चौघांच्या चार दिशा

By admin | Published: January 9, 2016 02:44 PM2016-01-09T14:44:05+5:302016-01-09T14:44:05+5:30

काहींना वाटतं, ‘स्मार्ट सिटी’ म्हणजे जणू स्वर्गच! एकदा का आपलं शहर असं ‘स्मार्ट’ झालं, की काही प्रश्नच उरणार नाहीत. काहींचा समज स्मार्ट म्हणजे श्रीमंत! ही नटवी हौस आधीच हजार अभावांशी झगडणा:या आपल्या देशाला परवडणार तरी आहे का? मध्यममार्गीना वाटतं, शहर स्मार्ट झालं तर बरंच! पण भारतासारख्या देशात अशी शहरं उभारणं ही प्राथमिकता असावी का?

Four directions of four | चौघांच्या चार दिशा

चौघांच्या चार दिशा

Next
स्मार्ट सिटी - अपर्णा वेलणकर
 
काहींना वाटतं, ‘स्मार्ट सिटी’ म्हणजे जणू स्वर्गच! एकदा का आपलं शहर असं ‘स्मार्ट’ झालं, की 
काही प्रश्नच उरणार नाहीत. काहींचा समज स्मार्ट म्हणजे श्रीमंत! ही नटवी हौस आधीच हजार अभावांशी झगडणा:या आपल्या देशाला परवडणार तरी आहे का?  मध्यममार्गीना वाटतं,  
शहर स्मार्ट झालं तर बरंच! पण भारतासारख्या देशात अशी शहरं उभारणं ही प्राथमिकता असावी का? - या गोंधळलेल्या लोकमताला आकार यावा म्हणून ज्यांनी प्रयत्न करायचे; ते राजकीय नेते अज्ञानाच्या खाईतून बाहेर यायलाच तयार नाहीत. आणि ‘स्मार्ट’ म्हणजे काय, याबद्दल तर गैरसमजांची मालिकाच!  
 
पल्याकडे शब्दांना विशिष्ट छटा असते आणि निव्वळ शब्दार्थापलीकडचे काही हवे-नकोसे संदर्भही. ‘स्मार्ट’ हा त्यातलाच एक शब्द. तो केवळ चलाख, चुणचुणीत, हुशार या मराठी अर्थाचा इंग्रजी शब्द नव्हे. त्याला सामान्यांपासून स्वत:ला वेगळं काढणा:या आधुनिक इंग्रजी तो:यातल्या अहंभावाची एक ‘एलीटिस्ट’ छटा आहे. खासगी जीवनात, व्यक्तिगत संदर्भापुरतं छुपं आकर्षण, पण सामूहिक जीवनात - जेव्हा स्वत:च्या सामान्य असण्याला समूहाचा आधार मिळतो तेव्हा - मात्र तिरस्काराने बघणारा संशयी दुरावा हे ‘स्मार्ट’च्या नशिबी असणारं भारतीय समाजवास्तव!
अगडबंब फुगलेल्या भारतीय शहरांच्या ढासळत्या डोला:यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने निदान सुसह्य होण्याची संधी मिळावी, यासाठीच्या योजनेचं नामकरण करताना वापरलेली शब्दयोजना - स्मार्ट सिटी - हे भारतातल्या उलटसुलट मतांच्या अतिरेकी कल्लोळाचं एक प्रमुख कारण असावं.
आपलं शहर ‘स्मार्ट’ होण्याला पाठिंबा देणा:या अनेकांना वाटतं की एकदा काय ते केंद्र सरकारच्या तिजोरीतले पैसे ओतून सगळं चकचकीत केलं, ऑनलाइन केलं, गगनचुंबी इमारती-वळणदार उड्डाणपूल-सुळसुळत धावणारी मेट्रो हे सगळं बांधलं की झालं! नळ सुरू केला की पाणी, रस्त्यावर उतरलं की मेट्रो, वीज जाणार असली तरी फोनवर मेसेज, रस्ता (चुकून) तुंबला असला तरी मेसेज.. शहराचे सगळे प्रश्नच सुटले! स्मार्ट म्हणजे स्वर्गच!
आपलं सध्याचं वेडंबागडं शहर ‘स्मार्ट’ होण्याला विरोध करणा:या अनेकांचा ठाम समज असतो की स्मार्ट म्हणजे श्रीमंत! या शहरातून गरीब हद्दपार होणार. चढे कर असणार म्हणजे ते न परवडणा:या मध्यमवर्गीयांनाही हे बाहेरच हाकलणार. शिवाय ‘स्मार्ट-बिर्ट’ ही सगळी युरोप-अमेरिकेला परवडणारी चैन! आपल्या खिशात नाहीत पैसे, ही भलती छानछोकी हवीच कशाला मुळात? उगाच दुसरा करतो म्हणून आपण का उंटाच्या *** चा मुका घ्यायला जायचं? पश्चिमेतल्या चकचकाटाला भुलून गेलेल्या काही मूठभर स्वप्नाळू मूर्खाची भारतात कधीही पूर्ण न होऊ शकणारी अविवेकी हौस म्हणजे स्मार्ट सिटी अशी या विरोधी गटाची व्याख्या असते.
- या दोन्ही टोकांच्या मध्ये बहुसंख्य जनता. पाठिंबा आणि विरोधाच्या कडाक्याच्या भांडणात त्यांच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं देण्याची जबाबदारी सोडाच, कुणी त्यांना साधं चर्चेतही सामावून घेतलेलं नाही. तंत्रज्ञानाने व्यक्तिगत परिघातल्या अनेक प्रश्नांना रस्ते शोधले जातात, ते वापरून रोजचं जगणं सुलभ होतं याचा प्रत्यक्ष अनुभव गाठीशी जमलेल्या या मध्यममार्गी लोकांचा तंत्रज्ञानाबद्दलचा दुरावा, संशय, भीती हे सगळंच आता बरंच निवळलं आहे. परदेशी स्थिरावलेल्या मुलाबाळांच्या भेटीसाठी नाहीतर पर्यटनाची (आता परवडणारी) हौस म्हणून यातल्या अनेकांनी परदेशातल्या आधुनिक शहर नियोजनाची तात्पुरती का असेना, चव चाखली आहे. आपण राहतो ते शहर असं आधुनिक होणार असेल, तर उत्तमच ही त्यांची भावना आहे. पण आजवर फक्त श्रीमंत देशांच्या संदर्भानेच पाहिलेलं या अत्याधुनिक शहराचं चित्र अवाढव्य लोकसंख्येच्या आणि अभावांशीच झगडणा:या भारताशी कसं जोडावं? मुळात असा विचार आर्थिकदृष्टय़ा आपल्या देशाला परवडणारा आहे का? - हे त्यांना समजत नाही. जो देश आपल्या सर्व नागरिकांना पिण्याचं शुद्ध पाणी पुरवू शकत नाही; त्याने ही अशी भलती स्वप्नं पाहावीत का? - हा विरोधकांचा नेमका प्रश्न बहुसंख्येने असलेल्या मध्यममार्गीयांना निरुत्तर करतो. अभाव आणि अपु:या साधनसामग्रीचे गंभीर प्रश्न असलेल्या देशाच्या प्राथमिकता काय असाव्यात? - या प्रश्नाशी येऊन गाडं अडतं.
या सगळ्या गटांना ‘संवादा’च्या पातळीवर आणून लोकमताला आकार देण्याची जबाबदारी ज्यांची, ते राजकीय नेते आपापल्या पक्षीय राजकारणात अडकलेले. त्यामुळे त्यांचा विरोध आक्रस्ताळा आणि पाठिंबाही उद्धट! अज्ञानावर बाजी मारून नेण्याची कला अवगत असलेल्या या गटामध्ये ‘हा विषय आपल्याला समजत नाही, तर जरा शिकून घेऊया’ अशा उत्सुकतेला मुळातच रजा दिलेली. त्यामुळे काही अपवाद वगळता अभ्यासाचा आनंद! त्यात एक कळीची भीती! - सगळीकडे टेक्नॉलॉजी असणार म्हणजे शहर चालवण्याची सूत्रं शिकलेल्या उद्धट लोकांच्या, ते चालवतात त्या नफेखोर कंपन्यांच्या हातात जाणार (मग आजच्या नगरसेवकांना कोण विचारणार?) शिवाय ज्यावर भारतातले राजकीय पक्ष (आणि नेते) जगतात, ती आर्थिक रसद तर शहरंच पुरवतात. त्या मार्गाना तंत्रज्ञानाचे बोळे लागले तर?
असे हे चार गट.
- आपापल्या पूर्वग्रहांच्या चौकटीत बसवल्याने भारतीय मानसिकतेतल्या या प्रत्येक गटाची ‘स्मार्ट सिटी’बद्दलची कल्पना वेगवेगळी आहे. आणि जगभरातल्या तज्ज्ञांच्या अभ्यासांचा, शहरनियोजनकारांच्या प्रत्यक्ष प्रयोगांचा कानोसा घ्यावा तर लक्षात येतं, की हत्ती ना त्याच्या शेपटीसारखा आहे, ना सोंडेसारखा, ना पायांच्या आकाराचा!
एखादं शहर ‘स्मार्ट’ असतं म्हणजे काय?
डिजिटल टेक्नॉलॉजी आणि आयसीटीने (इन्फर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीने) गुंफलेल्या या व्यवस्थेत नागरी सेवांची गुणवत्ता, विश्वासार्हता आणि वेग वाढवणा:या ‘ऑनलाइन’ व्यवस्था शहरनियोजनाच्या केंद्रस्थानी असतात. नैसर्गिक संसाधनांच्या बेसुमार वापराला आळा घालण्याचे मार्ग शोधले-वापरले जातात. सरकारी सेवा, शहरांतर्गत वाहतूक, वीज आणि पाणीपुरवठा यांचं नियोजन, आरोग्यसेवा, स्वच्छता आणि मलनि:सारणाची व्यवस्था हे सारं  ‘रिअल टाइम रिस्पॉन्स’च्या आधाराने नियंत्रित होतं. शहर नियोजनात आणि नियंत्रणात नागरिकांच्या मताला/सहभागाला वाव असतो.
शहरनियोजनाच्या या नव्या विचारात एक महत्त्वाचा पॅराडाईम शिफ्ट आहे. आजवर शहरातले नागरिक हा ‘प्रश्न’ आहे आणि त्यावर उत्तरं शोधणं म्हणजे नियोजन अशी सरसकट भूमिका होती. नागरिक आहेत, ते कचरा करणार, ढीग साचणार, ते ढीग महानगरपालिकेने (शक्यतो वेळेत) उचलणं म्हणजे नियोजन! म्हणजे प्रश्न निर्माण करतात ते नागरिक, त्यावर उत्तर शोधायची जबाबदारी महानगरपालिकेची!
- नव्या  ‘स्मार्ट’ योजनेतला विचार म्हणतो, की नागरिक हा शहराचा प्रश्न नव्हे, तर ते शहराचे शेअर होल्डर्स आणि म्हणूनच प्रश्नांच्या संभाव्य उत्तरांचा एक भाग आहेत. ओल्या-सुक्या कच:याच्या विगतवारीची व्यवस्था आपल्या निवासाच्या जवळ कुठे आहे, कचरा कधी उचलला जाईल, त्याचं पुढे काय होईल हे नागरिकांना परस्पर कळवणारे स्मार्ट सेन्सर्स कार्यान्वित झाले, की कचरा तयार करणारा प्रत्येक नागरिक हा कच:याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेचा, ती जबाबदारी असलेल्या महानगरपालिकेच्या विभागाचा एक सक्रिय सदस्य, भागधारक होईल.
- हे असं असण्याचा प्रारंभ म्हणजे ‘स्मार्ट’ नगरनियोजनाची सुरुवात. त्यापुढला रस्ता खूप गुंतागुंतीचा, मतभेदांचा आणि तरीही रोमहर्षक आहे. त्याबद्दल पुढल्या रविवारी.
 
(लेखिका ‘लोकमत’च्या फीचर एडिटर आहेत.)
aparna.velankar@lokmat.com

 

Web Title: Four directions of four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.