आनंदयात्री
By admin | Published: November 8, 2014 06:27 PM2014-11-08T18:27:55+5:302014-11-08T18:27:55+5:30
सदाशिव अमरापूरकर एक कलावंत म्हणून जितके मोठे होते, तितकेच वडील म्हणून घराचा आधारस्तंभ होते. मुलींना संस्काराचे बाळकडू देतानाच स्वत:च्या पायावर उभं राहण्याची धमकही तेच देत होते. जगण्यावर मनापासून प्रेम करणार्या बाबांच्या मुलीने जागवलेल्या आठवणी..
Next
- रिमा अमरापूरकर
बाबांच्या अंगा-खांद्यावर खेळत मी लहानाची मोठी झाले. मी घरातलं शेंडेफळ. आमचं अवघं आयुष्य भरून पुरून उरतील इतक्या त्यांच्या आठवणी आहेत. त्यांनी दिलेली शिकवण, त्यांची जीवनविषयक मूल्यं, त्यांच्या सहवासातून आम्ही तिघी आणि आई जे शिकत-उमजत-समजत गेलो, त्यांनी आम्हाला दिलेले ते सारे संस्काराचे संचित न संपणारे आहे. म्हणून आज बाबा जाऊन चार दिवस झालेत, तरी ते सतत आमच्यातच आहेत, ही भावना मनात आहे.
बाबांना पडद्यावर सगळ्यांनी नेहमीच पाहिलं. त्यांच्या भूमिकांविषयी, त्या त्यांनी जशा साकारल्या, त्याविषयी भरभरून बोललं गेलंय; पण पडद्याआड ते एक व्यक्ती म्हणून किती संवेदनशील होते, हे त्यांच्या अतिशय निकटच्या लोकांनाच ठाऊक आहे.
बाबा प्रत्येकाची अडचण जाणून घेत, बारीकशा घटनेनेही व्यथित होत. महाराष्ट्रातल्या अनेक बर्या-वाईट घटनांचा परिणाम त्यांच्यावर होत असे. आमच्याशी ते बोलत, त्यावर चर्चा करत. घटनेपासून आपण काय बोध घेतला, काय घ्यायला पाहिजे, यावर ते बोलत. अभिनय त्यांच्या रक्तातच होता. त्यातून त्यांनी पैसाही कमावला; पण ते ग्लॅमर, प्रसिद्धी, पैसा या सर्वांच्या कधीही आहारी गेले नाहीत. अभिनयाचा मुखवटा उतरवला, की ते आमचे बाबा होत. चित्रपटसृष्टीत कुटुंबात रमणार्या व्यक्ती कमी दिसतात; कारण हा व्यवसायच खूप वेळ घेणारा आहे; पण बाबा सवंगतेपासून, अनावश्यक प्रसिद्धीपासून कायम दूर राहिले. त्याऐवजी ते कुटुंबात रमले.
बाबा खूप पुरोगामी विचारांचे होते. ते जसे बोललेत, तसेच ते वागलेत. समाज म्हणतोय म्हणून एखादी कृती त्यांनी केली, असंही कधी झालं नाही. जे मनाला पटलं, भावलं, तेच त्यांनी केलं. हाच वसा जीवनभर पाळला. आपलं मत समोरच्यासाठी अनुकूल ठरो वा प्रतिकूल, पण ते निर्भिडपणे समजावून देण्याची त्यांची क्षमता, तसेच हातोटी होती. खूपशा चळवळींत ते पूर्ण ताकदीनिशी उभे राहत, झोकून देऊन समाजासाठी-वंचितांसाठी ते अखेरच्या क्षणापर्यंत काम करत राहिले. ग्लॅमर-पैसा-मान-मरातब या त्रिसूत्रींत अडकलेले इथले दिग्गज आम्ही पाहत आलोय. त्या पार्श्वभूमीवर बाबांची वागणूक अगदीच टोकाची होती. त्यांच्या अवघ्या व्यक्तिमत्त्वात साधेपणा होता. आपल्या मातीची, माणसांची ओढ होती. त्यांचे प्रश्न सुटावेत म्हणून केलेले शर्थीचे प्रयत्न असं रसायन होतं. बाबा प्रवाहाविरुद्ध जाणारे होते. आम्ही तिघी बहिणी- सायली, केतकी आणि मी. सायली मानसशास्त्रज्ञ आहे, केतकीने एमएसडब्ल्यू केलंय. ती माहितीपट बनवते, स्वयंसेवी संस्था चालवते. प्रामाणिकपणाने वागा, जगा, हे सारं त्यांनी बोट धरून न शिकवताही आम्हाला शिकवले.
आमच्या घरांमध्ये- मुंबई, पुणे आणि नगरला बाबांनी भौतिक सुखं विकत घेण्यापेक्षा अफाट पुस्तकं विकत घेतली. आमच्या घरी किमान दहा ते अकरा हजार पुस्तकांचा संग्रह सहज आहे. पुस्तकं त्यांनी वाचनालयातून किंवा कुणाकडून उसनी आणली नाहीत. एखाद्या पुस्तकाचे प्रकाशन झाले, की ते पुस्तक ते विकत घेत. शोषितांचे प्रश्न सोडवण्यात ते तत्पर असत, वाचनाचा जबर व्यासंग होता. आम्हा लेकींना घडवण्यात आमच्या आईसह बाबांचेही योगदान फार मोठे आहे.
अभिनयातून मिळणार्या पैशांवर त्यांनी आवश्यक त्या सुखसोयी घेतल्या; पण पैशांचं मोल प्रथम आम्हाला समजावून दिलं. बाळांनो, ही सुखलोलुपतेची साधनं ऐहिक समाधान देणारी, या वस्तू घेण्यासाठी आज आपल्याकडे पैसा आहे; पण हेही लक्षात घ्या, या वस्तूंशिवायही जगता आलं पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, हवा यांखेरीज कुठल्याही भौतिक सुख-साधनांपासून तुम्हाला जगता आलं पाहिजे, हे त्यांनीच मनावर बिंबवलं. आमच्यात बळ निर्माण केलं, ते त्यांनीच. अमुक व्यक्ती-तमुक गोष्ट तुमच्याकडे नसली, तरी भागवता आलं पाहिजे, इतका आत्मविश्वास त्यांनी सतत जागवत ठेवला. ज्या घरात पुस्तकांच्या शेल्फपेक्षा घरातला टीव्ही मोठा असेल, तर त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, असं ते गमतीने म्हणत. पुस्तक वाचल्याखेरीज त्यांना झोप लागत नसे. ललित, अनुवादित, आत्मचरित्र, माहितीपर, ऐतिहासिक अशा सगळ्या प्रकारच्या पुस्तकांचा खजिना त्यांनी जोपासला आणि हाच आमचा वारसा आहे.
मलादेखील दिग्दर्शन-निर्मिती करावी, ही प्रबळ इच्छा होती. मी निर्माण केलेल्या
पहिल्या सिनेमाला खूप चांगलं यश मिळालं. बाबांनी शक्य होईल तेवढी मदत केली; पण ही फिल्म मी करण्याआधी तब्बल आठ वर्षे माझं ट्रेनिंग चालू होतं. तू जर टक्केटोणपे खाऊन घडलीस, तर त्याचा आनंद मला अधिक होईल; कारण सोनं तापल्यावर अधिक निखारतं. तुझ्या कारकिर्दीसाठी मी शिडी होणं, या क्षणाला कठीण नाही मला; पण स्वकर्तृत्वावर स्वत:साठी राजमार्ग घडवणं तुझ्या उज्जवल यशासाठी कायम श्रेयस्कर असेल, असं सांगून त्यांनी मला घडवलं. असे माझे बाबा वात्सल्य-प्रेम-कर्तव्याने भारलेला एक वटवृक्ष होता. त्यांनी सामाजिक बांधिलकी मानली आणि अखेरच्या श्वासापर्यंत निभावली. जीवनातल्या बर्या-वाईट घटनांसह त्यांचा स्वीकार करणारे, जगण्यावर मनापासून प्रेम करणारे बाबा आमच्यासाठी आनंदयात्री होते. जीवनातील शाश्वत मूल्यांची चिरंतन ठेव त्यांनी आमच्यासाठी ठेवलीय, जी आम्ही कायम जपणार आहोत.
(लेखिका सदाशिव अमरापूरकर
यांच्या कन्या आहेत.)
शब्दांकन : पूजा सामंत