींत गौखाडी गावानजीक मांजरेचे उगमस्थान. ते समुद्र सपाटीपासून ८२३ मीटर्स उंचीवर आहे. उगमानंतर ही नदी बीड जिल्ह्यातून पूर्वेकडे वाहत जाऊन उस्मानाबाद जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून पुढे जाते. नंतर कासारखेड गावाजवळ ती लातूर जिल्ह्यात प्रवेश करते. 

The flow of Manjara river damaged is Marathwada | मांजरा नदीचा मराठवाड्यातील प्रवाह क्षतिग्रस्त

मांजरा नदीचा मराठवाड्यातील प्रवाह क्षतिग्रस्त

googlenewsNext

- विजय दिवाण

बालाघाटाच्या खालच्या पठारावर मांजरा नदीस तेरणा, तावरजा आणि घरणी या तीन नद्या येऊन मिळतात. तेरणा ही मांजरेची मुख्य उपनदी होय. ती लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्याच्या दक्षिण सीमेवरून वाहत येऊन मांजरेस मिळते. तावरजा ही नदी मुरूड गावाजवळ उगम पावून लातूर आणि औसा यांच्या सीमेवर शिवणी येथे मांजरेस मिळते आणि घरणी ही नदी वडवळ गावाजवळ उगम पावून चाकूर तालुक्यातून वाहत जाऊन मांजरेस मिळते. पुढे मांजरा नदी ही लातूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागातून वाहत जाऊन आग्नेय दिशेस वळते आणि निलंगा या गावाजवळ ती कर्नाटक राज्यात प्रवेश करते. तत्पूर्वी या नदीच्या उत्तर भागातून मन्याड, तीरू आणि लेंडी या तीन नद्या येऊन मांजरेस मिळतात. त्यापैकी मन्याड नदी ही बीड जिल्ह्यात धरमपुरी गावाजवळ उगम पावते आणि अहमदपूर तालुक्यातून व नांदेड जिल्ह्यातून वाहत जाऊन तेलंगणात प्रवेश करते. त्यापुढे मान्यद नदी मांजरेस मिळते. लेंडी नदी ही उदगीर तालुक्यातून उगम पावून नांदेड जिल्ह्यात तीरू नदीस जाऊन मिळते आणि पुढे तेलंगणात ती मांजरेस मिळते.

मांजरा नदी कर्नाटकातील बीदर शहराच्या पूर्वेस तेलंगणात प्रवेश करून आग्नेय दिशेने वाहू लागते. या अंतराच्या दरम्यान तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात अच्चमपेठ आणि बंजापल्ली गावाजवळ मांजरेवर तीन किलोमीटर लांबीचे एक मोठे धरण बांधले गेले आहे. त्या धरणामुळे ‘निजामसागर’ नावाचा एक मोठा जलाशय तिथे निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे पुढे हैदराबाद शहरानजीक मेदक शहराजवळ आणखी एक धरण बांधून ‘सिंगूर’ जलाशय निर्माण केला गेला आहे. निजामसागर आणि सिंगूर जलाशयामधून बीदर, मेदक, निजामाबाद, हैदराबाद आणि सिकंदराबाद या शहरांना पाणीपुरवठा होतो आणि सिंचनही मिळत असते. नंतर अचानक मोठे वळण घेऊन ही मांजरा नदी एकदम उलट दिशेने वाहत येऊन महाराष्ट्राच्या सरहद्दीजवळ येते.

या ठिकाणी ती नांदेड जिल्ह्यातील शेळगावपासून राज्याच्या सरहद्दीवरून ईशान्येकडे वाहते आणि कुंडलवाडी गावाजवळ गोदावरीस जाऊन मिळते. या मांजरा नदीचा उपयोग महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांत सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. या नदीखोऱ्यात कापूस, ज्वारी, तांदूळ, कडधान्ये आणि तेलबियांचे उत्पादन होते. गेल्या काही दशकांमध्ये मराठवाड्यातून वाहणाऱ्या मांजरेच्या पात्रामध्ये अतीव प्रदूषण, अतिरिक्त वाळू-उपसा, काठांची धूप आणि गाळ साचणे यांचे प्रमाण जास्त वाढल्यामुळे नदीचा प्रवाह क्षतिग्रस्त झाला आहे, असा अहवाल अलीकडे तज्ज्ञांनी दिलेला आहे.

 

Web Title: The flow of Manjara river damaged is Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.