‘पोटातले’ परराष्ट्र संबंध

By admin | Published: October 8, 2016 04:35 PM2016-10-08T16:35:53+5:302016-10-08T16:35:53+5:30

चिंच मूळची आफ्रिकेची; पण भारतात चिंचेचं सर्वाधिक उत्पादन होतं. भारतीय चिंच जगभर जाते आणि आपल्याला विदेश मुद्राही देते. भारताच्या ‘मसाला महामार्गाला’ तर कोणीच विसरणं शक्य नाही. भारतीय गुलामगिरीची मुळं तिथपर्यंत पोहोचतात. भाजीपाल्याचा प्रवास भौगोलिक आणि ऐतिहासिक दोन्हीही आहे. भाजीपाल्यांनी जग जोडलं गेलं आहे. आपले मसाले, खाद्यपदार्थ, योग आणि आयुर्वेदाच्या सोबतीने जग पादाक्रांत करायचे मनसुबे रचले जाताहेत...

Foreign relations in the 'stomach' | ‘पोटातले’ परराष्ट्र संबंध

‘पोटातले’ परराष्ट्र संबंध

Next
-  ज्ञानेश्वर मुळे


शामी कबाब’ किंवा ‘शम्मी कबाब’ हा कबाबचा एक प्रकार तुम्ही ऐकला असणार. पण हा ‘शामी’ किंवा ‘शम्मी’ शब्दांचा उगम कुठे झाला हे माहिती आहे का? सीरियात त्याचा उगम झाल्याचं कळालं. ‘शामी’चा आपल्या ‘राम और श्याम’ किंवा ‘संध्याकाळ’ यांच्याशी संबंध नाही. ‘शाम’ म्हणजे दमास्कस आणि आजूबाजूचा प्रदेश. पण खरी गंमत तर वेगळीच आहे. आमच्या सीरियन मित्रांसमवेत भोजन घेत असताना त्यांनी मला विचारलं, ‘या कबाबाला भारतात काय म्हणतात?’ 
मी सांगितलं, ‘शामी कबाब’. 
ते म्हणाले, ‘आता सांगा, या कबाबाला आम्ही सीरियन लोक काय म्हणतो?’ त्यावर मीच प्रतिप्रश्न विचारला, ‘काय म्हणता?’ ते म्हणाले, ‘आम्ही या कबाबाला ‘कबाब हिंदी’ म्हणतो.’ थोडक्यात, भारतात आपण ज्याला ‘शामी (दमास्कस) कबाब’ म्हणतो त्या कबाबाला दमास्कसचे लोक ‘हिंदी कबाब’ म्हणजे ‘भारतीय कबाब’ असं संबोधतात.
सीरियाहून पर्शियामार्गे कबाब आपल्याकडे आला, की आपल्याकडून कंदाहार-बगदादमार्गे दमास्कसला गेला? उत्तर काहीही असो, खाण्यापिण्याच्या वस्तूंचा आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा केवढा जवळचा संबंध आहे हे यावरून लक्षात येतं. पण भाजीपाला असो वा फळफळावळ, मसाले असोत वा खाद्यपदार्थ या सर्वांचा आंतरराष्ट्रीय संबंधांशी आणि विदेशी धोरणाशी खोल संबंध असतो हे नि:संशय!
सीरियामध्येच आणखी काही गोष्टी समजल्या. त्यातली एक म्हणजे ‘टॅमरिंड’ या इंग्रजीतल्या चिंचेसाठी असलेल्या प्रतिशब्दाची व्युत्पत्ती. टॅमरिंडला अरबी भाषेत ‘तमार हिंदी’ असं म्हणतात. याचा शब्दश: अर्थ ‘भारतीय खजूर’ असा होतो. चिंच मूळची आफ्रिकेची; पण तिनं हजारो वर्षांपासून भारताला आपलं घर मानलंय. भारतात चिंचेचं सर्वात जास्त उत्पादन होतं. आता तर भारतीय चिंच जगभर जाते आणि आपल्याला विदेश मुद्रा देण्याचं कामही करते.
भारताचा इतिहास ‘मसाला महामार्ग’ किंवा ‘स्पाईस रूट’ या महत्त्वाच्या प्रवासाला विसरणं शक्य नाही. खूप प्राचीन काळापासून भारत हा मसाल्याचं केंद्र म्हणून ओळखला जातो. रोमन-ग्रीक साम्राज्यापासून अरब देशासह अन्य अनेक देशांना इथून मसाले जायचे. आॅटोमन साम्राज्याच्या उदयानंतर इस्तंबुलचा जवळचा रस्ता बंद झाला. त्यामुळे युरोपचे व्यापारी आणि समाज अस्वस्थ झाले. खरं तर मसाल्यांना शोधण्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्याचे प्रयत्नही सुरू झाले आणि वास्को-द-गामाला पोर्तुगालहून आफ्रिकेमार्गे भारतात यायला तब्बल सहा वर्षं लागली. त्यानंतरची सत्ता स्पर्धा आणि भारताची गुलामगिरी आपल्या परिचयाची आहे. केवळ मसाल्यांमुळं आपण पराधीन झालो. जीवनात आणि जेवणात मसाला महत्त्वाचा; पण तो आंतरराष्ट्रीय राजकारणातही महत्त्वाचा आहे ही मोठी गंमत आहे.
भाजीपाल्याचा प्रवास भौगोलिक आणि ऐतिहासिक दोन्हीही आहे. खरं तर भाजीपाल्यांनी जग जोडलं गेलं आहे. आपल्या दररोजच्या जीवनात बटाटा आणि टोमॅटो यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. पण हे ‘पोटॅटो’ आणि ‘टोमॅटो’ आले कुठून? जगातल्या सगळ्यांत पोटॅटोचा मूळ पुरुष दक्षिण पेरूआणि उत्तर बोलिव्हिया इथं होता. ‘बटाटा’ या शब्दाची व्युत्पत्ती स्पॅनिश भाषेतल्या ‘पटाटा’ या शब्दापासून झाली. आपला आणि दक्षिण अमेरिकेचा हा दुवा कित्येक शतकांचा आहे. 
जसं बटाट्याचं तेच टोमॅटोचं. दक्षिण अमेरिकेत ‘अ‍ॅझटेक’ संस्कृतीत टोमॅटोची मुळं सापडतात. मूळ शब्द ‘नाहूटाक’याचा अर्थ ‘फुगणारं फळ’ असा होतो. तिथून स्पॅनिश भाषेत घुसून आता हा शब्द जगभर राज्य करतोय.
अजून एक साधं उदाहरण. हिंदीतला ‘सब्जी’ (भाजी) हा शब्द आला कुठून? हा शब्दच मुळी पर्शियन भाषेतून आला. ‘सब्ज’ म्हणजे ‘हिरवा’ असा अर्थ आहे. आपण येता-जाता मॅकडोनाल्ड आणि कोकाकोला यांच्या जाहिराती बघतो. आता आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही. पण मॅकडोनाल्ड आणि कोकाकोला दोन्ही अमेरिकन संस्कृतीच्या जागतिक प्रभावाची प्रतीकं आहेत. फक्त जाहिरात आणि वेगळ्या पद्धतीचं सादरीकरण यांच्या ताकदीवर खाण्यापिण्याच्या वस्तू केवढ्या मोठ्या प्रमाणात जगभर विकल्या जातात याचं हे उत्तम उदाहरण आहे. 
मास्कोतली जुनी सोव्हिएट सत्ता कोसळली आणि नवा रशिया आकाराला येऊ लागला, तेव्हा पहिल्यांदा पिझ्झा हट आणि मॅकडोनाल्ड यांची ‘स्थापना’ रशियात झाली. त्यांची रशियातली सुरुवात ही भांडवलशाहीचा साम्यवादावरचा म्हणजे पर्यायानं पाश्चिमात्य संस्कृतीचा रशियन संस्कृतीवरचा विजय आहे असं विश्लेषणही केलं गेलं. खाद्यसंस्कृती आंतरराष्ट्रीय राजकारणात केवढी महत्त्वाची आहे त्याचं हे सार्थ उदाहरण.
आंतरराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीत चीन, मेक्सिको, इटली, फ्रान्स आणि जपान इत्यादि देशांनी स्वत:ची छाप बसवलेली आहे. या जागतिक खाद्यमहासत्तांच्या मध्ये भारताला महत्त्वाचे स्थान मिळत आहे. मध्यंतरी ‘हण्ड्रेड फूट जर्नी’ नावाचा चित्रपट आला होता. त्याचा विषय भारत आणि फ्रान्स यांच्या खाद्यसंस्कृतीचा संघर्ष आणि शेवटी त्यातून एकमेकांविषयी वाटणारी आपुलकी यांचं फार सुंदर चित्रण आलं आहे.
भारतीय खाद्यसंस्कृतीनं प्रभावित झालेले लोक मला सर्वत्र भेटताहेत. इंग्लंडनं तर तंदुरी चिकनला आपला राष्ट्रीय खाद्यपदार्थ म्हणून मान्यता दिली आहे. इंग्लंड असो वा अमेरिका, स्वत:ची म्हणून काही खास प्रभावी खाद्यसंस्कृती त्यांच्याकडे नाही. सँडविच, बर्गर यांना खाद्य मानायला माझं मन तरी धजत नाही. आमच्या बटाटावड्याला. ढोकळ्याला, पाणीपुरीला आणि चौपाटीवरच्या भेळीला ‘तोंड’ देऊ शकेल असे पाश्चात्त्य खाद्यसंस्कृतीत मला तरी काहीच दिसत नाही. आपले मसाले आणि खाद्यपदार्थ, योग आणि आयुर्वेदाच्या सोबतीने जग पादाक्रांत करायचे मनसुबे रचताहेत. भारतीय खाद्यसाम्राज्याचा विस्तार करताहेत!


भारतीय खाद्यसंस्कृतीचा जगभरावर प्रभाव 
भारतीय खाद्यसंस्कृती हळूहळू भारताचा जगभरचा प्रभाव वाढवायला मदत करते आहे. केवळ न्यू यॉर्क आणि जवळच्या न्यू जर्सी शहरात दोनशेच्या वर खाद्यगृहं आहेत. पंजाबी खाना देणारी खाद्यगृहं पूर्वीपासून आहेतच; पण दाक्षिणात्य मसाला डोसा आणि चवदार इडली देऊन तृप्त करणारी न्यू यॉर्कमधली ‘सर्वना’ रेस्टॉरण्ट्सदेखील प्रसिद्ध आहेत. जॅकसन हाईट असो व न्यू जर्सीतला ओक ट्री रोड असो, भारतीय खाद्यगृहांनी गजबजलेले अनेक भाग अमेरिकेत आहेत. न्यू यॉर्कमध्ये तुलसी, चोला, हंडी, लोटा, अवध बॉम्बे अशा पाट्या अमेरिकेतल्या भारताच्या लोकप्रियतेची साक्ष देताहेत. 

(लेखक भारतीय परराष्ट्रसेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत.)

dmulay58@gmail.com

Web Title: Foreign relations in the 'stomach'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.