विजयच्या मृत्यूचे जीवघेणे कटिंग; जिंदगी तो बेवफा है...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 01:26 PM2020-12-22T13:26:43+5:302020-12-22T13:29:28+5:30

विजयची मॅच जिथे असेल तिथे मी हजर. मग ती इंटर कॉलेज असो, कांगा लीग असो, टाइम्स शील्ड असो की पुढे सनग्रेस मफतलालची असो मी हमखास जायचो. मी भक्त कॅटेगरीतला नव्हतो पण माझा विजयवर आणि त्याच्या खेळावर विलक्षण जीव होता.

a friend's open letter to Sachin Tendulkar friend ranji player Vijay Shirke | विजयच्या मृत्यूचे जीवघेणे कटिंग; जिंदगी तो बेवफा है...

विजयच्या मृत्यूचे जीवघेणे कटिंग; जिंदगी तो बेवफा है...

Next
ठळक मुद्देविजयपुरत बोलायचं तर आम्ही काही रोज भेटणारे मित्र नव्हे. पण 40 वर्षांचा घट्ट दोस्ताना.परस्परांवर प्रेम हा जितका गाभा होता तितकाच सचिन तेंडुलकरविषयीचा जिव्हाळा हा एक सामायिक बंध होता. क्रिकेट हा त्याचा ध्यास होता आणि श्वासही. हौस आणि चैन म्हणून क्रिकेट खेळण्याजोगी त्याची सांपत्तिक स्थिती नव्हती.

>> चंद्रशेखर कुलकर्णी 

शनिवारी रात्री 19 डिसेंबरला विजय शिर्के गेला. त्याचं असं आकस्मिक जाणं माझ्यासाठी कमालीचे धक्कादायक होतं. अजूनही विश्वास बसत नाही. ही बातमी ऐकली आणि मन सुन्न झालं. नकळत डोळे पाणावले. किंचितशी सर्दी झाली होती म्हणून त्याच्या आड पाणावलेले डोळे लपवता आले. पण अजूनही त्याचा जिंदगी तो बेवफा है एक दिन ठूकरायेगी... हा व्हिडिओ बघताना कंठ दाटून येतोय. मी स्वतः मरण खूप जवळून बघितले आहे. पत्रकारितेच्या निमित्ताने मृत्यूची अनेक तांडव याची देही याची डोळा पाहिली आहेत. मी स्वतःही मरणाच्या दारातून परत आलो आहे. पण सहसा एखादा मृत्यू मला इतका भावूक करत नाही. चार वर्षांपूर्वी माझा आणखी एक मित्र विनय केतकर उपाख्य लाड्या गेला तो काय तो एक सन्माननीय अपवाद. विजयपुरत बोलायचं तर आम्ही काही रोज भेटणारे मित्र नव्हे. पण 40 वर्षांचा घट्ट दोस्ताना. साहचर्य हा मित्रत्वाचा प्रधान निकष असू शकत नाही याची साक्ष देणारी मैत्री. कधीही भेटलो तर बोलणं कुठल्याच क्षणी खुंटायचं नाही. मस्त गप्पा व्हायच्या. आठवणींना उजाळा मिळायचा. परस्परांवर प्रेम हा जितका गाभा होता तितकाच सचिन तेंडुलकरविषयीचा जिव्हाळा हा एक सामायिक बंध होता. खरंतर तो जातिवंत क्रिकेटर आणि मी जातिवंत प्रेक्षक. आमचा दोस्ताना 1980 पासून रुईया कॉलेजमधला. आम्ही मित्र कसे झालो वगैरे मला आठवतही नाही. पण जी काही दोस्ती झाली ती जणू जन्मजन्मांतरीचं नाते असल्यासारखी होती. अगदी सुरुवातीपासून मी क्रिकेटचा आणि विजयच्या खेळाचा निस्सीम चाहता. मी एक वेळ लेक्चर ची वेळ गाठायचो नाही. पण माधव मंत्री यांच्या देखरेखीखाली चालणाऱ्या रुईयाच्या नेट प्रॅक्टिसला हजर असायचो. विजय तेव्हा कल्याणला राहायचा. मुंबई जवळपास राहणाऱ्या मुलांच्याही आधी तो नेटवर हजर असायचा. नेट प्रॅक्टिस ची वेळ चुकायला नको म्हणून तो रोजच्या रोज जीवावर उदार होऊन फास्ट ट्रेन मधून धावत्या गाडीतून खांद्याला भलंमोठं किट असतानाही माटुंगा स्टेशनला उतरायचा. मी तेव्हाही त्याला अनेकदा त्यावरून  शिव्या घातल्या होत्या. पण तेव्हा क्रिकेट हा त्याचा ध्यास होता आणि श्वासही. हौस आणि चैन म्हणून क्रिकेट खेळण्याजोगी त्याची सांपत्तिक स्थिती नव्हती. किंबहुना गरिबीच म्हणा ना! 

कल्याणच्या रामबाग लेन नंबर 6 मधल्या बगरे निवास मधली चाळीतली तळातली खोली म्हणजे त्याचं घर. तिथं ऐश्वर्य जर काही असेल तर ते समाधान आणि आनंद. रेल्वेतून निवृत्त झालेले वडील. सर्वसामान्य गृहिणी असलेली आई. बहिणी लग्न होऊन गेलेल्या. मुलगा म्हणाल तर हा एकटा. निवृत्तीनंतर त्याचे पापा डोळ्याला भिंग लावून घड्याळ दुरुस्त करत बसायचे. घरात शैक्षणिक वगैरे वारसा नव्हता पण मला आश्चर्य वाटायचं त्याच्या घरी इंग्रजी पेपर असायचे. कालांतरानं मला त्याचं कोडे उलगडलं. आम्ही कॉलेजात असताना कांगा लीग आणि इतर क्रिकेटच्या मॅचेसचा संक्षिप्त धावफलक इंग्रजी पेपरात यायचा. माझ्या आठवणीप्रमाणे बॅटींगमध्ये तीस रन्स आणि बॉलिंग मध्ये तीन विकेट काढणा-याचं नाव त्यात असायचं. विजयच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याची कटिंग अभिमानानं जपून ठेवण्यासाठी त्याचे पापा तेव्हा इंडियन एक्सप्रेस आवर्जून घ्यायचे. कॉलेजात असताना मी असंख्य वेळा  कल्याणच्या घरी गेलो होतो. मला त्याची तिथली मित्रमंडळी टिळक चौक आणि गांधी चौकातल्या टीम्स, कल्याणच्या पूर्वेकडे टाटा इलेक्ट्रिक कॉलनीमधले मित्र इतकंच कशाला त्याचा श्रीमान टेलर सुद्धा परिचित होता. त्याकाळी पैसे मिळवण्याचे एक साधन म्हणूनही मुलं क्रिकेटच्या टूर्नामेंट खेळायची. कल्याणच्या पुढच्या पट्ट्यात बदलापूर आसनगाव अशा अनेक ठिकाणी 8/8 ओव्हरच्या टेनिस बॉल च्या क्रिकेट मॅचेस व्हायच्या. सुट्टीच्या दिवशी विजय हमखास या मॅचेस खेळायचा. बघायला जमलेल्या मध्ये माझी एक भर पडायची. जुनिअर कॉलेज संपल्यानंतर विजयने सीजन बॉल चेंडूचे क्रिकेट बऱ्यापैकी सिरीयसली घेतलं. पुढे त्याला असं जाणवलं की  झुनझुनवाला कॉलेज रुईयापेक्षा अधिक पुढच्या फेरीत धडक मारते. तशात त्याला तेव्हाचे तिथले प्रिन्सिपल करमरकर आणि क्रिकेटचे इन्चार्ज प्राध्यापक राम यांनी फ्रीशिप देऊ केली आणि तो  तिथं गेला. अर्थात प्रॅक्टिस ची वेळ सोडली तर तो रुईया नाक्यावरती भेटायला यायचाच. त्या अगोदरही आमची गट्टी दृष्ट लागावी अशी जमली होती. कॉलेजच्या जिमखान्यात तो सकाळी घरून येताना स्टीलचा उभा मोठा डबा भरून आईने बनवलेला खिमा घेऊन यायचा. त्या डब्याचे वाटेकरी वाढवू नयेत म्हणून आम्ही ही कॅन्टीन एवजी जिमखान्यात बसून दोघंच हा डबा फस्त करायचो. त्याची आई सामिष पदार्थ अतिशय रुचकर बनवायची. हा बंदाही पहाटे उठून मुंब्र्याला  जाऊन ओळखीच्या खाटकाकडून मटन किंवा खिमा घेऊन यायचा. मांसाहाराच्या बाबतीत मी तसा बाटगा. त्यामुळे मला त्याच्या डब्यातल्या मटणामधले बटाटेच अधिक आवडायचे. मांसाहार हा जिव्हाळ्याचा विषय होता त्यांच्यासाठी विजयच्या घरी पुक्खा झोडणे ही पर्वणी असायची. आमचं लाईफ तेव्हा मस्त अल्पसंतुष्ट होतं. मणीस मध्ये सांभार अनलिमिटेड मिळतं म्हणून तिथं डब्यातल्या पोळ्या घेऊन जायच्या. मणी वालाही अशा गोष्टींकडे तेव्हा कानाडोळा करायचा. अगदी चिकन वगैरे खायची हुक्की आली तर पोदार च्या पुढे गुलशनच्या बाजूला सर्वोदय नावाच एक रेस्टॉरंट होतं तो चिकनच्या एका प्लेट बरोबर कितीही वेळा वेगळा चार्ज न घेता सुरवा म्हणजे त्याचा तो टिपिकल मंगलोरी रस्सा वाढत राहायचा. तिथं आम्ही डझनावारी रोट्या त्या एका चिकन बरोबर खात असू. पण बहुतेक वेळा विजय घरून डबा आणायचा. मॅचला येताना सुद्धा त्याच्या कीट मध्ये घरूनआणलेला डबा असायचा. तसा माझा आणखी एक मित्र डबा धारी  होता. तोही ठाणे जिल्ह्यातला. सुलक्षण कुलकर्णी. सुलु तर वानखेडे स्टेडियमवर मॅच बघायला येतानाही डबा घेऊन यायचा. तो डबा मी शेअर केला आहे. विजय आणि सुलू मध्ये एक फरक होता. सुलक्षण तुलनेनं मोठं क्रिकेट दीर्घकाळ खेळला आणि तो इतरांचा खेळही अगत्याने बघायचा. विजयला फक्त खेळण्यात रस. माझ्यासारखा तो तासंतास इतरांची मॅच बघू शकायचा नाही. त्यामुळे बऱ्याचदा वानखेडे स्टेडियम मधल्या त्याच्या पासवर माझा अलिखित हक्क असायचा. तसा मला माधव मंत्री यांच्याकडूनही हक्काचा पास मिळायचा. सांगायचा मुद्दा इतकाच की माझ्या इतर अनेक मित्रांबरोबर मी स्टेडियम मध्ये बसून मॅचेस बघितल्या पण मी आणि विजय मॅच बघायला एकत्र कधीच गेलो नाही. पण ठाणे जिल्ह्यातल्या पिकनिकच्या अनेक जागा मी विजयमुळे बघितल्या. तिथे कधी रुईयातले मित्र असायचे तर कधी त्याचे ठाणे कल्याणच्या पट्ट्यातले दोस्त. त्या पिकनिकमध्ये चैन नसायची पण धमाल असायची.

त्याचं घर दिलदार होतं. मनाची श्रीमंती काय असते हे त्या चाळीतल्या एका खोलीत मी अनेकदा अनुभवलं. मी हक्कानं विजयच्या कुठल्याही घरी कुठल्याही वेळी जाऊ शकत होतो. तो गेला तेव्हा मला कोणीतरी विचारलं अरे शिर्के म्हणजे मराठा ना? त्यावेळी पहिल्यांदा मला त्याच्या जातीचा साक्षात्कार झाला. गेल्या चाळीस वर्षात कधीही तो मराठा आणि मी ब्राह्मण, असला विचारही आमच्या डोक्यात कधी डोकावला नव्हता. असो. गमतीचा भाग असा पुढे मी रुईया कॉलेजचा स्पोर्ट्स सेक्रेटरी झालो. कॉलेजच्या मॅचेस ला मी जायचोच. पण विजय साठी मी झुनझुनवाला कॉलेजच्या मॅचेस बघायलाही जायचो. कित्येक महिने त्यांच्या राम सरांना मी रुईयाचा विद्यार्थी आहे हे माहितही नव्हतं. सुधाकर हरमलकर, विनायक म्हणजे मोठा जोशी, छोजो म्हणजे छोटा जोशी आणखी बरेचसे मला त्यांच्या टीमचा चिअर लीडर मानायचे. क्रिकेटच्या प्रांतातल्या अनेकांच्या ओळखी विजयमुळे झालेल्या. त्यात सुलक्षण कुलकर्णीपासून प्रविण अमरेपर्यंत असंख्य जणांचा समावेश आहे. विजयची मॅच जिथे असेल तिथे मी हजर. मग ती इंटर कॉलेज असो, कांगा लीग असो, टाइम्स शील्ड असो की पुढे सनग्रेस मफतलालची असो मी हमखास जायचो. मी भक्त कॅटेगरीतला नव्हतो पण माझा विजयवर आणि त्याच्या खेळावर विलक्षण जीव होता. आणखी मोठं क्रिकेट खेळण्याची क्षमता होती पण ते त्याच्या भाग्यात नव्हतं. त्याबद्दल मला चुटपुट लागून राहायची पण तो कधीही नशिबाला किंवा एखाद्या व्यक्तीला दोष द्यायचा नाही. मुंबईला रणजी ट्रॉफी खेळला नाही. संभाव्य तीसात नाव असायचं पण अंतिम संघात निवड नसायची. प्रसंगी मी खट्टू व्हायचो त्याच्या चेहर्‍यावरचे हास्य कायम असायचं. मुख्य म्हणजे ज्याची निवड झाली त्याच्याविषयी विजयच्या मनात कधीही असूया निर्माण झालेली मी पाहिलेली नाही. तो मनानं उमदा होता. तो मुंबई युनिव्हर्सिटीला संजय मांजरेकर च्या नेतृत्वाखाली आंतरविद्यापीठ स्पर्धा खेळायला गेला तेव्हा मला त्याच्या गोलंदाजीचे पृथक्करण तोंडपाठ असायचं. मला आठवतंय एकदा श्रीकांत खरगेने मला त्याचा अनुभव सांगितला होता. तो मुंबई युनिव्हर्सिटीच्या टीमचा विकेट किपर होता. त्याचा तोवरचा अनुभव असा होता, की फास्ट बॉलर काही ओवर टाकल्यानंतर दमतात त्यांच्या चेंडूचा वेग कमी होतो. तो सांगत होता, विजयच्या बाबतीत असं होत नाही. त्याच्या पंचविसाव्या ओव्हरलाही ग्लोव्हज असून चेंडू हाताला शेकतो. त्या मॅचमध्ये त्याचं एनालिसिस होतं...27-5-85-5.

नंतर आंतर विद्यापीठ सामन्यात एकदा रॉबिन सिंगने विजयाच्या बॉलिंगची धुलाई केली तेव्हा मला खूप वाईट वाटलं. याचं वर्णन करताना विजय मला म्हणाला होता रॉबिन सिंग काय बॅटिंग करतो यार. स्टँडमध्ये भिरकावून देतो. हा असा अनुभव मी अनेकदा घेतला. पुढे तो क्रिकेटच्याच बळावर सनग्रेस मफतलाल मध्ये नोकरीला लागला. तसं पाहिलं तर त्याला खुप महत्त्वाकांक्षा मोठी स्वप्न वगैरे नव्हती. रेल्वेत नोकरीला लागलं तर पास फुकट असतो याचंही त्याला कोणे एके काळी आकर्षण होतं. तो मोह नव्हता, पण परिस्थितीनं शिकवलेला करकरीत व्यवहार अधून मधून त्याला खुणवायचा. त्याच्या तेजतर्रार बॉलिंगच्या बळावर त्याला नोकरीच्या अनेक संधी होत्या पण तो स्थिरावला सनग्रेस मफतलाल मध्ये. त्या संघात संदीप पाटील, सचिन तेंडुलकर, सलील अंकोला, अनिरुद्ध खेर असे अनेक मोठे खेळाडू होते. तिथे हेमंत वायंगणकर च्या रूपात त्याला मेंटॉर लाभला आणि अनिल जोशी सारखे जिवाभावाचे मित्रही मिळाले. आपण यापुढे मोठ्या पातळीवरचं क्रिकेट खेळणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांन खेळाकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. तो ज्या भागातून आला, तिथं म्हणजे ठाणे कल्याण मध्ये क्रिकेटच्या सुविधा कशा वाढतील याचा विचार तो करायला लागला. त्याच्याबरोबर अनेकदा कल्याणच्या सुभाष मैदानात धाक्रस सरांच्या नेटवर गेलो आहे. आपण ज्या पद्धतीने धडपडत मुंबईपर्यंत यायचो तशी वेळ पुढच्या पिढीवर येता नये हे कायम त्याच्या डोक्यात होतं. त्यासाठी तो नेमकं काय करतो आहे याची चर्चा त्यांन फारशी कधी केली नाही. इतका जवळचा मित्र पत्रकार असून माझी त्यासाठी कधी मदत मागितली नाही. पण त्याचं काही ना काही सुरू होतं. दरम्यानच्या काळात विसावं शतक उजाडलं ते विजय साठी एक नव आव्हान घेऊन. पावसाळ्यात प्रॅक्टीस नसते म्हणून कल्याण भिवंडी रस्त्यावर पंधरा वीस किलोमीटर धावणारा हा आमचा मित्र हृदयाचा रोगी होईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. 

2000 सालाच्या सुरुवातीला एक दिवस अचानक विजयचा मला फोन आला. मी तेव्हा लोकसत्तात होतो. त्याला डॉक्टर नीतू मांडके यांची अपॉइंटमेंट हवी होती. त्याच्यामते हेमंत वायंगणकर ते काम सहज करू शकणार होता. काही कारणाने ते काही जुळून येत नव्हतं. शेवटी मीच त्याला म्हटलं आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करू. मग मी तत्कालीन केंद्रीय मंत्री रामभाऊ नाईक यांना विजय ची कौटुंबिक आणि आर्थिक पार्श्वभूमी सांगितली आणि डॉक्टर मांडके यांच्याकडे शब्द टाका अशी विनंती केली. ते लागलीच नीतू मांडके यांच्याशी बोलले. मग मी आणि विजय लीलावतीत जाऊन डॉक्टर मांडके यांना भेटलो. त्यांनी खिसा न कापता बायपास करण्याचा शब्द दिला आणि पाळलाही. मार्च महिन्याच्या तेवीस तारखेला विजयची बायपास झाली. अर्थातच शस्त्रक्रिया उत्तम झाली. विजय इकॉनोमी मधला पेशंट होता. पण त्याला भेटायला येणारी माणसं व्हीव्हीआयपी कॅटॅगरीतली होती. त्यात अर्थातच नामवंत क्रिकेटपटूंचा समावेश होता. हा गोतावळा बघितल्यानंतर लीलावती ची मॅनेजमेंट विजयला अपग्रेड करायला निघाली होती. पण त्याचे पाय जमिनीवर होते. तो म्हणाला त्यापेक्षा पैसे कमी करणार असाल तर खाली झोपवलं तरी चालेल. या दिव्यातून तावून सुलाखून निघाल्यानंतर तो पूर्वी इतका क्रिकेट खेळणार नाही हे उघड होतं. पण क्रिकेट हा त्याचा श्वास होता. त्यातूनच तो हळूहळू संघटकाच्या भूमिकेत शिरला. पुढे कालांतराने सन ग्रेसने क्रिकेट संघ गुंडाळला. एकूणच कापड गिरण्यांची अवस्था बिकट झाल्याचा तो काळ होता. त्यानंतर विजय स्वतःच्या हिमतीवर इन्शुरन्स एजंट म्हणून उभा राहिला. त्याचं सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यानं कधीही आर्थिक स्थितीचे भांडवल केलं नाही. खिशात पैसा नव्हता तेव्हाही आणि सुस्थितीत आल्यावरही. आर्थिक स्थैर्य लाभले त्यानंतरही तो बेतास बात आर्थिक स्थिती असलेल्या गुणवान क्रिकेटपटूंना जमेल त्या पद्धतीने मदत करीत राहिला. मुख्य म्हणजे विजयचा कणा अखेरपर्यंत ताठ होता. आज मागे वळून बघताना मला जाणवतं की तो व्यवसायिक मदतीसाठी माझ्याकडे कधीही आला नाही. मीच एकदा कधीतरी माझ्या गाडीच्या इन्शुरन्ससाठी त्याला सांगितलं तेव्हा तो संग्रामला घेऊन माझ्याकडे आला. व्यक्तिगत संबंध व्यवसायासाठी वापरायचे नाहीत असं बहुदा त्यानं ठरवलं होतं. 

विजयचं लग्न ही एक फिल्मी स्टोरी होती. कल्याण मधल्याच जोशांच्या वंदनाच्या तो प्रेमात पडला. शिर्के  - जोशी विवाह एकूणच त्रांगडं होतं. तशात वंदनाच्या घरून विरोध होता. पण दोघांनीही लग्न करायचा चंग बांधला होता. कधी, कुठे ,कसं हे सगळंच गुलदस्त्यात होतं. एके दिवशी कॉलेजच्या नाक्यावर मला विजयचा क्रिकेटर मित्र सुभाष क्षीरसागर भेटला. तोही सनग्रेस मध्ये होता. त्याला आमचे संबंध पक्के ठाऊक होते. तो मला सहज म्हणाला परवा तू विजय च्या लग्नाला जाणार असशील ना? मी त्याला मला माहित नाही असं दाखवलं नाही. पण पण लग्नाच्या दिवशी सकाळी लवकरची ट्रेन पकडून मी कल्याणला विजयच्या दारात पोहोचलो. मला त्याचा तो आश्चर्यमिश्रित चेहरा आजही आठवतो. मी म्हटलं मला आमंत्रणाची गरज नाही. तू बोलावलं नाहीस म्हणून काय झालं? मला तुझ्या लग्नाला यावं असं वाटलं म्हणून मी आलोय. तो लग्न सोहळा आटपल्यावर आम्ही गुरुदेव हॉटेलमध्ये जेवलो आणि मी परत आलो. कालांतरानं जोशांच्या घराचे दरवाजे ही विजयला उघडले. दरम्यान 91 साली माझ्या लग्नात विजय आणि वंदना आवर्जून आले. अर्जुन असं म्हणण्याचं कारण म्हणजे तेव्हा वंदना गर्भार होती. तेव्हाची तिची अवस्था लग्नाला न येण्याचं कारण ठरू शकली असती पण त्या दोघांनीही तसं केलं नाही. विजयची बायपास झाली तेव्हा संग्राम जेमतेम 9 वर्षाचा होता. 2001 पासून मी दरवर्षी 23 मार्चला विजयला पुनर्जन्माच्या शुभेच्छा देत आलो. तेव्हा मला तरी कुठे कल्पना होती की हाच माझा मित्र माझ्या हॉस्पिटल वाऱ्यामध्ये न चुकता नाईट वॉचमन म्हणून येणार आहे. अलीकडच्या काळात माझी बायपास झाली तेव्हा आणि एकूणच मी जेव्हा कधी हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा रात्री माझ्या खोलीत मुक्कामाला विजय असायचा. अंतर वेळ बिझी शेड्युल असलं कुठलंही कारण त्यानं पुढं केलं नाही. माझं सोडा. ठाण्याला श्रीरंग सोसायटीत शिफ्ट झाल्यानंतर तो माझ्या मोठ्या बहिणीच्या घरापासून हाकेच्या अंतरावर आला. तिच्यासाठीसुद्धा तो मॅन फ्रायडे होता. अडीअडचणीला ती माझ्याही आधी विजयला फोन करायची. तोही मदतीला तत्पर असायचा. 

त्याचा आणखी एक विशेष असा की आयुष्यात कुठलीही कृती करताना किंवा निर्णय घेताना त्यानं फायदा तोटा असा विचार केला नाही. एके काळी तो सुधीर लाईक यांच्या नॅशनल क्रिकेट क्लबला खेळला असता तर लौकिकार्थानं त्याचं भलं झालं असतं. पण त्याला आकर्षण होतं ते रमाकांत देसाई यांच्याकडून दीक्षा घेण्याचं. तेवढ्यासाठी तो नॅशनलला न खेळता शिवाजी पार्क जिमखान्याला आला. अर्थात त्याला त्याचा कधीही पश्चात्ताप झाला नाही. रमाकांत देसाईसारख्या बॉलरच्या हाताखाली शिकायला मिळाल्याचा आनंद त्याला अधिक होता. तीच गोष्ट त्यानं ओळखीच्या बाबतीतही पाळली. छोट्यातल्या छोट्या माणसाला कधी टाळलं नाही आणि मोठ्यातल्या मोठ्या माणसाची ओळख कधी मिरवली नाही. सचिनसह इतर अनेक मोठ्या क्रिकेटपटूंशी असलेली ओळख तो मिरवायचा नाही. दुरुपयोग करणं तर खूप दूरची गोष्ट. मीच एकदा अलीकडे त्याला भरीस घातलं. माझा भाचा विभास सचिनच्या शेवटच्या टेस्ट मॅचला वानखेडेवर हजर होता. तो माझ्या इतकाच सचिनचा फॅन. त्यानं ते तिकीट जपून ठेवलं होतं. त्यावर त्याला सचिनची सही हवी होती. मी  सांगायला कचरत होतो. शेवटी मी विभासला म्हटलं तूच विजयला रिक्वेस्ट करून बघ. विजयने त्याला त्या तिकिटावर सचिनची स्वाक्षरी आणून दिली. काल माझ्या भाच्याला ही वाटलं विजयने ज्या क्रिकेटमधल्या देवाची स्वाक्षरी आणून दिली त्याच्याच स्वाक्षरीचा विजयबद्दलचा शोकसंदेश वाचावा लागणं हे वेदनादायी नाही का? माझ्या मनात आलेला विचार वेगळा होता. विजय गेला त्यानंतर सचिन तेंडुलकरने आस्थापूर्वक ट्वीट केलं आणि देशभरातल्या माध्यमांनी विजयच्या आकस्मिक मृत्यूची दखल घेतली. Covid-19 ने त्याचा बळी घेतला. मुक्काम पोस्ट ठाणे असूनही ऍडमिट झाला तो कल्याणच्या हॉस्पिटलमध्ये. अखेरचा श्वास घेतला तोही सर्वाधिक प्रिय असलेल्या कल्याण मध्येच. आज पेपर मध्ये त्याच्या मृत्यूची बातमी वाचताना मनात आलं.... कधीच वाटलं नव्हतं की त्यांनी घेतलेल्या बळींची पेपर कटिंग मनोमन साठवून ठेवणाऱ्या माझ्या सारख्या मित्राला त्याच्या मृत्यूचं जीवघेणं कटिंग बघावं लागेल!

जाताना मला भेटलाच नाही. मला कळेपर्यंत अंत्यसंस्कार ही होऊन गेले होते. आता राहून राहून एकच वाटतंय... जसा लग्नाला न बोलावता गेलो तसा शेवटचे भेटायला ही न बोलवता आलो असतो रे....

तुझा मित्र
चंद्रशेखर कुलकर्णी 
तुझ्यासाठी चंद्या.

Web Title: a friend's open letter to Sachin Tendulkar friend ranji player Vijay Shirke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.