सगळ्या धर्मांना कवेत घेणारे, मनुष्य धर्म शिकवणारे ‘गांधी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 06:00 AM2018-09-30T06:00:00+5:302018-09-30T06:00:00+5:30

ते हिंदू होते, ख्रिश्चन होते, मुस्लीम धर्मातील प्रार्थना म्हणणारे होते, बौद्ध, जैन व शीख याही धर्मांविषयीच्या त्यांच्या र्शद्धा मोठय़ा होत्या. ते सगळ्य़ा धर्मांना कवेत घेणारे होते की कोणताही एक धर्म त्यांची सारी धारणा करायला अपुरा होता?

Gandhi who teach lesson of humanity to world | सगळ्या धर्मांना कवेत घेणारे, मनुष्य धर्म शिकवणारे ‘गांधी’

सगळ्या धर्मांना कवेत घेणारे, मनुष्य धर्म शिकवणारे ‘गांधी’

googlenewsNext
ठळक मुद्देयेत्या 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीवर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्त...

-सुरेश द्वादशीवार

 

गांधीजी  स्वत:ला सनातनी हिंदू म्हणवून घेत. सामान्यपणे सनातन या शब्दाचा समाजात रूढ असलेला अर्थ ‘अनादिअनंता’सारखा प्राचीन, कर्मठ, अचल व अविभाज्य निष्ठा सांगतो. त्या अर्थाने गांधीजी सनातनीच होते. त्यांची निष्ठा धर्मपूर्व, धर्मोत्तर व धर्मबाह्य अशी होती. प्रत्येकच वर्तमान धर्माची जन्मतिथी व काळ सांगता येतो. इस्लाम हा नव्याने जन्माला आलेला धर्म 612 मध्ये जगात अवतरला. ख्रिश्चन धर्म येशू ख्रिस्तासोबत जगात आला. बुद्ध व जैन हे धर्म अनुक्रमे गौतम बुद्ध व महावीर यांच्या काळात उदयाला आले. हिंदू धर्माचा कोणता एक संस्थापक वा मूळ ग्रंथ सांगता येत नसला तरी प्राचीन काळात तो वैदिक धर्म या नावाने ओळखला जात असे. त्यामुळे वेदांचा आरंभ काळ हा या धर्माचाही जन्मकाळ म्हणता येतो. महाभारतात व्यासांनी वेदांचे संपादन केल्याचे म्हटले आहे. ते खरे मानले तर तोपर्यंत किंवा त्याच्या आधीच्या काही काळापर्यंत त्याचा इतिहास नेता येतो. वेदांमध्ये ऋग्वेद हा पहिला वेद आहे व त्यात मंडले आहेत. शिवाय या मंडलातील प्रत्येक ऋचेच्या आरंभी तिच्या रचयित्या ऋषीचे नाव आहे. या ऋषींचा जन्मकाळ व जीवनकाळ इतिहासाला अजून ज्ञात व्हायचा आहे. तो झाला तर हिंदू धर्माची जन्मतिथीही हाती येऊ शकेल. 

मात्र धर्म असे ऐतिहासिक असले व त्यांचा काळ, क्षेत्र, त्यातली दैवते व पूज्यस्थाने सांगता येत असली तरी मूल्यांचे आरंभ कधी कोणाला सांगता येणार नाहीत. त्यांचा शेवटही कोणी भविष्यवेत्ता सांगू शकणार नाही. सत्य, अहिंसा, असंग्रह, त्याग, नीती, माणसांनी माणसांशी माणसांसारखे वागावे ही प्रवृत्ती यांना केवळ इतिहास नाही, वर्तमान नाही आणि भविष्यकाळ हाही त्याचा अखेरचा काळ असणार नाही. ती माणसांना ज्ञात असलेल्या व नसलेल्या काळात होती आणि यापुढे येणा-या काळातही ती राहणार आहेत. या अर्थाने धर्मांचे सनातनत्व बाधित तर मूल्यांचे अबाधित आहे. या अर्थाने मूल्ये हीच खरी अनादिअनंत आहेत. त्यांना संघटित धर्ममान्य जन्मकाळ, उदयकाळ, वाढ व विस्तारकाळ आणि अंतकाळ नाही. जोवर माणूस ही जात जिवंत आहे आणि याआधी होती तोवर ती राहिली आहेत आणि राहणार आहेत. या मूल्यांचे स्वरूप विधायक व मानवी जीवनाला सहाय्यभूत ठरणारे आणि त्याला उन्नत करणारे आहे. गांधीजींचे सनातनत्व या मूल्यांच्या धर्माशी निगडित आहे. 

गांधींना गीता हा त्यांचा प्राणग्रंथ वाटत आला. शिवाय ते कुराणातील प्रार्थना म्हणत आणि त्या म्हणवून घेत. त्यांना येशूची पठारावरची प्रवचने मुखोद्गत होती. शिवाय बौद्ध, जैन आणि शीख धर्माच्या प्रार्थनाही त्यांच्या श्रद्धेचा व आवडीचा भाग होत्या. अशा माणसाला कोणताही एक संघटित धर्म मान्य होणारा नसतो. त्यात त्याची धारणा पूर्ण होणारीही नसते. 

गांधी हिंदू होते, ख्रिश्चन होते, मुस्लीम धर्मातील प्रार्थना म्हणणारे होते, बौद्ध, जैन व शीख याही धर्मांविषयीच्या त्यांच्या श्रद्धा मोठय़ा होत्या. ते सगळ्या धर्मांना कवेत घेणारे होते की कोणताही एक धर्म त्यांची सारी धारणा करायला अपुरा होता? जगातल्या सर्व धर्मांना कवेत घेणारा आणि तरीही उरून मागे राहणारा आणखी एक धर्म आहे व तो         ख-या अर्थाने अनादिअनंत व सनातनही आहे. त्याचे नाव, मनुष्यधर्म.. हा धर्म संघटित धर्मांच्या आधी होता, त्यांच्या वर्तमानासोबत आहे, भविष्यातही तो तसा राहील आणि त्यांच्या शेवटानंतरही शिल्लक असेल. गांधीजींचे सनातनत्व या धर्माशी जुळले होते. म्हणून ते प्रत्येक धर्माचे होते आणि कोणत्याही एका धर्मात न सामावणारे होते.
जगातले सर्वधर्म सा-या मानवजातीच्या कल्याणाचे स्वप्न सांगत आले  असले तरी त्यांच्या भौगोलिक मर्यादा आता निश्चित झाल्या आहेत. इतिहासात त्या बहुदा युद्धामुळे तर कधी प्रसारांमुळे वाढत होत्या. त्यांचा तसा विस्तार आता थांबला आहे. परिणामी धर्मांची शिकवण त्यांच्या अनुयायांपुरतीच र्मयादित राहिली आहे. परिणामी एकही धर्म जागतिक राहिला नाही वा होऊ शकला नाही आणि त्याला सार्‍या मानवजातीला कवेतही घेता आले नाही. या स्थितीत सा-या मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणारी माणसे, मग ती संत असोत वा तत्त्वज्ञ कोणत्या धर्माच्या कुंपणात अडकवून ठेवता येतील?

धर्मांचा इतिहास हा केवळ संस्कारांचा नाही, तो रक्तपाताचाही इतिहास आहे.. या युद्धांत कोट्यवधींच्या संख्येने माणसे मारली गेली. ही युद्धे केवळ दोन धर्मातलीच नव्हती. एकाच धर्मातल्या विविध पंथातलीही होती. मुसलमानांत सुन्नी विरुद्ध शिया, हिंदूत शैव विरुद्ध वैष्णव आणि ख्रिश्चनात कॅथलिक विरुद्ध प्रोटेस्टंट अशीही ही युद्धे होती. युद्धांचा इतिहास, त्याचेच वर्तमान व तेच भविष्य असणार्‍या संघटित धर्मात गांधी वा कोणताही अहिंसेचा उपासक कसा सामावेल? इंग्रजांच्या राखेतून आलेले स्वराज्यही मला नको असे म्हणणारा गांधी धर्मयुद्धाची वा संघटित धर्माची भाषा कशी बोलेल? त्याला सारीच युद्धे अधर्माधिष्ठितच वाटत असणार.

धर्मांच्या इतिहासाएवढाच त्यांच्या धर्माधिकार्‍यांचा, पुरोहितांचा, गुरुंचा व अधिका-याचा इतिहासही फारसा वाखाणण्याजोगा नाही. आपले वैदिक ऋषीमुनी कसे होते हे त्यांची चरित्रे पाहिली की यांनी धर्म सांगावा काय, असा प्रश्न आपल्याला पडावा. पोप आणि पुरोहितांच्या कहाण्याही नेहमीच फारशा  उज्ज्वल  राहिल्या नाहीत. मुल्ला मौलवींची सारी चरित्रेही नेहमीच वंदनीय राहिली नाहीत.. 

परधर्माची माणसे मारणे, जाळणे, त्यांच्या संपत्तीची लूट करणे, त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार करून त्यांच्या ठायी संतती उत्पन्न करणे यासारख्या आज्ञा करणारे धर्म जगात आहेत. त्यांना धर्म कसे म्हणायचे आणि ते सांगणा-याना धर्मगुरु तरी का म्हणायचे असा प्रश्न वर्तमानाला पडावा.. पण इतिहासात व त्यातही धर्मेतिहासात डोकावण्याची आपली वृत्ती फारशी प्रबळ नाही. त्यामुळे याही परंपरांचे आपण वारस आहोत, याचे भान वर्तमानाला नाही. अशावेळी एखादा माणूस यातले सत्य सांगतो वा न सांगता नाकारतो तेव्हा तो परंपरेचा अपमान करीत नाही. तो तिचे शुद्धिकरण करीत असतो. तो कधी सॉक्रेटिसच्या रूपाने जगात येतो, कधी बुद्धाच्या, कधी ज्ञानदेवाच्या, कधी कोपर्निकसच्या, कधी तुकोबारायाच्या, कधी जोतिबाच्या तर कधी गांधीच्या. 

एक गोष्ट धर्माच्या बाजूने सांगता येणारी आणि ती गांधींनाही मान्य होणारी आहे. सगळ्या धर्मातली नीतिमूल्ये माणसांची धारणा करणारी असतात. सत्य, अहिंसा, बंधुत्व या गोष्टी सर्वच धर्मांंच्या शिकवणीत आहेत. नीतीही सारेच धर्म सांगतात. आपत् धर्माची सोयही सा-यात आहे. सर्वच धर्मात ऋषीमुनी, संत व धर्मात्मे झाले. त्यांनी मनुष्यधर्माचा आग्रह आपल्या धर्माच्या र्मयादेत राहून केला. आपल्याकडील संतांच्या परंपरा, मुसलमानांमधील सुफी संप्रदाय, ख्रिश्चनांमधील सेवेला वाहून घेणा-या थोरांच्या परंपरा यांची शिकवण हिंसेची नाही, माणुसकीची आहे. स्नेहभाव व सहजीवनाची आहे. मात्र ती कोणत्याही एका धर्माची नाही. ती सर्वच धर्मांची आहे. गांधींचे संतत्व या परंपरांशी नाते सांगणारे व म्हणून सर्वच धर्मातील मानवतावादी शिकवणीचा स्वीकार करणारे आहे. त्यांचा ‘ईश्वर अल्ला’ त्यातून आला आणि गीतेतील शिकवण आणि येशूच्या पठारावरील प्रवचनांचे त्यांना जाणवलेले साधर्म्यही त्यातून आले. गांधी जेव्हा सर्वधर्मसमभाव म्हणतात तेव्हा सर्वधर्मातील या माणुसकीच्या शिकवणीतील साम्य सांगणारा विचार असतो. 

गांधीजी जेव्हा धर्म म्हणतात, तेव्हा त्यांच्या धर्माचा खरा अर्थ नीती हा असतो. नीती सर्व धर्मांंनीच सांगितली. पण तेवढय़ावर ते थांबले आहेत. संघटित धर्मांंनी आपले प्राबल्य वाढवायला अनीतीचा व हिंसेचा आधार घेतला. विषमतेची बाजू घेतली, स्त्रियांवरील अन्यायाला सामाजिक प्रतिष्ठा देण्याचे काम केले. गांधींना सर्वधर्मातील नीतीचा भाग मान्य तर त्या व्यतिरिक्त असणारा अन्य भाग अमान्य होता.. म्हणून गांधी सर्व धर्मांंचे होते आणि त्याचवेळी कोणत्याही एका संघटित धर्माचे नव्हते. 

..सॉक्रेटिसचा धर्म कोणता, अँरिस्टॉटल कोणत्या धर्माचा अनुयायी होता? त्यांच्या काळात ख्रिश्चन धर्माचा उदयही व्हायचा होता. पण ती ज्ञानी व जाणती माणसे होती. त्यांची नीतिमूल्ये धर्मपूर्व तर गांधींची नीतिमूल्ये धर्मव्यवस्थेच्या स्थायिकरणानंतरची होती. वास्तव हे की सगळ्याच धर्मात चांगली व वाईट माणसे झाली. तेच गुण त्यांच्या ईश्वरातही होते. यातल्या वाईटाची वजाबाकी आणि चांगल्याची बेरीज हा मनुष्यधर्माचा भाग आहे. या भागाचा संबंध आधुनिकतेशी आहे आणि तो धर्म कालसंगतही आहे. गांधी या धर्माचा प्रतिनिधी, प्रवक्ता व प्रसारक होता. 

(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे  संपादक आहेत.)

 

Web Title: Gandhi who teach lesson of humanity to world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.