फोकस

By Admin | Published: January 31, 2015 06:29 PM2015-01-31T18:29:44+5:302015-01-31T18:29:44+5:30

एखादं पेंटिंग करून भिंतीवर लावणं आणि एखाद्या पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी चित्र तयार करणं ह्या दोन गोष्टींत फरक आहे. उद्देश तर वेगवेगळा असतोच, पण चित्राचं उपयोजनही वेगवेगळं असतं.

Focus | फोकस

फोकस

googlenewsNext

 चंद्रमोहन कुलकर्णी

 
एखादं पेंटिंग करून भिंतीवर लावणं आणि एखाद्या पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी चित्र तयार करणं ह्या दोन गोष्टींत फरक आहे. उद्देश तर वेगवेगळा असतोच, पण चित्राचं उपयोजनही वेगवेगळं असतं. पुस्तकाचं, लेखकाचं नाव, पुस्तकासंबंधी आणखी काही मजकूर, एखादा फोटो, विषयाशी संबंधित एखादं ग्राफिक अशा पुष्कळ गोष्टी असतात.
जाहिरातीसाठीच्या क्षेत्रातदेखील लिफ्लेट, फोल्डर, ब्रोशर वगैरेंच्या निर्मितीमध्ये कलात्मकतेपाठोपाठ तांत्रिक भागही मोठय़ा प्रमाणावर येतो. आर्टवर्क करणं हा एक मोठा व्याप असतो. हल्ली बहुतेक सगळी आर्टवर्क्‍स संगणकामार्फत होतात. चित्र छापायला द्यायचं असलं तर ते सीडीवर कॉपी करून किंवा पेन ड्राईव्हवर दिलं जातं. काही वेळेला ईमेलद्वारे पाठवलं जातं.
आर्टवर्क करणं ही गोष्ट पंचवीस-तीस वर्षांपूर्वी आजच्याइतकी सोपी आणि फास्ट नव्हती. बहुत पापड बेलने पडते थे! फार झगमग असायची. थोडं सोपं, खुलं करून सांगायचं झालं तर एखादं उदाहरण घेता येईल.
 
काळ : पंचवीस-तीस वर्षांपूर्वीचा. आपल्याला ‘लोकमत’च्या अंकाची जाहिरात करायचीय. जाहिरातीचा आकार, मजकूर ठरलाय. जाहिरातीत एखादं चित्र हवं असंही आर्ट डिरेक्टरनं सांगितलंय. चित्र, लेटरिंग, फोटो असं वेगवेगळ्या माणसांकडनं एकत्र करायचं. दिलेल्या आकारात हव्या त्याठिकाणी बसवताना त्यांचे आकार लहानमोठे झालेत असं लक्षात येतं.
आता? 
फोटो, जाहिरातीचा मजकूर, लेटरिंग ग्राफिक्स, चित्र असं जे जे काही त्या जाहिरातीत छापायचं असेल, त्याचे स्वतंत्र फोटो काढायचे, त्याचे आपल्याला हव्या त्या आकाराचे लहानमोठे करून प्रिंट्स काढायचे, एकत्र चिटकवायचे, की झाली जाहिरात तयार!!
 
वरवर पाहता हे सोपं.
नीट पाहिलं तर फार किचकट उद्योग! एकेकाळी हा उद्योग फार महत्त्वाचा होता. शिक्षित, निमशिक्षित, कुशल, अर्धकुशल, अडाणी, काही ठार निरक्षर; पण आपल्या कामात कमालीची तरबेज असलेली अशी अनेक प्रकारची माणसं ह्या उद्योगात होती. विशेष कौशल्य लागायचं!
 
..तर हा जो लेटरिंगचा, चित्राचा प्रिंट असतो, त्याला म्हणतात ब्रोमाइड. ही ब्रोमाइड काढण्यासाठी डार्करूम असणं अत्यावश्यक असतं. अँड एजन्सीकडे ती सोय असायची, पण आमच्यासारख्या फ्री लान्सर्सकडे कुठली आलीय तसली डार्करूम वगैरे!
पण असं काम करून देणार्‍या शहरात काही डार्करूम असत. तिथं ही ब्रोमाइडची सर्व्हिस मिळायची. आपलं आपलं काम-चित्र, फोटो, लेटरिंग, मजकूर - जे काही असेल ते तिथं घेऊन जायचं, त्याच्या निगेटिव्हज् काढून घ्यायच्या आणि त्यावरून हव्या त्या आकाराच्या ब्रोमाइड्स काढून घ्यायच्या!
 
ब्राह्मण मंगल कार्यालयाच्या शेजारी एक वाडा होता. त्या वाड्यात एक डार्करूम होती.
चालवणार्‍याचं नाव : शिंदे.
फाटका माणूस. प्रिंट-ब्रोमाइडचे साइजेस आणि गिर्‍हाइकांची नावं वेड्यावाकड्या अक्षरात कशीबशी लिहिता येत. बुद्धीनं तल्लख. फोटोग्राफी कोळून प्यायलेला.
 
तांबारलेले, मोठे डोळे, पिऊन मुळातला गोल चेहरा सुजलेला. सतत पिणार्‍या माणसाच्या गालावर एक विशिष्ट प्रकारची लालसर चमकदार सूज असते तशी सूज. उरलेल्या चेहर्‍यावर देवीचे व्रण, डोईवरचे पातळ केस. केली-न केली अशी विरळ दाढी, कधी कधी एकदमच चकाचक साफ केलेली. ओठांच्या खालपर्यंत मिशीचे काही रेंगाळते केस. कामात नसला, तर चेहर्‍यावर दिलखुलास हसू. कामात असला तर मात्र तुमच्याकडे ढुंकूनही पाहणार नाही. फिकट ग्रे रंगाचा सफारी किंवा मग फिकटच रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट आणि त्याच रंगांची पँट (बेल बॉटम!).
मळके कपडे, फाटक्या चपला. हातात पेटती बिडी. ऐश करायची असली तरच सिगरेट, तीही चारमिनार!
डार्करूममध्ये सिगरेट-बिडी चालायची नाही म्हणून आणि तशीच रेटून ओढली तरी तल्लफ भागत नाही, म्हणून दर अध्र्यापाऊण तासानं शिंदे सरकार डार्करूमच्या बाहेर यायचे.
 
शिंदेचा दुधाचा धंदा होता. पिशव्या टाकायचा हा आणि बायको मिळून. दुधाचं एक केंद्रही चालवायचे.
कधीतरी प्रचंड पहाटे उठायला लागायचं त्याला. पहाटे उठून पिशव्या, केंद्र, काय मुलांच्या शाळाबिळा असतील ते मार्गी लावून डबा घेऊन साडेआठलाच यायचा डार्करूमवर.
 
असाच मी एकदा गेलो सकाळी सर्वात लवकर. खूप काम होतं. प्रचंड अर्जंट, कॉम्प्लिकेटेड.
 
मी आणि तो वाड्यात शिरायला एकच गाठ पडली. ‘परांजप्यां’चं काम असलं की पुढच्या इतरांच्या नेहमीच्या रूटीन कामावर जरा परिणाम होतो, ह्याची सगळ्यांना कल्पना असायची, म्हणून खरंच अर्जंट असेल तरच परांजपे कोड वापरायचा असं ठरलेलं होतं.
 
शिंदेची नजर फोटोग्राफीची होती. तीक्ष्ण. माझी अगतिकता ओळखली असावी त्यानं. ‘‘काय, परांजपे का?’’
दिलखुलास हसत शिंदेनं स्वत:च विचारलं.
माझ्या बॅगकडे हात करून म्हणाला,
‘‘बघू, काय आणलंय’’
मी दाखवलं.
निगेटिव्ह जुन्या होत्या हे खरं होतं, पण आउट ऑफ फोकस नव्हत्या हे मला माहीत होतं.
मी तसं बोललो, तर तो म्हणाला,
‘‘मग माज्या एनलार्जरला काहीतरी प्रॉब्लेम आसंल. फोकस होत नाय्ये.’’
मला ते काही सांगता येईना.
खूप प्रिंट्स काढून झाल्या. 
अंडरएक्सपोज, ओव्हरएक्सपोज, काही कमी जास्त डेव्हलप करून वगैरे, जे जे करता येईल ते ते सगळं करून पाहिलं. प्रिंट्स काही शार्प येईनात. सगळे आउट येत होते. अस्पष्ट. बारीक अक्षर होतं, प्रिंट्स चांगले, शार्प यायलाच पाहिजे होते.
खूप कष्ट केले शिंदेनं. डोळ्यावर ताण पडून शिंदे काम करता करता आता डुलक्या खाऊ लागला.
मला कळेना असं काय होतंय ते! 
जरा वेळानं म्हणाला, ‘‘आर्टिस. खरं सांगू का, रात्री लय जाग्रण झालंय. भउतेक त्यामुळं बी आसंल, फोकस व्हायला प्रॉब्लेम येतोय. उद्या करू.’’
मी सटपटलोच. हवा टाईट झाली माझी. 
म्हटलं, ‘‘येडायस का. उद्या? मला मरायची पाळी येईल. आत्ताच करावं लागेल.’’
 
शिंदेला सीरियसनेस कळला. अचानकच त्यानं डार्करूममधले सगळे लाइट लावले. बनियनवर होता, तो शर्ट घालू लागला. शर्ट घालता घालता म्हणाला, ‘‘तुम्ही हितं आतच थांबा. आता पब्लिक यायला सुरुवात होईल. मी आलोच. कडी लावून घ्या आतनं. कुणी आलं तर दरवाजा उघडू नका.’’
माझ्या प्रतिसादाची यत्किंचतही अपेक्षा न करता  शिंदे बाहेर गेलासुद्धा होता निघून! 
मी आतून कडी लावून बाहेरचा अंदाज घेत बराच वेळ गप्प बसून राहिलो होतो. कुणीच आलं नाही. बराच वेळ गेल्यानंतर बाहेर खुडबुड झाली आणि दारावर जोरात थाप पडली.
मी झटक्यात उठलो. हलक्या हातानं कडी उघडून अंदाज घेण्याच्या बेतात होतो तेवढय़ात शिंदेनच दार जोरात बाहेर ओढलं आणि वार्‍याच्या चपळाईनं आत शिरला. एका हातानं कडी लावता लावता दुसर्‍या हातानं शर्टाची बटणं ओढून शर्ट खुंटीला अडकवला, नि झपझप एनलार्जर वरखाली करू लागला. मला कळलं होतं, शिंदे कुठं गेला होता ते. शिंदे गेला होता अड्डय़ावर. पावशेर चढवून आला होता हातभट्टीची!!
 
सगळ्या खिडक्या बंद असलेल्या डार्करूमच्या त्या बाथरूमएवढय़ा जागेत हातभट्टीच्या वासाचा घमघमाट सुटला होता आणि मुख्य म्हणजे शिंदे आता झपाझपा काम करू लागला होता.
 
आता मात्र फोकस शंभर टक्के लागला होता. झकास. शिंदेनं तसं तात्काळ जाहीर केलं. निगेटिव्ह खराब वगैरे काही नव्हत्या. झोप न झाल्यानं शिंदेचं कामात लक्ष लागत नव्हतं आणि अर्थातच प्रिंट्स आउट ऑफ फोकस होत होत्या.
पावशेर हातभट्टी घेतल्या घेतल्या शिंदेचं डोकं ठिकाणावर आलं, तशी नजरही!
तिथून पुढचा सर्व वेळ तोंडातून चकार शब्द न काढता शिंदे फक्त प्रिंट्स काढत होता.
शंभर टक्के शार्प, काळेकुळकुळीत प्रिंट्स!
पाऊणएक तासानं सुमारे पंचवीसेएक निरनिराळ्या आकाराचे प्रिंट्स घेऊन मी बाहेर पडलोसुद्धा होतो.
परांजप्यांचे प्रिंट्स!!
 
 
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)

Web Title: Focus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.