सहज फुलू द्यावे फूल

By Admin | Published: September 10, 2016 02:54 PM2016-09-10T14:54:55+5:302016-09-10T14:54:55+5:30

महाराष्ट्रातल्या डोंगररांगांवरचे कातळकडे एरवी वर्षभर रखरखत सुस्तावून पसरलेले असतात! पण पाऊस आला आणि सरत निघाला की याच कातळकड्यांवर निळे-जांभळे तुरे उगवतात आणि बघता बघता अनेकानेक इवल्या फुलांचे गालिचे उलगडले जातात. - हीच ती अप्रूपाची पुष्पपठारं !पण त्या फुलाफुलांचा श्वास कोंडू लागला आहे. का?

Flowers give flowers easily | सहज फुलू द्यावे फूल

सहज फुलू द्यावे फूल

googlenewsNext

-  सीमंतिनी नूलकर



झाडांचं स्वत:चं असं खासगी आयुष्य असतं. गूढ, गहन, तुमच्या-आमच्या नजरेआडचं! सातारा जिल्ह्यातल्या कास पठाराचा विषय जेव्हा जेव्हा मनात येतो तेव्हा तेव्हा मला वाटतं या कास सड्याचं किंवा अशा सर्वच निसर्गस्थळांचंही स्वत:चं खाजगी आयुष्य असतं. कास सडाच पहा- वर्षातले सहा -सात महिने एकांत लपेटून पहुडलेला असतो. स्वत:मधे मग्न असा. पण मान्सूनच्या चाहुलीने मात्र तो अनावर सळसळून उठतो. एकापाठोपाठ एक उमलणाऱ्या निळ्या-जांभळ्या, पिवळ्या-लाल-केशरी फुलांच्या लाटा संभाळताना सड्याची तारांबळ उडते. कितीएक अनोखी फुलं, अनोख्या फुलांचे अनोखे नखरे!
या पठारावर दरवर्षी नेमाने फुुलणारी सोनकी, सोनटिकली, जांभळी मंजिरी, गेंद, भुई आमरीसारखी फुलं तर आहेतच; पण पाच किंवा सात वर्षांनी कास पठाराला निळी भूल पडते - कारवीची! पाच किंवा सात वर्षांनी कारवीच्या कृष्णनिळ्या फुलांचा संभार कास सडा हौसेनं मिरवतो. कारवी फुलायला लागली की, ‘‘नीळ आली’’ असे हाकारे गावकरी द्यायला लागतात. रॉय किणीकरांच्या शब्दात सांगायचं तर ‘‘काळोखातील निळाई वितळून’’ सडा माखल्याचाच तो अनुभव असतो. कारवीचा बहार म्हणजे एक माहौलच असतो.
पावसाच्या पहिल्या दमदार सरींच्या वर्षावात प्रथमच फुलारतो तो वायुतुरा (अस्रङ्मल्लङ्मॅी३ङ्मल्ल २ं३ं१ील्ल२्र२)! कास सड्याला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नेऊन बसवण्यात वायुतुऱ्याचं महत्त्वाचे योगदान आहे. या सड्यावर पराग हस्तांतरणासाठी हरतऱ्हेच्या युक्त्या वापरणारी बिरबोला, कंदीलपुष्पासारखी फुलं आहेत, तशीच मादाम, अग्निशिखा, निलावंतीसारख्या सौंदर्यखणी आहेत. ड्रॉसेरा इंडिका, ड्रॉसेरा बर्मानीसारख्या विषकन्याही आहेत. सड्यावर ही फुलं, शेकडो वर्षं स्वत:साठी, सड्यासाठी फुुलत होती. कधीतरी माणसाचं लक्ष तिकडं गेलं आणि कास सड्याच्या खाजगी आयुष्याचा चव्हाटा झाला. मानवी हस्तक्षेपामुळे कास सड्याच्या कपाळावर दुर्दैवाचा लेख लिहिला गेला.
- आणि आतातर माणसांनी या फुलांच्या पठाराचा श्वास चोंदून ठेवला आहे..


हाती काहीच उरत नाही...

या पुष्पपठारांचं ‘अवघं असणं’ वेगळंच ! मातीचा हलका थर, जांभ्याचा जाळीदार खडक, हवेतली आर्द्रता, तापमान,  सूर्याचं प्रखरतेने आग ओकणं, एकीकडे सहा-सात महिने पाण्याचा ताण, 
तर मान्सून काळात पाण्यानं दाणादाण! पण पठारांवरच्या जांभ्याच्या जाळीदार नक्षीतून पावसाच्या 
पाण्याच्या वाहत्या ओहोळातून, साठलेल्या पाणथळ जागातून पुष्पसौंदर्य मान्सूनच्या चाहुलीने उमलून येतं, आणि ही पुष्पपठारं रंगांनी माखून जातात...

मान्सूनची, पाऊसकाळाची, काजळकाळ्या मेघांची प्रतीक्षा झाडं, वेली, पशुपक्षी, माणसं असे सर्वजण अगदी सरत्या उन्हाळ्यापासून करत असतातच. पण महाराष्ट्रातल्या डोंगररांगावरचे काळे कातळ, जांभळे सडेही मान्सूनकडे डोळे लावून बसलेले असतात. एरवी हजार- बाराशे मीटर उंचीवरचे हे कातळकडे वर्षातले सहा-सात महिने रखरखत सुस्तावून पसरलेले असतात, काही जीव-जान नसल्यासारखे! पण अचानक मान्सूनच्या पायरवाने त्यांची हिरवी जाणीव जागी होते. कातळ सडे चैतन्याने सळसळून उठतात. स्वत:ला ढगांच्या स्वप्निल दुनियेत लपेटून घेतात.
येत्या मान्सूनपासून जात्या मान्सूनच्या काळात या सड्यांवर रंगांच्या फुलांच्या, गंधाच्या लाटांवर लाटा उसळत राहतात. चहूवार एकत्र फुलणं हेच तर या पठारांचे वैशिष्ट्य. राकट, कणखर, दगडांच्या देशाची महाराष्ट्र देशाची ही सौंदर्यलेणी!
कित्येक कोटी वर्षांपूर्वी ही पठारं जन्माला आली. महाराष्ट्रात जवळजवळ अशी साठ-सत्तर पुष्पपठारं माहितीची आहेत. पाचगणी, कास, डिंभे धरणामागचे आहुपे, मसाई, जगमिन, सडा वाघापूर, वाल्मीकी, भीमाशंकर, सिंहगड अशी कितीतरी. साधारण १००० मीटर ते १२०० मीटर उंचीवर ही पठारं (table lands) असतात. काळ पाषाण (बेसॉल्ट) आणि जांभ्याचे (लॅटराइट) हे कातळ सडे ! एखादं महाबळेश्वरसारखं पठार १४०० मीटर उंचीवरचंही!
इथलं ‘अवघं असणं’ वेगळंच! मातीचा हलका थर, जांभ्याचा जाळीदार खडक, हवेतली आर्द्रता, तापमान, सूर्याचे प्रखरतेने आग ओकणं, एकीकडे सहा-सात महिने पाण्याचा ताण, तर मान्सून काळात पाण्यानं दाणादाण! पण पठारांवरच्या जांभ्याच्या जाळीदार नक्षीतून पावसाच्या पाण्याच्या वाहत्या ओहोळातून, साठलेल्या पाणथळ जागातून पुष्पसौंदर्य मान्सूनच्या चाहुलीने उमलून येतं.
पावसाचे संकेत या पठारावरच्या अद्भुत जीवसृष्टीला कसे मिळतात, हा वेगळा संशोधनाचा विषय आहे. पण एक हलचल सुरू होते. या पत्थरांच्या काळजाला फुलांचे पाझर फुटायला लागतात. सापकांदे (अरिसीमा) हळूच भुईतून फणे काढतात. कंदिलपुष्पे (सेरोपेजिया) आडवाटांवर ताजिम द्यायला सरसावतात. पावसाचे संकेत देणारे अग्रदूत म्हणजे भुई आमरी आणि वृक्ष आमरी - आॅर्किड्स ! भुई आमरींचे तरी किती आविष्कार - आषाढ आमरी, बाहुली आमरी, टूथ ब्रश आमरी, कंगवा आमरी, हिरवी आमरी, शेरूट आमरी. प्रत्येक सड्यावर वेगवेगळ्या भुई आमरींचं प्राबल्य जाणवतं.
या आॅर्किड्सचा गंध हलकेच दरवळून जातो.
आता सडे निळंजांभळं काही ऐकवायला लागतात. सीतेची आसवं (युट्रिक्युलॅरिया) कातळभर विखुरलेली असतात. ही आहे एक कीटकभक्षक वनस्पती. पाण्याच्या ओहोळातून येणारे सूक्ष्मकीटक हे तिचं नायट्रोजन मिळवण्याचं साधन!
पाणथळ जागांलगत जांभळी मंजिरी फुललेली दिसते. कातळसड्यांचं जांभळं वैभव म्हणजे ‘पोपटी’ (स्रँ८२ं’्र२ स्री१४५्रंल्लं) अतीव देखणं फूल ! पुष्पमध्यातून हलका प्रकाश परावर्तित होतोय असं जाणवतं खरं! तशीच सिल्की मॉर्निंग ग्लोरी. निळा जांभळा आणि भडक गुलाबी यांचं अनोखं मिश्रण या फुलात असतं. मधूनच थोडी ओळखीची कोरांटीची फुलंही भेटतात. पण प्रत्येक फुलांचं स्वत:चं वैशिष्ट्य असतं, अस्तित्त्व, ओळखही असते. आंबोलीजवळ कोरांटीचा एक प्रकार आढळतो. पिंगुळी कोरांटी तर कासच्या अंतर्भागात इटा कारवी (बारलेरिया). दोघी जांभळ्या रंग आणि पोत वेगळा. भारंगीही जांभळी; पण एक जांभळी छटा दुसरी सारखी नाही. धनगरांची पागोटी (गेंद- एरिओकोलॉन) जवळजवळ सर्व कातळ सड्यांवर दिसतात. पांढरेशुभ्र टपोरे मोतीच. पाण्यालगत या गेंदाची एक वेगळी प्रजाती असते.
जागतिक वारसा यादीत स्थान पटकावलेल्या कास पठारावरच अशा आठशेपेक्षा जास्त प्रजाती आहेत. त्यातल्या काही प्रदेशनिष्ठ असतात. कास पठाराला मानांकन मिळवून देणारी अशीच एक कास प्रदेशनिष्ठ वनस्पती म्हणजे वतुरा - अपोनोगेटॉन सातारेन्सीस! केवळ इथच, या भागातच ती आढळते.
कातळ सड्यांवरचं हे पुष्पवैभव केवळ अवर्णनीय. पाहून डोळे निवत नाहीत. अनुभवून समाधान होत नाही. शेकडो जाती, शेकडो रचना, किती रंग, किती गंध यांचा शास्त्रीय अभ्यास, शास्त्रीय नावं हा सामान्यांसाठीचा विषय नाही. म्हणून या फुलांच्या स्थानिक नावाचं अप्रूप. त्यांच्या मागच्या मिथक कथांचं एक अप्रूप. यातूनच एक जिव्हाळा निर्माण होतो. एक काळजी घेण्याची, ममत्वची भावना मनात उद्भवते. सिटिझन सायंटिस्ट म्हणून जी एक संकल्पना आहे तिचा मूळ पाया हाच आहे.
निसर्गाचं हे वैभव, कातळ सड्यांचं हे पुष्पवैभव जपण्यासाठी सर्वसामान्य माणसाचा सहभाग महत्त्वाचा, मोलाचा. त्यासाठी निसर्ग साक्षर होणं गरजेचं. रानफुलं निसर्गाशी समरसून कशी जगतात, विपरीत परिस्थितीत अस्तित्त्व स्वत्व कसं टिकवतात हे यांच्याकडून शिकावं. त्यासाठी गरज आहे नैसर्र्गिक आधिवासात, नैसर्गिक स्थितीत, त्या रानफुलांची, झाडांची निरीक्षणं नोंदण्याची. त्यातूनच एखाद्या दुर्मीळ प्रजातीचा शोधही लागू शकतो. एखादी दुर्मीळ नैसर्गिक घटना अनुभवता येते. जगासमोर येते.
उत्तम संतुलित पर्यावरण हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे. पण उत्तम संतुलित पर्यावरण राखणं हे मूलभूत कर्तव्यही आहे. पण ते सोयीस्कररीत्या नजरेआड केलं जातं. पुष्पपठारांचाच फक्त प्रातिनिधिक म्हणून विषय घेतला तरी या पुष्पपठारांवरच्या कित्येक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या पुष्पपठारांना असलेले धोके छाती दडपून टाकतात. प्रत्येक धोक्याचं मूळ आहे मानवी हस्तक्षेप.
नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरच्या यादीत तर ही पठारं वैराण-बॅरन म्हणून नोंदली गेली आहेत. म्हणजे इथं पवनचक्क्या, खनन, उत्खनन व्हायला अडसर कोणाचा? त्यापाठोपाठ प्रदूषण आलंच! त्यासाठीची पवनचक्क्या गाड्यांची वाहतूक म्हणजे हवेच्या प्रदूषणाला आमंत्रण, त्यातच पुन्हा या गाड्या धुण्यामुळे, तेल वंगणामुळे नैसर्गिक ओहोळ अडवले जातात. प्रदूषित होतात. गाड्या धुण्यासाठी वापरलेल्या डिटर्जंटमुळे वनस्पती जीवनावर होणारे परिणाम वेगळेच.
कास पठारावरून महाबळेश्वरकडे जाणारा एक रस्ता आहे. राजमार्ग. या राजमार्गाच्या दुतर्फा ड्रॉसेरा, बर्मानी फुललेली असायची. पण पवनचक्यांसाठीचे अवजड ट्रेलर्स या मार्गावरून जाऊन जाऊन बर्मानीने माना टाकल्या, हा अनुभव आहे. माणसाचे निसर्गावरचं हे अतिक्र मण, बदललेल्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेले धोके फार गंभीर आहेत. दूरगामी आहेत.
रासायनिक खतांमुळे कीटक-कीडनाशक फवाऱ्यांमुळे, पराग हस्तांतरण करणाऱ्या कीटकांवर अतिशय वाईट परिणाम झाले आहेत. वणव्यांनी त्यांची मुळं भाजून काढली आहेत. काही विशिष्ट समजुतींपोटी स्थानिक लोक भाजावळ करतात. शेतातलं वाळकं गवत, तण, पिकांचे बुडखे जाळून टाकणं हा एक उद्देश आणि जमीन भाजली गेली की पुन्हा चांगलं उगवतं ही समजूत! याला शास्त्रीय आधार नाही. केवळ रूढीगत परंपरा. वणवे लावण्यामागे तर भाजावळीसारखी तकलादू कारणमीमांसाही नाही. वणवे हे समाजकंटक, विकृत लोकच लावतात. गंमत म्हणून, मजा म्हणून. उन्हाळ्यात पेटलेले डोंगर बघून मन चरकतं.
पुष्पपठारांवरचा अलीकडचा, बदलत्या जीवनशैलीमुळे येणारा मोठा ताण आहे पर्यटकांचा. काही पर्यटक तर विशेषत्वाने असंवेदनशील, बेजबाबदार असतात. त्यांच्यामुळे येणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचा, ध्वनिप्रदूषणाचा आणि प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या बाहेरून आलेल्या वनस्पतीमुळे होणाऱ्या अतिक्र मणाचा (्रल्ल५ं२्र५ी स्र’ंल्ल३२) धोका गंभीर आहे. हौशी पर्यटकांचा उच्छाद या फुलांच्या जिवावर उठतो.
काही प्रमाणात संशोधक हीदेखील एक अडचण आहे. खरं तर आता कॅमेरा, व्हिडीओ शुट्स, जीपीएस असं विकसित तंत्रज्ञान हाताशी आहे. वनस्पतींचा, फुलांचा, विशेषत: दुर्मीळ प्रजातीचा अभ्यास करताना, नोंदी घेताना या साधनांचा उपयोगच करायला हवा. पण झाड मुळापासून उपटून पानं, फुलं तोडून नेण्याचा हव्यास संपत नाही. कास पठारावरची एक दुर्मीळ सेरोपेजिया- कंदिलपुष्प - एका विशिष्ट ठिकाणी दरवर्षी उगवायची. एकदा एका नामांकित विद्यापीठाचे विभागप्रमुख विद्यार्थ्यांना अभ्यास सहलीसाठी घेऊन आले. त्यांनी अगदी सहजपणे ती सेपोपेजिया उपटून विद्यार्थ्यांना दाखवली आणि सांगितलं की, ही दुर्मीळ आहे, धोक्यात आलेली आहे!!
प्रत्येक पठाराची किंवा पर्यटनस्थळाची पर्यटकांना सामावून घेण्याची क्षमता (ूं११८्रल्लॅ ूंस्रंू्र३८) असते. तिचा तर कधीच विचार केला जात नाही. हजारोंची झुंबड, एक जातो म्हणून दुसरा. वीकेण्ड आहे म्हणून जायचं. याचा ताण पार्किंग, ट्रॅफिक जॅम, स्वच्छतागृह या सगळ्यावर येतो आणि पर्यायानं प्रदूषण वगैरे वगैरे वगैरे... दुष्टचक्र ाचा कुठे भेद होत नाही.
या दुष्टचक्र ाचा भेद करण्याचे तसे पाहिले तर दोन उपाय आहेत. एक म्हणजे परिणामकारक कायदे आणि त्याची परिणामकारक अंमलबजावणी. गंभीर शिक्षा, दंडाची तरतूद करणं, तर दुसरा उपाय प्रत्येक नागरिकाने स्वेच्छेने अंगीकारलेली बंधनं आणि त्यासाठी साक्षरता. विशेषत: निसर्ग साक्षरता, जनजागृती मोठ्या प्रमाणावर करणं. स्वत:ची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याची आणि ‘मला काय त्याचं’ असं समजण्याची, म्हणण्याची विशिष्ट भारतीय मनोवृत्ती हाही महत्त्वाचा मुद्दा पुष्पपठारांच्या ऱ्हासाला कारणीभूत आहेच. निसर्ग, पर्यावरण संरक्षण ही केवळ सरकारची जबाबदारी कधीच नसते. प्रत्येक नागरिकाची त्या त्या भागातल्या स्थानिकांचीही असते. त्यासाठी व्यवस्थापन आणि पॉलिसी मेकर्स, वनखाते, पोलीस, स्थानिक लोक यांचा समन्वय असणं महत्त्वाचं ठरतं.
स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध होणं, त्यांना प्रशिक्षण देणं, तंत्रज्ञानाविषयी अद्ययावतठेवण्याचा प्रयत्न करणं, पुष्पपठारांच्या परिसराची ूं११८्रल्लॅ ूंस्रंू्र३८ लक्षात घेऊन पर्यटक संख्येवर नियंत्रण ठेवणं, पार्किंग, शौचालयं याची सोय करणं, त्या स्थळावर जाण्यासाठी काही शुल्क, कॅमेरा शुल्क आकारणं (जेणेकरून सोम्यागोम्यांवर बंधने येतील), प्लास्टिक कचरा बंदी, त्या स्थळाचं महत्त्व समजावून देणारी फिल्म पाहूनच प्रवेश देणं असे मार्ग अवलंबता येतील.
महाराष्ट्रातील पुष्पपठारं हा जैवविविधतेचा संपन्न आविष्कार आहे. त्यांच्या जतनासाठी विशेष पठार परिसंस्था (२स्रीू्रं’ स्र’ं३ीं४ ीूङ्म२८२३ीे) म्हणून त्यांना दर्जा मिळायला हवा, वेगळी नीती असायला हवी आणि त्याची अंमलबजावणीही परिणामकारकरीत्या व्हायला हवी. निसर्गाशी जवळीक राखत, कृतज्ञता राखत जगणं ही खरी भारतीय जीवनशैली आहे. त्यासाठी कितीतरी प्रथा, रूढी होत्या, आहेत.
पूर्वी देवराया देवडोह जपले जायचे. पिंपळासारखे वृक्ष यज्ञीय म्हणून तोडायचे नाहीत किंवा चंद्र आकाशात असण्याच्या काळात झाडं तोडायची नाहीत, अशा काही प्रथा होत्या / आहेत. या प्रकारची बंधनंच आहेत / होती. एकूण भारतीय समाजव्यवस्था, शिक्षणाचं प्रमाण, देवभोळेपणा लक्षात घेता अगदीच हाडहूड करून त्या प्रथा मोडीत काढणं योग्य नाही. त्याचा सकारात्मक वापर सद्यस्थिती करून घेणं हिताचं होईल. कोणत्याही मार्गाने अनिर्बंध वापरावर हानीवर निर्बंध येणं ही आजची गरज आहे.
निसर्गाप्रति प्रेम, जिव्हाळा हवा, निसर्ग अनुभवण्याची दृष्टी हवी, संवेदनशील मन हवं.
आतापर्यंत खूप उधळमाधळ झालीये. आता कुठेतरी निसर्गाला ओरबाडून बंबाळ करणं थांबवायलाच हवं.
कास पठारावरची रानफुलं हेच सांगतात, 
सहज फुलू द्यावे फूल, सहज दरवळावा वास 
अधिक काही मिळवण्याचा, करू नये अट्टहास 
सुवास, पाकळ्या, पराग, देठ, फूल इतकीच देते ग्वाही
अलग अलग करू जाता, हाती काहीच उरत नाही...


निसर्ग पर्यटन हे एक फॅडच झालं आहे. कशासाठी जायचंय हेच मुळात माहीत नसतं, त्याची गरजही वाटत नाही. पर्यटन घडवून आणणारे मध्यस्थ एवढाल्या जाहिराती करतात. कासचंच उदाहरण घ्यायचं झालं तर इथं फुलणारी फुलं बहुतांशी जमिनीलगत फुलणारी, इवलाली, चिमुकली असतात; पण त्यांचे जे फोटो जाहिरातीसाठी वापरले जातात, त्यावरून बरेच लोक काश्मीरची ट्युलिप गार्डन पहायला निघालोय अशा आविर्भावात येतात आणि भ्रमनिरास झाला की भांडणं, शिव्याशाप ! फुलं तुडवून राग काढणं ओघानं आलंच. 
गेली दोन वर्षे कास पठारावर पाऊस आणि अन्य काही कारणांमुळे म्हणावा असा बहर नव्हता; पण पर्यटन मध्यस्थांनी जुने फोटो जाहिरातीत वापरून चांदी करायची ती करून घेतलीच. पुष्पपठाराची मात्र माती झाली.

(लेखिका पुष्पपठारांच्या अभ्यासक आहेत)


सौजन्य : भवताल (पाणी व पर्यावरण या विषयांना वाहिलेले मासिक)

seema_noolkar@yahoo.co.in

Web Title: Flowers give flowers easily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.