चीनमध्ये उभी राहाते आहे फॉरेस्ट सिटी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 03:34 PM2018-02-17T15:34:47+5:302018-02-18T06:43:23+5:30
भारत आणि चीन या दोन्ही ‘शेजारी महासत्ता’ भौतिक विकासाच्या शर्यतीत निसर्गावर घातल्या जाणाºया घावांनी घायाळ आहेत. दोन्हीकडे आ वासून असलेले अक्राळविक्राळ प्रश्न आहेत आणि उत्तरे शोधण्याची तातडीची अपरिहार्यताही! ...याच शर्यतीतली ही दोन चित्रे!
- पवन देशपांडे
कचरा जाळल्याने २ लाख ७० हजार लोकांचा बळी गेला... औद्योगिक क्षेत्रात वापरल्या जाणाºया कोळशाच्या धुरामुळे ८२ हजार जणांचा जीव गेला... औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमुळे ८३ हजार आणि शेतीतील तणकट जाळल्याने ६६ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला... रस्त्यांवर धावणाºया गाड्यांमुळे होणाºया प्रदूषणातून २३ हजार तर धूरकणांमुळे १ लाखावर लोक प्राणास मुकले...
भारतात एकूण ११ लाखांवर बळी एकट्या वायू प्रदूषणाने घेतल्याची ही धक्कादायक आकडेवारी आहे आजपासून तीन वर्षांपूर्वीची!
वायू प्रदूषणामुळे आजारी पडणाºयांची आणि त्यातून अकाली मृत्यू होणाºयांची संख्या येत्या काही वर्षांत दुप्पट होईल, असा इशाराही ‘हेल्थ इफेक्ट्स आॅफ इंडिया’ या संस्थेने काही दिवसांपूर्वी दिला होता. याशिवाय दिल्लीचा श्वास गुदमरतोय... दिल्लीचे गॅस चेंबर झालेय.. अशा मथळ्यांच्या बातम्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये सर्वत्र धोक्याचा नगारा वाजविला.
पण त्यानंतर झाले काय? - काहीच नाही!
ना कोणते उपाय योजले गेले, ना कोणत्या वायू प्रदूषणावर आळा घातला गेला.
सध्याची राजकीय मानसिकता पाहता काही होण्याची शक्यताही नाही. भारतातील ही स्थिती इतकी भयंकर आहे की, जे वायू प्रदूषणामुळे अकाली प्राण गमावत आहेत त्यांची गणतीही केली जात नाही. कारण हे मृत्यू कधी फुप्फुसाच्या आजाराचे असतात कधी हृदयरोगाचे असतात... पण याचं मूळ वायू प्रदूषणात आहे. चीनमध्ये याहीपेक्षा परिस्थिती भयंकर आहे़ तीन वर्षांपूर्वीच्या आकडेवारीनुसार चीनमध्येही ११ लाखांहून अधिक बळी एकट्या वायू प्रदूषणाने गेले आहेत़ या अवाढव्य देशात दररोज साडेचार हजार बळी केवळ एकट्या वायू प्रदूषणामुळे जात असल्याची धक्कादायक आकडेवारीही समोर आलेली आहे़ पण, आपल्या या सर्वांत मोठ्या शेजारी देशाने मात्र वायू प्रदूषणाच्या फटक्यातून धडा घेतल्याचे आणि त्यावर उपाय सुरू केल्याचे दिसत आहे. दरवर्षी होणाºया वायू प्रदूषणावर उपाय शोधण्यासाठी चीनने आता एक नवीन शक्कल लढवली आहे.
सिमेंटचे जंगल उभे करत असताना कत्तल होणाºया झाडांची संख्या अधिक असते. जगभरात आतापर्यंत जो काही विकास झालाय, तो याच पद्धतीने होत आला आहे. पण चीन आता जेवढी घरे, त्यापेक्षा कैक पटीने झाडेही उभी करणार आहे. यासाठी एक नवीन संकल्पना समोर आली आहे. सध्या या संकल्पनेने जगभरात धूम निर्माण केली आहे.
ही संकल्पना आहे ‘फॉरेस्ट सिटी’ उभी करण्याची. जगातील पहिली ‘फॉरेस्ट सिटी’ निर्माण करण्याची तयारी चीनने सुरू केली असून, वाढत्या प्रदूषणावर हा एक उत्तम उपाय असल्याचा चीनचा दावा आहे. प्रत्येक इमारतीवर, प्रत्येक घराच्या गॅलरीत मोठमोठी झाडे लावण्यात येणार आहेत. अनेक छोटी झाडेही त्यात असणार आहेत. लिउझो फॉरेस्ट सिटी असे या जंगलाच्या चिनी शहराचे नाव आहे़ (अधिक तपशील चौकटीत) ही संकल्पना ज्या प्रांतात प्रत्यक्षात साकारली जाणार आहे, तेथे जवळच नदी आहे. बाजूला जंगलही आहे.
यामुळे त्या जंगलाला लागूनच एक वृक्षांनी गजबजलेल्या इमारतींचे उभे जंगल साकारले जाणार आहे. इटलीचे प्रसिद्ध वास्तुविशारद स्टिफॅनो बोरी यांनी हे डिझाइन तयार केले आहे.
- याच प्रकारची सहा ते आठ शहरे चीनमध्ये २०२० पर्यंत विविध ठिकाणी उभारण्याचा सरकारचा मानस आहे आणि त्यासाठी त्यांनी कंपन्यांची निवड करण्यासही सुरुवात केली आहे. अर्थात, याही फॉरेस्ट सिटीसमोर नवीनच समस्या उभी राहिली आहे. ज्या ठिकाणी हे काम सुरू झाले आहे, त्या भागात आता वन्यजिवांचा वावर वाढला आहे. शहरात अशी ‘जंगले’ आणली गेली, तर वन्य प्राणीही येणार आणि माणसांबरोबर त्यांच्या ‘सह-अस्तित्वातून’ सुरक्षेचे वेगळे प्रश्न तयार होणार! - तो प्रश्न प्रस्तावित लिउझो शहराला आधीपासूनच भेडसावतो आहे. - पण ही शहरे प्रत्यक्षात आली तर चीनमध्ये प्रदूषणाला आळा घालण्याच्या मोहिमेला मोठा हातभार लागणार आहे. एकीकडे झपाट्याने वाढणारे औद्योगिकीकरण आणि दुसरीकडे अशा प्रकारच्या जंगलांची संख्येतील वाढ यामुळे पर्यावरणाचा समतोल साधला जाऊ शकतो. वाढत्या तापमानामुळे संंपूर्ण जगावर संकट ओढवण्याची भीती असताना पर्यावरणीय समतोलासाठी पर्याय शोधण्याकरता जगभर विचारमंथन सुरू आहे. - त्यात चीनने उचललेले हे पाऊल सध्या चर्चेत आहे. प्रदूषण नियंत्रण आणि मुख्यत: प्रदूषित हवेचा दर्जा सुधारण्यासाठी हा ‘एकमात्र’ उपाय नाही, यावर तज्ज्ञांमध्ये एकमत आहे... पण चीनसारख्या अतिगर्दीच्या, बजबजलेल्या आणि वायू प्रदूषणाने चोंदलेल्या व्यवस्थेमध्ये ‘तातडीचा’ उपाय म्हणून ही व्यवस्था काम करू शकते, यावर एकमत दिसते.
लिउझो फॉरेस्ट सिटी
- येथे ३० हजार लोक राहू शकतील आणि या रहिवाशांसाठी तेथेच हॉटेल्स, हॉस्पिटल्स आणि शाळा असे सारेकाही असणार आहे.
- एकूण ४० हजार झाडे येथे लावण्यात येतील.
- १०० प्रकारची १० लाखांहून अधिक छोटी रोपेही असणार आहेत़
- या हिरवाईत लावलेली झाडे पूर्ण आकाराची वाढली, की त्यांच्यामध्ये १० हजार टनांहून अधिक कार्बन डायआॅक्साइड शोषण्याची क्षमता येईल.
- शिवाय मानवाला घातक ठरणारे हवेतील आणखीही घटक (पोल्यूटन्ट) ही झाडे शोषून घेतील.
- पूर्ण वाढ झाल्यानंतर या शहरातली झाडे दरवर्षी ९००टन आॅक्सिजनची निर्मिती करतील.
- या वृक्षांच्या शहरात प्रदूषण होऊ नये किंवा झाले तरी कमीत कमी व्हावे यासाठीही उपाय शोधण्यात आला आहे.
- शहरात येणारे प्रत्येक वाहन विजेवर चालणारे असेल.
- प्रवासी वाहतूक करणारी रेल्वेही धूर सोडणार नाही, कारण तीही विजेवर चालणारी असणार आहे.
- शिवाय सर्वत्र छतांवर लावलेली सोलार पॅनल्स वीजनिर्मितीतले प्रदूषणही आटोक्यात ठेवतील.