समाजसेवेत रमलेली फ्रेंच योगसाधक

By admin | Published: October 25, 2014 02:13 PM2014-10-25T14:13:22+5:302014-10-25T14:13:22+5:30

फ्रान्ससारख्या परकीय देशातून एक जिज्ञासू योगसाधक भारतात येते काय, उत्तम प्रकारे योगसाधना शिकते काय, योगसाधनेचा नैसर्गिक परिणाम म्हणून तिच्या अंत:करणात विशुद्ध करुणा निर्माण होते काय आणि या करुणेपोटी बोधगयेच्या रस्त्यातल्या गरीब मुलांना आईच्या मायेने हृदयाशी धरून त्यांचं उत्तम पालन-पोषण करते काय; हे सगळंच मोठं अचंबित करणारं आहे. त्याची ही कहाणी.

The French Yoga Spell in Social Services | समाजसेवेत रमलेली फ्रेंच योगसाधक

समाजसेवेत रमलेली फ्रेंच योगसाधक

Next

- डॉ. संप्रसाद विनोद

 
रियुनियन या निसर्गसुंदर बेटाशी आणि तिथल्या तेवढय़ाच छान साधकांशी माझा अनेक वर्षांचा संबंध आहे. फ्रान्सच्या मालकीचं हे बेट हिन्दी महासागरात मादागास्करजवळ आहे. सँटा आपोलिनिया, बोरबॉन आणि बोनापार्ट या नावांनी पूर्वी ओळखलं जायचं. ब्रिटिश, डच आणि पोर्तुगीज खलाशांना हे बेट दिना मोर्गाबिन म्हणून माहीत होतं. सध्या या बेटाची लोकसंख्या सुमारे आठ लाख आहे. लांबवर पसरलेला स्वच्छ समुद्रकिनारा, दक्षिण-पूर्व भागातला सुप्त ज्वालामुखी, लगून, कॉरल रीफ यामुळे हे बेट पाश्‍चात्त्य पर्यटकांचं अतिशय आवडतं ठिकाण झालं आहे. एका भेटीत मी या सुप्त ज्वालामुखीचं हेलिकॉप्टरमधून दर्शन घेतलं होतं. हेलिकॉप्टरच्या वैमानिकाचं नाव मिस्टर इगो म्हणजे मराठीत अहंकार असं होतं. अहंकाराच्या शेजारी बसून घेतलेला हा अनुभव फारच अनोखा होता. 
ऊस, साखर आणि व्हॅनिलाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणार्‍या या बेटाचं दर वर्षी होणार्‍या चक्रीवादळांमुळे प्रचंड नुकसान होतं. पण, प्रामुख्याने फ्रेंच वस्ती असलेल्या या बेटावरची माणसं दर वर्षी तेवढय़ाच उमेदीने परत उभी राहतात. सेवानवृत्तीनंतरचं निवांत जीवन जगण्यासाठी बरेच फ्रेंच लोक इथे येऊन राहणं पसंत करतात. सुमारे शंभर वर्षांपूर्वी भारत, पाकिस्तान, आफ्रिकेतून उसाच्या शेतात काम करण्यासाठी मजूर म्हणून आलेल्या असंख्य लोकांच्या पुढच्या पिढय़ा आता शिकून सवरून चांगलं जीवन जगू लागल्या आहेत. 
एक वषापूर्वी रियुनियनमध्ये जाण्याचा योग आला. तिथल्या काही निवडक साधकांसाठी हा खास कार्यक्रम होता. त्यातले बहुतेक सगळे साधक भारतात येऊन शांतिमंदिरा’मध्ये ‘अभिजात योगसाधना शिकून गेलेले आणि नियमित साधना करणारे साधक होते. या साधकांशी माझं नातं जुळलं ते मादाम जेन पेरे या फ्रेंच महिलेमुळे. पाच फुटांच्या आसपास उंची असलेल्या, तरतरीत चेहर्‍याच्या, बुद्धिमान जेनचा आणि माझा परिचय पॉंडिचेरीतल्या एका आंतरराष्ट्रीय योगपरिषदेच्या वेळी झाला होता. देशविदेशातले सुमारे ४00 प्रतिनिधी उपस्थित असलेल्या या परिषदेमध्ये मला योगावर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केलं होतं. परिषदेच्या वेळा सोडून उरलेल्या वेळेत मी टांग्यात बसून अरविंद आश्रमात जाऊन तिथल्या प्रगाढ शांतीचा, आध्यात्मिक वातावरणाचा आस्वाद घ्यायचो. परिषदेच्या ठिकाणीदेखील आपलं जेवण वाढून घेऊन शांतपणे एका झाडाखाली बसून जेवायचो. कोणाशी सहज बोलणं झालं तर व्हायचं. नाहीतर मौनातच जेवण करायचो. एकदा जेवण वाढून घेत असताना फ्रान्समधून आलेल्या मादाम पेरेंशी माझा परिचय झाला. 
कॉन्फरन्समधलं माझं व्याख्यान झाल्यानंतर बरेच प्रतिनिधी माझ्या भोवती गोळा झाले आणि अनेक प्रश्न विचारू लागले. त्यात मादाम जेनही होत्या. मी इतरांच्या प्रश्नांची उत्तरं देतानादेखील त्या तिथेच थांबून राहायच्या आणि मी दिलेली उत्तरं काळजीपूर्वक ऐकायच्या. समजून घ्यायच्या. योगाविषयीची आपली तीव्र जिज्ञासा शमविण्याचा त्यांचा हा प्रयत्न असायचा. प्रसंगी त्याही काही प्रश्न विचारायच्या. हे प्रश्न खूप मूलभूत स्वरूपाचे असायचे. या गोष्टीचं मला आश्‍चर्य वाटायचं. मग, या प्रश्नांची उत्तरं देण्याच्या निमित्तानं आमचं बरंच बोलणं व्हायचं. त्यातून दर वेळी मला त्यांच्या बुद्धीची चमक जाणवायची. पूर्वी भारतात येऊन अनेक योगाश्रमांना भेटी दिलेल्या असल्याने त्यांची योगाशी आधीच तोंडओळख झाली होती. 
परिषद संपल्यानंतर प्राधान्याने उत्तर भारतात आणि जमलं तर दक्षिण भारतात फिरायला जायचा त्यांचा बेत होता. भारतातला प्रवास संपवून त्या एक महिन्यानंतर मुंबईमार्गे फ्रान्सला परत जाणार होत्या. मी पुण्याचा आहे आणि पुणं हे मुंबईजवळ हे आहे समजल्यावर उत्तरेचा दौरा थोडा आटोपता घेऊन योगाचं अधिक सखोल आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांनी पुण्याला यायचं ठरवलं. मीही त्या कालावधीत पुण्यात असल्यामुळे त्यांचं येणं पक्कं झालं. दोन दिवसांसाठी म्हणून त्या आल्या; पण एक आठवडा राहून गेल्या. पती नुकतेच कर्करोगाने वारलेले असल्यामुळे त्या फार दु:खात होत्या. पण, योगसाधनेचा एक नैसर्गिक परिणाम आणि योगविद्येच्या साह्याने पतिनिधनाचं दु:ख कमी कसं करायचं याविषयी आमचं विस्ताराने झालेलं बोलणं यामुळे त्यांचं दु:ख बरंच हलकं झालं. 
मग मात्र त्या दर वर्षी एक महिन्यासाठी असं सुमारे दहा वर्षे न चुकता पुण्यात येत राहिल्या आणि योगाभ्यास शिकत राहिल्या. प्रत्येक वेळी सकाळ-संध्याकाळ मिळून मोठय़ा निष्ठेने रोज चार-ते सहा तास त्या योगसाधना करायच्या. मीही त्यांचा उत्साह पाहून त्यांच्यासाठी खास वेळ काढायचो आणि योगग्रंथांमधील अनेक सूक्ष्म संकल्पना त्यांना समजावून सांगायचो. मी जे काही शिकवायचो ते त्या खूप मनापासून आणि  एकाग्रतेने शिकायच्या. जे शिकवलंय त्याच्या प्रथम इंग्रजीत आणि नंतर फ्रेंचमध्ये नोट्स काढायच्या. एखादी संकल्पना समजावून सांगताना, मी कागदावर काही लिहिलं, चित्र काढलं तर तो कागद त्या माझ्याकडून आवर्जून मागून घ्यायच्या. दुसर्‍या दिवशी तोच कागद त्यांच्या वहीत मला व्यवस्थित चिकटवलेला दिसायचा. त्यांच्या चिकाटीचं, निष्ठेचं, तळमळीचं, सगळं नीट शिकण्याच्या वृत्तीचं, सुरेख अक्षरांचं, कष्टाळूपणाचं मला फार कौतुक वाटायचं. 
या दहा वर्षांच्या कालखंडात आणि नंतरही त्या आवर्जून आपल्या मित्रमैत्रिणींना घेऊन भारतात येत राहिल्या. आपल्याबरोबर आलेल्या साधकांना योगाचं उत्तम प्रशिक्षण मिळावं यासाठी त्यांची फार धडपड असायची. पेशाने शिक्षक असेल्या जेन सेवानवृत्त झाल्यानंतर रियुनियनमध्ये कायमच्या स्थायिक झाल्या. तिथल्याच एका डोंगरावर असलेल्या वास्तूत त्यांनी योगकेंद्र सुरू केलं. हाडाच्या कलाकार असलेल्या जेनने हे केंद्र मोठय़ा कलात्मक पद्धतीने सजवलं. माझे योगावरील अनेक कार्यक्रम या केंद्रात आयोजित केले. या कार्यक्रमांची आखणी खूप मनापासून, विचारपूर्वक आणि मोठय़ा कल्पकतेने केलेली असायची. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे हे सगळे कार्यक्रम खूप यशस्वी व्हायचे. याच वास्तूत त्यांनी असोसिएशन समन्वय योग नावाची संस्था स्थापन केली आणि या संस्थेमार्फत योगाचं कार्य चालू ठेवलं. नंतर, एका फार चांगल्या सामाजिक कार्यासाठी त्या कायमच्या भारतात येऊन स्थायिक झाल्या आणि स्वत:ला या कार्यासाठी पूर्णपणे सर्मपित केलं. 
जेन यांना बौद्ध धर्मात विशेष रुची होती आणि आहे. आमच्या चर्चेतदेखील भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा संदर्भ नेहमी येत असे. बुद्धांविषयी असलेल्या प्रेमापोटीच बहुधा दर वर्षी भारतात आल्यावर त्या बोधगयेला अवश्य जाऊन येत. एकदा त्या अशाच बोधगयेला गेल्या असता त्यांना रस्त्यात चार-पाच अनाथ गरीब मुलं दिसली आणि त्यांना त्यांच्या उरलेल्या आयुष्याचं उद्दिष्टच सापडून गेलं. तिथल्या काही ओळखीच्या लोकांच्या मदतीने त्यांनी तिथे जेनामिताभ वेल्फेअर ट्रस्ट नावाची एक सेवाभावी संस्था स्थापन केली. या संस्थेतर्फे त्या आता सुमारे २00 मुलांना नि:शुल्क शिक्षण देतात. त्यांचं राहणं आणि जेवणं हे सगळं विनाशुल्क करतात. जवळपासच्या गावांमध्ये संस्थेच्या वतीने छोट्या मुलांसाठीच्या सात शाळाही चालवतात. अभ्यासाबरोबर या मुलांना गाणं, नाच, कराटे, योग, चित्रकला असे अनेक विषय शिकवून त्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. या सगळ्या अनाथ मुलांच्या त्या आता खर्‍याखुर्‍या आई झाल्या आहेत. त्यामुळे, ही मुलं आणि त्या भागातले सगळे लोकदेखील त्यांना आता ममीजी म्हणून ओळखू लागले आहेत.
फ्रान्ससारख्या परकीय देशातून एक जिज्ञासू योगसाधक भारतात येते काय, उत्तम प्रकारे योगसाधना शिकते काय, योगसाधनेचा नैसर्गिक परिणाम म्हणून तिच्या अंत:करणात विशुद्ध करुणा निर्माण होते काय आणि या करुणेपोटी बोधगयेच्या रस्त्यातल्या गरीब मुलांना आईच्या मायेने हृदयाशी धरून त्यांचं उत्तम पालन-पोषण करते काय, हे सगळंच मोठं अचंबित करणारं आहे. म्हणून, आपल्या देशाच्या सीमा ओलांडून मानवसेवा करणार्‍या मादाम जेन पेरे यांच्या व्यापक जीवनदृष्टीला आणि करुणामय जीवनाला मन:पूर्वक अभिवादन !!  
(लेखक हे महर्षी न्यायरत्न विनोद यांचा विशुद्ध अध्यात्माचा आणि अभिजात योगसाधनेचा वारसा चालविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे
 योगगुरू आणि योगोपचारतज्ज्ञ आहेत.) 

Web Title: The French Yoga Spell in Social Services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.