शांतीचे अग्रदूत

By admin | Published: October 18, 2014 02:20 PM2014-10-18T14:20:55+5:302014-10-18T14:20:55+5:30

बालमजुरीच्या विरोधात संघर्ष करून लहानग्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झगडणारे कैलाश सत्यार्थी आणि दहशतवाद्यांच्या दडपशाहीला न जुमानता मुलींच्या शिक्षणासाठी उभी राहत जगासाठी रोल मॉडेल बनलेली मलाला हे दोघेही शांततेच्याच वाटेने जाणारे वारकरी. त्यांना नुकताच विभागून नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने..

The forerunner of peace | शांतीचे अग्रदूत

शांतीचे अग्रदूत

Next
>- जयशंकर गुप्त
 
त्याचं वय तेव्हा अवघं सहा ते सात वर्षांचं. मध्य प्रदेशमधील विदिशा येथे शालेय शिक्षण घेत असताना, आपल्याच वयाचा मुलगा ढाब्यावर काम करत आहे हे पाहून वडिलांकडे तक्रार केली. गरीब घरचा मुलगा असेल तर काम करण्यासाठीच त्याचा जन्म असतो अशी वडिलांनी समजूत काढली. तेव्हा या जिज्ञासू मुलाने शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्याशीही या विषयावर चर्चा केली, पण त्याचे समाधान झाले नाही. या छोट्याशा घटनेने त्या मुलाच्या जीवनाची दिशा बदलून टाकली होती. तेव्हाच त्याने ठरविले, की मोठा झाल्यावर बालमजुरी विरोधात काम करेन. हाच मुलगा म्हणजे, वयाची साठी ओलांडलेला कैलाश सत्यार्थी. 
बालमजुरी आणि मानव तस्करीच्या विरोधात मागील तीन ते साडेतीन दशकांच्या संघर्षानंतर त्यांनी भारतातील जवळपास ८0 हजार बालमजुरांना त्यांनी मुक्त केले आहे. शांततेसाठी दिल्या जाणार्‍या नोबेल पुरस्कारासाठी निवड करून नॉर्वेमधील नोबेल पुरस्कार समितीने त्यांच्या कार्याचा फार मोठा गौरव केला आहे. सत्यार्थी यांना यापूर्वीही अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नोबेल पुरस्कारासाठीही त्यांच्या नावाची चर्चा याआधी अनेकदा झाली आहे.  जेव्हा त्यांच्या ‘बचपन बचाओ’ आंदोलनातील एका सहकार्‍याने सांगितले, की तुमची मलालाबरोबर संयुक्तपणे नोबेल पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तेव्हा देशातील इतर लोकांप्रमाणे त्याचाही यावर विश्‍वास बसला नाही. ते म्हणाले, की कोणीतरी आपल्याला वेडे बनवत असेल. परंतु त्यानंतर देश-विदेशातील मित्रमंडळी, शुभचिंतक आणि माध्यमांमधील लोकांचे फोन यायला लागले. शुभेच्छा देणारे आणि प्रतिक्रियेसाठी धडपडणार्‍यांची मोठी रांग लागली. 
डॉ. राममनोहर लोहिया यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या कैलाश सत्यार्थी (शर्मा) यांच्या म्हणण्यानुसार बालअत्याचार माणुसकीच्या विरोधातील गुन्हा आहे. इथे तर माणुसकीलाच आव्हान निर्माण झाले आहे. आणखीन बरेच काम बाकी आहे.  मला मिळत असलेला नोबेल पुरस्कार १२५ कोटी भारतीय आणि गुलामीत अडकलेल्या मुलांचा सन्मान आहे. पुरस्कारामुळे आता जगभरातील जवळपास १७ कोटी मुलांना बालअत्याचारातून मुक्त करण्याची माझी जबाबदारी वाढली आहे. आम्ही तीन दशकांपूर्वी भारतातील बालमजुरीच्या विरोधात काम करायला सुरुवात केली. हळूहळू हा मुद्दा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय होत गेला. गरिबी आणि निरक्षरता हेच बालकामगारांचे मुख्य कारण आहे. पुरस्कार मिळाल्यामुळे आता मजुरी रोखण्यासाठी सरकारही काही करेल अशी आशा आहे.  
     बालमजुरीच्या विरोधात तीन ते साडेतीन दशकांपासून सक्रियपणे लढणार्‍या सत्यार्थी यांचा जन्म मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात ११ जानेवारी १९५४ मध्ये मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. आता ते आपली पत्नी, मुलगा व सून यांच्याबरोबर दिल्लीत राहतात. त्यांचे मोठे बंधू जगमोहन शर्मा सांगतात, की आर्य समाजाच्या ज्वलंत समस्यांवर सत्यार्थी नावाने त्यांचे काही लेख प्रसिद्ध झाले आहेत, त्यानंतर त्यांच्या नावापुढील शर्मा बाजूला जाऊन सत्यार्थी ही त्यांची ओळख झाली. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात इलेक्ट्रॉनिक इंजिनियर म्हणून केली होती. तेव्हापासूनच ते आर्य समाज आणि समाजवादी आंदोलनात सक्रिय होते. जातिव्यवस्थेवर त्यांचा कधीच विश्‍वास नव्हता.  विद्यार्थीअवस्थेत असताना एक दिवस त्यांनी विदिशामधील अस्पृश्य दलितांकडून स्वयंपाक बनवून घेऊन त्यांच्यासोबत जेवण केले होते. सन १९८0मध्ये २६ वर्षांचे असताना त्यांनी नोकरी सोडून दिली आणि दिल्लीमध्ये येऊन बंधुआ मुक्ती मोर्चामध्ये वेठबिगारी कामगारांची मुक्ती आणि बालमजुरांच्या मुक्ती आणि बाल अधिकार यासाठी काम करणे सुरूकेले होते. काही दिवसांनी काही कारणांनी वादविवाद झाल्याने सत्यार्थी स्वामी अग्निवेश यांच्यापासून वेगळे झाले. त्यानंतर सत्यार्थी यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर ‘बचपन बचाओ आंदोलना’चे काम आणि त्याच्या शाखांचा देश-विदेशात विस्तार व्हायला लागला. हे अभियान सुरूकेल्यानंतर काही काळातच बालमजुरी आणि मुलांचे लैंगिक शोषण यांचे प्रमाण जास्त असल्याने या मुलांना यातून वाचविल्यानंतर सरकारमार्फत त्यांना उच्चशिक्षण मिळावे तसेच त्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी व्यवस्थेविरोधात लढा उभा केला. दिल्ली तसेच मुंबईसारख्या मोठय़ा शहरांतील कारखान्यांमध्ये मुलांचे होणारे शोषण यामुळे ओडिशा आणि झारखंडसारख्या भागातही त्यांच्या संस्थेने अनेक लहान मुलांना बालमजुरीपासून मुक्त केले आहे. या सर्व संघर्षामध्ये त्यांच्या दोन कार्यकर्त्यांचे प्राण गेले असून, त्यांच्यावरही अनेकदा प्राणघातक हल्ले झाले आहेत. त्यांच्या नोबेल पुरस्काराने प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली आहे. 
(लेखक लोकमत समाचारचे वरिष्ठ ब्युरो चीफ आहेत.)
 
 
 
 
संजय मेश्राम
 
 
किस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमेवर असलेल्या स्वात खोर्‍यात राहून मुलींच्या शिक्षणासाठी कार्य करणारी एक सामान्य मुलगी म्हणजे मलाला युसूफझई. मलाला हा शब्द मलाल या शब्दापासून तयार झाला आहे. मलाला म्हणजे शोकमग्न. मग असा अर्थ असलेले नाव तिच्या वडिलांना का ठेवावेसे वाटले असावे? तर अफगाणिस्तानच्या लढय़ात मलालाई नावाच्या एका युवतीने असामान्य लढा दिला होता. तिचे नाव आजही तिथे आदराने घेतले जाते. त्यामुळेच अफगाणिस्तानमध्ये मलालाई तर पाकिस्तानमध्ये मलाला. मलालाचे वडील झियाउद्दीन युसूफझई हे सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक आणि कवी म्हणून स्वात खोर्‍यात प्रसिद्ध आहेत. मिंगोरा हे त्यांचे गाव. झियाउद्दीन यांनी या भागात शाळा काढली.  
२00४च्या सुमारास अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवाद्यांचा उदय झाला. त्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. हळूहळू त्याचे लोण सीमेपलीकडे पाकिस्तानातही पोहोचले. पुढे २00८ मध्ये तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या नावाने तालिबानी स्वात खोर्‍यात सक्रिय झाले. स्वातमधील तालिबानचा प्रमुख मुल्ला फझलुल्ला हा खासगी रेडिओवरून रोज प्रवचन द्यायचा. काय करावे, काय करू नये याची आचारसंहिता सांगू लागला. याचीच पुढची पायरी म्हणजे मुलींच्या शिक्षणावर बंदी. तालिबानींनी थेट मुलींच्या शाळाच बंद ठेवण्याचे आदेश दिले. अखेर शाळा बंद पडल्या. मलालाही घरीच राहू लागली. शाळांच्या इमारती उद्ध्वस्त करण्यात आल्या. तालिबान्यांचा थैमान सुरू असताना मलालाला स्वस्थ बसवत नव्हते. काही दिवसांनी चौथीपर्यंतच्या शाळा सुरू ठेवण्यास मुभा मिळाली. मलाला पाचवीत असतानाही पुस्तके ओढणीखाली लपवून शाळेत जायची. कुणी विचारलंच काही तर मी चौथ्या वर्गात आहे, असं सांगायचं, असं तिनं मनातच ठरवलं होतं. तिला शिकायची खूप जिद्द होती.
अशातच बीबीसीच्या अधिकार्‍यांना एक कल्पना सुचली. तालिबानींच्या या सावटाखाली जगणार्‍या एखाद्या मुलीने डायरी लिहावी अन् ती बीबीसीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. कुणीच तयार न झाल्यामुळे मलाला तयार झाली. तिने जीव धोक्यात घातला होता. ती होतीच धाडसी. ३ जानेवारी २00९ ला तिने डायरीचा पहिला भाग लिहिला. शाळेला जायला कशी तयारी केली, शाळेत काय घडले, घरी परततताना काय अनुभव आला..अशा गोष्टींबद्दल ती सहजतेने लिहायची. कुटुंबीयांसोबत कुठे सहलीला गेली, तिथे काय घडले.. नवीन शहर कसे वाटले.. रात्रभर गोळीबाराच्या फैरी चालू होत्या. झोप आली नाही.. अशा गोष्टींचे वर्णन तिने डायरीत केले आहे. यातून तालिबानी अत्याचाराचा खरा चेहरा तिने बालसुलभ अनुभवातून जगासमोर मांडला. १२ मार्च २00९ या तारखेला मलालाने डायरीचा शेवटचा भाग लिहिला होता. डायरीचे ३८ भाग वाचून सारे जगच ढवळून निघाले. खुद्द स्वात खोर्‍यातही कुणालाच माहीत नव्हते की ही डायरी लिहिणारी मुलगी कोण? कारण ती ‘गुलमकई’ या टोपणनावाने डायरी लिहायची. तिचे वडील तिला एकदा प्रेस क्लबच्या कार्यक्रमात घेऊन गेले. तेथे तिने मोठय़ा माणसासारखे धाडस दाखवत शिक्षणाबद्दल विचार मांडले. ती म्हणाली, ‘‘मला शिकण्याचा अधिकार आहे, खेळण्याचा अधिकार आहे, गाण्याचा अधिकार आहे. बोलण्याचा, मतं मांडण्याचा अधिकार आहे.. आणि माझा अधिकार कुणी कसे हिरावून घेऊ शकतात. मला जमिनीवर बसावे लागले तरी चालेल; पण मला शिक्षण घेण्यापासून तालिबानीच काय, कुणीही रोखू शकणार नाही. मी शिकणार म्हणजे शिकणारच.’’ वडील तर कायम तिच्या पाठीशी होतेच. तिने दोन वर्षे युनिसेफच्या मार्गदर्शनाखाली चालणार्‍या जिल्हा बाल परिषदेची अध्यक्ष म्हणून शिक्षणाच्या जागृतीसाठी कार्य केले.
डायरी लिहिणारी गुलमकई म्हणजेच मलाला हे आता सार्‍यांनाच कळून चुकले होते.  तिच्या धाडसाचे वृत्त तालिबानींपर्यंत पोहोचले. तालिबानी तिला सारखे धमक्या द्यायचे. अखेर जी भीती होती तेच झाले.
मंगळवार, दि. ९ ऑक्टोबर २0१२ हा दिवस. नेहमीसारखाच वाटणारा हा दिवस नेहमीसारखा नव्हता. शाळेतून परतत असताना तालिबानींनी स्कूलबस थांबवली. ‘तुमच्यापैकी मलाला कोण?’ असे विचारले. तिने ‘मी आहे मलाला’ असे सांगताच तिच्यावर गोळ्या झाडून तालिबानी पळून गेले. सुरुवातीला पाकिस्तानमध्येच उपचार केल्यानंतर तिला इंग्लंडमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. तिचे आईवडील, भाऊ मात्र लगेच सोबत जाऊ शकले नाहीत. डोक्यात गोळी लागल्याने कवटी फुटली; पण मेंदूला इजा झाली नाही. उपचारांना ती योग्य प्रतिसाद देत होती. आठ दिवसांनंतर ती शुद्धीवर आली. हा एक चमत्कारच होता. 
धोका टळला होता. डॉक्टरांना यश येत होते. मलाला बरी होती. तिच्या कवटीच्या काही भागात धातूची प्लेट आठ स्क्रूच्या मदतीने बसविण्यात आली. मलालावर हल्ला झाल्यानंतर जगभरातील नागरिक, मुले, मुली रस्त्यावर उतरले. हल्लेखोरांचा निषेध आणि मलालासाठी प्रार्थना केल्या जाऊ लागल्या.
मलाला हळूहळू बरी झाली. या धक्क्यातून ती सावरली. बर्मिंगहॅममध्येच तिने शाळेत प्रवेश घेतला. तिच्या वडिलांची संयुक्त राष्ट्रसंघाने विशेष प्रकल्पासाठी नियक्ती केली. संयुक्त राष्ट्रसंघात तिला भाषण करण्याची संधी मिळाली. तिने सांगितले की, मी तीच मलाला आहे, शिक्षणाच्या हक्कांविषयी बोलणारी. मला माझ्या स्वप्नांपासून कुणीही परावृत्त करू शकत नाही. जगातील प्रत्येक मुलामुलींना शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळालाच पाहिजे. आम्हाला स्वातंत्र्य हवे याचा अर्थ आम्ही पालक, पती यांचा अनादर करतो, असे नाही; पण आम्हाला आमचे निर्णय घेण्याचा अधिकार हवा.
मलालाला शांततेसाठीचा मिळालेला नोबेल पुरस्कार ही तिच्या कार्याची पावती आहे. तिच्या कार्याला सलाम आहे. या पुरस्कारामुळे तिच्या कार्याला अधिकच गती येईल, तिच्यासारख्याच तिच्या वयाच्या मुलींना यातून प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा करू या. मलाला म्हणते, तालिबानींनी गोळ्या घातल्या ती ही मुलगी, अशी ओळख मला नको आहे. शिक्षणासाठी संघर्ष करणारी मुलगी म्हणून ओळखले जावे.

Web Title: The forerunner of peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.